हाथ बढा ऐ जिंदगी…

हाथ बढा ऐ जिंदगी…

निर्माते मनमोहन शेट्टी, प्रदीप उप्पर आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘हिप हिप हुर्ये’ हा चित्रपट १ जानेवारी १९८४ रोजी प्रदर्शित झाला होता. यात दीप्ती नवल, राज किरण, शफी इनामदार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शक म्हणून झा यांचा हा पहिला सिनेमा. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाणी गुलजार यांची होती. चित्रपटाचे संगीतकार आहेत वनराज भाटिया. प्रकाश झा यांनी या चित्रपटासाठी अनिल कपूर व शबाना आझमी यांना विचारणा केली होती. पण काही कारणास्तव या दोघांनाही यात काम करता आलं नाही. चित्रपटाचे कथानक फुटबॉल खेळाशी निगडीत आहे. या चित्रपटात एक सुबह एक मोड पर… ( येसूदास), जब कभी मूड के देखता हू… (आशा भोसले- भूपेंद्रसिंह), हिप हिप हुर्ये हो… (आशा-शैलेन्द्रसिंह- उदित नारायण), मैदान है सारी जिंदगी… (शैलेन्द्रसिंह) आणि आप जैसे लोगों में… (नंदू भेंडे, अनेट पिंटो) ही पाच गाणी आहेत.

चित्रपटाचे संगीतकार वनराज भाटिया हे समांतर / कलात्मक हिंदी चित्रपटांचे अग्रणी संगीत दिग्दर्शक होत. दूरदर्शनवर प्रक्षेपित झालेल्या ‘तमस’ या मालिकेच्या संगीतासाठी त्यांना उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार १९८८ मध्ये देण्यात आला. मालिकेच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले संगीतकार ! तसेच त्यांना १९८९ मध्ये सर्जनात्मक आणि प्रयोगशील संगीतासाठी ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं. २०१२ मध्ये वनराज भाटीया यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ते भारतातले एक आघाडीचे पाश्चिमात्य अभिजात संगीताचे दिग्दर्शक होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी लंडनच्या ‘रॉयल अकाडेमी ऑफ म्युझिक’ इथून पाश्चात्य संगीताचे शिक्षण घेतलं. त्यांना सर मायकेल कोस्टा शिष्यवृत्ती, रॉकफेलर शिष्यवृत्ती आणि फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्या. भारतात परतल्यावर त्यांनी एका जाहिरातीला संगीत दिलं. जाहिरातीला संगीत देणारे भाटिया भारतातले पहिले संगीतकार समजले जातात. त्यांनी सुमारे ७००० पेक्षा जास्त जाहिरात गीतांना (जिंगल्स) संगीतबद्ध केलं आहे. ते दिल्ली विद्यापीठात १९६० ते १९६५ या कालावधीत ‘पाश्चात्य संगीतशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते.

ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाला संगीत देऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या विश्वात पदार्पण केलं. नंतर त्यांनी मंथन, जाने भी दो यारो, ३६ चौरंगी लेन, मोहन जोशी हाजीर हो, तरंग, खामोश, भूमिका, पेस्तनजी, सरदारी बेगम, हरी-भरी, द्रोह काल, नसीम, जय गंगा अशा चित्रपटांना संगीत दिलं. नव्वदच्या कालखंडातल्या अजूबा, दामिनी, घातक, बेटा, चमेली, परदेस व रुल्स: प्यार का सुपरहिट फॉर्म्युला या चित्रपटांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांनाही संगीत देऊन उल्लेखनीय कामगिरी केली. उदाहरणार्थ खानदान, यात्रा, वागळे की दुनिया, बनेगी अपनी बात, नकाब इत्यादी. पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ यावर आधारित ‘भारत एक खोज’ या मालिकेचे ५३ भाग त्यांनी संगीतबद्ध केलं. शिवाय काही आध्यात्मिक संगीताच्या अल्बम्सना पण त्यांनी संगीत दिलं. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, कुंदन शाह, अपर्णा सेन, सईद अख्तर मिर्झा, कुमार शहानी, विधू विनोद चोप्रा, विजया मेहता अशा प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शकांच्या चित्रपटांना भाटियांनी संगीत दिलंय. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ या मराठी चित्रपटालाही त्यांचं संगीत लाभलं.

गीतकार गुलजार आणि संगीतकार वनराज भाटिया ही जोडी ‘हिप हिप हुर्ये’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आली. यातल्या एक सुबह एक मोड पर… या गाण्यावर हा एक दृष्टिक्षेप:

एक सुबह एक मोड पर, मैने कहा उसे रोककर
हाथ बढा ऐ जिंदगी, आंख मिला के बात कर…

रोज तेरे जीने के लिये, एक सुबह मुझे मिल जाती है
मुरझाती है कोई शाम अगर, तो रात कोई खिल जाती है
मै रोज सुबह तक आता हू, और रोज शुरु करता हू सफर
हाथ बढा ऐ जिंदगी, आंख मिला कर बात कर…

तेरे हजारो चेहरों मे, एक चेहरा मुझसे मिलता है
आंखो का रंग भी एक सा है , आवाज का अंग भी मिलता है
सच पुछो तो, हम दो जुडवा है , तू शाम मेरी, मै तेरी सहर
हाथ बढा ऐ जिंदगी, आंख मिला कर बात कर…

या गाण्याची जातकुळी टिपिकल गुलजारची आहे. गीताची शब्दरचना आणि त्यातल्या भावना याचा विचार करता हे एक अतिशय दर्जेदार गाणं आहे. या गीताला श्रेष्ठ पार्श्वगायक येसूदास यांचा आवाज लाभलाय. ‘गुलजार-वनराज भाटिया-येसूदास’ असं ‘क्लासिक कॉम्बिनेशन’ जुळून आलं आहे. हिंदी सिनेसंगीताच्या कानसेनांचं हे भाग्यचं म्हणायला हवं. येसूदास यांनी आपल्या गायकीची कोणतीही सांगीतिक अदाकारी न दाखवता अतिशय सहजतेने हे गाणं गायलं आहे. श्रोत्यांवर उगीचच प्रभाव टाकण्याचा थोडाही प्रयत्न न करता त्यांनी गाणं गायलं आहे. त्यासाठी त्यांना मनापासून सलाम करायला हवा. एका तरल गाण्याला त्यांनी यथोचित न्याय दिलाय. गाणं खेळाशी संबंधित असल्याने गाण्याचा र्‍हिदम वेगवान आहे. व्हायोलिन या वाद्याचा अप्रतिम उपयोग वनराज भाटियांनी या गाण्यात केलाय. त्यांचा भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य अभिजात संगीताचा समसमान अभ्यास होता. या दोन्ही प्रकारांत प्रभुत्व असलेले संगीतकार अपवादानेच आढळतात.

हे गाणं आहे अवघ्या साडे-तीन मिनिटांचे. मात्र एकदा ऐकून रसिकांचे समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी ही रचना आहे. यातले शब्द अधिक परिणामकारक आहेत की त्या आशयपूर्ण शब्दांना दिलेली सुरेल चाल, असा प्रश्न पडतो! तीन प्रतिभावंत एकत्र आल्यावर किती उत्तम निर्मिती होऊ शकते, याचं हे उदाहरण! गाण्यातल्या शब्दांचे वेगळे विश्लेषण करण्याची गरज नाही. ते स्वंस्पष्ट आहेत. आपलं रोजचं जगणं जगत असताना आयुष्याशी मैत्री करत पुढे जात राहण्याचा संदेश गुलजार देतात. आयुष्याशी संवाद साधणार्‍या, हितगुज करणार्‍या अनेक अर्थपूर्ण कविता त्यांच्या लेखणीतून उतरल्या आहेत. हे गाणं म्हणजेदेखील एक भावकाव्यचं म्हणता येईल. संगीतकार वनराज भाटिया हे गतवर्षी ७ मे २०२१ रोजी हे जग सोडून गेले. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

–प्रवीण घोडेस्वार 

First Published on: May 15, 2022 4:11 AM
Exit mobile version