मुलांशी बोला !

मुलांशी बोला !

सामाजिकरणाची प्रक्रिया ही बालपणापासून सुरू होते, ती आयुष्याच्या शेवटपर्यंत…आपण प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकत असतो. त्या गोष्टींचा फायदा आपल्याला वेळोवेळी होतो. बालपणात शिकलेल्या चांगल्या वाईट गोष्टी किंवा आलेला अनुभव सर्वांच्याच लक्षात राहतो. काही पालक मुलांना लहान वयातच अनेक गोष्टींसोबत आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देतात. जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यात वेगळी ओळख मिळावी व अडचणी येऊ नयेत. पण सर्वच बाबतीत पालक पुढाकार घेत नाहीत हा माझा अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जातो. त्यावेळी सहज म्हणून त्यांना लैंगिक शिक्षणाबद्दल विचारतो. तर सोबत आलेले पालक एकमेकांकडे बघतात.

आणि विद्यार्थीसुद्धा स्पष्ट बोलायला घाबरतात. एका महाविद्यालयात तरुणांच्या बाबतीत असाच एक अनुभव आला. गेस्ट लेक्चर सुरू असताना मी विद्यार्थ्यांना सहज प्रश्न विचारला की, तुम्हाला लैंगिक शिक्षणाबद्दल काय माहीत आहे..? त्यावेळी एका विद्यार्थ्याने उत्तर दिले. सर आम्ही ते सोशल मीडियावर आणि इतर वेबसाईटवर पाहतो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, विद्यार्थ्यांशी शिक्षक आणि पालक लैंगिक शिक्षणावर स्पष्टपणे बोलत नाहीत. परिणामी किशोरवयीन मुले मुली आपल्या मोबाईलचा वापर करतात आणि पॉर्नोग्राफीच्या विळख्यात अडकतात. यासाठी शिक्षक स्वतः पुढाकार घेत नाहीत. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाबद्दल पाहिजे ती माहिती देत नाहीत ही दुर्दैवाची बाब.

सामाजिक बंधनं असतात, आपल्या रूढी, परंपरा, प्रथा, संकेत याच्या नावाखाली मुलांसोबत एखाद्या विशिष्ट मुद्यावर पालक संवाद साधत नाहीत. त्यावेळी कुतुहल म्हणून मुले पालकांचा मोबाईल घेऊन त्याबद्दल सर्च करतात. किंवा आता सध्या तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मुलांकडे ऑनलाइन लेक्चरसाठी एक मोबाईल आहे. सोबतच सोशल मीडिया वापराची थोड्याबहुत प्रमाणात मुभा मिळाली. याचाच फायदा मुले घेतात. चांगल्या-वाईट गोष्टी काय आहेत, यापेक्षा त्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा मुलांमध्ये जास्त असते. आणि त्यातूनच वेगवेगळ्या वेबसाईट शोधता-शोधता किंवा मित्रमैत्रिणींकडून माहिती मिळवून ते पोर्नोग्राफीकडे वळतात. नेमका याचाच फायदा फेक वेबसाईट घेतात. सोशल मीडियाचा आधार घेऊन अनेक अल्पवयीन मुला-मुलींना फसवले जात आहे. अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये गुन्हेगार बालकांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढतो. हे सगळे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देतो. आणि पुन्हा पुन्हा जे जाळ्यात अडकले आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो. तंत्रज्ञानाचा आणि पाठीमागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे फेक वेबसाईटवरील लिंकच्या आधारे लैंगिक वासना असणारी विकृती चाईल्ड पॉर्नोग्राफीला उत्तेजन देतात व बालकांचे शोषण करतात.

आपण आपल्या मुलांना याबाबत स्पष्ट बोलत नाही. म्हणून त्याचा फायदा आजूबाजूचे लोक घेतात. लैंगिक क्रियांसाठी बालकाला प्रत्यक्ष स्पर्श न करता त्याच्यावर अत्याचार केले जाऊ शकतात. गुन्हेगार बालकांना अश्लील चित्रीकरण किंवा छायाचित्र दाखवतो. बालकांचा उपयोग या प्रकारच्या चित्रीकरणासाठी केला जातो. या चित्रीकरणाचा व्यावसायिक वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मीडियाद्वारे बालकांचे लैंगिक शोषण होऊ शकतं. यासारख्या अनेक बारीक-सारीक मुद्यांचा समावेश चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या विस्तृत आणि सर्वसमावेशक व्याख्येत केंद्र सरकारने पुढाकार घेऊनच ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेनसेस अमेंडमेंट बिल’ केंद्र सरकारने मंजूर केले. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्याच्या मोबाईलमध्ये लहान मुलांचे लैंगिक हेतूने काढलेले फोटो, व्हिडिओसुद्धा या कायद्यात गुन्हा ठरवला आहे. म्हणजेच याद्वारे मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्याबरोबरच पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना योग्य ते ज्ञान देणे गरजेचे आहे. याचा अंतर्भावसुद्धा या बिलात आहे.

चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या विरोधात अमेरिकेची ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्सापलॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था काम करते. भारतातून अशा ध्वनीचित्रफिती किंवा या संदर्भाचे काही फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर जाहीर करणार्‍या व्यक्तींची तांत्रिक माहिती पुरवण्याबाबत ही संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत मिळून काम करते. संस्थेच्या अहवालानुसार 2020 मार्च अखेर सहाशे प्रकरणे एकट्या मुंबईतील आहेत. ही आकडेवारी तेव्हाची आहे, जेव्हा भारतात टाळेबंदी लागू व्हायची होती. आणि मुलांना मोबाईल वापरास तेवढी संधी नव्हती. अलिकडच्या काळात अशा या प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. एवढेच नाही तर अल्पवयीन मुलींना जाळ्यात अडकवून त्यांना पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. अवघ्या सोळा वर्षाच्या मुलींवर अत्याचार करून कुमारीमाता होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि हे सर्व सोशल मीडियाद्वारे घडून येत आहे.

भारतात 25000 चाईल्ड पॉर्नोग्राफी सोशल मीडियावर आढळून आल्याची धक्कादायक माहिती या संस्थेच्या अहवालात आहे. यासाठी पालकांनी वेळीच सतर्क राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सतराशे प्रकरणांचा समावेश आढळून आल्यानंतर सायबर विभागाने ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ मोहीम हाती घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या आणि अशा प्रकरणांवर वेळीच अंकुश लावला जावा यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महिला व बाल आयोग, न्यायालयीन अधिकारी, सरकारी अधिकारी, सायबर विभाग व इंटरनॅशनल जस्टीस मिशनसारख्या काही संस्था कार्यरत आहेत. आपण किंवा आपला मुलगा-मुलगी काही मजकूर गुगलवर सर्च करतो. त्यावेळी सुरुवातीला आपली डिजिटल प्रतिमा तयार केली जाते. त्याद्वारे आपल्याला जाळ्यात अडकवले जाते. यात महाविद्यालयीन मुला-मुलींचे प्रमाण वाढत आहे. आपल्याशी किंवा आपल्या मुलांशी असे काही घडत असल्यास, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 67 बी (बी) नुसार गुन्हा दाखल केला जातो. शिवाय पॉक्सो कायद्याअंतर्गत सेक्शन 14 नुसार बालकांचा उपयोग पॉर्नोग्राफीसाठी केल्यास त्याला सात वर्षांपर्यंत शिक्षा केली जाते.

भारतात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे प्रकार वाढण्याचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे गरिबी…गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याशी असे गैरवर्तन करून त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून वेगवेगळ्या देशात विकले जातात. त्यांना बदनाम केले जाते.

रोजच्यारोज सोशल मीडियावर आपण अनेक घटना पाहत असतो. ज्या समाजहिताच्या नसतात.आपला पाल्य सोशल मीडियाचा कशाप्रकारे वापर करत आहे. यावर पालकांनी थोडे लक्ष ठेवले पाहिजे. एखादा गुन्हा घडल्यानंतर आपल्याकडे शिक्षेसाठी कायदे आहेत. पण घटना घडते त्यावेळी पालक घाबरलेले असतात. ज्या पालकांसोबत हा प्रकार घडतो त्यावेळी ते सुद्धा दडपणात असतात. आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होणार या भीतीपोटी अनेक बालकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किंवा कायमचे मानसिक दडपण घेऊन मानसिक रुग्ण झाले आहेत. यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर आणि काम झाल्यानंतर त्याने काय सर्च केले. याची थोडीफार हिस्ट्री तपासली व त्या गोष्टींवर मुलांसोबत मनमोकळ्यापणाने बोलले तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल. सोबतच मुलांना तुमच्या अनुभवातून नवीन काही शिकता येईल जे सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा भाग असेल.

-धम्मपाल जाधव
(लेखक युवा विषयाचे अभ्यासक आहेत)

First Published on: December 20, 2020 6:14 AM
Exit mobile version