बातमीचा हरवला चेहरा

बातमीचा हरवला चेहरा

पुण्यातल्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करताना माझ्यासमोर घडलेला एक प्रसंग कायम लक्षात राहिला. रात्रपाळीत काम करणार्‍या मुख्य उपसंपादकाने रात्री संपलेल्या एका क्रिकेट सामन्याची बातमी पहिल्या पानावर आठ कॉलमामध्ये लावली होती. याच बातमीवरून दुसर्‍या दिवशी त्याच वृत्तपत्राच्या कार्यालयात अनेक वर्षे काम करीत असलेल्या सहसंपादकांनी संबंधित बातमी ज्या पद्धतीने पानात लावली होती, त्यावरून त्या मुख्य उपसंपादकाची अनौपचारिकपणे बरीच खरडपट्टी काढली. त्या सहसंपादकांचे म्हणणे असे होते की साखळी सामन्यात विजय मिळाल्याची बातमी जर आठ कॉलमात लावणार असाल तर मालिका जिंकल्याची बातमी कशी लावणार?, त्यासाठी अंकात कशी जागा देणार? मालिकेतील विजय साखळी सामन्यातील विजयापेक्षा मोठा आहे, हे अंकातील बातमीच्या मांडणीवरून वाचकांना कसे दाखवून देणार.

मालिका जिंकल्याची बातमी साखळी सामन्यातील विजयापेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्याचा विचार करूनच आधीची बातमी पानात कुठे आणि किती मोठी लावायची हे निश्चित केले पाहिजे, असे त्या सहसंपादकांना सांगायचे होते… हा प्रसंग माझ्या लक्षात याच्यासाठी राहिला की माध्यमांमध्ये काम करणार्‍या प्रत्येकाने बारीक सारीक गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन पटकन कोणताही निर्णय घेण्यापेक्षा तर्कशुद्ध मांडणी केली पाहिजे वगैरे…

वर जे उदाहरण दिले, ते वृत्तवाहिन्यानी अक्राळविक्राळ रुप धारण करण्याअगोदरचे तसेच समाज निर्बुद्धपणे सोशल मीडियाच्या आहारी जाण्याअगोदरचे. पुढे या दोन्ही घटकांचे प्रस्थ वाढत गेले… ते सहसंपादक वृत्तपत्राच्या कार्यालयात एकाकी पडत गेले. ते जे सांगताहेत त्याला वेड्यात काढले जाऊ लागले आणि मग एके दिवशी त्यांनाच वृत्तपत्राच्या कार्यालयात बसण्यासाठी जागा दिली गेली नाही…

बनावट टीआरपीवरून जो काही गोंधळ सध्या सुरू आहे, तो बघितल्यावर मला त्या सहसंपादकांची मनापासून आठवण आली. आपण काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय असे प्रश्न हल्ली माध्यमांच्या कार्यालयात काम करणार्‍यांना पडतात की नाही, हाच प्रश्न आहे. मुळात आपली बांधिलकी वाचकांशी आहे. त्यांना फसवून अजिबात चालणार नाही वगैरे आता केवळ बोलण्यापुरते राहिले आहे. याची सुरुवातच मुळात पत्रकारितेचे शिक्षण जिथे मिळते तिथून होते. पत्रकारिता शिकवणारी खंडीभर महाविद्यालये गेल्या दशकभरात सुरू झाली. पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याआधी प्रवेश परीक्षा वगैरे होती. त्यामध्ये तुमचा कस लागायचा आणि त्यात निवड झालेल्यांनाच पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण दिले जायचे. आता परिस्थिती अशी आहे की प्रवेश परीक्षा केवळ तोंडी लावण्यापुरती उरली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळतोच. प्राथमिक तयारी किंवा कल नसलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यामुळे त्याच्याकडून खूप काही अपेक्षा ठेवता येत नाही.

तो किंवा ती केवळ दोन वर्षांचा अभ्यासक्रम गुण मिळवण्याच्यादृष्टीने पूर्ण करतो आणि बाहेर पडतो. विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात पहिला येऊन सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्याला बातमीच लिहिता येत नाही, असे उदाहरण मी स्वतः अनुभवले आहे. या खंडीभर महाविद्यालयांमध्ये पत्रकारिता शिकवणारे काहीजण डॉक्टरेट वगैरे मिळवलेले असतात. पण त्यापैकी अनेकांनी महिनाभरसुद्धा प्रत्यक्ष पत्रकारिता केलेली नसते. माध्यमांमध्ये प्रत्यक्ष काम न करताच पत्रकारिता शिकवणे यापेक्षा गंभीर अपराध नाही. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतात. पत्रकारिता हा मुळात पुस्तकी विषयच नाही. अनेक वर्षांचा अनुभव, साधना, सातत्य, जनसंपर्क, आकलनशक्ती, विश्लेषणशक्ती याच्या आधारावरच कोणत्याही पत्रकाराची पत्रकारिता बहरत जाते, त्याच्या लिखाणामध्ये अधिक खोली येत जाते. अशा लोकांनी पत्रकारिता शिकवल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्यातून मिळणारा अनुभव हा माध्यमात कधीच काम न केलेल्या सर किंवा मॅडमकडून कधीच मिळू शकत नाही. त्याचे ते शिक्षण कोरडेच राहते.

माध्यमांचा अख्खा डोलारा केवळ आणि केवळ आशयावर उभा आहे. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, डिजिटल यापैकी माध्यम कोणतेही असो आशय सर्वाधिक महत्त्वाचा. पण परिस्थिती अशी झाली की आशय निर्मिती करणार्‍या विभागाकडे माध्यमांमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. सहज म्हणून बघितले तरी कळेल की कोरोना विषाणू संक्रमणामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर माध्यम कंपन्यांमध्ये सर्वाधिक नोकर्‍या या संपादकीय विभागातील सहकार्‍यांच्या गेल्या आहेत. कॉस्ट कटिंग करायचे तर पहिला हात संपादकीय विभागालाच घातला जातो, हे नाकारता न येणारे वास्तव आहे. आशय निर्मितीमध्ये संपादकीय विभागाला असणारे स्वातंत्र्य संपुष्टात येऊन वर्षे झाली आहेत. काही माध्यम कंपन्यांमध्ये काही बातम्या प्रसिद्ध करण्याअगोदर सेल्स टीमला दाखवाव्या लागतात. संबंधित बातमीमधून कंपनीच्या उत्पन्नावर काही परिणाम तर होणार नाही ना, याची काळजी सेल्स टीम घेत असते. जर त्यांनी होकार दिला तरच ती बातमी प्रसिद्ध करायची असे बंधन संपादकीय विभागावर असते. यामुळे ‘रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे’ छाप बातम्या प्रसिद्ध होतात. वाहिन्यांवर संध्याकाळी दिसणार्‍या मालिका आणि या स्वरुपाच्या बातम्या या एकाच मापात तोलण्यासारख्या आहेत. या बातम्या वाचकांना आपल्या वाटतच नाहीत. त्यामुळे त्या वाचून किंवा बघून चर्चा करावी, त्यावर मतप्रदर्शन करावे, असे होतच नाही. माध्यमांपासून वाचकांच्या तुटलेपणाची येथूनच सुरुवात होते.

७० किंवा ८० च्या दशकात पत्रकारिता करणार्‍या एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला विचारले की तो सांगतो त्यावेळी काही वृत्तपत्रांच्या संपादकांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धास्ती होती. आता याच्या १८० कोनात विरुद्ध परिस्थिती आहे. आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्तीला संपादकपदावरून हटविण्याचे काम गरज पडल्यास एखादा मुख्यमंत्री काही तासात करू शकतो. काही संपादकांचे बोलणे, लिहिणे पाहून ते एखाद्या माध्यम समूहाचे संपादक कमी आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते जास्त वाटतात. काही संपादक फक्त आणि फक्त उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करतात. तर काही फक्त डाव्या विचारसरणीला वाहून घेतात. या सगळ्यामध्ये मध्यममार्गाने चालू पाहणारा वाचक पूर्णपणे बाजूला फेकला गेलेला असतो.

त्याचे प्रश्न, त्याच्या अडचणी, त्याची आव्हाने याचा विचारच न करता आशय निर्मिती होते आणि त्याला एबीसी, टीआरपी, कॉमस्कोअर याच्या वेष्टनात बांधून पुन्हा वाचकांच्या माथ्यावर मारले जाते. आम्ही नंबर वन, आमचे वाचक जास्त, आमचा टीआरपी जास्त, आमचे पेजव्ह्यूज जास्त वगैरे सांगून वाचकांना आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्याचा खरंतर काहीच उपयोग नसतो, कारण आधी म्हटल्याप्रमाणे माध्यमांपासून वाचकांच्या तुटलेपणाची सुरुवात झालेली असते. बनावट टीआरपीवरून जो काही गदारोळ सुरू आहे, त्यामध्ये जे एकमेकांविरोधात भांडताहेत, सोशल मीडियावर वाट्टेल ते लिहिताहेत ते कोण आहेत सहजपणे बघा. त्यामध्ये सामान्य प्रेक्षक किती हे शोधून पाहा… फार मिळणार नाहीत. त्याच्यासाठी सध्या हा विषयच महत्त्वाचा नाही. सद्यस्थितीत त्याच्यासाठी रोजचे जगणेच इतके अवघड होऊन बसले आहे की त्यातून वेळ काढून या सगळ्या वादात आपली भूमिका मांडावी, अशी त्याला किंचितही इच्छा नाही.

यश ही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही, या संकल्पनेला सोशल मीडियामुळे तडा गेला. झटकन स्टार होण्याच्या आणि लगेचच पैसे मिळवण्याच्या नादात प्रत्येकजण दुसर्‍याला कॉपी करू लागला. आपल्याला काय येते, यापेक्षा त्यांनी केले मग मी पण करणार हाच विचार करून सोशल मीडियात निर्मिती होऊ लागली. माध्यमांमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. एका वाहिनीने ब्रेकिंग दिली की लगेचच दुसरी वाहिनी देते. एका वेबसाईटने बातमी दिली की लगेचच दुसरी वेबसाईट देते… मिळालेल्या माहितीची खातरजमा केली पाहिजे, माहितीचा स्रोत कोण आहे, याची पडताळणी केली पाहिजे वगैरे गोष्टी दूर सारल्या गेल्या. त्यातूनच मग प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरू असतानाच सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी दाखविली जाते. काही सेलिब्रिटी त्यावर प्रतिक्रिया देऊन श्रद्धांजली वाहतात आणि नंतर समजते की निशिकांत कामत अद्याप गेलेले नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कशाचे निदर्शक आहे तर केवळ स्पर्धेचे. बरं या स्पर्धेला काही नियम नाही किंवा कोणतीही चौकट नाही. स्पर्धा कशासाठी याचे उत्तर केवळ आणि केवळ आकड्यांसाठी. मग ते आकडे एकतर टीआरपीचे, सर्क्युलेशनचे नाहीतर नफ्यातोट्याचे.

संपादकीय विभाग जसजसा या आकड्यांमध्ये अडकत गेला, तशी व्यवस्था कोलमडल्यासारखे चित्र निर्माण झाले. बातमी करताना ती पत्रकारितेच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हा विचार करण्याअगोदर ती चालेल का, सोशल मीडियामध्ये व्हायरल होईल का, याचा जास्त विचार केला जातो. त्या बातमीमुळे आपली व्ह्यूअरशीप वाढेल का, आपले सर्क्युलेशन वाढेल का, पेजव्ह्यूज मिळतील का वगैरे मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यातूनच मग अनेक चांगले विषय माध्यमे हाताळतच नाहीत. अनेक घटनांच्या खोलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. त्यातूनच मग रिया चक्रवर्तीच्या गाडीचा पाठलाग करणे, कंगना राणावतच्या ट्विटवर पानपानभर लेख लिहिणे वगैरे कचर्‍यात टाकण्यासारखे मुद्दे अग्रस्थानी येतात. लोकांना हेच हवंय, यालाचा टीआरपी जास्त आहे सांगत आपणच आपले समाधान करण्याचे काम केले जाते.

अलाईन मुलर या लेखिकेने एका संकेतस्थळावर लिहिलेल्या एका लेखात बातम्यांचे वाचन, ग्रहण करण्यात आपला वेळ का वाया घालवू नये याची काही कारणे दिलीत. ही कारणे कोणती समजून घेणे महत्त्वाचे आहे. तिने दिलेले पहिले कारण असे की, बातम्या म्हणून आपल्यापुढे जे ठेवले जाते. ते घडण्यामागील प्रमुख कारणे शिक्षणाचा अभाव, जनजागृती कमी, समाजातील असमानता-भेदभाव, प्रामाणिकपणाचा अभाव आणि खुलेपणाने बोलण्याबद्दल कचरणे ही सगळी एकसमान आहेत. जेव्हा यामुळे कोणती बातमी पुढे

येते तेव्हा गदारोळ उठतो. पण मूळ कारणाला कोणीच हात घालत नाही. दुसरे कारण सांगताना ती म्हणते, एखादी मोठी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी त्याचा पाठपुरावा त्याच पद्धतीने माध्यमांमध्ये येतच नाही. केवळ आत्ता काय घडले यावरच माध्यमांचे जास्त लक्ष केंद्रित असते.

वेगवेगळ्या स्वरुपातील माध्यमांमधून माहितीचा मारा मोठ्या प्रमाणात केला जातो. पण कृती शून्य असते. बातम्यांमधून माहिती खूप मिळते, पण ज्ञान अजिबात वाढत नाही, असे तिने तिसरे कारण देताना म्हटले आहे. बातम्या केवळ समोरच्या व्यक्तीला घाबरवण्याचे काम करतात. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. बातम्या वाचून आनंद मिळतो, असे कधीच होत नाही, असे चौथे कारण अलाईन मूलरने दिले. ही कारणे समजून घेतली पाहिजेत. कारण ती संशोधनातून पुढे आली आहेत. माध्यमे आकड्यांच्या मागे लागल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून ही कारणे निर्माण झाली आहेत.

डिजिटल मीडियामुळे निर्माण झालेल्या विविध वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनेल हेसुद्धा एक आव्हानच आहे. एकतर हे सर्व कोणत्याही नियमात बांधलेले नाही. सध्या तरी कोणत्याही सरकारी परवानगीची याला गरज नाही. कोणीही उठतो आणि एखादे युट्यूब चॅनेल काढतो, अजून एक उठतो बातम्यांसाठी वेबसाईट तयार करतो. या सगळ्यांना लवकर पैसे कमवायचे असतात. त्यातूनच मग पत्रकारितेची नीतीमूल्ये खुंटीवर टांगून कोणत्याही राजकीय नेत्याचे, राजकीय पक्षाचे मांडलिकत्व काही जणांकडून घेतले जाते. त्यांच्याचकडून निधी घेऊन त्यांचाच उदोउदो करणारा आशय या माध्यमातून वितरित केला जातो. एकतर या सगळ्यांची कुठेही नोंदणीच नसते. कोणते युट्यूब चॅनेल नक्की कोणाचे आहे, कोणती वेबसाईट नक्की कोण चालवतोय, हे वाचकांना समजतच नाही. त्यातून प्रसारित होणारा आशय अनेकवेळा एकांगी असतो. त्यामुळे वाचणार्‍यांचे मन कलुषित होण्याची शक्यताही जास्तच असते. दुसरीकडे स्पर्धा तीव्र वाढल्यामुळे ज्याचे वार्तांकन करायलाच नको, असे मुद्दे केवळ स्पर्धेत वेगळे दिसण्यासाठी कव्हर केले जातात. मग ब्रेसिअरच्या पट्टीवरून अभिनेत्री ओळखा असा बावळट प्रकारही मुंबईतील एका मोठ्या दैनिकाच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून केला जातो. कशाला कशाचा धरबंदच उरला नसल्याने आणि पत्रकारिता करताना विचार करायचा असतो हेच विसरल्याने असला भंपक प्रकार सुरू राहतो.

आधीच वाचकांकडे वेळ कमी असल्यामुळे ते वेगवेगळ्या माध्यम प्रकारांमध्ये फार वेळ गुंतून पडत नाहीत. त्यात स्पर्धेमुळे कोणताही विषय बातमी म्हणून पुढे आणला जाऊ लागल्याने काही माध्यमे विचार करायला लावण्यापेक्षा मनोरंजन करण्यासाठी बघितली किंवा वाचली जाऊ लागली आहेत. त्यामुळेच समाजातील वास्तव मांडून जनभावना तयार करणे वगैरे गोष्टी काही वर्षांनी माध्यमांचा इतिहास म्हणून शिकवल्या जातील की काय अशी शंका उपस्थित होते. माध्यमातील नवनिर्मित व्यवस्थेचा प्रातिनिधिक बुरखा खोट्या टीआरपीमुळे टराटरा फाटला. पण ही तर सुरुवात आहे… अजून बराच तळ गाठायचा आहे… सध्या तरी इतकेच…

First Published on: October 18, 2020 5:44 AM
Exit mobile version