आंदोलन अचानक!

आंदोलन अचानक!

बघता बघता बातमी झळकली – वाहतूक व्यवस्था विस्कळीत.
आम्ही म्हटलं, श्रावणातला पौराणिक पाऊस कोसळतोय, परंपरेप्रमाणे वाहतूक विस्कळीत ही होणारच. तुळतुळीत केलेल्या दाढीसारख्या कितीही गुळगुळीत रस्त्यांवरून कितीही विकासाची गंगा वाहिली तरी पावसात वाहतूक विस्कळीत होणं हे जगातल्या कोणत्याच कार्यसम्राटाला तसं अशक्यच आहे.
आमच्या हे सगळं मनात असतानाच पुन्हा पुन्हा वाहतूक व्यवस्थेची ती बातमी झळकत राहिली. आम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या बातमीकडे दुर्लक्ष करत राहिलो. पण चॅनेल्स बदलत बसलो तरी खोडकर मुलाप्रमाणे ती बातमी प्रत्येक चॅनेलवर आमच्या डोळ्यांसमोर त्याच शब्दांत, त्याच कानामात्रेच्या व्याकरणात झळकत बसली.
शेवटी आम्ही दुर्लक्ष न करायचं ठरवलं तेव्हा वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचं खरं कारण आम्हाला कळलं.
सत्याची चाड असलेल्या, सत्याचा आग्रह धरलेल्या काही लोकांनी म्हणे त्या तुळतुळीत रस्त्यांवर येऊन उत्स्फूर्त आंदोलन सुरू केलं होतं. सत्याचा विजय नेहमीच शेवटी होतो हे सार्वत्रिक सत्य माहीत असूनसुद्धा आंदोलनाच्या सुरुवातीपासून सत्याची आग्रही मागणी त्यांनी लावून धरली होती.
सत्य बाहेर आलं पाहिजे, सत्य आम्हाला कळलं पाहिजे, सत्य महाराष्ट्राला कळलं पाहिजे, सत्य देशाला कळलं पाहिजे, सत्य सत्यवादींना कळलं पाहिजे, सत्य हे असत्य पचवून रात्री बिनधास्त घोरणार्‍यांनाही कळलं पाहिजे ह्यासाठी केवढा तो त्यांचा संविधानिक सोस होता!
सत्यासाठी त्यांच्या हातात टारगट लाठ्या, शेलाट्या काठ्या, तरणेबांड धोंडे, बचकंडे धोंडे आणि धष्टपुष्ट हॉकीस्टिक्सही आल्या होत्या. कुणाच्या हातात म्हणे शिगाही होत्या. सत्याचं उत्खनन करण्यासाठी म्हणे त्यांना त्याची आत्यंतिक गरज होती. आपलं विजातीय अमरप्रेम सफल करण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी विवाह मंडळात धावणार्‍या प्रेमिकांसारखे ते सैरावैरा धावत सुटले होते. पण त्यांची ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित होती हे विशेष होतं.
सत्याच्या शोधासाठी सैरावैरा धावत सुटलेले ते आंदोलनकर्मी आणि त्या सत्यशोधक गँगच्या मागे उपविजेत्यासारखे धावत सुटलेले माध्यमकर्मी अशी ती शर्यत लागली होती. पुढे पुढे पळणारं सत्य मात्र ह्या दोघांच्याही खूप पुढे निघून गेलं होतं. अर्थात, लाठ्याकाठ्या हातात असणार्‍यांना आपल्या हातात लाठ्याकाठ्या आहेत ह्याचाच खूप कर्कश्य आनंद होता. बर्‍याच दिवसांनी शांततेच्या पाठीत दोन धपाटे घालता येणार ह्या नुसत्या कल्पनेनेच ते आसुसले होते.

फार पूर्वी कुणा कवीच्या कल्पनेत शांतता स्वत:च निवारा शोधत यायची, पण इथे एव्हाना कानाकोपर्‍यात अशांतता प्रदेशांमागोमाग प्रदेश बळकावत सुटली होती. शांतताप्रिय जनांनाही अशांततेच्या साम्राज्यवादाचं हळुहळू काही वाटेनासं झालं होतं. त्यांना त्यांच्या खिडकीतून जरी ह्या अशांततेचं दर्शन होऊ शकत नसलं तरी ब्रेकिंग न्यूजच्या झिरझिरीत पडद्यातून त्यांना आरपारचं सारंकाही दिसत होतं आणि त्यातून होणार्‍या मनोरंजनाने त्यांचा छान टाइमपास होत होता.
आता वाहतूक आणखी विस्कळीत झाली होती. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा दिसू लागल्या होत्या. वाहतूक विस्कळीत होणं इथपर्यंत ठीक होतं. जनजीवन विस्कळीत होऊ नये अशी काळजी फारच थोड्या लोकांना वाटत होती. पण वाहतूक विस्कळीत करणार्‍या लोकांनीच जनजीवन विस्कळीत होणार नाही ह्याची काळजी घेतली होती. मध्यंतर कुठे करायचं आणि शेवट कुठे करायचा ह्याची रूपरेषा त्यांनी पडदा उघडण्यापूर्वीच ठरवली होती.
आता, पाचशे बांगड्या फुटल्या, कोणीच कोणास दिसेनासे जाहले अशा छापाचं सुदैवाने कुठे काही घडलं नाही. पण लाठ्या, काठ्या म्यान झाल्या. दगडधोंडे शिणले. तुळतुळीत, गुळगुळीत रस्तेही विकासकामाची गंगोत्री दाखवू लागले. आलिशान वाहनं रूबाबात धावू लागली. सत्याची कास धरलेल्या आंदोलकांचाही ड्रिंक इंटरव्हल झाला.
सगळी अशांतता पांगली तसा एक शांतताप्रिय नागरिक एका सुसंस्कृत रस्त्यावर आला. त्याला आम्ही त्याच्या भल्यासाठी म्हटलं – अजूनही शांततेचं पुनर्वसन झालेलं नाही, तू आपला तुझ्या घरी राहिलेलं बरं!
….तर तो आम्हाला म्हणाला – आतल्या गोटातून मला बातमी कळलीय.
आम्ही म्हटलं, कोणती बातमी कळली?
…तर तो म्हणाला – पुढची अशांतता प्रस्थापित करेपर्यंत आताची शांतता स्थगित करायचा हुकूम वरून सर्वांना प्राप्त झाला आहे.
आम्ही म्हटलं – चला, बरं झालं, आंदोलन मिटलं तर!
तो म्हणाला – आंदोलन कसलं…राडा म्हणतात त्याला.

First Published on: August 29, 2021 6:00 AM
Exit mobile version