एकसंधतेचा मंत्र !

एकसंधतेचा मंत्र !

स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यामुळे प्राप्त झालेले अधिकार सदैव जतन करणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशात दृढ झालेले मानवतावादाचे, बंधुभावाचे संस्कार व त्यातून निर्माण झालेली देशाची संघटित शक्ती डळमळीत झाल्याचे सध्याचे चित्र आहे. सत्तेच्या राजकारणासाठी माणसामाणसातील अंतर वाढविण्याचे काम सुरू आहे. स्वातंत्र्यासाठी जात, धर्म, पंथ व भेदभाव विसरुन खांद्याला खांदा लाऊन लढलेल्या एकसंध समाजात फुटीची बीजे रोवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत.

स्वातंत्र्य चळवळीतून या देशाला मिळालेला नवा विचार आणि संस्कार आपण विसरलो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पुढील काळात नवीन जनजागृती आंदोलन उभे करण्याची, तरुण पिढीला स्वातंत्र्यपूर्व काळातील खरा भारत समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताचे संविधान, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती आणि देशाची जडणघडण किती संघर्ष आणि बलिदानातून झाली आहे, याचे स्मरण तरुणाईला करुन देण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेतून स्वत:ला या कार्याला जोडून घेणे, हेच स्वातंत्र्यवीर, हुतात्म्यांना अभिवादन ठरेल.

दुसर्‍या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र, ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. या आंदोलनामुळे इंग्रजांची ताकदही संपली. नागरिकांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले होते. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणार्‍या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.

क्रांतीची धगधगती मशाल हाती घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो तो ‘ऑगस्ट क्रांती दिन’. ९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा दिली होती. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. आता कार्यकर्ता नाही तर नेता बना, असेही आवाहन गांधीजींनी नागरिकांना केले. मात्र, स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण लागले होते. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण नेता झाला होता. स्वातंत्र्यासाठी ज्याला जे वाटेल ते तो करत होता.

९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाअधिवेशन भरले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची सुरुवात ‘गवालिया टँक’ म्हणजे आजच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली. त्यानंतर या आंदोलनाचा भडका देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. परिणामी, इंग्रजांना परिस्थिती हाताळताना नाकी नऊ आले.

इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केली की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. इंग्रज कोणत्याही व्यक्तीला अटक करुन तुरुंगात डांबत होते. या आंदोलनात लोकांनी पोलीस ठाणीदेखील नेस्तनाबूत केली. टेलिफोन सुविधा बंद केल्या. ब्रिटिश सरकारने आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. मात्र, लोकांनी ब्रिटिशांच्या गोळीबाराला, लाठी हल्ल्याला न घाबरता आंदोलन सुरू ठेवले. ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली. ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची रवानगी पुण्यातील गुप्त ठिकाणी केली. त्याचबरोबर काँग्रेसच्या इतर नेत्यांनाही गुप्त जागी ठेवण्यात आले. परंतु, ही बातमी फुटली. नेत्यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. लोकांनी ब्रिटिश सरकारविरोधात प्रचंड हिंसक आंदोलने केली. ब्रिटिशांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे जरी उद्रेक झाला असला तरी स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलनामुळेच झाली, हे विसरता येणार नाही.

देशभरात मंगळवारी (दि.९) ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जाणार आहे. क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांंना अभिवादन केले जाईल. मात्र, स्वातंत्र्य चळवळीमुळे निर्माण झालेली एकजूट दिवसेंदिवस कमी होत आहे. ही एकजूट पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, राजकारणी सत्तेसाठी धर्म, जात, भाषावाद निर्माण करून गट निर्माण करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. हा निर्णय समजल्याने मुंबईत मराठी माणसे एकवटली. परिणामी, मुंबईचा महाराष्ट्र राज्यात समावेश झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तब्बल १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले. महाराष्ट्रातही धर्म, जात, भाषा, वर्णभेद निर्माण केला जात आहे. मुंबई ही गुजरातची की महाराष्ट्राची, यावर आजही चर्चा केली जाते. गुजराती लोक मुंबई आम्हीच चालवतो, असे म्हणतात तर, मराठी राजकारणी मुंबई ही महाराष्ट्राचीच असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य निर्मितीची आठवण करून देतात.

त्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यास मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या भागात पैसाच उरणार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरुन राज्यभरातून राज्यपालांवर जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांनी माफी मागत आपले विधान मागे घेतले. क्रांतीदिन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भारत आणि महाराष्ट्रात अनेक बदल झाले आहेत. चळवळींमुळे मानवतावादाचे, बंधुभावाचे संस्कार व त्यातून निर्माण झालेली देशाची संघटित शक्ती आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यास राजकारणी खतपाणी घालत आहेत. तरुणाईने वेळीच खरा इतिहास समजून घेत एकजूट केली तर राजकारण्यांचे मनसुबे उधळले जातील. अन्यथा राजकारणी देशभर नवनवीन राज्ये व जिल्हे निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत. क्रांती दिनाच्या निमित्ताने तरुणाईला हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून भावी पिढीसाठी सजग व्हावे लागणार आहे. तसे झाले तरच क्रांती दिनाचे फलित होईल!

First Published on: August 7, 2022 2:00 AM
Exit mobile version