आत्महिताची वाट

आत्महिताची वाट

-रामेश्वर सावंत 


अर्थात ‘रॉक क्लाइंबिंग’ म्हणजे, एक कौशल्यपूर्वक नजाकती-कलाच ! एकेकाळी मुंब्रा फर्स्ट स्टेपपासून प्रस्तरारोहणाचे धडे गिरवले जायचे. मुंब्रा देवीच्या अगदी खालील जंगलात असंख्य मोठमोठे प्रस्तर-बोल्डर्स आहेत. त्याला आम्ही मुंब्रा रॉक-नर्सरी म्हणतो. मुंब्रा नर्सरी, मुंब्रा फर्स्ट स्टेप पिन्याकल, कळवा वेस्टफेस वॉल, माकड कडा, दुधा स्लॅब हे इकडे ठाण्याच्या बाजूने तर बोरिवलीच्या बाजूने कान्हेरी गुंफेमधील काही कातळ भिंती या प्रस्तरारोहण सरावासाठी असत. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यावर रस्त्याच्या पलीकडे एक रेस्टॉरंट होते. तर कान्हेरी गुंफांमध्ये प्रवेश करतानाच गंगाराम शेठचा एक स्टॉल होता. इथे गिर्यारोहक कोण कोणत्या स्थळावर आहे हे कळण्याकरिता आणि सुरक्षितता म्हणून इथे ठेवलेल्या रजिस्टरवर प्रथम येताना आणि पुन्हा माघारी परतताना ‘सेफली रिटर्न’ नोंद व्हायची. दसर्‍याला इथे गिर्यारोहण साहित्याची सामूहिक पूजा झाली की सराव सुरू व्हायचा. कारण पावसाळ्यात मिळालेल्या मोकळ्या वेळेत येणार्‍या मोसमात कोणत्या शिखर सुळक्यांवर भिडायचेय हे मनसुबे बर्‍याच संस्थांचे ठरलेले असत. त्यासाठी कातळावरील थ्री पॉईंट टेक्निक सराव आणि मोहिमेचे प्लॅनिंग इथेही होत असे.

आजही या मार्गावरून जातांना मुंब्रा देवीची बेलाग कातळ भिंत, पारसिक सुळका पाहिल्यावर ते सखे सोबती मित्र त्यांसोबतच्या सुखद आठवणी जशाच्या तशा जागृत होतात. अलीकडेच एकदा आता नवीन झालेल्या मुंब्रा बायपासवर गाडी थांबवून मुद्दाम नर्सरीत गेलो. त्या बोल्डर्सना स्पर्श करताच अंगावर काटा आला. पहिला साष्टांग दंडवत घातला त्या कातळावर डोकं टेकवलं फक्त आणि डोळ्यांतून अश्रूभर्‍या-भावना मोकळ्या झाल्यात. कारण पुन्हा या जन्मात इथे येणे होईलसे वाटत नाही. याच जागेवरून मी शिकलो-घडलो-थोडाफार नावारूपास आलो. तासभर वरची मुंब्रादेवी कातळभिंत एकटक न्याहाळत निवांत बसलो. आग्या-मधमाश्यांची लगडलेली असंख्य पोळी, त्यांच्या उजवीकडून बोल्टींग केलेल्या रूटवरून पुढे होताना मधमाशांच्या भीतीने तेव्हा मला फुटलेला घाम जसंच्या तसं आठवतंय.

जीवनशक्ती एक बॅटरीच असते… तिलाही चार्जिंग व्हावेच लागते. ती एकांत-मौन, उपासना, प्रार्थना अशा मानसिक उपक्रमांत घडते. हे प्रबलीकरण केव्हा थांबू नये. या निसर्ग चेतनेस आपण व्हायटॅलिटी म्हणतो. त्यासाठी निसर्गाच्या कुशीत पुन्हा पुन्हा येऊन आव्हानं झेलत चार्जिंग होता येतं. होय; त्यामुळे प्रस्तरारोहणाची ऊर्जा एक नशाच होती. जुने मित्र, कुणीही इतक्या वर्षांत फार संपर्कात नाहीयत. डोंबिवली वाय एच ये युनिट, कॅम्पफायर, सागरमाथा, आणि माझा स्वतःचा ‘अल्पायनो समिटर्स’ ग्रुप. उमेश लोटलीकर, अरुण सावंत, अशोक शेणवी, प्रदीप केळकर, प्रजापती, बापू, विनायक शेट्ये, मिलन म्हात्रे असे कित्येक आवर्जून स्मरतायत. या सगळ्यांच्या आठवणींत अक्षरशः जड अंतःकरणाने माघारी परतलो.

जसे किल्ले-घाटमार्गांचा सहवास वाढतो तसतसे हे शिखर सुळकेही सादावु लागतात. ती खुमखुमी स्वस्थ बसू देत नाही. पहिल्या स्तरावरील हडबीची शेंडी, कर्नाळा, डांग्या, झेनिथ, लिंगाणा अशा सुळक्यांची चाचपणी केल्यावर आत्मविश्वास वाढलेला असतो. या सुळक्यांवरील आरोहण हे ‘थ्री पॉईंट टेक्निक’ तंत्रावर फ्री मूव्हमेंट क्लाइंबिंगच असते. फक्त उंचीवरून फॉल होऊ नये म्हणून लीड क्लाइंबर आपल्या सोबतचा रोप रूटवर अधेमधे कातळाच्या भेगेत पिटॉन्स-पेग्स मारून रोप त्यात कॅरॅबिनर्सद्वारे पास करत असतो. याला आपण ‘फ्री-ऍडेड क्लाइंबिंग’ म्हणतो. या प्रकारच्या चढाईत क्लाइंबरला आपल्या हाता पायाच्या कौशल्यावर हवी तशी मूव्हमेंट करायला मुभा असते आणि मजाही अनुभवता येते.

इथे मजा म्हणतोय, ती वास्तविक मजा नसते तर तो थरारही असतो. ते त्या क्लाइंबरचे स्किल असते. अशा काही मूव्हस असतात की त्या प्रत्यक्ष पाहणार्‍याच्या पोटात गोळा यावा. एखादा ट्रॅव्हर्स किंवा ओव्हर हँग पार करताना आरोहक ती रिस्क काउन्ट करून मूव्ह करतो. एखादा पिंच किंवा पिंसर पॉईंट होल्डवर शरीराचे पूर्ण वेट तोलावे लागते. कातळावरील एखादे छिद्र ज्यात एक बोटच मावेल अशात बोट रुतवून अख्खा शरीराचा भार त्यावर पेलून पुढील हाताची ग्रीप मिळवायची ते सुद्धा खालून कित्येक फूट उंचीवर हे येड्यागबाळ्याचे काम नक्कीच नव्हे. अशा कौशल्यासाठीच तर तो सातत्यपूर्ण सराव हवा.

कान्हेरीच्या स्लॅबवरचा अंडरकट एका दमात दुतर्फा मारणे, सत्तर फुटी स्लॅब हात न टेकवता शरीर तोलत चढणे, वेगवेगळ्या प्रकारे कसून सराव व्हायचा. अगदी वरच्या आश्रमाकडील ओव्हर हँगची तर वेगळीच खुमारी होती. उभ्या फटीत बोटांची ग्रीप घेत अर्धा टप्पा गाठायचा आणि या टप्प्यावरील आपल्या डोक्याच्याही दोन फूट वरील आपणास न दिसणार्‍या एका छिद्रात उजव्या पंजाचे मधले एकच बोट रुतवून ती मूव्ह एका फटक्यात मारायची म्हणजे कसोटी होती. याच मूव्हवर बरेचदा बिले-फॉल व्हायचा. पुन्हा पुन्हा या पॅचवर प्रयत्न करताना प्रसंगी थकायला व्हायचे. आत्ता माझाच लेख म्हणून कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण एक वेळ अशी आली की हाच ओव्हर हँग मी विदाऊट बिले एका दमात पार करू लागलो होतो. बिले न घेण्याची माझी कृती पूर्णतः चुकीची होती. त्यास अरुण आणि इतरांचाही विरोध असायचा. पण तेवढाच माझ्या सरावावर माझा आणि ग्रुपचा विश्वास होता. या पॅचवरची माझी फ्री क्लाइंबिंग अनुभवताना माझ्यासाठी जोखीम होतीच पण ती पाहताना इतरांची धाकधूक वाढायची.

एकीकडे निसर्गावर प्रभुत्व संपादन करण्याच्या हव्यासामुळे आपले निसर्गाशी असलेले नाते माणूस विसरला. ‘प्रदूषण’ याचाच अर्थ निसर्ग विस्मरण होय. इंद्रियांनी खरंतर मनाच्या आणि बुद्धीच्या आज्ञेने चालावे, हा वास्तविक नियम असतो. पण मन हे इंद्रियवश होत चाललेय आणि इंद्रिये ही उद्दीपन वश झाल्याचे सर्वत्र दिसून येतेय. दुसरीकडे निसर्गप्रेमी-पर्वतरोहक मात्र निसर्गाचे प्रभुत्वच कायम मानत त्याची अथांगता-उत्तुंगता शिरोधार्य मानत त्याचा आदर करतोय. प्रस्तरारोहणात ज्याने त्याने स्वतःच्या कुवतीचा पक्का अंदाज घेऊनच साहस करायचे असते. कुणास काय वाटेल, कोण काय म्हणेल, कमीपणा-फुशारकी इथे उपयोगाची नसते. जरूर रोपचा बिले घेऊन ऍडेड प्रकारात हवं ते साहस करता येईल. मोठ्या उंचीचा फॉल झाला तरीही फॉलिंग टेक्निकवर फारतर खरचटण्यावर भागेल. या स्तरावरचा कसून सराव झाल्यावरच उत्तुंग उंचीच्या शिखरांचे आव्हान स्वीकारावे. शिबिरांत माफक ट्रेनिंग घेऊन कुणास आरोहक नाही होता येत. NIM किंवा HMI मध्ये जाऊन बेसिक, ऍडव्हान्स कोर्स केलाय म्हणजे तो पट्टीचा प्रस्तरारोहक बनेल, हे यत्किंचितही शक्य नव्हे. त्यासाठी फक्त आणि फक्त हार्डकोर सरावच हवाय. शिखर प्रस्तरारोहण मोहिमेचे नियोजन करताना तीन ग्रुपमध्ये वर्गवारी करायचो. एक म्हणजे प्रत्यक्ष आरोहण करणारा लीड क्लाइंबर ग्रुप, दुसरा त्यांना रोप-बिले देणारा ग्रुप आणि तिसरा म्हणजे सपोर्ट टीम. या तिन्ही ग्रुपची सामुदायिक जबाबदारी असल्याने टीमवर्कने यश साधले जाते.

शिखर प्रस्तरारोहण अनुभवाची सुरुवात सपोर्ट टीम मधून करावी. ज्याला उत्कृष्ट प्रस्तरारोहक बनायचे त्याने मोहिमेचे जास्तीत जास्त सामान पाठीवरून वाहून नेण्याची क्षमता तयार करावयास हवी. जिथे चार चाकी प्रवास संपतो तिथून एका वेळी किमान 20-25 किलो वजन शिखराच्या बेस कॅम्पपर्यंत नेता यावयास हवे. शक्य झाल्यास पुन्हा लोडफेरी करता यावयास हवी. हे कुणी लिडरने सूचना देऊन सांगण्यापेक्षा आपण स्वतः चक्क हावरेपणाने अशा हेवी लोड सॅक्स उचलाव्यात. हल्ली मी काही शिबिरात पाहतोय, युवकांना अनावश्यक चॅटिंग,सेल्फी फोटोज काढण्यापलीकडे या शिबिरांत काही शिकावयास तिळमात्र स्वारस्य नसते. आपण ज्या संस्थेच्या माध्यमातून एखादा अनुभव घ्यावयास येतोय त्या संस्थेच्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये समरसून काही पाहावे, शिकावे, सहकार्य करावे असा भाग जाणवत नाही.

संस्थेचे सामान मागे तसेच राहिलेय याच्याशी काही देणे वा न घेणे हा युवकांमधील सेल्फीश भाव मलातरी अस्वस्थ करतो. अशावेळी वाटतं आणि मनोमन पटतं आत्ता पुरे; नको यापुढे कुणासाठीही अट्टाहास. या घडीला शिखर प्रस्तरारोहण करणार्‍या काही मोजक्याच संस्था राज्यात कार्यरत असतीलच. शिखरांचे जुनेच रूट बहुधा अवलंबिले जातात. चाकोरी बाहेर जाऊन व्हर्जिन रूट किंवा पूर्णतः नवीन बेलाग कड्यांना गवसणी घालायचे दिवस मागे पडतायत असे वाटते. दोन दशकांपूर्वी गिर्यारोहणातील इतके आधुनिक साहित्य उपलब्ध ही नव्हते. जेमतेम अत्यावश्यक साहित्यावर प्रसंगी कुणाकडून सहकार्य घेऊन मोहिमा व्हायच्या. आज कित्येक ठिकाणी क्लाइंबिंग श्यूजपासून हेल्मेट्सपर्यंत हवे ते महागडे साहित्य उपलब्ध आहे. याचा बहुतांश खरेदीदार हा ‘शो-शायनिंग’ पठडीतलाच. वेगवेगळ्या कंपनीचे ब्रॅण्डेड साहित्य पाहून माझ्यासारख्याला आजही हेवा वाटतो आणि प्रश्नही पडतो. आपलं तर याच्यामुळे काहीच अडलं नव्हतं.

तिसर्‍या प्रकारातील चढाई आरोहण हे ऍडेड प्रकारातीलच मात्र अधिक जोखीमभरे आणि पूर्णतः एक्सपान्शन बोल्टसच्या आधारावरच. जसे निसर्गतः कातळ भिंतींवर अंगावर आलेला कडा म्हणजे ओव्हर हँग असतो, तसेच चढता चढता ठरविलेल्या क्लाइंबिंग रूटवर जमिनीस समांतर असे कातळाचे छप्पर येते. त्यावेळेस त्या कातळावर कुठेही उभी-आडवी भेग, पोकळी नसेल तर त्या सपाट कातळावर एक्सपान्शन बोल्ट्स मारले जातात. अमर्याद फूट उंचीवर जमिनीस समांतर बॉडी पोझिशनमध्ये लटकत राहत कातळात हातोडी, पंच ड्रिलबिटच्या आधारे अचूक मापात ड्रिल करून बोल्ट परफेक्ट ठोकणं हे कुशल तंत्रच होय. त्यामानाने सरळसोट भिंत किंवा ओव्हर हँगवर कमी श्रम लागावेत.

सरळ किंवा ओव्हर हँगवरसुद्धा दोन बोल्ट्समधले अंतर जास्तीत जास्त म्हणजे किमान चार फूट तरी ठेवण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असे. खालील बोल्टवरील एट्रीअरच्या सर्वात वरच्या स्टेपवर उभा राहत आणि बिले रोपवर बॉडी बॅलन्स करीत हे अंतर साध्य होई. पण रूफ वर मात्र हे शक्य नसे. कमरेवर भार येऊन काही वेळा बोटे- खांदे-पोटर्‍या सुन्न व्हायच्या. पण एकेक बोल्टवर जसे अंतर पुढे जाई, तेवढेच रिलॅक्स वाटायचे. या प्रस्तरारोहण विश्वातले आणखी एक थ्रिल म्हणजे कड्याच्या भिंतीवरील क्लाइंबरचा रात्रीचा मुक्काम. हजार फूट उंचीचे शिखर चढताना 300 फुटांच्या वर आरोहण गेल्यानंतर एखादी छोटी लेज मिळाली तर त्यावर किंवा उभ्या सरळसोट भिंतीवर पिटॉन्स -बोल्ट्सच्या आधारे झुले अँकर करून त्यावर विश्रांती घ्यायची. खाली अथांग दरी वर नभाचे खुले छत.फक्त खुला निसर्ग आणि आपण. सोबत असलीच तर घारी-गिधाडांच्या ढोली. जे पोटासाठी हवंय ते बेसकॅम्प वरून वर ओढायचे आणि प्रातर्विधी ही तशाच अवस्थेत मॅनेज करायचे. यालाच शुद्ध भाषेत म्हणायचे तर खाज.

सूर्यास्तानंतरचे सृष्टीचे रूप एक प्रकारच्या आंतरिक संवेदनेने इथे कळते. निसर्गाची निरवता आणि स्वस्थता प्राण्यांना कळते. माणसांचे मात्र तसे होत नसावे. लखलखाट, झगमगाट, खडखडाट हाच खरा थाट आणि हाच जीवनाचा घाट असे समजून माणूस काळवेळ विसरून सृष्टीचे नियम चक्र उध्वस्त करून विहार करतोय हे कळते.

प्रखर महत्वाकांक्षा, सळसळता उत्साह, जिद्द, परिश्रम, प्रस्तरारोहणाचे अचूक ज्ञान, कातळाची ओळख-मैत्री ,सभान साहस, सरावातील सातत्य, समयसूचकता, संयम तेवढीच सावध आक्रमकता, चपळ देहबोली, सहकार्‍यांमधील विश्वासपूर्ण टीमवर्क, निसर्गावरील निस्सीम प्रेम आणि सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे धोका पत्करायची खाजएवढं असेल तर तो सर्वोत्तम शिखर प्रस्तारारोहक झालाच म्हणून समजा. शरीर विज्ञानाला स्वा-नुभवाचा आधार हवा असतो. निसर्ग सानिध्यात दर्‍याखोर्‍या, उत्तुंग पर्वत-शिखरे पालथे घालताना या अनुभवाचे पृथक्करण विज्ञानाच्या प्रकाशात होत असते. देहधर्माचा अभ्यास होत असतो. पर्वतारोहणातून ही आत्महिताची वाट नक्कीच सापडते.

First Published on: March 28, 2021 4:20 AM
Exit mobile version