स्वप्नामधील गावा…

स्वप्नामधील गावा…

मानवी मनाची सहज, स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजे स्वप्न पहाणे. माणसे स्वप्ने पहात आली. स्वप्नांच्या सोबत जगत आली. स्वप्न माणसांना निरागस बाळाच्या हास्याप्रमाणे हसवतात, रडवतात, कधी कधी अंगाराच्या रुक्ष खाईत लोटूनही देतात. स्वप्नांचा बळी जाणे भयंकरच असते. त्याच्या सफलतेला नि विफलतेलाही एक किनार लाभते. विफल स्वप्नेही कधी कधी अधिक ध्येयप्रवण करून यशाच्या राजद्वारात आणून सोडतात. स्वप्ने जगण्याची प्रेरणा देतात आणि त्यामागे धावायला लावतात, माणसाला क्रियाशील बनवतात.

माणूस नेहमीच भूत, भविष्य आणि वर्तमानाच्या त्रिमितीत जगत असतो.. वर्तमानाच्या पाऊलवाटेवरून माणसाचे मन भविष्यातील प्रशस्त मार्गाचे स्वप्न रंगवत असते. अशा स्वप्नांनी भारलेले डोळे काहीतरी सांगत असतात, बघत असतात, बोलत असतात. त्या डोळ्यात उत्साह असतो, चमक असते, काही तरी करण्याची धमक असते. भविष्यातील विविधरंगी स्वप्नांची आभा तिथे जाणवत असते. उलट स्वप्नहीन डोळे काहीतरी हरवल्यागत निराशेच्या कोरड्या काठावर उभे असतात.
स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमारेषा खूप धूसर, निसरड्या असतात. अशा स्वप्नांच्या गावी पोहचणे सर्वानाच साध्य होते असेही नाही. यात अनेकांचे आयुष्य पणाला लागते. अशा वेळी माणूस हतबल होतो. हरवून बसतो. ज्यांच्या प्रेयस स्वप्न कहाणीला वास्तवाचे श्रेयस लाभते त्या माणसांचे मन आनंदाचे डोही डुंबून जाते. या परिपूर्तीने त्याला आकाश ठेंगणे होते.

त्या क्षणाला भोवतालचा विसर पडतो. पण उलटे झाले तर…? स्वप्नभंगाची जखम गहरी असते. काही कणखर माणसे ती भोगतातही. परंतु पुन्हा थकल्या पावलांनी ती चालायला लागतात. थबकतात; पण थांबत नाहीत. आयुष्याचा, स्वप्नांचा मार्ग बदलतात. काहींना हे साध्य होत नाही. या दु:खाने काही माणसे आयुष्याचा प्रवासच थांबवतात. किती साधे प्रश्न असतात त्यांचे? परीक्षेत मार्क कमी पडले, एका मार्कावरून प्रवेशाचा नंबर चुकला, मुलाखतीत नाकारले गेले, आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, असे किती तरी. पण यातून किती जबरी शिक्षा. वास्तवाच्या चटक्याने असे होरपळले आणि कोमेजलेल्या डोळ्यांचे चेहरे पाहिले की मन सुन्न होते. अशी किती तरी स्वप्नाळू डोळे मी आजूबाजूला पाहतोय. फुलण्याच्या आधीच कोमेजून गेलेले.

असाच मुलांना शिकवून त्यांना मोठी करण्याचा स्वप्ने बघणारा माझा बालपणीचा मित्र भेटला. आपल्या मुलीबद्दल तो कौतुकाने, भरभरून बोलत होता. त्यांच्या भविष्याची सातमजली स्वप्ने त्याने पाहिलेली. गलेलठ्ठ पगाराची आरामदायी, सुरक्षित नोकरी त्याला खुणावत होती. त्यात त्याचा काय दोष ? गावी गेलो की त्याची भेट व्हायची. तेव्हा तो मला त्याच्या जबरी आश्वासक शब्दात म्हणायचा, आपल्या पोरांना पण तुझ्यासारखाच प्राध्यापक करतो की नाही ते बघ…! आणि त्याने ते केलेही. त्याची दोन्ही मुले प्राध्यापक होण्याची पात्रता परीक्षा पास झाले. मुलाने नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले. पण वशिला, पैसा, प्रतिष्ठा, ओळखी, नोकर भरतीवरील बंदी अशा नानाविध समस्या त्याच्या वाट्याला आल्या. त्या सुजाण पोराने हा मार्ग बदलला आणि एका बँकेत नोकरी पत्करली. आता त्याची मुलगीही नेट परीक्षा पास झालेली. तो म्हणाला, आता पोराचे जाउदे, त्याने बँकेत धरली नोकरी, पण पोरीचे काय? पोरीसाठी शिक्षकाची नोकरी लई बेस्ट असतीय … मी तिला कसं शिकविल ते तुला माहितीय…आता तिच्या नोकरीचे तेवढे बघ…! मी उडालोच. शिक्षण क्षेत्रातले वास्तव मला परिचयाचे.

त्याला ते कसे सांगणार? आणि वास्तव सांगून त्याच्या डोळ्यातील स्वप्ने विझवण्याचा मला काय अधिकार ? त्याचा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते. या व्यवस्थेत तरी ते आहे का? असे हजारो तरूण आज भविष्याची स्वप्ने रंगवत मुलाखतीच्या फार्सला सामोरी जाताना आणि त्यांना निर्दयीपणे नाकारताना त्यांच्या इच्छा-आकांक्षेचा चक्काचूर होताना मी आजूबाजूला पहातोय. किती तरी स्वप्नांची राखरांगोळी झालेली. अशी ही शोकांतिका. हे एका क्षेत्रापुरतेच नाही. सर्वच ठिकाणी साचलेपण. गतीला अवरोध. तरी तरुण संभ्रमित मनाने स्वप्ने उराशी बाळगून उर फाटेस्तोवर पळतायत. सकाळी कोणत्याही मार्गावरून जा, पोलीस भरतीसाठी डोळ्यात आयुष्याची मोरपंखी स्वप्ने घेऊन धावणारी मुले मला दिसतात. शहरात जाऊन रात्री जागवून पोटाला चिमटा देऊन अधिकारी होण्याची स्वप्ने रंगवणारी मुले भेटतात.

आपण भरल्या पोटाने ढेकर देत त्यांना काय सांगावे? असे सांगणार्‍या प्रेरक पुस्तकांच्या लाखोहून अधिक आवृत्त्या संपल्या. त्यातून भरपूर कमाई झाली. पण विरलेल्या स्वप्नांचे काय? पुस्तक लिहिणारे लोक त्याबद्दल बोलत नाहीत. बी प्लान तयार ठेवा म्हणतात. असे किती दिवस पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणायचे …? अजूनही तरूण शांत आहेत, समंजस आहेत. आपल्या संस्कृतीची सहिष्णुता त्यांनी मनात बाळगलेली आहे. त्यामुळे विधायकता टिकून आहे. आपली विरलेली स्वप्ने घेऊन पुन्हा ती उभी राहतायत. त्यांनी कोणाकडे पहायचे? जेव्हा याचा कडेलोट होईल तेव्हा काय होईल? नजीकच्या दशकात हा प्रश्न भीषण होणार का? त्यातून सामाजिक अराजक माजले तर…? मनात असे बरेच काही साचलेले.

मागील वर्षी एका नामवंत शिक्षण संस्थेत मी मुलाखतीच्या समितीत गेलेलो. तिथे एक उमेदवार पुढ्यात आला. विसेक वर्षे त्याने इथे काम केलेले. सर्वात जास्त अनुभव. त्याला पाहून कुठे तरी माझ्या पूर्व स्मृती जागृत झालेल्या. त्याने कॉलेजचे नाव सांगितले आणि डोक्यात उजेड पडला. ‘अरे हा तर आपण शिकलो त्याच कॉलेजचा? माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी सिनिअर. हा बावीस-तेवीस वर्षापासून अजूनही उमदेवारीच करतोय. या संस्थेत इतकी वर्षे काम केल्यामुळे आता त्याला प्राधान्य होते. असे कित्येक लोक अनेक वर्षापासून तुटपुंज्या पगारात भविष्याची स्वप्ने रंगवत, अधांतरी अवस्थेत या आवर्तात सापडलेले. माझ्या मित्राला हे वास्तव कसे आणि कोणत्या शब्दात सांगणार …?

आता जेव्हा वर्गात जातो तेव्हा समोरचे विद्यार्थी पाहून मी अस्वस्थ होतो. मला प्रश्न पडतो. यांची स्वप्ने अशीच विरली तर…? आता कोणती स्वप्ने पेरावीत यांच्या मनात, कानात, डोळ्यात? यांची स्वप्ने कुणी हिरावून घेतली तर? याचे उत्तर मिळत नाही? तरीही मी शंभरातल्या एकासाठी मनात स्वप्न घेऊन जागत असतो. त्यांना, त्यांच्या स्वप्नातील गावी नेण्यासाठी अगदी अल्केमिस्टमधल्या त्या मेंढपाळासारखाच …. !

–डॉ.अशोक लिंबेकर 

 

First Published on: January 16, 2022 4:40 AM
Exit mobile version