जे न देखे रवी, ते देखे कवी..

जे न देखे रवी, ते देखे कवी..

रंगीबेरंगी फुले सर्वांचेच मन मोहून घेतात. त्या फुलांवर तर कविता होतेच ही सामान्य बाब आहे. परंतु, कवीची कल्पनाशक्ती तेथेच नाही थांबत. तर तीच फुले जेव्हा कोमेजून निर्माल्य होतात, त्यावरदेखील रचना केली जाते. हा रचनाकार आपल्या शोधक, भेदक दृष्टीने या फुलांचे स्वरूप वर्णन करतो. उदा. ते फुल जेव्हा प्रियकर प्रेयसीला देतो तेव्हा त्याला प्रेमाचा रंग असतो, मंदिरात ईश्वरचरणी दरवळणार्‍या पुष्पात अध्यात्माचा रंग, प्रेतावर पडणार्‍या पुष्पक मालात श्रध्दांजलीचा अर्पण भाव, आणि तोच फुलांचा गजरा वासनेच्या दरबारात बांधला जातो तेव्हा तितकाच किळसवाणा वाटतो. फूल एकच, त्यामागचे भावरंग अनेक.

कविता म्हणजे संवेदनशील मनाचे प्रफुल्लित रूप आहे. तसेच कुठलेही काव्य हे अभिव्यक्तीचे अलंकारिक दालन आहे.
लेखणीतून कोर्‍या कागदावर उमटलेले शब्दभाव हे त्या कवीचे अंतरंग असते. रचनेतील विविध छटा त्या अंतरंगात डोकाऊन आलेल्या असतात.

आजच्या तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या काळात समाज माध्यमांमुळे कवितेला एक आगळा वेगळा वाचक वर्ग प्राप्त झाला आहे. काही ठराविक तोटे वगळता या माध्यमांचा उपयोग अभिव्यक्तीसाठी खूप उत्तम प्रकारे होतोय. पूर्वी तुमचे साहित्य पुस्तक प्रकाशित झाल्यावर वाचकांपर्यंत पोहचायचे अथवा वृत्तपत्र प्रसिद्धीतून. आता ते सहजरीत्या समोरच्या व्यक्तीला हवे तेव्हा उपलब्ध करून देता येते. कविता सादरीकरण हा अतिशय सुंदर प्रकार. हा प्रकार पूर्वी होता आणि आतासुध्दा आहे. किंबहुना, आता खूप जास्त प्रमाणात खुलवला गेलाय. कविता सादरीकरण ही एक कलाच आहे. जितके उत्तम लिहिले आहे तितक्याच ताकदीने ते प्रेक्षकांसमोर मांडता आले पाहिजे. हे जमले की तुम्ही आपोआपच हजारो हृदयांचा ठाव घेता.

बदलत्या काळानुसार जरी कवितेत रचनात्मक वेगळेपण आले असले तरी, काव्यरचनेत भावनांची आर्तता मात्र ह्रदयीच्या तळापासूनच ओतली जाते. त्यात मग कधी प्रेम, विरह, भेट, मैत्री या सारख्या नाजूक, तरल लहरीत अक्षरे गुंफली जातात.तर कधी, भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, महागाई, शेतकर्‍याची व्यथा…अशा प्रकारे ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून लेखणीस प्रज्ज्वलित केले जाते.

लेखनात सातत्य ठेवणे, उत्तमोत्तम पध्दतीचे साहित्य वाचणे, आपल्या कलेचे योग्य प्रकारे सादरीकरण करणे. आणि सर्वांत महत्वाचे एकमेकांच्या कलागुणांचा आदर करणे. ही लक्षणे तुम्हाला एक प्रतिभावान कलाकार तर बनवतातच त्याचबरोबर तुम्हाला माणूस म्हणून खर्‍या अर्थाने जगायला शिकवतात.

–कस्तुरी देवरूखकर

First Published on: March 27, 2022 4:45 AM
Exit mobile version