डिजिटल ‘न्यूज सायकल’च्या निमित्ताने

डिजिटल ‘न्यूज सायकल’च्या निमित्ताने

डिजिटल माध्यमांमध्ये सगळं काही नंबर्सवर अवलंबून आहे. तुमच्याकडे नंबर्स असतील तर तुम्हाला या इकोसिस्टिममध्ये किंमत आहे. तुमच्या बातम्या सोशल मीडियावर शेअर होत असतील, युजर्स त्यावर कमेंट करत असतील, गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये तुम्हाला रँकिंग मिळत असेल, तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम लक्षात ठेवून लोक थेटपणे तुमच्याकडे येत असतील तर तुम्हाला महत्त्व असते. तुम्ही खूप चांगला आशय देत असला आणि तुमच्याकडे नंबर्स नसले, तर तुम्हाला फार कोणी विचारत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही पद्धत रुढ होऊनही काही वर्षे झाली आहेत. याच नंबर्सच्या पाठीमागे सगळे लागले आहेत. ज्यांच्याकडे नंबर्स आहेत ते आणखी वाढविण्यासाठी आणि ज्यांच्याकडे नंबर्स नाहीत ते नव्याने मिळवण्यासाठी प्रयत्न करताहेत. डिजिटल माध्यमात असलेल्या प्रत्येकाचे एकच लक्ष्य टार्गेट पूर्ण करणे. टार्गेट पूर्ण झाले तरच नोकरी राहील, टार्गेट पूर्ण झाले तरच पगार वाढेल, टार्गेट पूर्ण झाले तरच प्रमोशन मिळेल, टार्गेट पूर्ण झाले तरच वगैरे वगैरे…

आता हे टार्गेट फक्त डिजिटल माध्यमातच आहे असे मुळीच नाही. टार्गेट प्रत्येक ठिकाणीच आहे आणि ते असलेही पाहिजे. पण त्या टार्गेटच्या किती आहारी जायचे हे पण ठरवले पाहिजे. केवळ टार्गेट एके टार्गेट एवढाच उद्देश ठेवून काम करून चालणार नाही. कधी कधी त्यापलीकडे जाऊनही विचार केला पाहिजे. टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात आपण आपल्या वाचकांपासूनच दूर होत नाही ना, हेसुद्धा बघितले पाहिजे. याच टार्गेटच्या नादात डिजिटलमध्ये एक ‘न्यूज सायकल’ तयार झालं आहे. प्रत्येक घटनेनंतर किंवा ब्रेकिंग न्यूजनंतर याच ‘न्यूज सायकल’चा वापर करून बातम्या तयार केल्या जातात. अनेकवेळा केवळ ‘न्यूज सायकल’च्या पायी नको त्यांना प्रसिद्धी दिली जाते तर कधी अत्यंत तकलादू माहितीला रंगवून सांगितले जाते.

‘न्यूज सायकल’ समजून घेण्यासाठी एक काल्पनिक उदाहरण बघूया. एखाद्या अभिनेत्रीवर कोणीतरी शाई फेकली अशी ‘ब्रेकिंग’ आली की लगेच डिजिटल माध्यमांच्या न्यूजरुममधील ‘न्यूज सायकल’ कार्यरत होते. डिजिटलमध्ये अशा प्रसंगी फक्त एक बातमी करून चालत नाही तर एकापेक्षा जास्त बातम्या करणे अपेक्षित असते. यातूनच मग याच विषयाशी संबंधित बातम्या एकामागून एक तयार केल्या जातात. मूळ बातमी आहे अभिनेत्रीवर शाई फेकली.

त्यानंतर दुसरी बातमी अशी होईल की शाई फेकण्यामागे कोणती कारणे असू शकतात, तिसरी बातमी अशी होईल की अभिनेत्रीने गेल्या महिन्याभरात सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक कार्यक्रमात केलेली वादग्रस्त वक्तव्ये कोणती, चौथी बातमी अशी होईल की शाई फेकणारा कोणत्या प्रांतातील आहे किंवा तो कोण आहे, पाचवी बातमी अशी होईल की या घटनेनंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, सहावी बातमी अशी होईल की राजकीय नेत्यांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, सातवी बातमी अशी होईल की घटनेनंतर त्या अभिनेत्रीची भेट घेण्यासाठी कोण कोण तिच्या घरी गेले, आठवी बातमी अशी होईल की त्या अभिनेत्रीची या संपूर्ण प्रकाराबद्दल काय प्रतिक्रिया आहे, नववी बातमी अशी होईल की पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणात आरोपीला किती शिक्षा होऊ शकते, दहावी बातमी अशी होईल की गेल्या वर्षभरात किती सेलिब्रिटींवर शाई फेकण्यात आली, त्याची कारणे काय होती, या शिवाय घटनेचे व्हिडिओ, विश्लेषण असेही वेबसाईटवर आणि पुढे सोशल मीडियावर जाईलच.

मूळ बातमी आल्यानंतर पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये ‘न्यूज सायकल’मधील इतर बातम्या गेल्या पाहिजेत. परत हे सगळं करताना संपादकीय विभागात ‘सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन’ करणारी जी टीम बसलेली असते, ती सुद्धा बातम्यांचे काही वेगळे विषय सुचवत असते. ‘गुगल’वर लोक नक्की काय शोधताहेत हे बघून त्यांच्याकडून विषय सुचवले जातात. मग त्या विषयांवर संपादकीय विभागाला काम करावे लागते.

मूळ घटनेशी संबंधित विविध बातम्या करण्यामध्ये गैर काहीही नाही. पण त्या करताना अनेकवेळा माहिती पडताळून पाहणे, खातरजमा करणे वगैरे बाजूला ठेवले जाते. न्यूज वेबसाईटमध्ये चढाओढ सुरू होते. एखाद्याने पहिल्यांदा बातमी दिली आणि त्याची बातमी सोशल मीडियावर वाचली जाऊ लागली, असे दिसताच इतर वेबसाईट त्यावर तुटून पडतात. काहीवेळा तीच माहिती अजून रंगवून सांगितली जाते. दोन हजार रुपयांची नवी नोट आली त्यावेळी याच प्रकारातून त्या नोटेमध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोचीप बसविण्यात आली आहे. ज्यामुळे ही नोट कुठे आहे, हे समजू शकते वगैरे बातम्या काही माध्यमांमध्ये देण्यात आल्या. खरंच तसे आहे का वगैरे काहीच बघितले गेले नाही. एकाने केले की दुसर्‍याने हाच प्रकार. शेवटी असे काही नाही कळल्यावर याच माध्यमांनी स्वतःचे हसे करून घेतले.

या ‘न्यूज सायकल’मध्ये शीर्षकांना खूप महत्व असते. कारण या बातम्यांच्या माध्यमातून वेबसाईटवर जे वाचक येतात त्यात सर्वात आधी सोशल मीडियाचा समावेश असतो. सोशल मीडियावर तुमच्याकडे चांगले ‘फॉलोईंग’ असेल तर अशा बातम्या तिथे शेअर केल्यावर लगेचच वाचल्या जाऊ लागतात. त्यामुळे तुमच्या साईटवर लगेचच वाचक यायला सुरुवात होते. बातमी वाचली जाते आहे की नाही हे सर्वात आधी याच माध्यमातून समजते. त्यासाठीच मग शीर्षकांच्या माध्यमातून कुतूहल निर्माण केले जाते. शीर्षक किती हटके करता येईल. ते कसे क्लिकबेट असेल याचा विचार आधी केला जातो.

साईटवर खूप सारे वाचक येऊ लागले आहेत हे गुगल अ‍ॅनॅलिटिक्सच्या माध्यमातून समजू लागते. आधी हजारो, मग लाखो आणि नंतर मिलियनच्या दिशेने आलेख वर जाऊ लागतो. पण या सगळ्यामध्ये एका आकड्याकडे दुर्लक्ष होते. संबंधित वेबसाईटवर वाचक वाचण्यासाठी किती वेळ देतात. वेबसाईटचा ‘अ‍ॅव्हरेज सेशन ड्युरेशन’ किती आहे बघितलेच जात नाही. कारण तो आकडा हळूहळू विरुद्ध दिशेने खाली जाऊ लागतो. वेबसाईटवरील आशय वाचण्यासाठी एक मिनिटही वाचक थांबत नाही, असे दिसते. पण या आकड्याकडे बघतो कोण? समोर टीव्हीवर दुसरी ब्रेकिंग न्यूज आलेली असते आणि डिजिटलमध्ये नवी ‘न्यूज सायकल’ कार्यरत होण्याच्या दिशेने पाऊले पडायला लागलेली असतात.

First Published on: October 10, 2021 3:15 AM
Exit mobile version