वस्तुमात्रांचा शक्तीशाली संवाद!

वस्तुमात्रांचा शक्तीशाली संवाद!

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ म्हणजेच आयओटी ही एकमेकांना जोडले गेलेली आणि एकमेकांशी थेट संवाद साधणार्‍या उपकरणांची एक यंत्रणा किंवा जाळे असते. यात यांत्रिक आणि डिजिटल यंत्रे, वस्तू, प्राणी, पक्षी किंवा लोक समाविष्ट असतात. यात प्रत्येकाला ओळखता येईल अशी (युनिक आयडेंटीफायर) साधने परस्परांशी संवाद साधत असतात. ही साधने आणि स्वतःच परस्पर निर्णय घेऊन आपल्या नेटवर्क (जाळ्या) मध्ये कामे पूर्ण करत असतात. दैनंदिन जीवनात सर्व वस्तू अगदी सहज ओळखता येतील आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीने त्या परस्परांशी जोडलेल्या असतील. तसेच या सर्व वस्तू एकमेकांशी संवाद करू शकतील आणि संगणकाद्वारे नियंत्रित करता येतील.

आयओटीमध्ये ‘स्मार्ट’ उपकरणे इंटरनेटशी जोडलेली असतात. आयओटी तंत्रज्ञानात उपकरणांना सूचना किंवा आज्ञा आपण आपल्या मोबाईलवरून देत इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी असल्याने जगात कोठूनही दूर-नियंत्रण करू शकतो. स्मार्ट उपकरणाच्या मेमरीतदेखील त्या साठवल्या येतात. गरजेनुसार आधीच ठरवून दिलेल्या अटींवर आधारित त्या सूचना किंवा आज्ञा उपकरणांच्या एम्बेडेड सिस्टिमप्रमाणे साठविल्या जातात तसेच त्यांचे पालन करत स्वयंनिर्णय घेत ‘स्मार्ट सिस्टीम’ कार्यान्वित होते.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आणि मानवी भविष्य!
‘वस्तूमात्रांच्या संवाद-जाळ्यात’ गुरफटतेय मानवी भविष्य असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ चे भविष्य काय असेल हे पाहताना सातत्याने जगात होत असलेल्या बदलांचा प्रभाव या तंत्रज्ञानावर पाहावा लागेल. वायरलेस रेडिओचा आकार आणि किंमत प्रचंड कमी झाली आहे. ब्रॉडबँड आणि वायफाय यांचा वापर हा कमी खर्चिक असल्याने ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’च्या क्षमता नेहमीच वाढत आहेत. ब्रॉडबँड स्पीड देणार्‍या अनेक नेटवर्क कंपन्यासह मोबाईल डेटा कव्हरेजमध्ये लक्षणीय सुधारणा करीत आहेत. अगदी परिपूर्ण नसले तरी बॅटरी तंत्रज्ञान सुधारले आहे आणि सौर रीचार्जिंग सुविधा अनेक उपकरणांमध्ये तयार करण्यात आली आहे. गोपनीयता व सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच इंटरनेट पायाभूत संरचना निर्मितीत मोठी गुंतवणूक केली जात आहे. आयपीव्हीसिक्स हे तंत्रज्ञान आपल्याला अब्जावधी यंत्रे किंवा वस्तू (डिव्हाइसेस) परस्परांशी संवाद (संप्रेषण) साधावा यासाठी प्रत्येक वस्तूला ओळखण्याचा पत्ता देण्याची सुविधा प्रदान करते आहे. त्यामुळे ती वेळ दूर नाही जेव्हा ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ सामान्यतः कुटुंब आणि कंपन्या दोन्हीमध्ये सर्रासपणे आणि सुलभतेने कार्य करील.

‘एबीआय’ रिसर्चने अंदाजानुसार, २०१३ मध्ये पाच अब्जापेक्षा जास्त वायरलेस चिप्स काम करीत असलेल्या वस्तू कार्यरत झाल्या आहेत. पुढील अनेक वर्षांमध्ये नेटवर्कशी जोडणारी अब्जावधी वस्तू असतील. सिस्कोच्या ‘इंटरनेट ऑफ थिंग्स ग्रुप’ (आयओटीजी) च्या अंदाजानुसार २०२० अखेरपर्यंत ‘शहाणा’ उपकरणांची संख्या (कनेक्टेड डिव्हाइसेस) ५० अब्जांपेक्षा जास्त आहे.

‘इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन’ (आयडीसी) नुसार वर्ष २०२० पर्यंत ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’क्षेत्रात १.७ ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल अपेक्षित आहे, यात भारताचा ६ टक्के वाटा अपेक्षित आहे. जगभरातील कंपन्या टूथब्रशपासून तर विमानापर्यंत इंटरनेट-योग्य (इंटरनेट-एनेबल्ड) उत्पादनांची निर्मिती करण्यात दंग आहेत. फक्त स्मार्टफोनवर घरातील सर्व उपकरणं नियंत्रित करता येतील, असे स्वतःचे होमकिट ‘अ‍ॅपल’ कंपनीने तयार केले आहे.

‘गुगल’ने डिवाइसच्या जगात प्रत्येक ठिकाणी आघाडीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशी प्रत्येक गोष्ट जी इंटरनेटने जोडली जाते, त्या क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आता गुगलने नवीन ‘ब्रिलो’ ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम सर्वांत लहान असेल. त्यासाठी केवळ ३२ मेगाबाइट किंवा ६४ मेगाबाइट रॅम लागेल. इंटरनेट ऑफ थिंग्स डिवाइसमध्येही ही ऑपरेटिंग सिस्टम टाकता येणार आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड बॅनरखालीच बाजारात आणली जाणार आहे. ‘सॅमसंग’चे स्मार्टथिंग्स तर मायक्रोसॉफ्टने विंडोज आयओटी कोअर १० अशी संगणक प्रणालीच विकसित केली आहे.‘बिटलॉक’ कंपनीने मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून चावी शेअर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे आपण जगात कुठेही असलो तरी फक्त मोबाईलने कुलूप उघडता येते.

मँचेस्टर येथे ‘सिटिव्हर्व’ उपक्रमांतर्गत स्मार्ट बसथांबे (बसस्टॉप्स) बसविण्यात आले आहेत जिथे प्रवासी प्रतीक्षा करीत असल्यास बसचालकाला तत्काळ माहिती मिळते. तसेच बसथांब्यावरील स्वयंचलित दिवे फक्त प्रवासी असतानाच गरजेनुसार चालू-बंद होतात. इंग्लंडमध्ये ऑक्सफोर्ड येथे ‘फ्लड नेटवर्क’ कंपनी पूरसदृश्य काळात विविध ठिकाणांहून पाण्याच्या पातळीची प्रत्यक्षदर्शी माहिती यंत्रणेला पुरवते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेला तसेच पर्यावरण कंपन्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. ‘टीझेडओए’ कंपनीने शहरातील हवेतील प्रदूषण, तापमान, आद्रता, हवेचा दाब, प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

क्रीडाक्षेत्रात आयओटी आधारित क्रिकेट बॅट, टेनिस रॅकेटचा वापर करून खेळाडू स्वतःच्या खेळाचे विश्लेषण करू शकतो व आपली कामगिरी सुधारू शकतो.

*‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे फायदे आणि तोटे काय आहेत ?

फायदे

१. डेटा: अधिक आणि अचूक माहिती असेल तर योग्य निर्णय घेणे सोपे होते. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ मध्ये सर्व डेटा पाहिला जातो आणि त्यावर विचार करून सहज, सुलभ आणि मानवी जीवनशैली सोपी करू शकेल असे वातावरण बनविले जाते. आपण बाहेर असताना किराणा मालकाकडून काय घ्यायचे आहे हे परस्पर किराणा दुकानदार जाणून घेऊ शकेल, दरवेळी होणारी किचकट तपासणी टाळून वेळ वाचविणे सोयीचे होऊ शकते.

२. ट्रॅकिंग: गुणवत्ता आणि घरगुती गोष्टींवर लक्ष ठेवणे या दोन्ही गोष्टींवर संगणक लक्ष ठेऊ शकेल. ग्राहकाला एखादे उत्पादन कालबाह्य होण्याची तारीख तसे होण्याआधीच समजू शकेल.

३. अर्थ: आर्थिक पैलू हा सर्वोत्तम फायदा आहे. देखरेख आणि पुरवठा करणार्‍या माणसांची किंवा कंपन्यांची जागा हे तंत्रज्ञान घेऊ शकेल. त्यामुळे कामचुकारपणा करणार्‍या लोकांवर या तंत्रज्ञानाने मोठी ‘संक्रांत’ येणार आहे हे निश्चित होय.

तोटे

१. सुसंगती : सॅन्सर्ससह जोडणी करणे आणि त्यांची देखरेख करणे (टॅगिंग अँड मॉनिटरिंग) यासाठी कोणतेही मापदंड (स्टँडर्ड्स) नाहीत. यूएसबी किंवा ब्ल्यूटूथ यांसारखे एकसमान संकल्पना असणार्‍या स्टँडर्ड्सचा वापर सुसंगती राखण्यासाठी आवश्यक आहे.

२. जटिलता : गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट अशा या प्रणालींच्या अपयशासाठी अनेक शक्यता उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, आपण आणि आपल्या जोडीदारास एकाचवेळी समान संदेश प्राप्त होऊ शकतो. घरात दूध संपले आहे असा एकच संदेश एकाच वेळी दोघांना मिळाला तर दोघेही दूध खरेदी करतील आणि त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. प्रिंटरला शाई संपल्यानंतर एकाच एजन्सीला त्याची मागणी करता येते, असे ‘बग’ नसलेले सॉफ्टवेअर तयार करण्याची आवश्यकता आहे.

३. गोपनीयता / सुरक्षितता: ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ने अब्जावधी साधने एकत्र जोडली गेल्यामुळे, त्यांची माहिती सुरक्षित राहण्यासाठी लोक काय करू शकतात?, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’प्रणालीमध्ये गोपनीयता ही मोठी समस्या आहे. सर्व डेटा एन्क्रिप्ट केला गेला नसला तर आपली आर्थिक स्थिती किंवा आपण वापरत असलेली साधने, ट्रेड सिक्रेट्स यांची माहिती प्रणाली कामाच्या ठिकाणी वापरणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना किंवा आपल्या मित्रांनाही अगदी सहज मिळू शकेल जे सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. सुरक्षा हा मोठा आव्हानात्मक मुद्दा आहे, त्यादृष्टीने तंत्रज्ञान अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न जगभर सुरू आहेत.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ प्रणालीचे काही तोटे आहेत आणि येत्या काळात ते दूर होतील ही गोष्टदेखील तितकीच खरी आहे. मानवी जीवन सुलभ करणारी ही ‘स्मार्ट सिस्टीम’ ग्राहकांना वेळ आणि पैसा वाचविण्याचे काम करणारी असेल त्यामुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करणे नक्कीच फायदेशीर नाही !

First Published on: October 2, 2022 1:12 AM
Exit mobile version