लाल चिखल !

लाल चिखल !

साहित्यचर्चेत काही सनातन प्रश्न असतात. त्यापैकीच एक, अगदी यक्षप्रश्न ठरावा असा प्रश्न म्हणजे ‘कोणते साहित्य श्रेष्ठ मानावे?’ आयुष्यावर चाल करून येणार्‍या विक्राळ वास्तवापासून उसंत घ्यायला लावणारे? की भवतालाचे भेगाळलेले वास्तव थेट आत उतरावे म्हणून आपल्यापुढे आरसा धरणारे? या प्रश्नाने समीक्षाग्रंथांची पृष्ठे भरून गेलेली आहेत.

कुणी म्हणेल तुमची जशी प्रकृती असेल तसा पर्याय तुम्ही निवडाल. तर अन्य कुणी म्हणेल प्रकृतीएवढीच परिस्थिती किंवा मनःस्थितीही महत्त्वाची असते. वाचक म्हणून तुम्ही ज्या ‘स्टेट ऑफ माइंड’मधून जात असता, त्याच्याशी सुसंगत साहित्य आपणाला जवळचे वाटते. पण सतत आपण एकाच ‘स्टेट ऑफ माइंड’मध्ये राहू, असे नाही ना. मग आपली मनःस्थिती बदलली की साहित्याची आवडनिवडही बदलत जाणार…म्हणजे मग ‘श्रेष्ठ साहित्य’ असे सतत हेलकावे खात राहणार का…?

पण प्रत्यक्षात मात्र हे सारे काही बदलत गेले तरी काही कविता, कथा, कादंबरी, नाटक, लेख… हे आपणाला तसेच आणि तितकेच आवडत राहतात, असे का? ते वास्तवापासून दूर नेऊन विरंगुळा शोधतात की वास्तवाची वारुळं आपल्या मेंदूत तयार करतात, माहीत नाही. श्रेष्ठ साहित्याचे निकष ठरविणार्‍या घनघोर चर्चेपेक्षा अशा साहित्याचा नंदादीप स्वतःपुरता तेवता ठेवणारी एक कॅटेगरी असते, ती जास्त महत्त्वाची वाटते. मी तिला ‘क्लोज टू हार्ट’ म्हणतो.

माझ्यासाठी ‘लाल चिखल’ ही भास्कर चंदनशिव यांची कथा या कॅटेगरीतली आहे. पंधरा वर्षांपूर्वी अध्यापनाचा भाग म्हणून ही कथा पहिल्यांदा वाचली. पण पुन्हा वेळोवेळी स्वतःला हलके करण्यासाठी मी ही कथा वाचत आलो आहे. जेव्हा जेव्हा ही कथा वाचतो, तेव्हा आपण शिक्षक, प्राध्यापक वगैरे कुणीही नाही, तर ‘माती आणि शेतीला जिवापाड जपणार्‍या शेतकर्‍याचा अनुवंश आपल्यामध्ये आहे’ याची जाणीव मला होत राहते.

आमच्या खापर पणजोबाकडे म्हणे पाचशे एकर जमीन होती, पणजोबाकडे दोनशे एकर, आजोबांकडे शंभर एकर असलेली जमीन वडिलांकडे येईयेईपर्यंत पंधरा एकरांवर आली. आणि दीड हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटपलीकडे माझा जमिनीशी संबंध उरलेला नाही. मग तरीही ही कथा अस्वस्थ का करते? कथेतील बापू आणि आबाकडे पाहून मला ते माझे आणि वडिलांचे प्रतिबिंब आहे असे का वाटत राहते?

इतक्या वर्षांनंतरही अपघाती निधनानंतर वडिलांचा निश्चेष्ट पडलेला देह जेव्हा डोळ्यांसमोर येतो तेव्हा मृत्यूसमयी त्यांच्या मेंदूत कोणत्या विचारांनी गर्दी केली असेल? याचे गिरमीट माझ्या मनात सतत चालू असते. तसे वेगवेगळ्या भाषा, कायदा आणि आयुर्वेद या विषयांची त्यांना विशेष गोडी. पण मृत्यू पुढ्यात उभा असताना हे ‘निर्जीव’ विषय त्यांच्या आसपासही फिरकले नसतील. मात्र पडलेल्या घराची डागडुजी, लेकरांचे शिक्षण, लेकीचे लग्न…..अशा आजन्म पिच्छा पुरवत आलेल्या ‘जिवंत’ विषयांनीच त्यांना तेव्हाही बेजार केले असेल. बहुविध विषयांत कसलेल्या आपल्या बापाचा अपघाताने नाही तर शेतीच्या फसलेल्या अर्थशास्त्रानेच बळी घेतला असे अजूनही वाटत राहते.

बापूला दर सोमवारी कळंबाच्या बाजारात भाजी घेऊन जावे लागायचे आणि मला फारच तंगी आली तर माळवं घेऊन औशाचा बाजार गाठावा लागायचा. अर्थात तेव्हा वय दहा वर्षांचं होतं आणि वर्ग पाचवीचा होता. एवढं साम्य वगळता कथेचा नायक-निवेदक असलेला बापू आणि मी याच्या कष्टात कसलेही साम्य नाही. पण बाजार कळंबाचा असेल वा औशाचा…तो शेतकर्‍यांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यासाठीच असतो… म्हणून पाठ्यपुस्तकातली ही कथा आपल्या आयुष्यात कधी उतरून येते हे कळतच नाही.

ग्रामीण समाजाच्या अंतर्मनातील भावआंदोलने संवेदनशीलतेने टिपणारे आणि साहित्यातून त्याची सशक्त अभिव्यक्ती घडविणारे लेखक म्हणून भास्कर चंदनशिव यांचा परिचय. मराठी समाजाने ग्रामीण जीवनाचे विनोदी दर्शन घडविणारे लेखक डोक्यावर घेतले, त्यांच्या कथाकथनांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी केली. ग्रामीण कवींच्या कविताही ‘नॉस्टॅल्जिया’चे कढ आवरत ऐकल्या. पण आपल्यापुढे आरसा धरणार्‍या भास्कर चंदनशिव यांच्यासारख्या लेखकाचे पोटॅन्शियल नीटपणाने समजून घेतले नाही.

असो, ज्यांना या पोटॅन्शियलचा प्रत्यय हवा असेल त्यांनी निदान ही एक कथा तरी वाचायलाच हवी.
‘…सोम्मारचा बाजार असल्याने माय आणि आबा या दोघांनी बापूला बजावून बाजारातली मोक्याची जागा पकडायला सांगितली होती. जागा मोक्याची असेल तरंच माळवं विकंल. म्हणून दहावीच्या वर्गाचे एक-दोन तास बुडाले तरी चालतील पण अगोदर जागा पकडून ठेवणे गरजेचे होते. बापूला पुस्तक, शाळा, अभ्यास, शिक्षण….यात जास्त गोडी होती. पुस्तक आणि परिस्थिती यातला संबंध ताडून पहायची सवय होती. गाव सोडून कळंबातच रहायची इच्छा होती. पण बापाच्या अठरा विश्वे दारिद्य्राने त्याच्या इच्छांचे गाठोडे त्याला गुंडाळूनच ठेवावे लागलेले होते.

माय-आबाच्या सांगण्यावरून त्याने लवकरच बाजार गाठून मोक्याच्या जागा दगडांच्या खुणा ठेवून पकडल्या. आणि तिथेच चटणी-भाकर खाताखाता, शेजारच्या माळवेवाल्याशी बोलताना ब्रिटिशांच्या काळापासून ते आजपर्यंत सारे बदलले पण शेतकरी शोषणाच्या तर्‍हा कशा कायम राहिल्या हे तो पाठ्यपुस्तकातून पडताळून पाहू लागला. महात्मा फुले, दादाभाई नौरोजी यांनी केलेली शेतकरी शोषणाची चिकित्सा या बालवयातही समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. खरेतर हे सारे लेखन शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे, पण कागदावर छापलेली अक्षरे व्यवहारात काही उतरली नाहीत. राज्यकर्ते असलेले गोरे इंग्रज जाऊन एतद्देशीय राज्यकर्ते आले. म्हणजे राज्यकर्त्यांचा रंग बदलला; पण शेतकर्‍यांचे आयुष्य बेरंगच राहिले, असे का ? याच्या तंद्रीत बापू बुडून गेला.

तेवढ्यात टमाट्याच्या दोन मोठ्या डालींची कावड घेवून आबा आणि कांदे व गवारीचे बारके पोते घेऊन माय बाजारात आली. मायीकडे कांदे, बापूकडे गवारी विकायची जबाबदारी देऊन आबा टमाट्याच्या विक्रीकडे वळला.त्या वर्षी टमाट्याचे पीक जोरावर असल्याने सगळा बाजारच लालेलाल दिसत होता. म्हणजे आता आवाजाला नेट लावल्याशिवाय गिर्‍हाईक जमा व्हायचं नाही, याचा त्याला अंदाज आला. आणि आबाने आरोळी ठोकल्यागत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली.
‘चला,चला. सस्त लावली. बीन बियाची टमाटी… लाल लाल टमाटी.. मस्त-सरकारी टमाटी घ्या घ्या…’

मग गिर्‍हाईक यायचं. डालीत हात घालून बगायचं. चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं. आन् आर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. अशा गिर्‍हाईकांकडे तो ‘खाऊ का गिळू’ असे डोळं फिरवीत पाहायचा. पण मग आलेला राग घटाघटा गिळून जराशा नरमाईने सांगायचा..

‘मामा, पुढच्या आठवडी या… आज न्हाय मिळायचं…’

आलेलं गिर्‍हाईक निघून गेलं तरी निराश न होता तो गळ्याच्या दोर्‍या ताणू ताणू ओरडायचा. यातून आलेली ही हताशा घालविण्यासाठी बायकोला टोचणी देत राहायचा,

‘…मुकी झालीस काय ह्येडंबा? आरड की आवसान आसल्यावनी…’
ज्या लेकरावर जीवापाड प्रेम आहे, त्याला शिव्या हासडून गर्जायचा,
‘ये पोरा. बसलाच कसा? उठून आरड की हँद्रया… ऊठ ऊठ.’

बापाचं दुःख बापूला कळायचं पण शिक्षणातून आलेली शरम त्याला असे ओरडण्यापासून थांबवायची; मग नाईलाजाने आजूबाजूला कोणी ओळखीचं माणूस नाही हे बघून तो मन मारून उठायचा आणि डोळे झाकून खच्चून ओरडायचा,
‘घ्या.घ्या. ताजी गवारी, हिर्वी गवारी सस्त लावलीय् सस्त… घ्याऽऽ घ्याऽऽऽ.’

परिस्थितीच इतकी प्रतिकूल होती की आबा,माय आणि बापू यांना असा आरडाओरडा करण्याशिवाय पर्याय नव्हता; बरे, इतके ओरडूनही फायदा काय तर मायचे कांदे कसेबसे संपले होते, बापुची गवारी अजून शिल्लकच होती आणि आबाच्या टमाट्याची अर्धी डालसुद्धा विकलेली नव्हती.

‘बोलंल त्यांचं हुलगं इकत्यात, मुक्याचं गहू बी कुणी इच्यारीत नस्तंय…’ हा इथल्या बाजाराचा न्याय; पण घसा कोरडा पडेपर्यंत ओरडूनदेखील माळव्याला गिर्‍हाईक नव्हतं. अखेर बाजार सुटायची वेळ आली आणि गिर्‍हाईकांनी भाव पाडून मागायला सुरुवात केली. आबाने दोन रुपये किलोचे टमाटे एक रुपया किलोवर आणले. पंच्याहत्तर पैशावरून अखेर पन्नास पैसे किलोने विकायची मानसिकता केली तेव्हा….

हा प्रसंग वाचताना आपल्या माथ्यात ठणक उठल्याशिवाय राहत नाही.
‘…आबाच्या किरूळ्या ऐकून एक गिर्‍हाईक जवळ आलं.
‘काय सांगितलं?’ म्हणून गिर्‍हायकानं नवी डाल उघडली. एक-दोन टमाटी चाचपून बघितली.
गिर्‍हाईकानं चार-दोन टमाटी हातात घेतली.
‘पर… घ्यायचं काय?’ गिर्‍हायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं.
‘घ्यायचं मंजी…?’
‘सांगणं आठ आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं?’
आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं बघता बघता तापली. व्हट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं इच्यारलं.
‘पावनं, किती घ्यायचीत?’
‘सिस्ताईनं सांगितलं, तर पावशेर घेतली आस्ती…’
असं मनून त्यानं चार-दोन मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली. आन् पिसवी धरीत त्ये गिर्‍हाईक बोललं.
‘चार आणे किलोनं धरा…’
‘काय?’
आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. सम्दं आंगच थरारलं. आन् कडाड्कन आबा गरजलं…
‘ये हायवानाऽ जिभीला हाड बसवून घे! चल ऊठ, पळ हितून…’
तसं त्यो माणूस तट्कन उठला. आन् काईतरी बुटबुटत म्हागं सरकत निघून गेला…
आबा भुसा भरल्यागत ताठच्या ताठच उभं व्हतं. चेहरा तापला व्हता. आन् डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या व्हत्या.
‘…चार आणे किलो… ईस पैस्या किलो… धा पैस्या, पाच पैस्या… आरं फुकट घ्या की मनावं…’
आन् एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचविल्या. लालेलाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या गुडघ्याएवढा रसरसीत ढीग झाला. आन् आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचाकचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला.
आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच व्हता.’

आपल्या श्रमाची, घामाची कवडीमोलाने खरेदी होणे आबाला पसंत नाही. भले त्याचा मातीवर जीव असेल, शेतीवर प्रेम असेल, रक्त आटवून, घाम गाळून आपल्या कुटुंबाला पोसायची तयारी असेल….पण याचा अर्थ कुणीही आपल्या कष्टाची अशी खुलेआम खिल्ली उडवावी, ही गोष्ट त्याच्या शांत व्यक्तिमत्वातील ‘विद्रोहाच्या पाण्याला’ जागे करते. तो अंतर्बाह्य पेटून उठतो. आणि ‘पडेल भावात माल विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याचे क्रांतिकारी पाऊल’ उचलतो.

पुढे आबाचे या क्रांतीचे काय होते? याचे उत्तर कथेतून मिळत नसले तरी आजपर्यंत ‘हिरव्या रंगा’त रंगवलेल्या शेतकर्‍याने आता ‘लाल रंग’ धारण करायला हवा, हा संदेश मात्र या कथेतून अगदी स्पष्टपणे मिळतो.

…म्हणून तर अपघातानंतर वडिलांचे कलेवर निश्चेष्ट पडले असले तरी त्यांच्या डोळ्यांत उतरलेला लाल रंग पाहून कथेतला आबा अन् माझे वडील सोबत असल्यासारखे दिसायला लागतात!

आता समीक्षेच्या निकषानुसार ही कथा श्रेष्ठ आहे की नाही? मला कल्पना नाही; पण माझ्यासाठी ती ‘क्लोज टू हार्ट’ आहे आणि पुढेही तशीच राहणार, याची मला खात्री आहे.

First Published on: October 18, 2020 5:21 AM
Exit mobile version