कुलुपबंद अनुभव !

कुलुपबंद अनुभव !

वर्ष संपतंय, करोनाचे भयही कमी होतंय, हे चांगलंच. पण करोना आल्यानंतर घाईघाईनं लॉकडाऊन सुरू झालं, त्यामुळं सामान्य माणसाची अवस्था, मनात येणारे विचार यासंबंधीचे हे पुस्तक. या आहेत नोंदी. लॉकडाऊन होण्यापूर्वीपासूनच्या ते अनलॉकिंग सुरू झाले, त्या काळातल्या. तशी डायरीच. पण बरंच काही असलेली. 17 मार्च ते 31 जुलै या काळात जे आजूबाजूला घडत होतं, त्याच्या नोंदी. त्या अनुषंगानं मनात येणारे विचार, प्रश्न, असहायता, वेदना, संताप, तोंडावर हसू आणणारे व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठातले मेसेज, आणि जाणकारांच्या लेखांतील महत्त्वाचे मुद्देही.

या नोंदी एका पत्रकार महिलेच्या आहेत, हे तर खरंच, त्यामुळं या काळात तिला गृहिणी, आई अशा भूमिकाही कराव्या लागताहेतच, तशा नेहमीच्याच पण आता पर्यायच नाही. कधी भावुक, कधी बोचर्‍या, कधी हताशपणा तर कधी चीड अशा सर्वप्रकारच्या भावना या नोंदींमध्ये आहेत. अनेकांना वाटेल की, अरेच्चा! हेच तर आपल्याला वाटत होतं, आपण बोलत होतो, हिला कसं बुवा कळलं? तिच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंटसबाबत तर असे विचार तीव्रतेनं मनात येतील.

पुस्तक आहे गौरी कानेटकरांचं. युनिक फीचर्सच्या अनुभव मासिकाच्या संपादक. पत्रकारितेचा दीर्घ अनुभव. मार्चमध्येच रुग्णांची संख्या वाढू लागली. न घडणारं काहीतरी घडतंय असं त्यांना वाटू लागलं. युनिक फीचर्सचे मुख्य संपादक सुहास कुलकर्णी त्यांना म्हणालेः आसपास घडतंय ते अपूर्व आहे. आपल्यासह सर्व जगाला, मानवजातीला व्यापून टाकणारं. याला व्यक्ती म्हणून आपला प्रतिसाद, एक समाज म्हणून त्याला कसे सामोरे जातो, सरकार त्याला कसं तोंड देतं, यांचं डॉक्युमेंटेशन करायची ही संधी आहे. या घडामोडींची जमेल तशी नोंद ठेवणं हे पत्रकार म्हणून आपलं काम. तू लिहितेस का बघ.

तिने नेमकं तेच केलंय. डोळे उघडे ठेवून ती बघते. लेख वाचते, मुलाखती ऐकते, सहकार्‍यांशी, मित्रमैत्रिणीशी बोलते, टी.व्ही., व्हॉटसअ‍ॅपवरील मजकूर, चित्रफिती पाहते. अस्वस्थ होते, आपली असहायताही सांगते. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देणारं, चुुकीची कबुली न देणारं सरकार, केवळ विरोधक, वा योग्य काही सांगणार्‍यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती, त्यानं होणारं नुकसान, तरीही आपलंच खरं हे भक्त-भाटांकडून वदवून घेण्याचा अट्टहास, त्यामुळे येणारी कीव, कधी कुणाच्या वागण्यानं येणारा राग, पण त्याचबरोबर आपण काहीच करू शकत नाही म्हणून वाटणारी खंत, सारं काही आडपडदा न ठेवता सांगते. त्यामुळंच हे सहजशैलीतलं लिखाण आहे. गप्पा मारल्यासारखं. मनापासूनचं. कृत्रिमतेचा लवलेशही नसलेलं. अगदी सच्चं. ते कादंबरीप्रमाणं वाचकाला खेचून नेणारं. केवळ तारखा आहेत म्हणून या नोंदी म्हणायच्या. एरवी पुढं काय असंच कुतूहल वाटतं. या सार्‍यातून आपण गेलेलो असलो तरी! हेच या पुस्तकाचं यश आहे.

लॉकडाऊन 1 मधील एक प्रश्न. ती म्हणते, तसं बघायला गेलं तर कोरोना देशात आणला तो परदेशी गेलेल्या मंडळींनी. उच्चभ्रूंनी. आता त्याची शिक्षा आधीच गांजलेल्या अनेकांना भोगावी लागतेय. उद्या कोरोना त्यांच्यात पसरला तर त्यांची दशा काय होईल हा विचार अंगावर काटे आणणारा. तसं झालं तर दोष कुणाचा? उत्तरही तीच देतेः कुणालाही दोष न देता मुकाट्याने जे नशिबी येईल ते भोगत राहणार ही माणसं.

नंतर ती सांगते की, लॉकडाऊनचे तोटे फक्त गरिबांनाच झालेत असं नाही. कधी कधी आर्थिक ऐपत जितकी जास्त तितका फटका मोठा, तसंच जितका पगार मोठा तितका फटका मोठा. ज्यांनी कर्ज काढून घरं घेतली, ज्यांचे पगार कापले जाताहेत किंवा नोकरीच गमवायची वेळ आलीय, त्यांचा निभाव कसा लागणार. पायी गावी निघालेल्यांच्या हालअपेष्टांकडे हृदयशून्यपणे बघणारे, लोकांना असं का करावं लागतंय याचा विचारही मनात आणत नव्हते. तसं केलं असतं तर येणारं उत्तर त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का देणारंच असणार याची खात्री असल्यानं ? दुसरीकडे कनवाळू आणि शक्य होईल तेवढी मदत करणारेही. अनेकजण गावी पोहोचले. त्यांना गावात येण्याचीच मनाई, बिचारे आगीतून फुफाट्यातच गेलेे.

या काळातही अन्यायाच्या, हिंसाचाराच्या बातम्या होत्याच. अत्याचार करणार्‍यांवर कारवाई होत नव्हती. विशिष्ट लोकांवर आरोप होत होते. काही अर्धसत्य सांगणारे तर काही सरकारच्या धोरणाविरोधात गेल्यानं. रीतीनुसार त्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल. लेखिका म्हणते, लॉकडाऊन म्हणजे प्रश्न विचारायला बंदी, अन्यायाला मोकाट संधी, असे असण्याची गरज नाही, एवढं आपल्याला अमेरिकेतील या (जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर झालेल्या) निदर्शनांवरून आपल्याला कळेल का?

देशात दर हजार लोकांमागे फक्त 0.55 सरकारी बेड उपलब्ध आहेत. म्हणजे हजार लोकांना मिळून अख्खा बेडही नाही, अनेक राज्यांत तर याहूनही कमी आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्याने असा किती फरक पडणार? जनता, कर्फ्यू, टाळ्या-थाळ्या, अंधार करून दिवे लावा, विमानांमधून पुष्पवृष्टी अशा इव्हेंट्सबाबत तिनं कळकळीनं लिहिलंय. तसं अनेकांनीही त्यांच्या फोलपणाबाबत सांगितलं होतं, पण लक्षात कोण घेतो? कुणी त्याबाबत काही बोललं, तर लगेच त्यांच्यावर देशद्रोही शिक्का! त्याबरोबरच या काळातही समाजामध्ये दोन तट पाडण्याचे काम कसे पद्धतशीरपणे होत होते, याची काही उदाहरणेही देते. त्याचे परिणाम कसे भयानक होते, ते सांगताना तिला एकाबाबत टीका, देशद्रोही म्हणणे इ. तर आपल्याच लोकांच्या उत्सवांबाबत चकार शब्दही कसा नाही, याचं आश्चर्य वाटतं! कदाचित सारं हेतूपूर्वकच घडवलं जात असावं अशी शंकाही येते. या काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर, परिचारिका इ. याबाबतची नोंद महत्त्वाची. देशातली, राज्यातली, पुण्यातली रुग्णसंख्या वाढते तशी लेखिका अस्वस्थ होते.

प्रस्तावनेमध्ये सुहास पळशीकर म्हणतात, या लॉकडाऊन नोंदींमधून मध्यमवर्गीय, माध्यम वर्गीय संवेदना ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. या नोंदींचा अर्थ शोधायचा ठरवलं, ही संवेदना ओलांडली, तर मार्च 2020 पासूनचे चारेक महिने भारतात सार्वजनिक विश्वात जे घडलं त्याचा अर्थ लावण्यासाठी, सदर नोंदवही उपयोगी पडू शकते. तसा प्रयत्न करण्याची इच्छा मात्र हवी.

खरं तर हा स्वतंत्र लेखच आहे. त्यांनीच म्हटलंय, ही रूढार्थाने प्रस्तावना नाही, तर बंद पडलेल्या आपल्या भवतालातील काही कुलुपबंद अनुभवांच्या निमित्ताने लिहिलेली प्रतिक्रिया आहे. देश बंद, संवेदना कुलुपबंद आणि चिकित्साही कुलुपबंद! या मथळ्यानंच त्यांनी विचार मांडलेत.

शेवटी लॉकडाऊनचे तीन धडे ते सांगतात. दमनकारी राज्याची दमदार पावलं, संशयी समाजाच्या निर्मितीला हातभार आणि गरिबांच्या हद्दपारीवर झालेलं शिक्कामोर्तब. या संदर्भात पाहिले तर मग चिकित्सेची दारं खुली होतील… लॉकडाऊनमधून काय शिकायचं याचा अंदाज येईल. त्याची आठवण का जागवायची, हे उलगडेल. वाचकांनीच हे मनावर घ्यायला हवं!

जग थांबतं तेव्हा.. लॉकडाऊन काळातल्या नोंदी
लेखिकाः गौरी कानेटकर
प्रकाशकः समकालीन प्रकाशन
पानेः 216, किंमत ः रु. 200/-

First Published on: December 27, 2020 5:50 AM
Exit mobile version