इंग्लिश नदीकाठी…

इंग्लिश नदीकाठी…

स्थळ, इंग्लंडमधला एक मग्न तळ्याचा काठ, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे, कप्तान आणि उपकप्तान, फक्त दोघंच तिथे बसले आहेत. तळ्याकाठी बारीक बारीक दगड आहेत. पण दोघांना त्यातला एकही दगड पाण्यात भिरकवावासा वाटत नाही. न्युझिलंडशी हरल्याच्या त्यांच्या दु:खाचा पहाडच इतका मोठा आहे की तळ्याकाठच्या ह्या बारीक बारीक दगडांची नोंद त्यांच्याकडून घेतली जाणं शक्य नाही.

आपण कुठे जातो आहोत हे दोघांनी प्रशिक्षक रवी शास्त्रींनाही कळवलेलं नाही. शास्त्रींच्या प्रबोधनाचा मुंबई पॅटर्न अजिंक्य रहाणेला कदाचित पसंत असेल, पण विराट कोहलीला मात्र तो निदान ह्या क्षणी तरी पसंत नाहीय. त्याच्या मते, आता मुंबईचा तो इतिहास स्टान्स घेण्याआधीच बाद झाला आहे. आता रवी शास्त्रींचा तसा त्या दोघांना बर्‍याच वेळा कॉल येऊन गेला आहे. पण त्यांनी तो उचलला नाही. अजिंक्य रहाणे त्याच्या विनम्र स्वभावाप्रमाणे एकदा फोन घेण्यासाठी पुढे सरसावलाही, पण विराट कोहलीने खुणेनेच त्याला फोन न घेण्याचा इशारा केलेला आहे. रवी शास्त्रींचा फोन न घेणं हे सभ्यतेला धरून नाही असं डोळे बारीक करून अजिंक्य त्याला सांगतो आहे. विराट नाकावर बोट ठेवून त्यावर थोडा विचार करतो आहे. विचारांती विराटला अजिंक्यची ती सूचना पटली आहे. पण त्यातूनही त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्याचा मध्यममार्ग निवडला आहे. त्यानुसार, ‘कुछ देर के लिए हमें अकेले पे छोड दो’ असा मेसेज टाइप करून त्याने तो रवी शास्त्रींना धाडला आहे.

‘फार मनाला लावून घेऊ नकोस विराट, आपलं मौन सोड, आपण इथे काही विचारमंथनासाठी आलो आहोत,’ बराच वेळ तळ्यातल्या हिरव्याशार पाण्यात पहात राहिल्यानंतर अबोल, मितभाषी, सालस वगैरे वगैरे वगैरे अजिंक्यने न राहवून तोंड उघडलं आहे.

‘अं?…काय म्हणालास?…मला काही म्हणालास?’ विराट समाधी खाडकन् भंग पावल्यासारखा म्हणतो आहे.
‘हो, तुलाच म्हणालो, तुझ्याशीच मी बोलतोय…म्हटलं, इतकं मनाला लावून घेऊ नकोस, आज एक सामना हातातून गेला म्हणून इतका निराश होऊ नकोस. आपल्या मनगटात जोर आहे, छातीत दम आहे, आपण पुन्हा पहिला नंबर गाठू रे,’ मितभाषी अजिंक्य आपल्या बुजर्‍या बॅटमधून खेळपट्टीवर जरा जास्तच एकेरी-दुहेरी धावा शिंपडतो आहे.
‘प्रश्न मनाला काही लावून घेण्याचा नाही रे…प्रश्न वेगळा आहे,‘विराट त्याच्या मनातला काही वेगळा रहस्यमय मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

‘म्हणजे?…तुला आपल्या पराभवाबद्दल काही वेगळा मुद्दा मांडायचा आहे का?‘ अजिंक्य आपला चेहरा नेहमीप्रमाणे कोरा ठेवत म्हणतो आहे.’
‘तसं नाही रे जिंक्स, ह्या न्यूझिलंडविरूध्दच्या सामन्याच्या आधी तर आपल्या थोरल्या विक्रमवीरांपासून धाकट्या क्रिकेटपंडितांपर्यंत सगळेच आपणच जिंकणार असं ठामपणे म्हणत होते,‘मला त्याचं आश्चर्य वाटतंय,‘ विराट गौप्यस्फोट केल्यासारखं सांगतो आहे.
‘खरंय विराट, मीसुध्दा ह्या सामन्याच्या आधी सगळे पेपर वाचले, सगळ्या पेपरात तू म्हणतोस तसंच छापून आलं होतं. ज्योतिषाच्या रकान्यात नाही, पण ज्याने त्याने आपल्याबद्दल आपलं हेच ज्योतिष मांडलं होतं की आपण त्यांच्यापेक्षा प्रत्येक बाबतीत बलाढ्य आहोत, सामना आपणच जिंकणार!’ अजिंक्य त्याच्या स्थितप्रज्ञ शैलीत म्हणत आहे.

‘…आणि आज मात्र जो तो आपले कान धरतोय,’ विराट आपल्या दु:खाची वेगळी जातकुळी सांगतो आहे.
‘अरे जो तो काय म्हणतो आहेस?…ज्यांनी ज्यांनी आपणच जिंकणार हे भविष्य छातीठोकपणे वर्तवलं तेच आज आपले कान ओढताहेत,’ अजिंक्य कप्तानाच्या मुठीला आपली मूठ लावतो आहे.
‘काय रे जिंक्स, निवडणुकीत, अमक्यातमक्या उमेदवाराच्या विजयाची दाट शक्यता, अशी प्रीपेड बातमी छापतात ती पूर्वी बघायचो मी,‘विराट आपली एकच भुवई खूप उंचावतो आहे आणि अजिंक्यला प्रश्न करतो आहे.’
‘मी पण बघितल्या आहेत तशा बातम्या विराट, पण इथे तर आपल्याकडल्या ज्योतिषांची भाकितं खोटी ठरली आहेत…आणि वर आपला खेळ पण झाला नाही, आपला बेफाम सुटलेला अश्वमेधसुध्दा रोखला गेला आहे,’ अजिंक्य विराटला समजावण्याचा सुरात समज देण्याचा प्रयत्न करतो आहे.
‘त्यात तुझ्या बॅटचा फटाका भिजलेला आणि माझ्या बॅटला सायलेन्सर लागलेला, पण तरीसुध्दा ह्या ज्योतिषांच्या भाकितांनी आपल्या दंडात दहा जिमची ताकद आली होती, आपल्यातल्या प्रत्येकाची बेटकुळी फुगली होती, म्हटलं, सामना कधीही आपल्या बाजूने होऊ शकतो,‘विराट बोलता बोलता खुलासा करून चुकला आहे.’
‘मग आपण जो खेळ केला तो आपल्या रणनीतीनुसार की आपल्या क्रिकेटपंडितांच्या भाकितानुसार?’ अजिंक्य अजाणतेपणे प्रश्न विचारतो आहे.
…आणि विराट जाणतेपणी पुन्हा मौनात गेला आहे.

First Published on: July 4, 2021 3:30 AM
Exit mobile version