वास्तविक उपरोध : मी पुन्हा येईन

वास्तविक उपरोध : मी पुन्हा येईन

एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून सध्याच्या राजकारणावर थेट भाष्य करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. कारण एखाद्या सामान्य माणसाचं डोकं दुखण्याच्या आधी त्याच्या भावना लवकर दुखावतात. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं, त्याची कथा एखाद्या उत्तम बॉलीवूडपटाला लाजवेल अशी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला भूकंप मुंबईहून व्हाया सुरत थेट गुवाहाटीपर्यंत पोहचला आणि मग गोव्याच्या मार्गाने परतीचा प्रवास करत मुंबईत येऊनच शमला. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स, आमदारांची पळवापळवी, घोडेबाजार यांनी भरलेलं सत्तानाट्य अनुभवलं. त्याच काळात एका मराठी वेबसीरिजचा टीझर जुलै महिन्यात प्रदर्शित झाला. तत्कालीन राजकीय परिस्थितीशी संबंधित काही संदर्भ त्या टीझरमध्ये दिसल्याने त्याला प्रतिसाददेखील उत्तम मिळाला.

गुजराती भाषेत वाजणारी मोबाईलवरची कॉलर ट्यून, ‘ओकेमध्ये आहे’सारखा डायलॉग यामुळे टीझरला प्रतिसाद मिळालाच, पण या वेबसीरिजचं टायटल हेदेखील हा टीझर बघण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं कारण बनलं. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या भाषणातील लोकप्रिय वाक्य, जे अनेकांच्या डोक्यात भिनलंय तेच वाक्य टायटलला घेऊन दिग्दर्शकाने आपल्या सीरिजबद्दल आधीच उत्सुकता निर्माण केली होती. प्लॅनेट मराठीवर याआधी आलेल्या ‘रानबाजार’ सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने या सीरिजकडूनदेखील तितक्याच अपेक्षा होत्या. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या सीरिजकडून अधिकच्या अपेक्षा असण्याचं कारण म्हणजे त्यांनी यापूर्वी लिहिलेले सिनेमे. राजकारणाची जाण असणारा आणि मातीशी नाळ जपणारा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी लिहिलेली ही राजकीय विषयावर आधारित वेबसीरिज आठ भागांच्या रूपात ‘मी पुन्हा येईन’ या नावाने प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाली आहे. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव आणि भारत गणेशपुरे यांसारख्या कलाकारांना घेऊन बनविलेली ही सीरिज नेमकी आहे तरी कशी याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न.

अरविंद जगताप हे एक लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ‘झेंडा’ सिनेमातील विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती गाण्यापासून ते चला हवा येऊ द्यामधील पत्रांपर्यंत त्यांच्या प्रत्येक लिखाणाचे अनेक चाहते महाराष्ट्रात आहेत. या सीरिजची जमेची बाजू हे जगताप यांनी लिहिलेले संवाद आहेत. ‘मी पुन्हा येईन’ ही सीरिज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे काल्पनिक चित्रण आहे, ज्याचा वास्तवाशी थेट संबंध नाही. सत्ता हे अंतिम ध्येय ठेवून चालणारी आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी राजकीय मंडळी आणि त्यातून होणारी लोकशाहीची थट्टा याचं चित्रण म्हणजे मी पुन्हा येईन. निवडणुकीचा निकाल लागतो आणि निकालानंतर कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही. उपेंद्र लिमये (दिवटे) आणि सयाजी शिंदे (मुरकुटे) हे राज्यातील दोन्ही महत्त्वाचे नेते आपल्याच पक्षाची सत्ता येणार, असं सांगत असतात, पण बहुमतासाठी आवश्यक असणार्‍या आमदारांची जुळवाजुळव काही होत नाही.

तेव्हा आधार घेतला जातो अपक्ष आमदारांचा आणि सुरू होते त्यांची पळवापळवी. दोन्ही नेते अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात. अपक्ष आमदारांचादेखील एक वेगळा गट आहे, ज्यांचं नेतृत्व करतोय भारत गणेशपुरे (सम्राट वाकडे). त्यांच्याही काही अपेक्षा आहेत, म्हणून ते या सगळ्यांचा आनंद घेत रिसॉर्टवर मजा करतात. महाराष्ट्रात दिल्लीतून एक राज्यपाल (राजेंद्र गुप्ता) पाठवलेत, ज्यांचं पाइल्सचं ऑपरेशन आणि हीप रीप्लेसमेंट झालंय म्हणून केंद्राने त्यांना आराम करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं आहे. संपूर्ण कथानक आपल्यासमोर मांडणारा सूत्रधार म्हणून एक रिसॉर्टचा शेफ यात आहे, ज्याची भूमिका साकारली आहे सिद्धार्थ जाधव याने. सीरिजमध्ये घडणार्‍या घटनांवर तो त्याचा टेक आणि काय घडतंय याची संक्षिप्त माहिती देत असतो. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेले दोन बडे नेते यांच्यातला सामना शेवटी कुठे येऊन संपतो? महाराष्ट्रात सत्तेचा दोर दिवटे की मुरकुटे नेमका कोणाच्या हातात जातो याचं उत्तर मिळविण्यासाठी संपूर्ण वेबसीरिज पाहावी लागेल.

राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक पद्धतीने केलेलं भाष्य नेहमीच प्रभावी ठरतं. अप्रत्यक्षरीत्या व्यवस्थेला आणि त्या व्यवस्थेचा भाग असलेल्या पुढार्‍यांपासून सामान्य जनतेपर्यंत दिलेले टोमणे चपखल बसतात. मी पुन्हा येईन हा एक कॉमेडी ड्रामा आहे जो राजकारणावर विनोदी अंगाने भाष्य करतो, पण यात असणारा विनोद एकाच वेळी हास्याच्या निर्मितीसोबत सत्य परिस्थितीवरदेखील भाष्य करतो. भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत जे काही अपक्ष आमदार आहेत त्यांचं कॉमेडी टायमिंग कमाल जमून आलंय. विशेषतः भारत गणेशपुरे यांच्या पात्राच्या वाट्याला आलेले बरेचसे संवाद लक्षात राहतील असे आहेत. कार्यकर्ता आणि सत्तेविषयी पुढार्‍यांचे विचार ऐकल्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

सीरिजमध्ये मुख्य पात्रांसोबत जी काही सहाय्यक पात्रे दाखविण्यात आलीत त्यांचीदेखील एक खासियत आहे. ते एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ सीरिजमध्ये एक आमदाराच्या संस्थेत कामाला असणार्‍या प्राध्यापकाचं पात्र आहे. ते एक पात्र आज अस्तित्वात असणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व करतं. इतकं सगळं असतानाही मी पुन्हा येईन एक परिपूर्ण कलाकृती वाटत नाही. त्याची काही कारणं आहेत. पहिलं कथा काल्पनिक असली तरी ती प्रेक्षकांना शेवटपर्यंत सत्य आहे अशीच भासवता आली पाहिजे, मात्र यातली काही दृश्य पूर्णतः वास्तवाशी फारकत घेतात. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास यात काही आमदारांचं अपहरण होतं, तेव्हा ते आमदार होते की ग्रामपंचायत सदस्य हेच कळत नाही. कारण ते अपहरण तितकं सहज दाखवलंय. रिसॉर्ट आणि मंत्र्यांची घरं पाहिली की बजेटचा इश्यू नसला पाहिजे असं वाटतं खरं, पण मग ती भव्यता इतर वेळी दिसत नाही.

भावी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, बैठका, गर्दी, पोलीस, सिक्युरिटी यांसारख्या कुठल्याच गोष्टीत भव्यता न दिसल्याने बर्‍याचदा आपण त्या कथानकाशी कनेक्ट होत नाही. जे समोर घडतंय ते खोटं आणि नाटकी वाटायला लागतं. कलाकारांचे काम उत्तम आहे. विशेषतः रुचिका जाधव हिने साकारलेली भूमिका आणि भारत गणेशपुरे यांचं पात्रं सीरिज संपल्यावरदेखील लक्षात राहतं. राज्यपाल महोदयांच्या एण्ट्रीला वाजणारं पार्श्वसंगीत आणि साहेब साहेब म्हणून वाजणारं पार्श्वसंगीत पात्राशी सुसंगत वाटतं. एकंदरीत मी पुन्हा येईन ही एक राजकारणावर भाष्य करणारी अशी सीरिज आहे, जी आपल्या सादरीकरणापेक्षा संवादातून अधिक प्रभावी ठरते. ही सर्वोत्तम सीरिज नसली तरी आपले मनोरंजन करू शकणारी एक चांगली सीरिज आहे. म्हणून एकदा आठ भागांची ही विनोदी सीरिज पाहण्यास हरकत नाही.

First Published on: August 21, 2022 6:55 AM
Exit mobile version