स्त्रीवाद आणि फ्लर्टिंग!

स्त्रीवाद आणि फ्लर्टिंग!

सामाजिक क्षेत्रात किंवा जेंडर आधारित काम करणार्‍या संस्थांमध्येदेखील स्त्रीवादी असणं तितकं सोपं नाही. संस्थेत कित्येक वर्षे काम करताय, उच्च पदावर आहेत, किंवा स्वतः संस्थापक असलेल्या लोकांकडून माझ्याही अपेक्षा बर्‍याच वेळी चिरडल्या जातात. निदान बेसिक दृष्टीकोन असणार एवढी माफक अपेक्षा करण्याचीसुद्धा सोय बहुतेक वेळा नसते. मी 22 वर्षांची असताना ह्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्या पूर्वी एनजीओ, सोशल वर्क, चळवळ यातल्या कोणत्याही गोष्टींशी माझा काहीही संबंध नव्हता. पण इथे लोक संवेदनशील असतील हे मी गृहीत धरलं होता. सुरुवातीला आणि काही प्रमाणात अजूनही अनुभवाने सिनियर असणार्‍या व्यक्तीने (खरं तर पुरुषाने) सेक्सिस्ट जोक मारलाय हेच कळायला दोन दिवस लागायचे. कारण त्याच्या तोंडून ते अपेक्षितच नसायचं. पुढे अशा लोकांचे रंग हळू-हळू दिसायला लागले आणि कितीही काही झालं तरी आपण त्याच समाजाचा भाग आहोत आणि म्हणून हे क्षेत्र अपवाद असू शकत नाही हे कळायला लागलं. अशा लोकांच्या गराड्यात आपण स्त्रीवादी म्हणून अधिकच ठळक दिसतो आणि मिटिंगमध्ये असो किंवा जेवताना गप्पा मारत असू आपण आपलं मत मांडणं म्हणजे वार करत आहोत असं बचावात्मक भूमिका घेऊन भासवून दिलं जातं. बरं आपण गप्प राहायचा निर्णय घेतला तरी कुणीतरी कुत्सिक हसून आपल्याकडे पाहत असतं आणि तिला कशी चर्चा पटत नाहीये हे इतरांना दाखून देण्याची काळजी ते घेतात.

नाशिकमधल्या संस्थांमध्ये काम करताना वाटायचं की, हे अज्ञान इथेच असेल. पण आता आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत काम करतानाही तेच अनुभव येताय, आणि बांगलादेशमध्ये काम करत असताना तर ते अधिकच तीव्र होते. त्यामुळे पितृसत्ता नव्याने अंगवळणी पडतेय! इथे काम करत असताना समोरची व्यक्ती स्त्रीवादी असल्याची चुणूक लागताच डोक्यात असलेले अनेक समज गैरसमज काम करायला लागतात आणि त्यातूनच लोक आपल्याशी बोलायला लागतात. त्यापैकी मी अनुभवलेले काही स्टिरिओटाईप्स सांगते.

स्त्रीवादी बायका पुरुषद्वेषी असतात हा गैरसमज तर खूपच प्रचलित आहे. पण संस्थांमध्ये सरळ हे वाक्य वापरणं अलीकडे टाळायला लागले आहेत. पण थेट असं न म्हणता इतर अनेक पद्धतींनी म्हटलं जातं. तुम्हाला का पुरुषांनी सांगितलेला मुद्दा पटेल, ‘पुरुषांनी बोललेली प्रत्येक गोष्ट का जेंडर नजरेतून तपासताय’, इत्यादी गोष्टी बोलून आपण पुरुषांना टार्गेट करतोय असं दाखवून दिलं जातं. या उलट इतकी वर्षे ह्या क्षेत्रात, स्त्रियांसोबत काम करूनही पुरुषांची (आणि कित्येक स्त्रियांचीसुद्धा) भाषा सुधारलेली नाहीये हे कुणी लक्षात घेत नाही.

स्त्रीवादी बायकांना जोक सहन होत नाही हा अजून एक समज आहे. आणि आपली सहनशक्ती तपासायला मुद्दाम सेक्सिस्ट जोक मारले जातात. तेही अशा ठिकाणी जिथे विरोध केला तर वातावरण खराब केल्याचा ठपका आपल्यावर ठेवता येईल. अजाणतेपणे की जाणतेपणाने हे लोक गर्दीच्या ठिकाणी, चहाच्या ब्रेकमध्ये इत्यादी हे प्रकार करतात. आणि जणू सगळेच आता ही कशी प्रतिक्रिया देते ह्या उत्सुकतेने आपल्या तोंडाकडे बघत असतात. अशा वेळी काही स्त्रीवादी बायका जोक समजला नाही असे सोंग घेऊन तो जोक फोडून सांगायला लावतात आणि मग तिथून पुढे त्यांचा जोक सुरू होतो.

लांब फॅब इंडियाचे कुर्ते, मोठे कानातले आणि टिकली हे स्त्रीवादी बायका लांबून ओळखण्याचे चिन्ह मानले जातात. ह्यांच्याकडे भरपूर पैसे असून घरची काही जबाबदारी नाही आणि म्हणूनच स्त्रीवाद ह्यांना परवडतो अशाही टीका आडमार्गाने केली जाते. ह्या बायकांच्या आवडी निवडी, छंद, फिरणे, खाणे-पिणे इत्यादींवर ऑफिसची बारीक नजर असते. पुरुष तर खास करून इर्षेने पाहतात आणि आम्हाला कशी घरादाराची आर्थिक जबाबदारी घ्यावी लागते जे तुम्हाला कधीच कळणार नाही असे टोमणेही देतात. यातून इर्षा नेमकी कसली आहे? त्यांच्या मुक्त जगण्याची की, घरातील जबाबदार्‍या सांभाळून स्वतःलादेखील महत्व देता येण्याच्या कौशल्याची हा प्रश्न मला अशा लोकांना विचारावासा वाटतो.

स्त्रीवादी बायका कुचक्या, अभिमानी आणि वर्चस्व गाजवणार्‍या असतात असं तर सर्रास म्हटलं जातं. आता बायका कशा असाव्यात याच्या काही कल्पना मोडीत काढणार्‍या बायका, स्वतःचं मत मांडणार्‍या बायका लोकांच्या नजरेत खुपल्या नाही तरच नवल, पण याला निदान जेंडरवर काम करणार्‍या संस्था तरी अपवाद ठराव्या अशी अपेक्षा होती.

या सर्वांच्या पलीकडे जाऊन स्त्रीवादी असल्यामुळे बर्‍याच फ्लर्टिंगला सामोरं जावं लागतं. ह्या बायका अ‍ॅव्हेलेबल असतात अशी धारणा असते. फ्लर्टिंगला रस्ता मोकळा मिळावा म्हणून कित्येक पुरुष ‘मीही खूप फेमिनिस्ट आहे’, अशा प्रकारची वाक्य बोलून सुरुवात करतात. थोडंफार इम्प्रेस केलं की, लगेच आपण ह्यांच्यासोबत सेक्स करायला तयारच होणार आहोत, अशी धारणा मनात ठेऊन प्रयत्न चालू असतात. ह्या एक पतित्व मानत नाहीत आणि त्यामुळेच ह्या बायका लग्न करत नाहीत किंवा मॅरेज मटेरियल नसतात अशा गोष्टीही बोलल्या जातात. अशा लोकांचं फ्लर्टिंग उघड करणंही फार अवघड होतं. कारण इतर लोकही ज्यांना पूर्वी कधी तरी ह्या बायाकांनी इंगा दाखवलेला असतो ते आपल्यावर विश्वास ठेवण्याच्या मूडमध्ये नसतात. हे इतकं अवघड होऊन जातं की, आपण आपल्याच भावनांवर शंका घ्यायला लागतो किंवा तसे वातावरणच तयार केले जाते.

हे सर्व स्टिरिओटाईप्स का जपले जातात ह्यावर विचार करत असताना मला अनेक चेहरे आठवले, जे स्त्रीवादी बायकांना वार करत असलेल्या शत्रूच्या जागी ठेऊन बचावात्मक भूमिका घेत असतात. ही बचावात्मक भूमिका घेणार्‍यांचेही काही प्रकार आहेत. यात आम्ही स्त्रीवाद नाही समानता मानतो, आता भेदभाव उरलेलाच नसून समानता आलेली आहे, मीही खूप फेमिनिस्ट आहे, स्त्रीवाद कोळून प्यायलेले, ‘नॉट ऑल मेन’ म्हणणारे असे अनेक प्रकार दिसतात. हे सर्व ठेवणीतले वाक्य डोक्यात पक्के करून त्याला आधार देणारा युक्तिवादही ह्यांनी पाठ केलेला असतो. हे युक्तिवाद तेव्हा तेव्हा बचावासाठी बाहेर काढले जातात जेव्हा ह्या लोकांची जागा एखाद्या स्त्रीवादी बाईने प्रश्न विचारून धोक्यात आणलेली असते.

स्वतःला स्त्रीवादी दाखवणारे किंवा मानणारे (पण नसणारे) लोकही हे स्टिरिओटाईप्स जपण्यात फार महत्वाचे योगदान देतात. स्त्रीवादी भाषा वापरून उलट आपल्यावरच वार करण्याचा किंवा निदान स्वतःचा बचाव करण्याची ही केविलवाणी धडपड स्त्रीवादी बायकांच्या नजरेतून सुटत नाही. हे सर्व बोलतानाही मी पुरुषांना टार्गेट करून बोलतेय असं वाटत असेल तर ते काही अंशी खरंही आहे. कारण मला बायकांकडून असे अनुभव आले असले तरी दुर्दैवाने मी ज्या संस्थांमध्ये काम करते तिथे पुरुषच जास्त आहेत. ह्या पुरुषांमध्ये अपवाद आहेत हे सांगायची गरज दर वेळेस असते, नाही तर ‘नॉट ऑल मेन’ गट जागा होतो आणि कसं हे सर्व मुद्दे त्यांच्यावर लागू होतच नाहीत हे एक वाक्य मारून सिद्ध करायला जातो.

आपण कोरोना वर लस शोधली तर कोरोनाची उत्क्रांती होऊन नवीन कोरोना उभा राहिला तसच स्त्रीवाद जिथे जिथे आला तिथल्या पितृसत्तेने हे नवीन रूप धारण केलेले ह्या स्टिरिओटाईप्समधून दिसते. मागे म्हणाले तसं संस्थाही समाजाचाच भाग आहेत आणि म्हणून पितृसत्तेचे इथे हे प्रारूप दिसणे नवल नाही. पण ह्याच संस्थांनी मला अशा काही गटांशी मैत्री करून दिली आहे, जिथे प्रेमात पडावं अशा खर्‍या अर्थाने स्त्रीवादी लोक भेटतात आणि वाळवंटात मधाचा घोट मिळाल्या सारखं ह्या स्टिरिओटाईप्सना फाट्यावर मारून काम सुरू ठेवण्याचं बळ मिळतं!

–प्रियंका अक्कर 

First Published on: March 7, 2021 3:50 AM
Exit mobile version