बुरा ना मानो दिवाली है..

बुरा ना मानो दिवाली है..

दरवाजावर टकटक वाजल्याचा आवाज ऐकून मोदीजी क्षणात जागे झाले. हे अलार्म काका इथे कसे काय पोहोचले हा विचार मनात येईपर्यंत मोदीजी दरवाजा उघडून बाहेर आले. आपल्याला भास झालाय हे लक्षात आल्यानंतर आता उठलोच आहोत तर दिवाळीच्या निमित्ताने भल्या पहाटे ट्विट तरी करुया म्हणून त्यांनी मोबाईल हाती घेतला. ‘दिवालीसे मेरा बहुत पुराना नाता है, जब मै वडनगर मै था..तो..’ वगैरे ट्विट केलं. तासाभरात हजारभर प्रतिक्रिया आल्यावर खूश होत पुन्हा एकदा मोबाईल खाली ठेवला.

तिकडे नागपूरला गडकरी पण भल्या पहाटे अभ्यंगस्नानाला उठले होते. मोदीजींनी ट्विट केल्याचे पाहताच ‘आपल्या खात्यामार्फत देशात एक लाख कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात येणार असून त्यापैकी 30 हजार कोटींचे फटाके हे इकोफ्रेंडली आणि प्रदूषणरहित असणार आहेत. बीओटी तत्वावर ‘दिल्ली ते मुंबई’ मार्गावर फटाक्यांची माळ लावण्यात येणार आहे’, असं त्यांनी घाईघाईत टाइप केलं. आपण रस्तेबांधणीवर नसून फटाक्यांविषयी ट्विट करतोय आणि हा विषय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येत नाही हे लक्षात येताच त्यांनी स्वतःशीच हसत त्वरेने ट्विट डिलीट केले.

तिकडे नागपुरातच देवेंद्रजी अभ्यंगस्नान होताच मोबाईल हातात घेऊन बसले. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ‘सरसकट’ दिवाळी साजरी न करता ‘निकष’ राखून’ ‘तत्वतः’ दिवाळी साजरी करणार आहोत. असं त्यांनी घोषित केलं. म्हणजे नेमकं काय करणार? हे न कळल्याने घरासमोर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना ‘मी पुन्हा येईन’ म्हणत हळूच तिथून काढता पाय घेतला आणि अमृतावहिनींकडून फराळाचे ताट मागवले.

इकडे मुंबईतदेखील दिवाळीची तयारी उत्साहात सुरू होती. आकाशकंदील ‘वर्षावर लावायचा की मातोश्रीवर?’ ह्या विचारात गोंधळात पडलेला एक शिवसैनिक हातात आकाशकंदील घेऊन बराच वेळ ताटकळत उभा होता. त्या शिवसैनिकाकडे पाहत उद्धवजी आपल्या नेहमीच्या शांत व संयमी स्वरात म्हणाले की, ‘आपण दिवाळी नक्कीच साजरी करणार आहोत. किंबहुना इथेही करणार आहोत, आणि मातोश्रीवरही करणार आहोत. पण मूळ प्रश्न असा आहे की साजरी करावी की न करावी. करावी तर लागणारच. निश्चितच करावी लागणार. पण नाही केली तर काय होणार? हे मी तुम्हाला विचारतो, गोंधळलेला शिवसैनिक आणखी गोंधळात पडलेला पाहून उद्धवजींनी त्याला खास शिवफराळ खाण्यासाठी आमंत्रित करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बारामतीतदेखील दिवाळीची तयारी जोमाने सुरू होती. कार्यकर्त्यांनी आपल्या घराघरातून माळ्यावर धूळ खात पडलेले फटाके बाहेर काढले. त्यातले अर्धे फटाके पावसात भिजल्याने फुटण्याच्या पलीकडे गेले होते. पण आपले साहेब भर पावसातसुद्धा चमत्कार घडवू शकतात ह्याचा ह्याची देही ह्याची डोळा प्रत्यय येऊन गेल्याने कार्यकत्यांनी उत्साहाने भिजलेले फटाकेसुद्धा शिलगवण्याची तयारी सुरू केली.

कोकणात राणे पिता-पुत्रांनी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या पक्ष कार्यालयाची स्वच्छता हाती घेतली होती. आजवर साजर्‍या केलेल्या गत सगळ्या दिवाळीतल्या जुन्या पक्षांच्या शुभेच्छापत्रांना माळ्यावरून बाहेर काढून बाजूला टाकण्यात आलं.

त्या मानाने कृष्णकुंजवर शांतता जाणवत होती. राजसाहेब दिवाळी कशी साजरी करावी ह्याचीदेखील ब्लू प्रिंट देतील म्हणून मनसैनिक आदेशाची वाट पाहत होते. सगळे लेकाचे फटाके फोडायला बोलावतात, पण फराळाच आमंत्रण कोणी देत नाही, म्हणून नाराज झालेले राजसाहेब स्वत:शीच पुटपुटत घरात समोर येणार्‍याला ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत स्वत:च्या पक्षाच्या तुफान गर्दीच्या सभेचा जुना व्हिडीओ बघत खिन्नपणे एकेक करंजी खात बसले.

काँग्रेसच्या गोटात तशी सामसूम होती. पक्षाच्या वतीने फटाके नेमके कोण फोडणार? बाळासाहेब, अशोकराव की पृथ्वीराजबाबा ह्यात एकवाक्यता होत नसल्याने सगळ्यांनी राहुल-प्रियांका गांधींना भाऊबिजेच्या शुभेच्छा देत वेळ मारून नेली.

ह्या सर्व दिवाळीत सर्वाधिक उत्साहात कोण असेल बरं? ‘आठवले का?’ हो तेच आपले शीघ्रकवी रामदासजी..

‘हम हर बार लगाएंगे दिवे,
हम हर बार बजाएंगे थाळी,
गो करोना, करोना गो,
बोलके हम कहेंगे हॅपी दिवाळी’

अशी चटकन एक चारोळी रचून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सार्‍या राजकीय गदारोळात दूर एक सामान्य भारतीय मात्र आपल्या घराची नेटाने स्वच्छता करत होता. कोरोनामुळे गमावलेल्या अनेक नातेवाईकांच्या तस्वरी पुसत तो त्यांसमोर नतमस्तक होत होता. स्वयंपाकघरातल्या रिकाम्या डब्यातून तो उरली-सुरली पीठं खरडून काढत होता.. खर्च नको म्हणून नवीन कपडे घेणं टाळत तो जुन्याच कपड्यांना इस्त्री मारत होता. हे सगळं करत असताना त्याने महाग झालेल्या तेलाच्या डब्यातले काही थेंब पणतीमध्ये टाकून दोन्ही हात जोडून त्यासमोर उभा राहिला. हिच त्याची दिवाळी.. कारण दिवाळी म्हणजे फक्त आनंद नसतो तर उज्ज्वल भविष्याची आशा असते…उम्मीददेखील असते की येणारे दिवस चांगले येतील. कोरोनाचा अंध:कार दूर होऊन सुखाचा प्रकाश पुन्हा आसमंत उजळून काढील.

–सौरभ रत्नपारखी

First Published on: October 31, 2021 7:03 AM
Exit mobile version