ओळख – उत्तरे शोधणार्‍या माणसांची

ओळख – उत्तरे शोधणार्‍या माणसांची

वर्षानुवर्षे अनेक समस्यांशी आपला समाज झुंजतो आहे. पण त्या समस्यांकडे केवळ पाहात न राहता त्यांच्यावर आपल्या परीने उत्तरे शोधणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. पण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर लोकप्रिय कार्यक्रमांत ‘इंडियन आयडॉल्स’ अशा पदव्या दिल्या जातात. या आयडॉल्सना ‘इंडियन आयडॉल्स’ म्हणणे योग्य आहे का? पण मग समस्यांशी झुंजण्याच्या उत्तम काम करणार्‍या मंडळींची दखल कोण घेणार? असे प्रश्न युनिक फीचर्सच्या पत्रकारांना पडले. आणि त्यांनी खरेखुरे आयडॉल्स शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांतूनच साधारण पंधरा वर्षांपूर्वी ‘खरेखुरे आयडॉल्स’ हे पुस्तक त्यांच्याच समकालीन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले.

समाजाकडून कोणत्याही दखलपावतीची अपेक्षा न करता समाज परिवर्तनाचे काम करणार्‍या पंचवीस कार्यकर्त्यांची ओळख त्यांनी त्यात करून दिली. याच्या पहिल्या भागाला महाराष्ट्रातील वाचकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्याच्या 30 आवृत्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत. या प्रतिसादामुळे दुसरा भागही 2010 मध्ये प्रकाशित झाला. त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद (15 आवृत्या) मिळाला. आता ‘खरेखुरे आयडॉल्स’चा तिसरा भाग आला आहे. संपादन गौरी कानेटकर यांचे आहे. पहिले दोन भाग सुहास कुलकर्णी यांनी संपादित केले होते. पहिल्या आणि दुसर्‍या भागामध्ये प्रत्येकी 25 आयडॉल्सच्या कामाची माहिती देण्यात आली होती. तिसर्‍या भागात 22 आयडॉल्सच्या कामाचे वर्णन आहे.

गौरी कानेटकर यांनी ‘मनोगत’मध्ये या आयडॉल्सच्या कामाचे स्वरूप सांगितले आहे. त्यातून या आयडॉल्सच्या कामाचा थोडक्यात परिचय होतो. (तो भाग मुद्दाम येथे देण्याचे कारण म्हणजे शब्दमर्यादेमध्ये प्रत्येकाबद्दल सविस्तर लिहिणे शक्य नाही.) त्या म्हणतातः ‘मेळाघाटात ठाम मांडून आदिवासींच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, कोरडवाहू शेतकर्‍यांच्या समस्यांवर शाश्वत उपाय योजण्यासाठी धडपडणारे सांगली जिल्ह्यातले संपतराव पवार, गडचिरोलीतल्या मेंढा(लेखा) या छोट्याशा गावातून ग्रामीण स्वराज्याचा अन् वनहक्कांचा नारा देणारे देवाजी तोफा आणि मोहन हिराबाई हिरालाल, विस्थापितांच्या हक्कांसाठी लढणार्‍या सुनीती सु. र., दलितांच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योजकतेचा वसा घेणारे मिलिंद कांबळे, आदिवासींच्या हक्कांसाठी अन् दारुबंदीसाठी संघर्ष करणार्‍या चंद्रपूरच्या परोमिता गोस्वामी, शेतकर्‍यांच्या संघटनांना एका छत्रीखाली आणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नगर जिल्ह्यातले अकोले गावचे डॉ. अजित नवले, सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यात बचतगटांचं जाळं विणणार्‍या कुसुम बाळसराफ, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हाती विज्ञानाची दोरी देणारे नंदुरबारचे डॉ. गजानन डांगे, मराठवाड्यातल्या दलितांचं आणि ऊसतोड महिलांच्या मानवी हक्कांसाठी झगडणार्‍या मनीषा तोकले, माणदेशातल्या दुष्काळी भागात अशिक्षित महिलांसाठी बँक उभारणार्‍या चेतना सिन्हा, मेळघाटात बांबू केंद्र उभारून आदिवासींना आर्थिक स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवणारे सुनील व निरुपमा देशपांडे, वंचित मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणार्‍या प्रथम या संस्थेच्या फरिदा लांबे आणि कोकणातल्या ग्रामविकासाचं भगीरथ मॉडेल साकारणारे हर्षदा आणि प्रसाद देवधर अशी महाराष्ट्राच्या विविध भागात काम करणारी ही मंडळी आहेत.

या सार्‍यांची नावे कधी ना कधी वाचकांनी वाचली असतील वा त्यांच्या कानावर आली असतील. पण त्यांबाबत फारशी माहिती नसेल. त्यामुळेच त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन वाचल्यावर ते आणखी हवे होते, असे वाटायला लागते आणि या मंडळींच्या कामाचे मोल ध्यानात येते. काहीजण एकट्याने तर काही जोडीदारांबरोबर काम करत आहेत. ज्या परिस्थितीत आणि ज्या अडचणींना तोंड देऊन ते हे काम करत आहेत, ते वाचल्यावर त्यांना सलाम एवढेच म्हणावेसे वाटते. (दुःखद बाब अशी की हे कोरोनाच्या लाटेमुळे विलंब झाल्यामुळे हे पुस्तक येण्याआधीच मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांचे निधन झाले.)

या कहाण्या वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या सर्वांचा आपल्या कामावरील ठाम विश्वास आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्यांची तयारी. अशा कामात अडचणी येणारच हे माहीत असूनही निष्ठेने काम करत राहण्याची त्यांची वृत्ती. अनेकदा सरकारी नियम, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून निर्माण केल्या गेलेल्या अडचणींचा त्यांना अनुभव आला, तरकाही अधिकार्‍यांनी त्यांच्या कामाचे मोल ध्यानात घेऊन केलेले सहकार्यही त्यांनी अनुभवले. सरकारी मदत मिळो वा न मिळो, आपले काम सतत सुरू कसे राहील असाच विचार या कार्यरतांनी केला.

जागेअभावी फक्त एकच उदाहरण ः संस्थेचे काम कसे असावे याचा आदर्श म्हणजे कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान. चांगल्या कामाला नेहमीच सहकार्याची उणीव भासत नाही, हे या संस्थेला बँकेचे सहाय्य मिळालेच, शिवाय अनेक कामे संस्थेनं लोकवर्गणीतून साकार केली आहेत. समविचारी अनेकांचे सहाय्य त्यांना मिळाले आहे, महत्वाचे म्हणजे त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापले उद्योग व्यवसाय उभे करून समर्थपणे चालवून दाखवले आहेत. अनेक क्षेत्रांत संस्थेचे काम आहे. शालेय साहित्य वितरण, विविध कौशल्याच्या कामांचे शिक्षण आदी उपक्रमही सुरू आहेतच. म्हणूनच या बाबतच्या लेखाच्या शेवटी म्हटले आहे की, बदलत्या युगाचं भान ठेवून जर कुणी होतकरू समाजसेवेसाठी आयुष्य देऊ इच्छित असेल, तर ‘भगिरथ’चं काम हा त्यांच्यासाठी वस्तुपाठ आहे. प्रशासकीय खर्च पाच टक्क्यांपेक्षा कमी, इमारत बांधणीत कमीत कमी गुंतवणूक आणि कुठेही संस्थेचा फलक न लावणं, ही भगिरथने स्वतःवर घालून घेतलेली बंधनं आहेत. ते निरीक्षण किती योग्य आहे हे पटते. याचबरोबर भगिरथच्या तालमीत तयार झालेल्यांमुळे भगिरथ सांभाळणारे हात किती सक्षम होत आहेत, हे समजते.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचवे आणि वाचल्यावर आधीचे दोन भाग वाचले नसल्यास, ते वाचण्याची इच्छा त्यांना होईल हे नक्की. अर्थात काहींना अशा कार्यरत लोकांना आपल्या परीने सहाय्य करावेसे वाटेल आणि शक्य असेल तेव्हा काहीजण त्यांच्या कार्यात, संस्थांत सहभागीही होण्यास तयार असतील!

-खरेखुरे आयडॉल्स (तिसरा भाग)
-संपादक ः गौरी कानेटकर
-समकालीन प्रकाशन, पुणे.
-पाने ः 198 ; किंमत ः 250 रुपये.

First Published on: October 24, 2021 5:30 AM
Exit mobile version