निसर्गाचे लचके आणि विनाशाच्या तोंडावर कोकण!

निसर्गाचे लचके आणि विनाशाच्या तोंडावर कोकण!

गुरुवारी एक बातमी आली. सिंधुदुर्गात कळणे खनिज प्रकल्पाचा बांध फुटला. खनिजमिश्रित पाणी परिसरातील शेतात आणि वाड्यांमध्ये घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले. हे आज ना उद्या होणारच होते. ते आज झाले. कळणे मायनींग सुरू होत होते तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी त्याला जोरदार विरोध केला होता. नामवंत मानसोपचार डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. रुपेश पाटकर यांची आई आणि या परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपोषण, आंदोलन, देवळात भजने करत लोकशाही मार्गाने चळवळ जिवंत ठेवत अनेक महिने हे आंदोलन सुरू ठेवले होते. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी आणि दक्षिण गोव्यातील अनेक गावे मायनींगमुळे उध्वस्त झालेले असताना देखील काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी कळणेसारखा एक निसर्गसंपन्न गाव उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणी दिला, या प्रश्नाचे उत्तर राजकारणी, प्रशासन आणि ठेकेदारांच्या मिलीजुली भागीत होते.

पण, लोकांचा आक्रोश दाबला गेला… शेवटी काय झाले? बेसुमार उत्खननाचा फटका बसलाच आणि कळणे बुडाले. लोक त्यावेळी आक्रोश करत होते, आताही आक्रोश करत आहेत. सरकारी बाबू येऊन पंचनामे करतील आणि जातील, पण अनेक वर्षे कष्टाने उभा केलेला संसार, शेती-बागायती ते कसे उभे राहणार? हा फक्त कळण्याचा विषय नाही. कोकणातल्या प्रत्येक गावाचा आहे. कारण आज जी गावे सुपात आहेत तीच उद्या जात्यात येणार आहेत. नद्यांमधून बेसुमार वाळू उपसली जात आहे. महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणार्‍या सातार्डे पुलाच्या खाली राजरोस वाळू उपसली जात असून प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे. कारण टेबलाखालून वाळू माफिया हप्ते देतात आणि त्यांना जाब विचारायला जाणार्‍यांवर तेच माफिया वाळूचे डंपर अंगावर घालून दिवसाढवळ्या खून पाडायला घाबरत नाहीत. अवैध वाळू उखननाने एक दिवस सातार्डे पुलाचे बीम कोसळून मोठी दुर्घटना होईल, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल.

याच सातार्डे पुलाच्या पलीकडे गोव्यात माझे मामाचे गाव. पेडणे तालुक्यातील उगवे हे गाव. याच गावातून वाहणारी नदी पुढे सातार्डेमार्गे समुद्राला जाऊन मिळते. ही नदी आजही माझ्या काळजात भरून वाहतेय… मामा नदीवर पोहायला घेऊन जायचा आणि पोहून झाल्यावर त्याच ओल्या धोतरात भरून शिंपले वर आणायचा. चार पाच वेळा नदीच्या तळाशी जाऊन शिंपले घेऊन तो वर आला की टोपली भरायची. मग मामा त्याच नदीच्या किनार्‍यावर असलेल्या आमच्या नारळाच्या झाडावरून शहाळी काढायचा… ती अमृताहून गोड शहाळी खाऊन झाल्यावर दुपारी तांदळाच्या पेजेबरोबर मामीने केलेल्या सुक्या शिंपल्याची चव जगातील कोणत्याही डिशला येऊ शकत नाही… पण आता मामा म्हातारा झाला आणि चार दशकांपूर्वीची त्या नदीचे पात्र आता सततच्या वाळू उपशाने प्रचंड खोल झाले असून आता तेथे शिंपले मिळत नाही तर मोठ्या मगरी आल्या आहेत. दर पावसाळ्यात आता नदीला मोठा पूर येतो… मामाची शेती आणि नारळाची झाडे ओस पडली आहेत. निसर्ग ओरबाडला गेलाय आणि नदीकाठचे संपन्न जीवन संपुष्टात आलंय. ती नदी आता आपली वाटत नाही. स्वच्छ, निळ्या नितळ पाण्याची ती नदी लाल गढूळ पाण्याने आता वाहते तेव्हा विनाशाची ती चाहूल असते…

कोकणातील नद्या आपली पूर्वीची कमाल पूररेषा ओलांडून नवे विक्रम करीत आहेत. हा जसा वाढीव पावसाचा परिणाम आहे; तसाच तो आपल्या चुकांचाही परिणाम आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. यात जागोजागचे अपुरे जलसंधारण, धरण व्यवस्थापन, बेबंद वृक्षतोड, नद्यांची उथळ व बेछूट वाळूउपसा होणारी पात्रे या सार्‍यांचा काय व किती संबंध आहे, हे प्रश्न आजच विचारणे आवश्यक आहे. ते विचारले नाहीत तर महाराष्ट्रात अशा शोकांतिका पुन्हा पुन्हा होत राहतील आणि राज्यकर्ते तात्पुरते उपाय योजून डोळ्यांवर कातडे ओढून पुढच्या शोकांतिकेपर्यंत ढिम्म बसतील. अशा दुर्घटना होतात, तेव्हा माणसे कोलमडून जातात. कुटुंबे उघड्यावर पडतात. मुले निराधार होतात. सारे समाजमन डहुळते. काळवंडून जाते. अशावेळी, या सार्‍यांना आधार देणे, हे सरकारचे व समाजाचे कर्तव्यच आहे. ते काम चालू झाले आहे. ते वेगाने व्हायला हवे. मात्र, या संकटातून महाराष्ट्रासमोर जे दूरगामी आणि मूलभूत प्रश्न उभे राहिले आहेत त्यांचाही विचार करण्याची हीच वेळ आहे. एखादी दरड कोसळून प्राण जातात, तेव्हा ते नैसर्गिक संकट असते. मात्र, दहा दहा ठिकाणी दरडी कोसळून इतके प्राण जातात आणि गावे उद्ध्वस्त होतात, तेव्हा ‘आपलेही काही चुकते आहे का’ हा विचार करणे आवश्यक आहे.

असे मूलभूत प्रश्न निर्माण होत असताना कोकणच्या विकासाला नक्की काय हवंय, याचा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण तो विचार मागच्या सरकारने केलेला नसतो. विधिमंडळ अधिवेशनात कोकणाच्या विकासावर आमदार भास्कर जाधव यांनी कितीही जोरात आवाज उठवत शाश्वत विकासाचा आराखडा मांडला तरी तो पुढे प्रत्यक्षात साकारला जात नाही, ही कोकण विकासाची शोकांतिका आहे. नाथ पै आणि मधू दंडवते यांच्यासारखी खर्‍या अर्थाने देव माणसे कोकणातून लोकसभेत गेली आणि त्यांनी या भागाचे प्रश्न सतत संसदेच्या पटलावर ठेवले. अशक्यप्राय कोकण रेल्वे आज कोकणातून धावते तेव्हा साथी मधू दंडवते यांच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांचे अथक प्रयत्न कारणीभूत ठरतात आणि त्यांना नकळत हात जोडले जातात. मी आजसुद्धा कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरतो तेव्हा प्रथम हातातील बॅग खाली ठेवून दंडवते यांच्या प्रतिमेला नमस्कार करतो. मला देव तेथेच देव भेटलेला असतो… मात्र कोकण रेल्वे धावल्यानंतर आज किती पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात उभे राहिले, हा प्रश्न काळीज पोखरतो.

समाजवादी विचार नव्वदीच्या दशकात वेंगुर्ल्याच्या मानसी खाडीतून वाहत अरबी समुद्रात जाऊन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली. मात्र गेले तीन तप वरचा असो की खालचा कोकणाने कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला साथ दिली. पण, आज कोकण आहे तेथेच आहे. या दरम्यान तीनवेळा शिवसेना सत्तेवर आली, हे विसरून चालत नाही. अक्राळ विक्राळ जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोकणच्या छाताडावर येऊन बसणार असे वाटत असताना अरेवा ही कंपनी बुडाली म्हणून कोकणवासीय वाचले. आता ग्रीन रिफायनरीच्या नावाखाली हिरव्या निर्सगाचे वाटोळे करण्याचा डाव खेळला जातोय…स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही, असे सांगून शिवसेनेने या प्रकल्पाला स्थगिती दिली असली तरी शिवसेनेचा काही भरवसा देता येत नाही, या संशयाचे भूत काही मानगुटीवरून खाली उतरत नाही. कारण आता नाणारवरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बारसू-सोलगावला ही रिफायनरी होत आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी असा काही प्रस्ताव नसल्याचे सांगितले असले तरी मातोश्रीवरून शेवटच्या क्षणी काय सूत्रे हलतील, याची काहीच खात्री देता येत नाही.

जैतापूर आणि नाणारसारख्या मानवी जीवितास आणि निसर्गाला धोकादायक प्रकल्पांमधून भकास विकासाचे गणित मांडता येत नाही तेव्हा मग डोंगर फोडून, नद्या प्रदूषित करून, वाळू चोरून, खाणी काढून विकासाचे मॉडेल मांडले जाते. पण, त्याचवेळी फळ प्रकल्प, पर्यटन योजना, बांबू विकास खुंटीला टांगून ठेवला जातो. कोकणात सातत्याने घडणार्‍या दरड कोसळण्याच्या घटना मानवनिर्मित आहेत. बेसुमार जंगलतोड, खणलेले चर, उतारांचे सपाटीकरण ही पावसाळ्यात दरडी कोसळण्याची प्रमुख कारणे आहेत. डोंगरात नवीन रस्ते बांधताना किंवा रुंदीकरण करताना उतारात केलेले बदल, बोगदे खणताना वापरलेले सुरुंग यामुळे डोंगरावरील तडे गेलेले खडक अस्थिर, खिळखिळे होतात. प्रचंड पावसाने माती भुसभुशीत होते आणि आधार सुटून दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, असे अभ्यासकांचे मत आहे. कोकणात पडणार्‍या प्रचंड पावसामुळे बॅसॉल्ट मूळ स्वरूपात न राहता, त्याचे रूपांतर जांभ्या दगडात होते. हा दगड सच्छिद्र व पावसाळ्यात पाणी साठवून ठेवणारा आहे. उन्हाळ्यात डोंगर कड्यावरील खडक तापतात आणि सैल होतात. पावसाळ्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे भेगा रुंदावतात आणि दरडी उताराच्या दिशेने कोसळतात. हे सर्व बदल जगण्यातील धोका वाढविणारे आहेत. त्याला विरोध करणारे आपण किती असहाय आहोत, हेच सिद्ध होते. प्रत्येक आपत्तीत नैसर्गिक कारण असतेच; पण त्यातला गंभीर धोका वाढतो तो माणसाच्या अनियंत्रित हव्यासाचा.

आज जगावर नजर टाकली तर युरोपसहित इतर खंडातील अनेक देशांमध्ये भयंकर अतिवृष्टी होत आहे. भारतातही आपण ती अनुभवतो आहोत. या अतिवृष्टीत पावसाचा जो जोर असतो, त्यामुळे शेतजमीन, डोंगर, नदीकाठ आणि जागोजागची माती यांची कितीतरी तीव्र हानी होते. या पावसाच्या मार्‍याच्या तीव्रतेमुळे दरडी कोसळतात, कडे निखळतात आणि पाण्याच्या प्रचंड ताकदीने हजारो टन गाळ वाहून नेला जाऊन तोही प्राणघातक ठरतो. ज्येष्ठ वैज्ञानिक माधवराव गाडगीळ यांनी पश्चिम घाटासंबंधीचा जो विस्तृत आणि शास्त्रीय अहवाल दिला होता; त्याची विकासविरोधी म्हणून वासलात लावण्यात सार्‍या राजकारण्यांनी भूषण मानले. मात्र, निसर्ग, पर्यावरण आणि मानवी वसाहती यांचा समतोल साधला न गेल्यामुळेच या दरडी कोसळण्याच्या घटना प्राणघातक ठरत आहेत. या घटनांनंतर आता मदतीचा महापूर सुरू झाला आहे. पण, कोकणच्या शाश्वत विकासाचे प्रारूप प्रत्यक्षात साकार होत नाही तोपर्यंत निसर्गाचे लचके तुटत राहणार आणि कोकण विनाशाच्या जवळ आलेला असेल…

First Published on: August 1, 2021 4:45 AM
Exit mobile version