इंटरव्ह्यूची तयारी करताना…

इंटरव्ह्यूची तयारी करताना…

नुकतंच माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने मला इंटरव्ह्यूमुळे नैराश्य आल्याचे सांगितले, कमालीचा उत्साही असलेला व्यक्ती इंटरव्ह्यूच्या वेळी मात्र हताश झालेला दिसून आला. काय बरं झालं असेल नक्की? याचा विचार केल्यावर असे दिसून आले की, अनेकदा उत्तर माहीत असूनही देता न आल्यामुळे अशी गोंधळजनक परिस्थिती निर्माण होते. आपल्या मनातील याच नकारात्मकतेचा परिणाम इंटरव्ह्यूवर होतो.

त्यातही जॉब इंटरव्ह्यू म्हंटला की, सर्वांनाच टेंशन येते. नुसते गुणवत्तेचे मार्कशीट पाहून नोकरी मिळत नसते. त्यासाठी इंटरव्ह्यूची (मुलाखत) पायरी यशस्वीपणे ओलांडावीच लागते. अनेकांची शैक्षणिक पात्रता असूनही मुलाखतीमध्ये कमी पडण्याच्या भीतीने निराश होतात, पण खचून न जाता काही बाबींचे नीट मूल्यांकन केले व समजून घेतले तर आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाणे काही अवघड नाही. मग त्या कोणत्या बाबी आहेत व कसे लक्ष द्यायचे ते पाहूया .

मुलाखतीच्या आधीची तयारी (पूर्वतयारी)

तपशीलवार सखोल अभ्यास : अनेकदा आपण इंटरव्ह्यूची सर्व तयारी करतो, परंतु पद कोणते आहे, कंपनी कोणती आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, या पदासाठी काय काय कौशल्य आवश्यक आहेत, यासारख्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करा. त्या कंपनीत आधीच तुमचे कोणी सहकारी किंवा मित्र-मैत्रिणी काम करत असतील तर त्यांना त्या कंपनीची माहिती विचारा, तेथील इतर लोकांबद्दल (बॉस, डायरेक्टर, एचआर मेनेजर ) आधीच थोडा रिसर्च करा. ज्या पदासाठी तुम्ही मुलाखत देणार असाल त्याची सखोल माहिती करून घेतल्यावर तुम्ही त्यासाठी योग्य आहात का हे सुद्धा पडताळून पहा.
मुलाखतीचा पूर्वसराव : प्रत्येक मुलाखतीमध्ये काही प्रश्न हे ठरलेले असतात.

उदारणार्थ : ‘तुमचे गुण किती? तुम्ही या पदासाठी कसे योग्य आहात? या पदासाठी आम्ही तुमचीच निवड का करावी?’ वगैरे वगैरे. या अशा प्रकारच्या प्रश्नांची व्यवस्थित उजळणी करा. आरशासमोर उभे राहून एक दोन वेळा सुस्पष्ट आवाजात या सर्व प्रश्नांचा सराव करा.

अडचणीत आणणारे प्रश्न : रेझ्युममध्ये अशा काही बाबी असतात ज्याबाबत मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्याची तुम्हाला भीती वाटत असते. म्हणून रेझ्युम बनवताना हे लक्षात ठेवा की, आपण आपल्या रेझ्युममध्ये काय काय लिहिलेलं आहे, आपल्या आवडीविषयी, शैक्षणिक पात्रतेविषयी, जसे की, शैक्षणिक वर्षात गॅप का पडली? किंवा बॅकलॉगविषयी विचारले जाऊ शकते, जॉबविषयीची माहिती मग त्यात असे विचारले जाते की, मागील नोकरीमधून का कमी करण्यात आले? सतत नोकरी बदलण्याचे कारण काय? अशा प्रश्नांनी गोंधळून जायचे नसेल तर विशेष तयारी करणे आवश्यक आहे.

स्वतःबद्दल सांगताना : स्वत:बद्दल सांगताना सुरुवात आधी शैक्षणिक पात्रतेपासून करा. मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल सांगताना आपल्यात कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत याची एक यादी तयार करा. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक कामगिरी, यश, विशेष कौशल्य, आवडी व छंद असे सगळे व्यवस्थित लिहून काढा आणि त्याचा सराव करा. विशेष व ठराविकच गोष्टींचाच उल्लेख करावा. स्वत:बद्दलची माहिती ही थोडक्यात पण व्यवस्थित असावी.

स्वत:चे प्रश्न तयार ठेवा : काही प्रश्न मुलाखत घेणारे तुम्हाला विचारण्यास सांगू शकतील तेव्हा अशा वेळेस काहीच न विचारण्याची घोडचूक करू नका. आधीच विचार करून ठेवलेले दोन-तीन चांगले प्रश्न विचारल्यावर तुमचे ज्ञान आणि त्या पदावर काम करण्याची उत्सुकता दिसून येते. आपल्या प्रश्नांनी समोरचा व्यक्ती गोंधळात पडणार नाही ना याची काळजी घ्यावी. आपल्याला मिळालेल्या या संधीचा योग्य वापर करा.

प्रत्यक्ष मुलाखत देताना.

ड्रेस कोड निवडताना : मुलाखतीसाठी फॉर्मल ड्रेस घालणे केव्हाही फायदेशीर असेल. डोळ्यांना आल्हादायक दिसेल अशा रंगाचे प्लेन किंवा लायनिंगचे शर्ट घालावे. तुम्ही कुठे मुलाखत देणार यावरून ड्रेस कोड बदलू शकतो. पण उगीच भडक रंगाचे कपडे घालून मुलाखतीस जाऊ नये, त्याने वाईट इम्प्रेशन पडेल. भडक व उठावदार रंग हे आपल्यातील उग्र व भिडस्त स्वभावाचे प्रदर्शन करतात तर आल्हादायक रंग हे आपल्या शांत व संयमी स्वभावाचे प्रदर्शन करतात.
फर्स्ट इम्प्रेशन : मुलाखतीमध्ये पहिले इम्प्रेशन फार महत्वाचे असते म्हणून म्हटलं जातं ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’. त्यामुळे हसतमुखाने प्रवेश करा. आत जाण्याआधी दरवाजा अर्धा उघडून आत जाण्यासाठी परवानगी घ्या. आत गेल्यावर उपस्थित सर्वांशी आत्मविश्वासाने हात मिळवा व बसण्याची परवानगी घेऊन मगच बसा. नम्रपणाने व संयमाने बोला. एकूणच तेथील वातावरणाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करा.

आय कॉन्टॅक्ट : एकाग्र चित्ताने नजरेला नजर मिळवून आपण दिलेल्या उत्तरामुळे आपल्यातील आत्मविश्वास, नेतृत्व या क्षमता लक्षात येतात, त्यामुळे प्रश्न विचारणार्‍याकडे नम्रपणे पाहत उत्तर द्या. चुकूनही नजर चुकवण्याची चूक करू नका. तसे केल्याने आपण काहीतरी लपवत आहोत किंवा खोटे बोलत आहोत असा अर्थ निघू शकतो. आपल्या नजरेतून आपला हेतू स्पष्ट दिसत असतो, त्यामुळे आय कॉन्टॅक्ट फार महत्वाचा असतो.

मुलाखत घेणार्‍याचे नीट लक्ष देऊन ऐका : मुलाखतीच्या वेळी तणावाखाली न राहता लक्षपूर्वक मुलाखत घेणार्‍याचे प्रश्न ऐका आणि योग्य विचार करून मगच उत्तर द्या. बर्‍याचदा मुलाखती दरम्यान तणावाखाली असल्यामुळे आपण केवळ स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष देत असतो. त्यामुळे समोरचा काय विचारतो याकडे आपले थोडे दुर्लक्ष होते. अशावेळी शांत होऊन हळूवारपणे श्वास घ्या आणि विचारणार्‍याच्या प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे प्रश्न समजण्यात गफलत होणार नाही व उत्तरही चुकणार नाही.

प्रश्न न समजल्यास : अनेकवेळा तुम्हाला कोंडीत पकडण्यासाठी ‘ट्रिक क्वेशन्स’ विचारले जाऊ शकतात, मग अशा गुगली प्रश्नांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर देता यावरून तुमच्या कार्यक्षमतेचे परीक्षण केले जाते. जर खरंच तुम्हाला प्रश्न नसेलच समजला तर तसे मान्य करून पुन्हा विचारण्याची विनंती करा आणि चुकीचे उत्तर देणे टाळा.

जुन्या कंपनीविषयी सकारात्मक बोला : आधीच्या कंपनीविषयी, तिथल्या लोकांविषयी नेहमी आदरपूर्वक व सकारात्मक बोला. तुम्ही तिथे काय शिकला, तुमच्यामध्ये कशी प्रगती झाली, तुमच्यात कोणती नवी कौशल्यं निर्माण झाली वगैरे वगैरे. यावरून तुम्ही जिथे काम केले होते तेथील लोकांविषयी तुम्हाला आदर आहे असे दिसून येईल. अनेक वेळा या कंपनीचे अनेक कर्मचारीही तुम्ही आधी काम केलेल्या कंपनीला ओळखत असतील किंवा त्यांचे चांगले संबंध असू शकतात, तेव्हा आदराने बोलणे हेच नेहमी फायदेशीर राहील.

मुलाखतीनंतर आभार प्रदर्शन : मुलाखत झाल्यावर सर्वांशी हस्तांदोलन करून तुम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला विसरू नका. पुढच्या दिवशी जिथे मुलाखत दिली त्या कंपनीला ‘थँक यु लेटर’ किंवा इमेल पाठवण्यास विसरू नका. असे करण्यामुळे तुमच्याविषयी त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होईल.

अनुभवातून शिका : प्रत्येक मुलाखत यशस्वी होईलच असं नाही, पण निराश न होता त्यातून आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत. आपण कुठे कमी पडलो आणि त्याऐवजी काय करायला हवे याची नोंद करा. पुढच्या वेळी त्यामध्ये दुरुस्ती करून स्वत:त सुधारणा करा. अनुभव हा इतर कोणत्याही शिकवणीपेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो, त्यामुळे अनुभवाने शहाणे व्हा.

–निकिता गांगुर्डे

First Published on: June 19, 2022 4:00 AM
Exit mobile version