जादूवर विज्ञानाचा उतारा!

जादूवर विज्ञानाचा उतारा!

अंधश्रद्धेतून मानसिक गुलामगिरीकडे ओढला गेलेला, आयुष्याची फरफट झालेला, पिडलेला, खचलेला, सारासार विवेक गमावून बसलेला मोठा समाजसमूह देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली चाललेल्या भयानक भोंदूगिरीच्या विरोधात संघर्ष करायला, सहजसहजी धजत नाही. तयार होत नाही. पुढे येत नाही. मात्र अशा पीडितांना वेळीच थोडा जरी आधार, धैर्य, दिलासा मिळाला तर हे लोक धाडसाने पुढे येतात आणि अंधश्रद्धांचा वापर करून, भोंदूंनी चालवलेली दमदाटी, दहशत झुगारून देतात, असा अनुभव अनेक वेळा कार्यकर्त्यांना आलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील 31 वर्षांच्या वाटचालीत, अध्यात्माच्या नावाखाली चालणारी अशी भोंदूगिरी, बुवाबाजी थांबवण्यासाठी, तिला जाहीर आव्हान देऊन, लोकमानसासमोर तिचे खरे स्वरूप उघडे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे.

संघटनेच्या चिवट संघर्षातून, संघटनेने मंजूर करून घेण्यात यश मिळवलेला जादूटोणा विरोधी कायदाही आता सतत मदतीला असतोच. परिणामी अशा भोंदूगिरीला काही प्रमाणात आळा बसला आहे. सदर कायद्याचा त्यांच्यात चांगलाच वचक बसला आहे आणि धाक निर्माण झाला आहे.असेही दिसून आले आहे.अलिकडेच मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो वापरून, देवदेवतांच्या नावे तंत्रमंत्र, चमत्कारिक वस्तू विकणे, त्यांची जाहिरात करणे याविरोधात आदेश जारी केला आहे. आता तो गुन्हा ठरणार आहे. न्यायालयाच्या ह्या निर्णयाचे आपण सर्वजण स्वागत करूया.

धर्माच्या व अध्यात्माच्या नावाखाली दहशत निर्माण करून, धाकदपटशा करणारी एक लहानसी घटना नुकतीच नाशिकमध्ये उघडकीस आली. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने, पीडितांना तात्काळ धीर व आधार मिळाला. त्यामुळे पीडित बांधव जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत न्याय मिळवण्यासाठी, हिंमत करून,पुढे येऊ शकले.

घटना अशी…. नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील एका धार्मिक स्थळाला लागून, मुख्य रस्त्याच्या कडेने काही व्यावसायिकांची, विविध व्यवसायांची दुकाने आहेत. धार्मिक स्थळांचा ताबा असणारे आणि व्यावसायिक यांच्यात, रहदारीच्या रस्त्यावरून मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोर्टात त्याबाबतच्या सुनावण्या चालू आहेत. पुढील काही दिवसात होऊ घातलेल्या सुनावणीत, अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागतो की नाही, याची धास्ती, भीती ह्या धार्मिक स्थळाच्या कारभार्‍यांना ग्रासू लागली आहे.

न्यायालयाच्या निकालाची धास्ती घेतलेल्या ह्या कारभार्‍यांनी धर्म, अध्यात्माच्या नावाने, अंधश्रद्धेतून दहशत निर्माण करण्याचे ठरविले.संबंधित व्यावसायिकांवर दैवी तोडगे करून,त्यातून त्यांना भीती दाखवण्याचा अघोरी प्रयत्न झाला. मात्र तो विज्ञानामुळेच उघडकीस आला….झाले असे…. अमावस्येच्या रात्री भारलेले, मंतरलेले तांदूळ, स्मशानातील राख, मिरची आधी वस्तूंचा ‘उतारा’ रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या, या दुकानाच्या बंद शटर्सवर करण्यात आला. मात्र आपण करीत असलेली दैवी, अवैज्ञानिक कृती विज्ञानाचे वरदान ठरलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.

हे ‘बिचार्‍या’ उतारा करणार्‍याच्या लक्षात आलेच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा हे दुकानदार आपापली दुकाने उघडण्यास, दुकानांजवळ पोहचली. तेव्हा सदर उतारा, तोडगा केलेल्या वस्तू त्यांच्या नजरेस पडल्या. मात्र त्यातील काहींनी झाडून, त्या वस्तू बाजूला केल्या आणि थोडे धाडस करून, घाबरत घाबरत का होईना, आपापली दुकाने उघडली. मात्र त्यातील काहींनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. त्यातच एका दुकानदाराच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला अन्य कारणास्तव कालच्या रात्री म्हणजे अमावस्येच्या रात्री वांत्या झाल्या होत्या. सदर करणी, दैवी तोडगा, उतारा आणि मुलाला झालेल्या वांत्या याचा काहीतरी संबंध असावा, अशा शंकेची पाल या व्यावसायिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात चुकचुकली. त्यामुळे ते जास्तच काळजीत पडले. म्हणून त्यांनी तातडीने नाशिक शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला. अगदी कमी वेळात चार-पाच कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. घटनेची कसून पाहणी करून, विचारपूस करून वस्तुनिष्ठ माहिती घेतली आणि भीतीग्रस्त व घाबरलेल्या व्यावसायिक बांधवांना धीर दिला. हा अघोरी दैवी प्रकारामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. योग्य ते प्रबोधन केले.

न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी व्यावसायिकांनी घाबरून, न्यायालयाकडे फिरकूच नये, यासाठी दुकानदारांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी, अंधश्रद्धेच्या आधारे दैवी उपाय,उतारा केला असावा, असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात उतारा करताना कैद झालेल्या व्यक्तीविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करणे कामी तक्रार अर्ज देणे आवश्यक आहे, असेही कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांना सुचवले. त्यांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार, त्या सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. घडलेली घटना कार्यकर्त्यांनी तसेच व्यावसायिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कथन केली. शहर पोलीस प्रमुखांकडे तक्रार अर्ज व सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज सादर केले. घटनेची सखोल चौकशी आणि तपास करून संबंधित दोषींवर जादूटोणा विरोधीकायद्यान्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाले. मात्र तरीही, ‘उतारा’ करणार्‍या इसमाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांना सतत पाठपुरावा करावा लागणारच आहे.

शहराच्या मध्यवस्तीत राहणारे आणि विविध व्यवसाय करणारे हे दुकानदार, व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी, चमत्कार प्रात्यक्षिकांसह, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. खरंतर, घटना अतिशय छोटी होती. पण त्यामागील हेतू हा, खर्‍या धर्माच्या, अध्यात्माच्या विरोधात होता,असे दिसून येते.

प्रत्यक्षात खरा धार्मिक, आध्यात्मिक पुरुष ओळखायचा कसा? त्याची सोपी खूण कोणती आहे? अशी व्यक्ती जीवनात संयमी आणि सदाचारी असते. आनंदाने अपरिग्रही राहते. अशी व्यक्ती भौतिक सुखापलीकडे जीवनाचे श्रेयस मानते. भौतिक सुखापेक्षा ते अनंत पटीने मोलाचे आहे, असे या व्यक्तीला वाटते. मात्र या सगळ्याचा केवळ शाब्दिक उच्चार करत ती व्यक्ती बसत नाही. ती करूणेने मानवसन्मुख कृती करते.आंतरिक विकास साधल्याने, अशा व्यक्तीच्या जीवनात शुचिता, साधेपणा, पावित्र्य व करूणा येते. त्याचा सहज प्रत्यय इतरांना येतो. जे आचरणात येते ते खरे अध्यात्म आणि तोच खरा धार्मिक, आध्यात्मिक पुरुष होय. अशा धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्तींचा बनलेला समाज असेल तर, तिथे दहशत, धाकदपटशा असण्याचे कारण उरत नाही. मात्र ज्यावेळी धर्माचा अतिरेक होतो.त्यातून धार्मिक कट्टरता आणि बौद्धिक गुलामगिरी जन्म घेते. अशा मानवी समाजात विधायकतेऐवजी विध्वंसकता जन्म घेते आणि विकसित होत जाते. याला वेळीच पायबंद घालण्यासाठी व्यक्तीला व समाजाला विवेकी विचारांचा अवलंब करण्यावाचून पर्याय नाही.

-डॉ. ठकसेन गोराणे

First Published on: February 21, 2021 5:40 AM
Exit mobile version