अडचणींवर मात करत भारताची आघाडी!

अडचणींवर मात करत भारताची आघाडी!

प्रिंट आणि सोशल मीडियावर मी नेहमी आर्थिक लेख, जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यातील एकूण आर्थिक परिस्थिती यावर बारकाईने वाचन करत असतो. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही म्हणून मला अर्थव्यवस्थेचे तटस्थ विश्लेषण करणे आवडते. एकदा का बजेट संसदेत मांडले की त्यावर अनेक लेख, विश्लेषण हे प्रिंट मीडिया आणि हल्ली सोशल मीडियावर येत असते. बरेच लोक हे असे लेख फॉरवर्ड करत असतात. आर्थिक क्षेत्रात अनेक उच्च पदव्या घेतलेले काही लोक जेव्हा तटस्थ विश्लेषण करत नाहीत आणि देश फक्त २०१४ नंतरच कसा विकसित झाला असे सांगतात, तेव्हा तर मला त्याचे फारच आश्चर्य वाटत असते.

हे म्हणजे असे झाले की मी आणि बायको कार चालवत नाशिकहून पुण्याला चाललो होतो आणि नाशिकहून नाशिक फाटा पुणेपर्यंत मी कार चालवली आणि नाशिक फाटा पुणे येथून शिवाजी नगरपर्यंत बायकोने कार चालवली तरीही बायको तिच्या नातेवाईकांना सांगायची की मी आज नाशिकहून पुण्यापर्यंत कार चालवली. असो, अर्थशास्राचे नियम हे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात किंवा कुठल्या उद्योजकीय लॉबीशी संबंधित आहात यावर ठरत नसतात. तेसुद्धा तटस्थपणे आपले काम करत असतात. म्हणूनच मी माझ्या अनेक लेखांमध्ये सरकारी मालमत्ता विकणे म्हणजे देश विक्री करणे नाही, असे आवर्जून सांगत असतो. कारण एक मालमत्ता विकून त्यातून सरकारची दुसरी मालमत्ता तयार होत असेल तर त्याला देश विक्रीस काढला, असे अजिबात म्हणता येणार नाही.

विक्री करण्याच्या पद्धतीवर तुम्ही जरूर टीका करू शकता. त्याचे फायदे-तोटे काय याबाबत वादविवाद होऊ शकतो. तरुणांना सरकारी नोकर्‍या नाहीत. त्यामुळे माझा नेहमी प्रयत्न असतो की नवीन उद्योजक घडावेत, स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा व यासाठी तरुणांना प्रोसाहन मिळावे, परंतु सोशल मीडियावरील नकारात्मक चर्चा, लेखन, ब्लॉग बघितले तर लोक नवीन उद्योग सुरू करणार नाहीत. जर तुम्हाला आपला देश जगात खूपच पिछाडीवर आहे असे वाटत असेल तर तुमचे ज्ञान फक्त सोशल मीडियावरच्या गप्पांपुरतेच मार्यादित आहे, असंच मी म्हणेन. आपण खरंच लीडर आहोत.

जगातल्या २०० देशांत पहिल्या पाचमधे असणं आणि तेही फक्त ७० वर्षांच्या कालखंडात साध्य करणं ही काही सोपी गोष्ट नाही. इतर देशांच्या मदतीवर अवलंबून असण्यापासून, अन्नधान्याच्या प्रचंड टंचाईपासून आज जगात लाखो कोटींची निर्यात करणारा देश इथपर्यंत आपला प्रवास आहे. चीन, रशिया असले हुकूमशाही देश सोडले तर आपण अशा देशांच्या रांगेत आहोत ज्यांना २००-४०० वर्षांचा स्थिर सरकारांचा किंवा लोकशाहीचा अनुभव आहे, ज्यामुळे त्यांना विकासाच्या जास्त संधी मिळाल्या आहेत. त्या मानाने आपली आजपर्यंतची कमाई खूप मोठी आहे. आपल्या देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक ताकद प्रचंड आहे. आपला मूळ पिंड राजेशाहीचा असल्यामुळे आपल्याकडे लोकशाहीचे काही साईड इफेक्ट्स झाले आहेत, पण येणार्‍या काळात तेही दूर होतील.

१९९१ पासून आपण आर्थिक उदारीकरण धोरण स्वीकारले तेव्हापासून आपण औद्योगिक क्षेत्रात मागच्या ३२ वर्षांत खर्‍या अर्थाने उतरलो आहोत. कुठला एखादा अर्थतज्ज्ञ सांगत असेल की, २०१४ नंतरच आपण मोठे झालो तर त्याच्या डिग्रीवर शंका घेणे गरजेचे आहे असे माझे विनम्र मत आहे. त्यातही गेल्या ३२ वर्षांत राजकीय लुडबुडीमुळे बर्‍याच मर्यादा आल्या आहेत. तरीही एवढ्या कमी कालावधीमधेसुद्धा आपण जगभरात आपला डंका वाजवत आहोत. टाटा, बिर्ला अशा जुन्या औद्योगिक घराण्यांसोबतच आपल्याकडे आता कितीतरी मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. टाटा, रिलायन्स, महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, कोटक कितीतरी कंपन्या आहेत. यातल्या काही कंपन्यांचे मूल्य १०-१५ लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. आर्थिक क्षमता मर्यादित असणार्‍या देशात ही उपलब्धी खूप मोठी आहे. देशाला लाखो कोटींची निर्यात या कंपन्या करून देत आहेत. आज आपल्या देशात १०० च्या वर युनिकोर्न स्टार्टअप आहेत.

मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या कंपन्यांकडून बाहेर देशातील उद्योग खरेदी करण्याचे आणि बाहेर देशात गुंतवणूक करण्याचे प्रमाणही चांगले वाढले आहे. याचा फायदा अप्रत्यक्षपणे देशालाच होतो. आपल्या कंपन्यांची गुंतवणूक त्या देशाला आपोआपच आपल्या देशाशी बांधून ठेवत असते. कित्येकदा तर या मोठ्या कंपन्यांचा वापर सरकारकडून इतर लहान देशांना गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवण्यासाठीच केला जातो.

आपला औषध क्षेत्रात जगभरात प्रचंड दबदबा आहे. कोरोनाच्या लसीसाठी आपल्याकडे पूर्ण जगाने फार आशेने पाहिले. अनेकांना आपण लसीसुद्धा दिल्या. आफ्रिका, दक्षिण अमेरिकेसारख्या खंडात तर आपल्याच औषध कंपन्यांचा डंका वाजतो. सनफार्म, रॅनबॅक्सी, सिरम, सिप्ला अशा कितीतरी कंपन्या जगभरात आपला दबदबा टिकवून आहेत. आपल्या फार्मासिटिकल इंडस्ट्रीला कमकुवत करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले गेलेत, आजही प्रयत्न चालू आहेत, पण या कंपन्या सगळ्या संकटांवर मात करून नेटाने पुढे चालल्या आहेत. यात आजपर्यंतच्या सर्वच सरकारांनी आपल्या बौद्धिक हक्क संपदा कायद्यांवर घेतलेली ठाम भूमिका महत्त्वाची आहे.

नव्यानेच सुरू होत असलेल्या ५ जी तंत्रज्ञानासाठी जगाला फक्त चीनवरच अवलंबून राहावे लागेल असे वाटत असतानाच आता ५ जीचे केंद्र नकळत भारताकडे सरकले आहे, याची अजूनही बर्‍याच जणांना कल्पना नाही. आपण टेक्नॉलॉजी क्षेत्रात आतापर्यंत पाश्चिमात्य राष्ट्रांवरच अवलंबून होतो, पण आता या क्षेत्रातही बरीच प्रगती करीत आहोत.

जागतिक स्पर्धेत आपण आजपर्यंत फक्त ग्राहक होतो, पण आता आपले प्रयत्न विक्रेते म्हणूनही विकसित होण्याचे आहेत आणि त्यामध्येही आपण चांगली सुरुवात केली आहे. आपण आरोग्याबाबतही जगात आता आघाडीवर जात आहोत. आरोग्य म्हणजे फक्त औषधांशी संबंधित नाही. योग, प्राणायाम याचा विचार जगभरात पोहचला आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांकडून आपले आयुर्वेदिक फॉर्म्युले त्यांच्या नावाने पेटंट करून घेण्याचे कितीतरी प्रयत्न आपण हाणून पाडले आहेत. सगळ्यात अलीकडचे उदाहरण हळदीचे आहे. आपल्याकडे ही औषधे काही कामाची नाहीत म्हणायचं आणि तिकडे पेटंट घ्यायचे असले प्रकार मागील कित्येक वर्षांपासून चालू आहेत, मात्र आता आपले तज्ज्ञ चांगले आक्रमक झाले आहेत. पद्मभूषण रघुनाथ माशेलकर ह्या मराठी रत्नाचे काम यासाठी खूप मोलाचे आहे.

आपण १०० टक्के स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, पण आपण जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. कोरोनाच्या संकटात जगभरातील शेअर मार्केटमधे प्रचंड उलथापालथी होत असताना आपल्याकडे सुरुवातीच्या पडझडीनंतर झालेली वाढ खूपच आश्वासक होती. याच कोरोना काळात फेसबुकच्या मार्क झुकर बर्क यांनी रिलायन्समध्ये करोडो अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अशा एखाद्या वर्षाच्या संकटाने देश कोलमडून पडावा एवढी आपली अर्थव्यवस्था कमकुवत नाही. २००८ मध्येसुद्धा कित्येकांनी आता देश संपला आहे अशीच आवई उठवली होती, पण देश मात्र तेवढ्याच जोमाने पुढे जात राहिला. उलट प्रगत राष्ट्रांनी त्यांच्या देशातील बँकांना भारताकडून शिका, असाच सल्ला दिला होता. ही ताकद आहे, कष्टाने कमावलेली आहे, अशा धक्क्यांनी त्या ताकदीला कमकुवत करता येत नाही.

मी माझ्या देशाबाबत भरपूर समाधानी आहे. इथल्या औद्योगिक प्रगतीबाबत समाधानी आहे. समाधानी आहे म्हणजे जे चालू आहे ते १०० टक्के योग्य आहे असे नाही, सुधारणेला भरपूर वाव आहे. उद्योगांना भरपूर अडचणी आहेत, पण सगळं काही एका रात्रीत शक्य नसते. त्याला वेळ लागतो. सगळीकडून त्यासाठी दबाव आवश्यक असतो, पण म्हणून आपण खूपच पिछाडीवर आहोत असं समजण्याची गरज नाही. कोणत्याही स्पर्धेत पहिल्या पाच-दहात जाणारे सर्वच स्पर्धक नेहमी तोडीस तोड असतात, पण सतत देश भिकेलाच लागलाय, परिस्थिती खूपच अवघड आहे वगैरे रडगाणे गाणारे मात्र फक्त निराशावादीच असतात. स्वत:ही काही करीत नाहीत आणि इतरांनाही प्रोत्साहन देत नाहीत. असल्या चर्चा आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालतात, पण सोशल मीडिया म्हणजे काही १०० टक्के वास्तव नव्हे.

आपण स्वत: सगळी माहिती घेणे आवश्यक असते. सोशल मीडियावर सतत निराशावादी पोस्ट लिहिणार्‍यांच्या मागच्या वर्षभराच्या पोस्ट पाहा. देशात आता महामंदी येणार आहे, लोक खायला महाग होणार आहेत, लोक आता एकमेकांची घरे लुटायला लागतील अशा प्रकारच्या चर्चा या लोकांनी घडवून आणलेल्या दिसून येतील, पण असं काही झालं नाही. व्यवसायात नुकसान सर्वांचंच झालं, पण त्यातून पार अराजकाची परिस्थिती निर्माण होईल एवढ्या वाईट परिस्थितीपर्यंत आपण कधी गेलो नाही. आर्थिक आणीबाणी काय असते हे माहीत नसल्यामुळे त्याचा परिणाम काय असतो हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे सध्याची परिस्थितीच आपल्याला खूप भयाण वाटते, पण जगभरातील आर्थिक आणीबाणीचे, अराजकतेचे किस्से पाहिले तर आपल्याकडे परिस्थिती खूप चांगली आहे हे आपल्या लक्षात येईल.

व्यावसायिकांनी अशा नकारात्मक चर्चांमध्ये अडकून पडण्याची गरज नसते. राजकीय मुद्दे हे जनतेच्या कामाचेच असतील असे काही नसते, किंबहुना ९० टक्के राजकीय मुद्दे जनतेच्या काहीच कामाचे नसतात. ते मुद्धे हे त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तयार केलेले असतात. त्यामुळे त्यात अडकून पडून आपलेच नुकसान होईल अशा प्रकारे वर्तणूक काहीच कामाची नसते. आपला दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. एखादा येऊन म्हणतोय, देशाचं काही खरं नाही, तुम्ही म्हणा ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी तयार आहे. एखादा म्हणतोय देशात महामंदी येणार आहे, तुम्ही म्हणा अरे बापरे मग मला आणखी काम करावे लगेल, चला नंतर भेटूया, कामाकडे लक्ष देतो.

एखादा म्हणेल तुमचा व्यवसाय बंद पडणार आहे, तुम्ही म्हणा पडू शकतो, पण म्हणूनच मी जास्तीत जास्त काम करून माझ्या गुंतवणुकी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, जास्तीत जास्त उत्पन्नाचे पर्याय उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्याही समस्येकडे, संकटाकडे, चर्चेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ते महत्त्वाचे असते. आपण व्यावसायिक आहोत. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेणे हा आपल्या कामाचा एक भाग आहे. एकाच गोष्टीकडे पाहण्याचा १०० जणांचा दृष्टिकोन १०० वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्यात जो नकारात्मक चर्चांमध्ये अडकून पडून आपले नुकसान करून घेत नाही तो टिकून राहतो, जो अशा चर्चात अडकतो, तो काही काळाने दिसेनासा होऊन जातो.

First Published on: March 12, 2023 5:44 AM
Exit mobile version