राज्यकर्त्यांची अनास्था कोकणाच्या मुळावर!

राज्यकर्त्यांची अनास्था कोकणाच्या मुळावर!

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चार तासांचा दौरा केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला धावती भेट देऊन ते मुंबईला परतले. या उडत्या कोकणच्या दौर्‍यावरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. अशा धावत्या दौर्‍यातून ठाकरे यांनी नक्की काय साध्य केले, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर, ‘मी काही फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नव्हतो. कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो होतो. प्रत्यक्षात पंचनामे झाले की, नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल’, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

टोलवाटोलवी करून वेळ मारून नेता येईल, पण ज्या कोकणाने शिवसेनेला त्यांच्या चांगल्या सोडाच वाईट काळात नेहमी साथ दिली त्या आज उध्वस्त झालेल्या कोकण प्रदेशातील माणसांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे यांनी चार तास तरी येण्याची काय गरज होती. नाही तरी पंचनामे सरकारी बाबूच करणार आहेत ना…सोडून द्या त्यांच्या जीवावर. नाही तरी गेल्या वर्षी निसर्ग वादळाने कोकणातील माणूस आधीच उध्वस्त झालाच होता, आता त्याला साथ मिळाली नाही तर जमीनदोस्त होईल. उद्धव ठाकरे असो, फडणवीस असो किंवा काँग्रेस राज्यकर्ते असो या सर्वांची अनास्था कोकणाच्या मुळावर आलीय…

कोकणी माणूस चिवट आणि सहजासहजी हार न मानणारा आहे. कोणतेही संकट आले तरी त्यातून मार्ग काढण्याची उमेद कोकणी माणसामध्ये असते. मात्र, गेल्या वर्षीचे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, तेव्हापासूनच सुरू असणारा कोरोनाचा कहर आणि तो संपण्याच्या आतच यंदा पुन्हा ‘तौत्के’ वादळाने दिलेला तडाखा यांनी पूर्ण कोकणाला पुरते नामोहरम करून टाकले आहे. गेल्या दोन दशकांत कोकणाने पर्यटन, आंब्यावर भर असणार्‍या फळबागा आणि मच्छिमारी या तीनही क्षेत्रांमध्ये नवी भरारी घेतली होती. दुर्दैवाने, गेल्या दीड वर्षात या वाटचालीला चांगलीच खीळ बसली आहे. त्याहूनही खेदाची बाब म्हणजे, गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानंतर ज्या कामांची आश्वासने राज्य सरकारने दिली होती, ती पुरी झालेली नाहीत. वादळे आली की, विजेचे खांब पडतात आणि वीजपुरवठा खंडित होतो, म्हणून आता कोकणात भूमिगतच वीजवाहिन्या टाकू, असे गेल्या वर्षी सांगण्यात आले.

प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात हे काम झालेले नाही. इतकेच नाही तर, निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या पंचनाम्यांविषयीही शेकडो तक्रारी आहेत. त्या तक्रारींचे निराकरण अजूनही झालेले नाहीत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वादळी हानीची हवाई पाहणी केली. पंतप्रधानांचे तेच विमान जरा कोकणपट्टीवरून फिरवले असते तर काही बिघडले नसते. तडाखे देणार्‍या निसर्गाला राज्यांच्या सीमा समजत नाहीत. मग आकाशमार्गी पाहणी करताना तरी त्या सीमा नेत्यांनी का मनात आणाव्यात? तौत्के वादळाचा फटका गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला बसला असताना मोदींनी कोकण दौरा केला असता तर नक्कीच लाल मातीमधील माणसांना आधार मिळाला असता. पण, मोदी हे आधी गुजरातचे पंतप्रधान असून मग फावल्या वेळात ते उर्वरित भारताचे प्रमुख आहेत, ही त्यांच्यावर सतत होत असलेल्या टीकेला पुन्हा एकदा वाव मिळाला.

खरेतर उठता बसता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार्‍या फडवणीस यांना मोदी यांचा हा दुजाभाव दिसत नाही. ते भले कोरोनामुळे महाराष्ट्राचा ताण केंद्रावर पडत असल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवतील, पण त्यांनी कधी तरी मोदी यांनासुद्धा पत्र पाठवण्याची हिंमत ठेवायला हवी… पण ते शक्य नाही. असो. वादळानंतर नेत्यांच्या भेटीमुळे वातावरण निर्मिती होईल. घोषणांचा पूर येईल. प्रत्यक्षात कोकणाचे सारे आर्थिक, शैक्षणिक आणि एकंदरीत जनजीवन उध्वस्त झाले आहे. या संकटाचा किंवा त्यातून काय नव्याने उभे करण्याची गरज आहे, याचा आवाका या नेत्यांना व सरकारला आलाय..

कोकणात कोणत्या भागातील आंबे कधी येतात, याचे गणित असते. मे महिन्याच्या उत्तरार्धात निघणारे आंबे त्या वर्षीचा हंगाम संपत असताना बागवानांच्या हातात चार पैसे टाकतात. तो खर्‍या अर्थाने नफा असतो. यंदा या वादळाने संपूर्ण कोकणातला आंबा पडला आहे. त्यातला बरा शोधून प्रक्रियेसाठी पाठवणे, हेही खूप कष्टाचे आहे. याशिवाय, लागोपाठ दोन वर्षे हादरे बसल्याने नारळ, सुपारीसहित असंख्य बागा उध्वस्त झाल्या आहेत. काही नेते हा अंदाज शंभराहून अधिक कोटींचा सांगत आहेत. तो फळबागांची सगळी हानी लक्षात घेतली तर याहूनही जास्त असू शकतो. राज्य सरकारच्या महसुली यंत्रणेने काही ठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.

मात्र, हे काम पारदर्शक आणि मुख्य म्हणजे शेतकरी व रहिवाशांना विश्वासात घेऊन झाले पाहिजे. तसे ते गेल्या वर्षी झालेले नाही. खरेतर, मुख्यमंत्र्यांनी कोकणाला आधार देण्यासाठी आता चार-पाच कार्यक्षम मंत्र्यांचा गट करून त्यांच्याकडे सारी सूत्रे सोपवायला हवीत. इतर हिशेब करण्याची ही वेळ नाही. अजित पवारांसारखा धडाडीचा मंत्री ही जबाबदारी निश्चितच पेलू शकतो. गेल्या वादळात प्रत्यक्ष पडल्या नाहीत पण कमकुवत झाल्या, अशा शेकडो शाळा या वादळाने उडवून दिल्या आहेत. सध्या त्या बंदच असल्या तरी त्या कधीतरी बांधाव्या लागतीलच. या सार्‍या कामांसाठी मुख्यत: अर्थ, महसूल, कृषी, शिक्षण, मदत आणि पुनर्वसन अशा सार्‍या खात्यांचा समन्वय होऊन वेगाने निर्णय व्हायला हवेत.

कोकणातील शेतकर्‍यांचं जीवन अवलंबून असते ते आंब, काजू, नारळ, सुपारी या मुख्य पिकांसह फणस, कोकम, करवंद, केळी, मिरी या आंतरपिकांवर. नारळ आणि केळी सोडली तर सगळीच पिके वर्षातून एकदाच पिकणारी आणि तीही सर्व एकदम मे महिन्यातच. त्यामुळेच वर्षभर केलेल्या मेहनतीचे आणि खर्चाचे फळ हाती येण्याची एकमेव संधी ती तेवढीच असते. म्हणूनच कोकणी माणूस कितीही घामाच्या धारा वाहत असल्या तरी मोठ्या खुशीत मे महिन्यात उत्साहाने राबत असतो. आता हाती येणार्‍या रोकड रकमेवर त्याचं पुढच्या वर्षाचं नियोजन अवलंबून असते. ते सारे नियोजन या वादळाने पुरते साफ केले आहे. पुढचे सारे वर्ष कसे काढायचे आणि नव्याने पुन्हा उभे तरी कसे राहायचे, असा प्रश्न सार्‍या कोकणासमोर आज उभा ठाकला आहे.

निसर्ग वादळ आले गेल्या वर्षी तीन जूनला. तोपर्यंत त्या वर्षाची सगळी पिकं शेतकर्‍यांच्या हातात आली होती. मात्र, त्या वादळाने कोकणातील काही भागातील बागा पार उध्वस्त करून टाकल्या होत्या. नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस ही सगळी झाडे दीर्घायुषी असल्याने ती मोठी होऊन फळधारणा सुरू व्हायला किमान दहा वर्षे तरी लागतातच. सरकारने उदार होऊन मदत केली. परंतु, ती वादळाने मोडलेल्या झाडांची साफसफाई करायलाही पुरली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण बहुतांश भागातील पिके, त्यावरील प्रक्रिया उद्योग आटोपत आले होते. त्यामुळे, किमान शेतकरी किंवा प्रक्रिया उद्योजकांच्या हातात वर्षभर पुरेल इतकी तरी रोकड तेव्हा आलेली होती. यंदा मात्र तसे झालेले नाही. ‘निसर्ग’ आणि ‘तौत्के’ यांच्यात हा मोठा फरक आहे आणि तो सरकारने समजावून घेण्याची गरज आहे.

‘तौत्के’ वादळ मात्र आले 16 मे रोजी. अगदी झाडून सगळ्या कोकणाला ते झोडपून गेले. ‘निसर्ग’च्या तुलनेत नुकसान कमी झाले आहे, असे त्याक्षणी भासले. नंतर लक्षात आले की आता तर एक वर्ष पूर्ण वाया गेले आहे. रोख रक्कम हाती येण्याच्या स्वप्नाच्या चिंध्या झाल्या आहेत. सगळी पिके ऐन तोडणीला आलेली असताना हे वादळ ती सारी पिके जमीनदोस्त करून गेले. वर्षभराच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवून गेले. अलीकडे कोकणी माणूस छोटे छोटे जोड धंदे करून उत्पन्नात भर घालू लागला आहे. आंब्याची, फणसाची साठ, तळलेले गरे, लोणची, मुरंबा, छुंदा, आमरसाचे कॅनिंग, फणसाच्या भाजीचे कॅनिंग, कोकम, कैरी, करवंद यांची सरबते… असे अनेक विविध प्रकारांचे उद्योग घरोघरी चालू असतात.

या वादळाने सगळी पिके नष्ट केल्यामुळे आता हे प्रक्रिया उद्योगही बंद पडले आहेत. हे सगळे उद्योग म्हणजे वर्षातून एकदा प्रक्रिया करून उत्पादन निर्माण करायचे आणि वर्षभर ती उत्पादने विकून गुजराण करायची. असंख्य शेतकरी आणि उद्योगांचे एक वर्षाचे संपूर्ण उत्पन्न हे वादळ सोबत घेऊन गेले आहे. शेतमजूर आणि प्रक्रिया उद्योगात लागणारे हंगामी मजूर अशा सर्वांनाच त्याची झळ आता वर्षभर सोसावी लागणार आहे. आता ही वादळे अशीच दरवर्षी येत राहणार, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नुकतीच काही तरुण मंडळी पुन्हा एकदा कोकणात स्थायिक होऊन शेती आणि त्यावर आधारित उद्योग करण्यासाठी प्रयत्न करू लागली होती.

त्यांच्यापुढे नियतीने काय वाढून ठेवलंय, देव जाणे! निसर्ग वादळापूर्वी कोकणाने असे वादळ 2009 साली अनुभवले होते. तेव्हा आलेल्या ‘फयान’ चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले होते. ‘निसर्ग’ चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवरचा भाग झोडपला गेला. मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना याचा मोठा फटका बसला. कोकण म्हटले की रत्नागिरी, गुहागर, दापोली यासारखे नारळी- पोफळीचे हिरवेगार भाग डोळ्यासमोर येतात पण याच कोकणात मंडणगडसारखा एक अतिदुर्गम तालुका आहे हेही वादळामुळे सगळ्यांसमोर आले. याच मंडणगड तालुक्यातलं ऑलिव्ह रिडले कासवांसाठी झटणारे कासवांचे गाव वेळास उध्वस्त झाले आहे.

निसर्ग आणि आता तौत्के वादळाने कोकणाला दहा पंधरा वर्षे मागे नेले आहे. सरकारची फारशी मदत नसतानासुद्धा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही किनारपट्टीवरील जिल्ह्यांनी फळबागा आणि पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्यासाठी पावले टाकली आहेत. तरुण मंडळी उत्साही असून मुंबईची वाट न धरता गावात राहून ते आपल्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आता यश मिळायला लागले होते. गोवा आणि अन्य समुद्र किनारी जाणारे देशातील पर्यटक आता कोकणच्या दिशेने मोठ्या संख्येने सरकताना दिसत होते. फळबागासुद्धा आता नव्या तंत्रज्ञानाने विकसित करण्याचे काम या युवा वर्गाने सुरू केले होते. काँग्रेस असो की, राष्ट्रवादी भाजप असो की, शिवसेना यांना या भागात काल, परवा आणि आजसुद्धा या भागाच्या विकासाचे काही घेणेदेणे नाही. विधानसभेचे अधिवेशन आले की बेंबीच्या देठापासून ओरडले की झाले, एवढाच यांचा कोकण विकास होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने खडे फोडणार्‍या भाजप आणि शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर कोकण विकासाला पानेच पुसली. नव्वदीच्या दशकाआधी समाजवादी विचारांचा मोठा पगडा कोकण भागावर होता.

या परिवारातील मधू दंडवते आणि साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोकणात रेल्वे धावली. त्यानंतर या भागाचा काय मोठा विकास झाला, याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करायला हवा. शरद पवार यांनी आणलेल्या 100 टक्के फळबागा योजनेचा थोडाफार फायदा झाला खरा, पण त्यापलीकडे काही नाही. समाजवादी विचारानंतर कोकणाने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मोठी साथ दिली आहे. पण, आज इतकी वर्षे साथ देऊनही हाती काहीच आलेले नाही. जैतापूर अणुऊर्जा असो किंवा नाणार रिफायनरी हे बडे प्रकल्प कोकणाला भकास करण्यासाठी आले होते. ते कधीच या निसर्गदत्त परिसराचे साथी नव्हते. आज पर्यटन, फळबागा, फळांवरील प्रक्रिया केंद्र, डेअरी, बांबू लागवड आणि त्यावरील उद्योग अशा या भागाशी नाळ असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे आता तरी काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा लागोपाठच्या दोन वादळांनी मागे पडलेला कोकण लवकर उभा राहणार नाही.

First Published on: May 22, 2021 8:24 PM
Exit mobile version