अरे वा, तुमची पण पोळी फुगते!

अरे वा, तुमची पण पोळी फुगते!

मी तेव्हा स्त्रीवादी चळवळीत चांगलीच सरावले होते. नवरा बायकोचे भांडण झाले तर अनिताचा सल्ला घ्या, अशी माझी ख्याती किमान माझ्या वस्तीत तरी झाली होती. त्यामुळे ऑफिसला गेल्यावर तर कंपलसरी भांडणं ऐकावीच लागायची; पण रोजच वस्तीत किंवा घरी आलेल्या पाहुण्यांकडची भांडण ही ऐकावी लागायची. त्याच काळात मला एका प्रसिद्ध संघटनेचा ‘नवोदित कार्यकर्ती’ असा पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या दिवशी त्या संघटनेच्या बाई मला घ्यायला माझ्या घरी आल्या. बाई ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच आल्या होत्या. मी घाईघाईत पोळ्या करत होते. त्यांना माझी माहिती घ्यायची होती. बहुतेक माझा परिचय करुन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असावी म्हणून त्या आमच्या किचनमध्ये आल्या आणि माझ्या शेजारी उभ्या राहून माझी माहिती घेत होत्या. तेवढ्यात मी जी पोळी शेकत होते ती फुगली आणि ह्या बाई जोरात ओरडल्या, अरे वा, तुमची पण पोळी फुगते.

हा डॉयलॉगनंतर अनेकवेळा मी ऐकत राहिले, माझ्यासारख्या शेकडो स्त्री मुक्तीवाल्या बायांनी ऐकला असेल. पहिल्यांदा ह्या वाक्याचा किंवा बाई, स्त्री मुक्तीवाल्या आहेत; पण घर जाऊन पहाल तर एकदम चकाचक असते. अशा नको असलेल्या सर्टिफिकेट वजा रिमार्क देणार्‍या वाक्यांचा खूप राग यायचा. मी तर कचाकचा भांडत याचे उत्तर द्यायचे की, आम्हालाही घर आहे, मुलबाळं आहेत, त्यांचे सर्व आम्हालाच करावे लागते किंवा घर स्वच्छ ठेवणे हे काय फक्त बायकांचेच काम आहे का? इ.इ.. नंतर ह्या मागची मानसिकता समजायला लागल्यावर यावर जोक्स करायला लागले. असं म्हणणार्‍या स्त्री पुरुषांसमोरच त्या वाक्याची खिल्ली उडवायला शिकले. स्त्रीवादी चळवळीत काम करणार्‍या किंवा लोकांच्या भाषेत सांगायचे तर स्त्रीमुक्तीवाल्या बायांना पोळ्या येत नाहीत, सर्वांच्या घरी जणू सर्वच कामासाठी कोणीतरी असतेच. घरी प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात आयती मिळते. त्या भाजी आणायला मार्केटमध्ये कधीच जात नाहीत, त्यामुळे त्यांना मार्केट समजत नाही असे अनेक गैरसमज असतात आणि तसे ते बोलूनही दाखवतात. इतरांवर जशी जबाबदारी असते, तशी त्यांच्या कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी असते याची जाणच समाजाला नसते. मी ज्या कार्यालयात काम करायचे तिथे कधी मला ऑफिसला यायला उशीर झाला किंवा मी आज घरी कपडे धुवून, आलेल्या पाहुण्यांचे करुन दामले आहे असे म्हणाले की, ठरलेला डायलॉग असायचा, हँ, तुला थोडी आमच्यासारखी घरची कामे असतात?

मी कार्पोरेटमध्ये काम करायला सुरुवात केली तर माझा ‘स्त्रीमुक्ती वाली’ हा परिचय माझ्या आधी तिथे पोहोचला होता. एकदा माझा तिथला बॉस माझ्याबरोबर माझ्या नाशिकच्या घरी आला होता. मीही त्याच्याबरोबर मुंबईहून आले होते. तेव्हा माझे कुटुंब माझ्याबरोबर मुंबईला आलेले नव्हते. तर माझ्या पार्टनरने खूपच चवदार पोहे, चहा करुन माझ्या ऑफिसच्या टीमचा पाहुणचार केला होता. तेवढ्यात त्यांच्यापैकी कोणीतरी मला घराबद्दल काहीतरी विचारलं आणि मी मला माहीत नाही मनोहरला विचार असे म्हणाले. झाले, त्या दिवसापासून तर हिला हिच्या किचनमधलेसुद्धा साधे माहीत नसते. हिच्या घरी कायमच सगळं हिला हातात मिळतं याची इतकी बातमी पसरली की, नंतर मला कधीच ही भाजी मी केली, ह्यात मी असा प्रयोग केला हे वाक्य कोणी म्हणू दिले नाही. नंतर तर मला स्वयंपाक येतो याची माहिती कोणाला जाऊच नये, त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे नाही याचेच महत्व पटले. त्यामुळे यावरुन होणारे वाद माझ्या बाजूने आपोपाप थांबले. आजही घरात मरेस्तोवर काम करुनही, तुमचे तर काय तुम्हाला सर्व हातात मिळते. हा डॉयलॉग ऐकावाच लागतो. ह्यांना कुठून ही माहिती मिळते तर माझ्या पार्टनरने कधीतरी स्वयंपाक करतानाचा, माझ्या मुलीने बापाने काहीतरी चांगला पदार्थ केला म्हणून एखादा फोटो टाकलेला असतो, त्या एका फोटोवरुन लोक तुमचे चारित्र्य, कौशल्य आणि तुमचे व्यक्तिमत्व लिहितात. कारण त्यांच्या डोक्यात स्त्रीमुक्तीवाल्या म्हणजे उनाड हे फीट बसलेले असते.

एकदा एका महिलांसाठी प्रशिक्षण असलेल्या कार्यक्रमात ‘आम्हाला वेळच नाही मिळणार असं बायका सांगत होत्या. त्याला उत्तर देताना मी बायकांना घरातल्या कामांचे क्रम, त्याचे नियोजन, कमीत कमी वेळात, कमीत कमी भांडे वापरून स्वयंपाक कसा करावा, घरातल्या स्वच्छतेचे सोपे सोपे उपाय सांगत होते तर कार्यक्रमाला आलेला एक स्थानिक पुढारी हसत हसत म्हणाला की, अनिताताई आता तुम्हाला पूर्ण स्त्री मुक्तीवाल्या करुनच सोडणार. आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाला, यांच्या नवर्‍याचे आता काही खरं नाही. खूप राग आला होता; पण त्याच्या सो कॉल्ड जोकला एकही बाई हसली नाही त्यामुळे मीही गंभीर घेतले नाही. स्त्रीमुक्तीवाल्या बाईच्या पर्समध्ये छोटी पिशवी घडी केलेली ठेवलेली असते. मिटिंग संपल्यानंतर माझ्यासारख्या अनेक स्त्रीमुक्तीवाल्या बायांना त्यांच्या घरातला रिकामा झालेला फ्रीज आठवतो आणि त्या रस्त्याने चालताना एक डोळा कुठे भाजी ताजी, स्वस्त मिळते याकडे लक्ष ठेऊन असतात आणि भाजी दिसली की तुटून पडतात याची दखल घेतली जात नाही किंवा काही वेळा अतिदखल घेतली जाते. दोन्हीचा अर्थ पाहणार्‍याच्या/ पाहणारीच्या डोक्यात काहीतरी आधीच फीट बसलं आहे हेच खरं.

एकदा स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची राज्याची एक बैठक सुरू होती. मुंबईतल्या ह्या बैठकीला रोहिणीताई गवाणकर होत्या आणि त्या बाहेर गावाहून आलेल्या प्रत्येकीला प्रवास कसा झाला? राहण्याची व्यवस्था कशी आहे? सुखरुप पोहोचलात ना? मिटींगच्या जागेपासून राहण्याच्या जागेपर्यंत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे हे सांगत होत्या. मला कळेचना ह्या एवढी काळजी का करत आहेत. न राहवून मी त्यांना विचारलेच आणि त्यांनी जो अनुभव सांगितला त्याने त्यांच्याच नाही पण माझ्याही डोळ्यात पाणी तरळले आणि अंगावर शहारे आले. एकदा त्या मुंबईतच एका कामगारांच्या प्रश्नांच्या बैठकीसाठी गेल्या होत्या. एका कार्यक्रमाच्या तयारीची ती बैठक होती. सर्वांना दिवसभर कामावर जावे लागते म्हणून ह्या अशा बैठका कायमच रात्री उशिरा असतात तशी ही बैठकही उशीराच होती. कार्यक्रमाची तयारी होती त्यामुळे रात्री बर्‍याच उशिरा ती बैठक संपली.

सगळे कार्यालयातून खाली उतरले आणि आपापल्या गाडीवर निघून गेले. त्या सुनसान एरियात रोहिणीताई एकट्याच उरल्या. खूप घाबरलेल्या रोहिणीताई यांनी कशीतरी टॅक्सी मिळवली तर नेमका ड्रायव्हर प्यायलेला होता. पण त्याच गाडीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्या बसल्या. वाटेत काही झाले नाही आणि त्या सुखरुप घरी पोहोचल्या. दुसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या सर्व ‘कॉम्रेड्स’ना हा अनुभव सांगितला आणि म्हणाल्या, अरे किमान मी निघेपर्यंत तरी थांबत जा. त्यांना उत्तर आलं, अरे, तुम्ही तर स्त्रीमुक्ती वाल्या, मग घाबरायचं काय त्यात? रोहिणीताई सांगतानासुद्धा संतापलेल्या होत्या. स्त्रीमुक्तीवाल्या बायांना भीती वाटता कामा नये, त्यांनी कुठल्याही अनोळखी रस्त्यावरुनही कॉन्फिडेंटली चाललेच पाहिजे अशी अकारण, अवास्तव अपेक्षा असते. भीती हा मानवी स्वभाव आहे तो सर्वांमध्ये असणार याची सूटच आमच्यासारख्या स्त्रियांच्या वाट्याला येत नाही. स्वयंपाक, मूल सांभाळणे, गाडी चालवणे, मारामारी करता येणे, शिटी वाजवणे ही सर्व कौशल्ये आहेत आणि ही कौशल्ये शिकण्याची संधी ज्यांना ज्यांना मिळाली त्यांना त्यांना ती येतात इतके साधे नैसर्गिक ज्ञान आपल्याकडे समाजात दिसत नाही.

आजकाल खूप वेळा माझी नातवंड माझ्याकडे राहायला येतात. मग एखादे काम होतच नाही. त्यांना सांभाळणे, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांच्याबरोबर सतत सक्रीय राहणे यामुळे काहीतरी काम राहून जाते हे वस्तीच्या, युनियनच्या, कुठल्याही बैठकीत सांगितले की, लोकांच्या चेहेर्‍यावर आश्चर्य असते की, अरे म्हणजे तुमच्याही घरी आमच्यासारखेच असते? तुमच्याहीकडे मुलं असतात का? मला कायम वाटते की लोक असा का विचार करत नाही की, ह्याही माणूस आहेत, यांचेही कुटुंब आहे, ह्याही ह्याच देशात, समाजात राहतात तर त्यांनाही ह्याच वातावरणातून जावे लागत असणार?

बरे असे टोमणे बाहेरच्या माणसांनी दिले तर दुर्लक्ष तरी करता येते, पण जेव्हा तुमचे आपले लोक असे टोमणे मारतात, तुम्हाला गृहीत धरतात तेव्हा त्यांचे काय करावे हेच समजत नाही. एकदा मी आणि मनोहर माझ्या आईवडिलांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे आमचे बरेच नातेवाईक आलेले होते. त्या नातेवाईकांपैकी कोणीतरी विचारलं, झालं का जेवण? मी काही उत्तर द्यायच्या आत माझे वडील की, मामा कोणीतरी म्हणाले, हो झाले असेल ना, आले असतील अंडा भुर्जी आणि पाव खाऊन. कधीतरी कार्यक्रमाची खूप उशिरापर्यंत तयारी सुरू असताना साग्रसंगीत स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक असणारा वेळ, एनर्जी शिल्लक राहत नाही म्हणून कधीतरी खरंतर खूप कमी वेळा सर्वजण पटकन हातभार लावून भुर्जी करणार आणि पटकन कोणीतरी ब्रेड आणणार, पटकन जेवण उरकून पुन्हा कामाला लागणार असे घडते ना. पण ते ठरवून घडलेले असते. स्त्रीमुक्तीवाल्या बायांना स्वयंपाक येत नाही म्हणून त्यांच्या घरात घडत नाही तर ती पाककला दाखवण्यापेक्षाही अधिक गंभीर आणि महत्वाचे काहीतरी घडणार असते, घडत असते म्हणून ठरवूनच फक्त खिचडी, आम्लेट पाव किंवा अंडा भुर्जी केली जाते तर त्यातली गंमत समजावून न घेता, आनंद समजावून न घेता पटकन स्त्रीमुक्तीवाल्या बायांना बदनाम करण्याची राष्ट्रीय पद्धत आपल्याकडे आहे.

सर्वात महत्वाचा टोमणा जर कुठला असेल तर, काय माहीत नवर्‍याकडे नांदेल की नाही? किंवा मॅडम, तुमच्याकडे तुमचे मिस्टर तुमच्यासमोर काही बोलतात का हो? किंवा समाजातल्या अशा वातावरणाचा फायदा घेऊन अशा स्त्रीमुक्तीवाल्या बायांचे नवरे जेव्हा सहानुभूतीचा फायदा घेऊन मी कसा बिचारा आहे असे स्वतःचे चारित्र्य सेट करतो आणि बाईला त्रास देतो तेव्हा तर समाजाच्या ह्या पूर्वग्रहाचे काय करावे तेच समजत नाही. ज्या मुली लग्नाच्या आधीपासून सामाजिक चळवळीत असतात, स्वतःचे आकलन असल्यामुळे त्या काहीना काही विचार मांडतात आणि अशा मुली जेव्हा लग्नाचा विचार करतात तेव्हा त्यांना वरील सर्व डॉयलॉग ऐकावे लागतात. मी आणि मनोहरने लग्न करायचे ठरवले, घरात सांगितले, घरच्यांची संमती मिळाल्यानंतर मित्र मंडळींमध्येही आम्ही स्वतःहून आमच्या नात्याबद्दल सांगायला लागलो. असेच एकदा एका प्रसिद्ध लेखकाला मी लग्न करते आहे असं सांगून मनोहरचा परिचय करून दिला तर त्यांची प्रतिक्रिया, तू का तो निधड्या छातीचा पुरुष, जो हिच्या बरोबर लग्न करायला तयार झाला. मला या वाक्यावर हसावं की, त्या लेखकावर रडावं हेच समजत नव्हतं.
आपल्या देशात विवाहित स्त्रीला तिच्या आयुष्यात कधी ना कधी माराला सामोरे जावे लागेल हे इतके गृहीत आहे किंवा याचे प्रमाण प्रत्यक्षातही खूप आहे. त्यामुळे एखादी बाई जेव्हा नवरा मानसिक त्रास देतो, अश्लील बोलतो, अपमानास्पद बोलतो याची तक्रार करते तेव्हा लोकांना खूपच आश्चर्य वाटतं.

अतिशय सहजपणे एखाद्या फटक्याची काय तक्रार करणार अस म्हटलं जातं. पुरुषांना घरीदारी तोंड द्यावे लागते, कामावर तर बॉसला उलटून बोलू शकत नाही किंवा त्याच्यावर हात उगारू शकत नाही म्हणून मारला असेल एखादा फटका किंवा उठला असेल त्याचा हात असं सहज म्हटलं जातं. लोकांनी आपल्या स्त्रीमुक्तीला शिव्या देऊ नये, आपल्या नात्याचे अपयश आपल्या विचारांवर फोडू नये म्हणून मला अनेक स्त्रिया अशा माहीत आहे की, त्या नवर्‍याचा त्रास काढतात, त्याला हवं नको ते सर्व पूर्ण करतील आणि मग आपल्या आवडीच्या कामासाठी बाहेर पडतील. सासरच्यांनी कितीही अपमान केले, घालून पाडून बोलले तरी अशा स्त्रिया गप्प राहून ते नातं टिकवण्याचा आटोकोट प्रयत्न करत असतात का तर ही पहिल्यापासूनच फटकळ होती. आम्हाला माहीत होतं हीच नाहीच पटणार हे वाक्य ऐकायला लागू नये. किंवा ज्या घरातून जरा बाईला मोकळीक मिळाली की ते घर म्हणजे स्वर्गच जणू काही असं वर्णन केले जाते किंवा त्या कुटुंबाचे कौतुक केले जाते. ती सूट मिळावी यासाठी त्या बाईला जीवाचा जो आटापिटा करावा लागतो त्याची दाखल मात्र घेतली जात नाही. ज्या ज्या बायका विशेषतः स्त्रीमुक्तीवाल्या बाया फटकळ आहेत किंवा त्यांचे नाते टिकले नाही अशा स्त्रियांचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, त्यांनी स्वतःचा अपमान नाकारला, हिंसाचार नाकारला म्हणून ते नाते बिघडले किंवा त्यांना ते नाते सोडून द्यावे लागले.

परवाच एका तरुण मुलीचा घटस्फोट झाला. ह्या आंतरजातीय लग्नासाठी तिने खूप जीवाचा आटापिटा केला होता. सगळ्या जग दुनियेच्या विरोधात जाऊन तिने हे नाते जुळवून आणले होते. ज्या दिवशी घटस्फोट झाला त्यादिवशीही ती कोर्टात नेहमीप्रमाणे नीटनेटकी आली होती. अगदी शांत होती, चेहेर्‍यावर कुठेही अपराध भाव, दु:ख नव्हतं. निर्णय झाला, तेव्हा तिच्या चेहेर्‍यावरचे भाव काही बदलले नाहीत किंवा पाणी येत होतं आणि ते तिने अडवले असेही झाले नाही. मला वाटले ती आपल्या भावना चांगल्या नियंत्रणात ठेवू शकली. मला रहावले नाही आणि मी सहनुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला तर अतिशय शांत चित्ताने ती म्हणाली, ह्याची काही गरज नाही. ते नातं मी मिळवलेले, प्रयत्नपूर्वक सजवलेलं होतं. माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही. पण मी जे केलं ते सर्व मनापासून होतं. मला त्याचा कुठलाही बदला घ्यायचा नाही. त्यामुळे आमच्यात झालेले वाद मी लक्षातही ठेवले नाही. त्यामुळे माझी रागाची फाईलच बनली नाही. मी अर्धा दिवसच सुट्टी घेतली होती. मला ऑफिसला जावं लागेल. चहा पित पित अतिशय थंडपणे तिने माझी सहानुभूती मला परत केली आणि पुढच्या बैठकीतल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊन निघून गेली. उद्याची कणखर स्त्रीमुक्तीवाली दमदार पावलांनी चालताना मी अनुभवत होते.

First Published on: March 7, 2021 4:45 AM
Exit mobile version