खलनायक फेम – केजीएफ 2

खलनायक फेम – केजीएफ 2

सिनेमा म्हटलं की नायक आला, कारण नायकाशिवाय सिनेमा याचा कोणी विचारच करू शकत नाही. सिनेमात एकवेळ कथा नसली तरी चालेल, पण नायक हा पाहिजेच. कारण त्याच्या चेहर्‍यावर सिनेमा चालतो, नायक म्हणजे सिनेमाचा युएसपी. बाकी एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर चालेलदेखील, पण नायक कमी असला की सिनेमा फ्लॉप झालाच म्हणून समजा. सिनेमाच्या कथेत नायक किती महान आहे हे दाखविण्याचेदेखील काही निकष असतात, जसं नायकासमोर जितका दमदार खलनायक तितकं नायकाच नायकत्व मोठं मानलं जातं.. गेल्या काही वर्षात आलेल्या सुपरहिट सिनेमांची यादी काढून बघा, भाषेचं बंधन मुळीच नाही. तुम्ही इंग्रजी सिनेमे घ्या किंवा मराठी, तामिळ. गाजलेल्या सिनेमात एक गोष्ट कॉमन असेल, ती म्हणजे दमदार खलनायक. पण एखाद्या सिनेमात फक्त खलनायकच असतील तर? सध्या जसं दमदार खलनायकाच्या भूमिकांचा ट्रेण्ड आहे, अगदी तसाचं अँटी हिरोंचादेखील ट्रेण्ड बनत चाललाय.. वाईट आणि अत्यंत वाईट या दोन्हींमधून एक जर निवडायचं असेल तर आपण वाईट निवडतो, ही मानवी वृत्ती आहे. म्हणून जेव्हा प्रश्न व्यवस्था आणि रॉबिनहुड यांच्यातील संघर्षाचा येतो, तेव्हा आपसूकच समाज रॉबिनहुडच्या मागे उभा राहिलेला दिसतो.

दाक्षिणात्य सिनेमाची एक खासियत असते, हे सिनेमे तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात, त्या विश्वात नायक सर्वोत्तम असतो किंवा सर्वोत्तम होण्यासाठीच काम करतो. जे कोणालाही जमू शकत नाही, तेच त्याला करायचं असतं आणि पडद्यावरदेखील तेच पाहायला मिळतं. केजीएफचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासूनच त्याच्या दुसर्‍या भागाची उत्कंठा लागली होती, त्याला अनेक कारणं आहेत. सिनेमापूर्वी अर्ध्या भारताला ज्या नायकाच नाव तर सोडा पण साधा चेहरादेखील लक्षात नव्हता, त्या नायकाची स्टाईल सगळ्यांना भावली आणि त्याचा लूक एक ट्रेण्ड बनला. पुढची 2 वर्षं बियर्ड ऑईल कंपन्यांचा व्यवसाय वाढला आणि सलोनच्या बाहेर लावायला एक फोटो मिळाला. दमदार कॅमेरावर्क, त्याहून दमदार बॅकग्राऊंड म्युजिक, अ‍ॅक्शन सीन्स आणि अभिनय यामुळे केजीएफ प्रचंड गाजला. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकवेळा याच्या दुसर्‍या भागाचं प्रदर्शन लांबलं आणि नुकताच हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित झाला.

केजीएफच्या पहिल्याच भागात या सिनेमाचा सिक्वल येणार याची हिंट दिग्दर्शकाने दिली होती, सिनेमाची कथा त्या नुसारच या भागात पुढे जाते. गरुडाला ठार केल्यानंतर रॉकी आता केजीएफचा सम्राट बनलाय, पण त्या खुर्चीसाठी अजूनही अनेक लोक आहेत जे त्याच्याविरुद्ध लढताय. सूर्यनारायणचा भाऊ अधिरा (संजय दत्त) हा पुन्हा केजीएफकडे निघालाय, देशात रमिका सेन (रविना टंडन) पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहे, जी सत्तेत आल्यानंतर केजीएफला नेस्तनाबूत करण्याची शक्यता आहे. इनायत खलील, राजेंद्र देसाई, गुरू पांडियन, शेट्टी, अँड्यूज आणि कमल यांसारखे काही लोक आहेत जे रॉकीविरुध्द लढणार आहेत. केजीएफची गादी शेवटी कोणाला मिळते ? रॉकी स्वतःचे साम्राज्य टिकवू शकतो का? हे सिनेमागृहात गेल्यानंतरच कळेल.

केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा आणि फुल मसाला सिनेमा असल्यानं तो फक्त एन्जॉय करावा, डोकं थोडं बाजूलाच ठेवावं लागेल. इथं प्रत्येक गोष्ट खूपच मोठी आहे, इथं लाईट गेल्यावर हिरोईनला गर्मी झाली म्हणून सरळ हेलिकॉप्टरचा पंखा सुरू केला जातो. यावरून सिनेमात काय काय पाहायला मिळेल याचा अंदाज लावावा, दुसरी महत्वाची गोष्ट की या सिनेमाची कथा फार वेगळी अशी नाहीये ना, ती या आधी होती. वेगळं आहे तर ते या कथेचं सादरीकरण आणि यात असलेले अ‍ॅक्शन सीन्स, जे फुल टू पैसा वसूल करतात. केजीएफना सोन्याच्या खाणीची गोष्ट आहे ना एका गँगस्टरची, केजीएफ गोष्ट आहे एका आईची जीचं एक वाक्य खरं करण्यासाठी तिचा मुलगा काहीही करायला तयार असतो. सिनेमात नायिका रीना एंटरटेनमेंट म्हणून दिसत असली तरी बाकी स्त्रीच्या भूमिका अतिशय निराळ्या आहेत, ज्या सिनेमा संपल्यावरदेखील लक्षात राहतात.

रॉकीची भूमिका साकारणारा यश हा या सिनेमाची जान बनलाय, जर त्याच्या जागी दुसरा कोणीही असता तर हा सिनेमा हीट ठरला नसता असं वाटणं हे त्या दिग्दर्शकाचं आणि अभिनेत्याचं यश आहे. संपूर्ण कथा ही फक्त आणि फक्त यशच्या भोवती फिरते, जेव्हा तो स्क्रीनवर नसेल तेव्हादेखील त्याच्याच बद्दल बोललं जातं, कुठलीच अशी उपकथा किंवा कुठलाच असा ट्रॅक नाही ज्यात रॉकी दिसणार नाही. पण एक गोष्ट नक्की की यश लोकांना आवडलाय तो त्याच्या अभिनयामुळे नाही, कारण एकच एक्स्प्रेशन त्याच्या चेहर्‍यावर दिसेल, म्हणून अभिनय ही त्याची मजबूत बाजू नव्हती. तर त्याची स्टाईल आणि त्याचा स्वॅग यामुळे तो लक्षात राहतो, सिगारेट ओढणं, केसांवरून हात फिरवत मारधाड करणं आणि चालणं यामुळे त्याची भूमिका लक्षात राहते. दुसरी मुख्य भूमिका आहे अधीरा जी साकारली आहे संजय दत्त याने, नकारात्मक भूमिकेत कांचा चीनानंतर संजू बाबा या रोलमध्ये जबरदस्त वाटतो, त्याचा वाईकिंग लूक आणि डायलॉग्ज दोन्ही यशच्या बरोबरीचे आहेत. रविना टंडन सिनेमात असणार हे माहिती होतं, पण तिची अवस्था ‘आरआरआर’मधल्या आलियासारखी असेल असं वाटलं होतं, पण ती या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे आणि काही दृश्यांमध्ये ती नायकावरदेखील भारी पडते.

या तीन व्यक्तिरेखा वगळल्या आणि रॉकीची आई सोडली तर इतर कोणालाही तितका स्कोप कथेत नाही. म्युजिक पहिल्या भागाच्या तुलनेत कमी आहे, पण बिजीएम मात्र पहिल्या भागापेक्षा कैक पटीने उत्तम जमलाय.. हातोडा, चाकू, तलवार यांच्या जागी मशीन गन आणि रायफल दिसते. अ‍ॅक्शन सीन्स एकमेव गोष्ट आहे जी या पावणे तीन तासांच्या सिनेमाला क्षणभरदेखील रटाळ बनवत नाहीत. कॅमेरा वर्क इतकं उत्तम आहे की साधे सीन्सदेखील महत्वाचे बनतात. ‘केजीएफ 2’ मध्ये कोणी नायक नाहीये, आपल्या रॉकीमध्ये देखील लालच दिसेल आणि जग जिंकण्यासाठी काहीही करण्याची इच्छा दिसेल, पण जसं सुरुवातीला सांगितलं अगदी तसंच कमी वाईट कोण? याच उत्तर रॉकी येतं. म्हणूनच नायक नसलेल्या या कथेत खलनायक असलेला रॉकीच नायक बनून लक्षात राहतो, सिनेमात पोस्ट क्रेडिट सीन आहे म्हणून संपल्यावर निघायची घाई करू नका आणि केवळ सिनेमागृहातच हा सिनेमा बघा, तरच याची खरी मजा कळेल.

First Published on: April 17, 2022 4:16 AM
Exit mobile version