‘महक’दार घमघमाट आणि एंजाइमचा केमिकल लोचा…!

‘महक’दार घमघमाट आणि एंजाइमचा केमिकल लोचा…!

–प्रा. किरणकुमार जोहरे

तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील ही ‘महकता’ म्हणजे सुगंधितता किंवा पसरणारी दुर्गंधी किती काळ सहन करू शकतात? पण आता जास्त काळजीचे कारण नाही. तुम्ही स्वत: जरी बदबूदार असाल तरी ती रोखू शकतात एवढेच नाही तर बदबूचे रूपांतर तुम्ही खुशबूमध्ये करण्यात ही लवकर महारथ साहिल करू शकता. यापुढे कुणीचीही हिंमत होणार नाही की तुम्हाला घामामुळे बदबुदार म्हणत चिडवणाची! कारण या समस्येवर इंग्लंडमधील यॉर्क युनिव्हर्सिटीने संशोधनातून जे शोधले आहे तो खजानाच म्हणावा लागेल.

सुगंधीद्रव्य, अत्तर, फुले अशा कितीतरी गोष्टींचा बिझनेस फळफळण्यामागे केवळ गंध हेच कारण आहे हे आपल्याला जाणवतदेखील नाही. चित्रपटात सिनप्रमाणे वास दरवळू प्रेक्षकांना एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये नेण्यासाठी प्रयोग आजही अमेरिकेत होत आहेत. एडवर्ड बाख या इंग्रज डॉक्टरने १९३० साली फुलांच्या अर्कापासून बनविलेली औषधे वापरत शोधून काढलेली प्रभावी ‘बाख थेरपी’ म्हणजे बाख फ्लॉवर रेमेडीज (बीएफआर) उपचारपद्धती देखील होमिओपॅथीमध्ये आजही वापरली जाते याची अनेकांना कदाचित माहीत नसेल. शरीराच्या दुर्गंधीमुळे नात्यात दुरावादेखील येऊ शकतो तसेच सुगंधामुळे प्रणयाला बहर येतो हे पती-पत्नीला तर चांगलेच माहीत आहे.

यॉर्क शहरात ५०० एकर जागेत विस्तरीत व १९६३ साली स्थापित ख्यातनाम यॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सायंटिफिक रिपोर्ट्स या सायंटिफिक जर्नलमध्ये एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. घामातील दुर्गंधी या समस्येचे मूळ शोधून काढले असून शरीराच्या दुर्गंधीवर उपाय सापडल्याचा दावा यात केलेला आहे. व्यक्तीच्या काखेत किंवा बगलेत विशिष्ट सूक्ष्मजंतू असतात व ते अंडरआर्म बदबू पसरवतात. आता या तीव्र त्रासदायक व घाणेरड्या वाटणार्‍या वासाकरीता कारणीभूत घटकाचा शोध लागला आहे.

असा येतो घाम!

माणसांमध्ये दोन प्रकारच्या घामाच्या ग्रंथी काम करत असतात. या ग्रंथीतून बाहेर पडणारा पदार्थ म्हणजे घाम होय. घामातून बाहेर पडणारे घटक लगेच दुर्गंधी पसरवित नाही. तर त्याचे रूपांतर जेव्हा थिओअल्कोहोल्समध्ये होते तेव्हा उग्र घाण वास येतो. अपवादात्मक जेनेटिक म्युटेशनमुळे अतिशय दुर्मिळ अशी माणसेदेखील असतात ज्यांना घाम येतच नाही. परिणामी घामाच्या दुर्गंधीचा प्रश्नच मग उद्भवत नाही. तर कोरियासारख्या देशातील बहुसंख्य लोकांच्या घामातून बाहेर पडणारे पदार्थ असे असतात की त्यामुळे दुर्गंधीच येत नाही.

१. एक्रिन ग्रंथी : या शरीरावर झाकून राहतात आणि थेट त्वचेवर उघडतात तसेच त्या शरीर तापमान नियंत्रण करत शरीराच्या शीतकरण प्रणालीचा एक आवश्यक घटक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.

२. एपोक्राइन ग्रंथी : बगल, स्तनाग्र आणि जननेंद्रिय आदींच्या केसांच्या कूपात या उघडतात मात्र यांची नेमकी भूमिका ही अद्याप इतकी स्पष्ट नाही. ज्याच्या विशिष्ट वासामुळे स्त्री-पुरूष एकमेकांकडे आकर्षित होण्यास कारणीभूत होतात अशी विशिष्ट रासायनिक संयुगेदेखील घामावाटे बाहेर सोडण्याचे काम याच ग्रंथी करतात हे विशेष!

शरीरातून जेव्हा घाम बाहेर पडतो तेव्हा त्यात जीवाणू म्हणजे बॅक्टेरियांची वाढ होऊ लागते. यात एंजाइम कळीचा मुद्दा होय. शास्त्रज्ञांनी एक अजब-गजब एंजाइम शोधून काढले आहे जे या सर्व प्रक्रियेत केमिकल लोचा घडवून आणते. घामापासून थिओअल्कोहोल्स बनवित शरीरापासून दुुर्गंध पसरवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे हे एंजाइम होय. या अद्भुत एंजाइमच्या रहस्यामयी क्षमतेचा वरील यंत्रणेचा पर्दाफाश शास्त्रज्ञांनी केला आहे. बदबूच्या राक्षसामागे इजाइमचा केमिकल लोचा आहे हे शास्त्रज्ञांनी आता सिद्ध केले आहे. म्हणून एंजाइम हे सर्वात आधी आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

एंजाइम म्हणजे काय ?

एंजाइम हा एक असे द्रव्य आहे आहे की जे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून तयार होते. एंंजाइम हे द्रव्य स्वतः रासायनिक प्रक्रियेत सहभागी होत नाही. मात्र एखाद्या कळलाव्या नारद म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीसारखे ते काम करते आणि परंतु नामानिराळे राहते. रासायनिक अभिक्रीयांमध्ये होणार्‍या अणू-रेणूंच्या जोडतोड प्रक्रियेत सहभागी न होता ते या अभिक्रीयांची गती ते वाढवतेे. म्हणून एंजाइमला शास्त्रीय भाषेत उत्प्रेरक किंवा कॅटॅलिस्ट असेदेेखील म्हटले जाते. एंजाइमला मॅक्रोमोलिक्युलर असेही म्हणतात.

एंजाइम नावाची जन्मकथा आजपासून १४३ वर्षांपूर्वी १८७७ मध्ये सुरू झाली. जर्मन फिजिओलॉजिस्ट विल्हेल्म क्यूने (१८३७-१९००) यांनी प्रथमच फसफसून येणार्‍या अशा किण्वन म्हणजे फरमॅन्टेशन रासायनिक प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी एंजाइम हा शब्दप्रयोग केला. एंजाइम एक जैविक उत्प्रेरक देखील आहे. पुढे एंजाइम शब्द अजैविक पदार्थांचा संदर्भातदेखील वापरला जाऊ लागला. एंजाइम म्हणजे थोडक्यात सजीव प्राण्यांनी तयार केलेला एक पदार्थ होय. एन्जोमॉलॉजी ही एंजाइम्सचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा होय.

काय केला प्रयोग?

तर यार्क विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याच एंजाइमला घेऊन प्रयोग केलेत. विशिष्ट प्रकारच्या एंजाइममध्ये शास्त्रज्ञांनी काही मेफिटिक सूक्ष्मजीवजंतू सोडले. आणि त्यातून त्यांना अभ्यासाअंती लक्षात आले की नेमके शरीरातून दुर्गंधी निर्माण नेमकी कशी व का होते. अशा या मेफिटिक सूक्ष्मजीवजंतूंचा वारसा मानवाला प्राचीन काळापासून लाभला आहे आणि घामामध्ये ते आपली वाढ करून घेतात.

नेमका शोध काय ?

१०६ रिसर्च पेपर प्रकाशित झालेले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रा. गॅव्हिन थॉमस हे यार्क विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या टीमचे मुख्य आहेत. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रा. गॅव्हिन थॉमस यांचे म्हणणे आहे की, नेमका गंध किंवा वास कसा तयार होतो हे त्यांना सापडले आहे. वास किंवा गंध कसा तयार होतो ती रासायनिक प्रक्रिया म्हणजे प्रा. थॉमस यांनी उलगडली आहे. मात्र हे असे का होते यामागील कारणांचा ते अद्याप शोध घेत आहेत. त्याच्या शोधाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

१. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे घामातून काही रेणू घेतात आणि त्यातील काही खातात, परंतु बाकीचे ते थुंकतात. बॅक्टेरियांनी जे थुंकलेले रेणू आहेत तेच शरीराच्या गंध म्हणून ओळखले जाणारे हे एक महत्त्वाचे रेणू आहेत.

२. त्वचेवर जसे जीवाणू (बॅक्टेरिया) असतात तसेच इतरही सूक्ष्मजंतू म्हणजे (मायक्रोब) सजीव रहात असतात. मात्र सूक्ष्मजंतू नव्हे तर स्टेफिलोकोकस होमिनिस या एका प्रजातीचे जीवाणू हे शारीरिक दुर्गंधीसाठी मुख्यतः कारणीभूत आहेत.
३. काखेत किंवा बगलात गुच्छासारखे क्लस्टर करीत राहणार्‍या स्टेफिलोकोकस होमिनिस हे स्वतः थिओलकोहोल्सचे उत्पादन करू शकत नाहीत, मात्र ते पण एपोक्राइन ग्रंथीमधून घामावाटे बाहेर पडणार्‍या सीझ-ग्लाय -३ एम ३ एसएच या वास नसलेल्या घटकाचे रूपांतर थिओलकोहोल, ३ एम ३ एसएच या बदबुदार घटकात करतात. मानवी नाक हे थिओअल्कोहोल्ससाठी अत्यंत संवेदनशील असल्याने थोडी जरी थिओअल्कोहोल्सची निर्मिती झाली तरी आपल्याला उग्र दुर्गंधी वास येतो व अशाा व्यक्ती जवळ थांबणे हे नकोनकोसे वाटते.

भविष्यात उपयोग काय?

आता पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी निष्कर्ष काढला की या शोधाचा उपयोग हा मानव जातीला प्रसन्न करण्यासाठी होऊ शकेल. रेणूंच्या रचनेनुसार सुगंध किंवा दुर्गंध ठरतो. जर आपण या रेणूंचे रचना जीवाणू व एंझाइमच्या माध्यमातून नियंत्रित करू शकलो तर सुगंध किंवा दुर्गंध निर्माण करणे शक्य आहे. जसे दुर्गंधी निर्माण होते तशीच सुगंधित वास येणार्‍या द्रव्याची निर्मितीदेखील शक्य आहे. या शोधातून अधिक प्रभावी डीओडोरंट्सदेखील कदाचित तयार करता येतील असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. थोडक्यात तुमची जी ‘महक’ दरवळते त्यामागे तुमच्या शरीरातील एंझाइमचा केमिकल लोच्या आहे. नजिकच्या काळात आहाराने तुम्ही कदाचित हवी ती दरवळ पसरवित लोकांना आकर्षित करू शकतात किंवा ‘मच्छर भगावो’ तसे विशिष्ट लोकांना कस्टमायझेशनने दूर पळवू शकाल, अशी तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे.

First Published on: May 28, 2023 6:15 AM
Exit mobile version