एक शब्दही न बोलता 15 कोटी फॉलोअर्स!

एक शब्दही न बोलता 15 कोटी फॉलोअर्स!

इटलीतील खबाने लामे या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर चांगलंच आहे. पण जर माहिती नसेल तर माहिती करून घेतली पाहिजे. कारण खबाने अर्थात खाबी (Khaby Lame) हा प्रसिद्ध टिकटॉकर आहे. इतकेच नाही तर त्याला इन्स्टाग्रामवरही जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर मिळून खाबीचे 15 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. यापैकी 10 कोटी फॉलोअर्स एकट्या टिकटॉकवर तर पाच कोटींहून जास्त फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत. अवघ्या दीड वर्षांच्या काळात खाबीने आपल्या वेगळ्या अंदाजाने इतकी प्रसिद्धी मिळवली. ती सुद्धा एक चकार शब्दही न बोलता. अगदी प्रमाणात बोलून आणि सुंदर दिसूनही ज्यांना अजिबात प्रसिद्धी मिळत नाही. त्यांच्यासाठी खाबी हे एक वेगळेच प्रकरण आहे. अशा लोकांपुढे खाबीने आव्हानच उभे केले आहे.

खाबी हा तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस. जगण्यासाठी नोकरी वगैरे करणारा. पण कोरोना काळात म्हणजे मार्च 2020 मध्ये त्याची नोकरी गेली. ज्या कारखान्यात तो काम करत होता. तिथून त्याला काढण्यात आले. नोकरी गेल्याचे घरी समजल्यावर तुमच्या आमच्या घरात दिला जातो तसाच सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला. वडिलांनी त्याला तातडीने दुसरीकडे नोकरी बघायला सांगितले. पण खाबीने यावेळी मनापासून ठरविले होते, वडिलांचे ऐकायचे नाही. आपण काही तरी वेगळे करायचे आणि यातूनच त्याने टिकटॉकवर व्हिडिओ प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि तिथूनच त्याच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिला गेला.

खाबीला लहानपणापासूनच लोकांचे मनोरंजन करण्याची त्यांना हसायला भाग पाडण्याची आवड होती. पण नोकरी आणि घर यातून वेळ मिळत नव्हता. नोकरी गेल्याने आवडीचे काम करण्यासाठी वेळ उपलब्ध झाला आणि टिकटॉक, इन्स्टाग्राममुळे आपल्या अंगातील कला जगापर्यंत नेण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला. खाबीने हे नवे काम हाती घेतले त्यावेळी त्याने डिजिटल मार्केटिंगचा कसलाही कोर्स केला नाही की, इंटरनेटवर व्हायरल व्हायचे असेल तर काय केले पाहिजे, याचे सल्लेही कोणाकडून घेतले नाहीत. त्याने केवळ जे काही सुरू आहे, त्यामध्ये कशाची उणीव आहे हे शोधले आणि ती उणीव भरून काढण्याचे काम सुरू केले. व्हिडिओंमध्ये उगाच आढेवेढे न घेता थेट विषयाला हात घालायला सुरुवात केली.

लाईफ हॅक्स दाखविताना एखादा सोपा विषय उगाच विविध साधनांच्या साह्याने सोडविण्यापेक्षा सोप्या पद्धतीने सोडवायला प्राधान्य दिले. त्याचा एक व्हिडिओ तर जबरदस्त गाजला. मोटारीच्या बाहेरील बाजूस आरसा बसवायचा आहे. मोटारीला आरसा नसल्याने गाडीचा दरवाजा उघडताना काय करायचे असा प्रश्न खाबीला पडतो. अशावेळी खाबी फार काही वेगळं करत नाही. तो सरळ गाडीची काच खाली घेतो आणि बाहेर डोकावून येणार्‍या जाणार्‍या गाड्यांचा अंदाज घेतो. कोणत्याही सामान्य माणसाने अशावेळी हेच केले असते. तेच खाबी करतो. उगाच लाईफ हॅक्स दाखविण्याच्या नावाखाली तो अचाट कृती करताना दिसत नाही. त्यामुळेच त्याच्या इतक्या साध्या व्हिडिओला 30 कोटींहून जास्त व्हिडिओ व्ह्यूज मिळाले. खाबीचे असे वेगवेगळे व्हिडिओ खूप गाजले आहेत.

खाबी व्हिडिओ तयार करताना कोणत्याही भाषेत बोलत नाही. त्याला जे काही सांगायचे आहे ते तो केवळ आपल्या शारीरिक हालचालींमधून आणि चेहर्‍यावरील हावभावांच्या साह्याने सांगतो. व्हिडिओमध्ये कोणत्याही भाषेचा वापरच नाही म्हटल्यावर बघणार्‍याला ती भाषा समजली पाहिजे वगैरे प्रश्नच येत नाही. जगातील कोणीही ते व्हिडिओ बघू शकतो आणि त्यातील मजा अनुभवू शकतो. खर्‍या अर्थाने खाबीचे व्हिडिओ यामुळे जागतिक स्वरुपाचे होतात. त्याला कोणत्याही देशाचे बंधन राहात नाही. याचा दुसरा फायदा त्याला असा झाला की, जगातील वेगवेगळ्या देशांमधून खाबीला फॉलोअर्स मिळाले. त्याचे व्हिडिओ जगाच्या कानाकोपर्‍यात बघितले जाऊ लागले.

एका अभ्यासानुसार, खाबीच्या प्रत्येक व्हिडिओला टिकटॉकवर सरासरी 96 लाख लाईक्स असतात. तर त्यावर 83 हजार प्रतिक्रिया येतात. त्याच्या व्हिडिओंचा एंगेजमेंट रेट जवळपास 10 टक्क्यांच्या घरात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एकीकडे सर्व काही चकचकीतपणे दाखवणारे व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती एकदम सुंदर असते. तिचे कपडे एकदम आकर्षक असतात. त्या व्यक्तीच्या बॅकग्राऊंडला काय दिसणार, तिथे प्रकाशव्यवस्था कशी असणार याचा विचार केलेला असतो. तरीही त्या व्हिडिओंना जेवढे व्ह्यूज मिळत नाहीत. तितके खाबीच्या साध्यासुध्या व्हिडिओंना मिळतात आणि हेच त्याचे यश आहे.

नोकरी गेली हे खरंतर खाबीच्या पथ्यावरच पडले. कारण नोकरी गेली नसती तर तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी व्हिडिओ निर्मितीकडे वळला नसता. आज याच व्हिडिओंच्या माध्यमातून खाबी लाखो डॉलर्स कमावतो आहे. ‘इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग हब’च्या आकडेवारीनुसार, खाबीने 20 लाख डॉलर्स कमावले आहेत. एका अंदाजानुसार, खाबीने आपल्या व्हिडिओंमधून चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवायचे ठरवले तर तो टिकटॉकच्या एका व्हिडिओमधून एक लाख डॉलर इथपर्यंत उत्पन्न कमावू शकतो. इतके पैसे कमावत असला तरी खाबीने पैसे कमाविण्यासाठी व्हिडिओ निर्मितीला सुरुवात केली नाही. त्याने आपल्या आनंदासाठी, आपल्यातील कला इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना हसविण्यासाठी व्हिडिओ तयार केले. त्याच्या व्हिडिओंची स्टाईल लोकांना आवडली म्हणून ते चालले आणि त्यातून खाबीसाठी पैसे कमाविण्याचा मार्ग उपलब्ध झाला. हेच तर सोशल मीडियाचे वैशिष्ठ्य आहे.

अवघ्या 21 वर्षांच्या खाबीने सोशल मीडियावर एकही फॉलोअर नसताना सुरुवात केली आणि 18 महिन्यात 15 कोटी फॉलोअर्स मिळवले आणि लाखो रुपयेही कमावले. एवढं सगळं त्याने केवळ क्रिएटिव्हिटीच्या जोरावर साध्य केले. अडचणी आल्यावर उगाच रडत बसण्यात अर्थ नाही. तुमच्या अंगात कला असेल आणि तुम्हाला पुढे जायचे असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. न जाणो तुम्हीही खाबीसारखे एकदिवस प्रसिद्ध व्हाल!

First Published on: November 14, 2021 5:00 AM
Exit mobile version