सलीलदा…

सलीलदा…

सलील चौधरींचं संगीत हे हिंदी सिनेसंगीतातलं एक वेगळंच दालन आहे. शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन ह्यांचं संगीत सिनेमासृष्टीत दुथडी भरून वाहत असताना सलील चौधरींचा झरोकाही त्यांच्या संगीताला समांतर धावत होता आणि सलील चौधरींनीही त्या सर्व अव्वल दर्जाच्या संगीतकारांबरोबर स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं.

सलील चौधरींच्या संगीताची शैली, जातकुळी ही त्यांची स्वत:ची होती. ‘आ जा रे परदेसी, मैं तो कब से खडी इस पार’, ‘न जाने क्यूं, होता हैं यूं जिंदगी से प्यार’, ‘आज कोई नही अपना, किसे गम ये सुनाये’, ‘जिंदगी कैसे हैं पहेली हाये’ ह्यासारख्या त्यांच्या गाण्यातून त्यांची अशी स्वत:ची शैली दिसून आली आहे. माझा मित्र आणि आजचा प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी सलील चौधरींच्या संगीतात काहीतरी वेगळेपण जाणवत असल्याचं मला कायम सांगायचा. त्याचं म्हणणं असायचं की सलीलदांच्या संगीतात काही निराळ्या लहरी, लकेरी असतात त्यामुळे सलील चौधरींच्या संगीतरचनेचा वेगळा बाज आपल्याला त्यांची गाणी ऐकताना वेगळ्या वाटेने नेतो.

मग मीच त्याला म्हणायचो, अरे, सलीलदा स्वत: आधी कविमनाचे होते, त्यांनी त्यांच्या बंगाली भाषेत आपलं कविमन वेळोवेळी पेश केलं होतं. आपली काही गाणी आपल्या शब्दांत साकार केली होती तर काही गाणी आपल्या मनात दाटून राहिलेल्या आपल्याच शब्दांवर बेतली होती. त्यांचं हे कवी असणं त्यांच्या संगीतकलेत बेमालुमपणे मिसळलेलं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की त्यांच्या संगीतरचनेतली काव्यात्मता ऐकताना सहज दिसायची, जाणवायची. खुद्द संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी ते एका मराठी चॅनेलवरच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक असताना सलीलदांच्या संगिताचं हे वैशिष्ठ्य सांगितलं होतं. ते म्हणाले होते, ‘सलील चौधरींची संगीत करण्याची वेगळी पध्दत होती. शब्दांतला भावार्थ त्यांच्या संगीतातून पुढे न्यायला मदत व्हायची. त्यांच्याच एका सुरावटीवरून प्रेरणा घेऊन ‘वादल वारं सुटलं गो’ ह्या गाण्याची चाल मला सुचली होती.’

खुद्द सलीलदांनाही हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतरचना आवडायच्या, म्हणूनच हृदयनाथ मंगेशकरांचं ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं’ं हे गाणं त्यांनी आपल्या बंगालमध्ये नेलं, त्यासाठी त्या गाण्याचं ‘ये दिन तो जाबे ना’ असं त्यांनी खास बंगालीकरण केलं. हे गाणं त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हाच ते आपल्या बंगाली भगिनीबांधवांपर्यंत पोहोचवायचं असं त्यांनी ठरवून टाकलं होतं.

सलीलदा प्रत्येक गाण्यासाठी तितका वेळ घेऊन संगीत करणारे संगीतकार होते. सिनेमाच्या दिग्दर्शकाने आता दिला आहे प्रसंग, किंवा गीतकाराने आता दिले आहेत लिहून शब्द म्हणून चट मंगनी, पट ब्याह स्टाइल गाणं करून आपली अचाट कार्यतत्परता दाखवणार्‍यांच्या गटात ते कधीच मोडत नव्हते. आपलं गाणं आपल्या चालीने, आपल्या गतीनेच होणार असा त्यांचा कटाक्ष असायचा. ‘जागो मोहन प्यारे’, ‘रजनीगंधा फुल तुम्हारे युं ही महके जीवन में’, ‘मौजो की डोली चली रे’ ही त्यांची गाणी त्यांच्या गाणं करण्याच्या ह्या तत्वाची, पध्दतीची साक्ष देतात. ‘मौजों की डोली चली रे’ ह्या गाण्याची चाल तर बंगालमध्ये खूप आधीच घराघरात पोहाचलेली होती. आपल्याकडे जसं मेंदीच्या पानावर हे गाणं माहीत नसलेला मराठी माणूस सापडणं दुर्मिळ तसंच बंगालमध्ये ‘मौजों की डोली चली रे’ ह्या गाण्याची चाल माहीत नसलेला बंगाली माणूस सापडणं मुश्किल. फक्त फरक इतकाच की ह्या गाण्याचे बंगाली शब्द होते – कॅनो किछू कॉथा बॉलो ना, शुधू चोखे चोखे चेये, जा के छू चावार आमार, निले शॉबी चेये, एकी छॉलो ना…आणि हे गाणं गायलं कुणी माहीत आहे! लता मंगेशकरांनी.

त्यावेळी हिंदी सिनेमात बंगाली कलाकार स्वत:चा असा एक गट करून असायचे आणि तशीच वेळ आली तर ते एकमेकांना मदतीचा हातही पुढे करायचे. त्याच वेळी घडलेली एक गोष्ट सलीलदांच्या पथ्यावर पडली आणि सलीलदांचं नशीब खुललं. झालं असं की बिमल रॉयनी नुकताच ‘देवदास’ (म्हणजे जुना देवदास) सिनेमा केला होता. त्या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी त्यांनी त्यांच्या लाडक्या सचिनदेव बर्मनवर सोपवली होती आणि ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्या संगीतावर बिमल रॉय इतके खूश झाले होते की त्यांनी त्यांच्या पुढच्या सिनेमाची जबाबादारीही सचिनदांवरच सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या ह्या पुढच्या सिनेमाचं नाव होतं ‘मधुमती.’ फक्त त्यात गंमत अशी होती की आधीच्या देवदासप्रमाणेच ह्या सिनेमातही बंगाली वातावरण असणार होतं. त्यामुळे सचिनदेव बर्मनना पुन्हा बंगाली वातावरण असलेला सिनेमा नको होता.

त्यांच्या मते, त्यामुळे त्यांच्या संगीतात तोच तोचपणा येण्याची शक्यता होती. साहजिकच, बिमल रॉयच्या प्रस्तावाला सचिनदेव बर्मननी विनम्र नकार दिला, पण तो देताना त्यांनी एक विनम्र सूचना केली. ही सूचना होती ‘मधुमती’च्या संगीताची जबाबदारी सलील चौधरींवर सोपवण्याची. अर्थात, बिमल रॉयनीही सचिनदांच्या सुचनेचा अव्हेर केला नाही. त्यांनी सचिनदांच्या म्हणण्याप्रमाणे सलीलदांना बुलावा धाडला. हिंदी सिनेमातल्या बिमलदांसारख्या भल्या मोठ्या हस्तीकडे काम करण्याची एक भली मोठी संधी स्वत:च्या पायापंखांनी सलीलदांकडे चालून आली होती. आ जा रे परदेसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी, दिल तडप तडप के, दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुआ, टुटे हुए ख्वाबों ने अशी एकाहून एक सरस गाणी सलीलदांनी ‘मधुमती’साठी देऊन जणू सचिनदांची कसर भरून काढली…आणि त्यानंतर सलीलदांनी मागे वळून पाहिलंच नाही. शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन, मदनमोहन ह्यांच्यासारख्या प्रस्थापित नावांच्या यादीत त्यांनी स्वत:च्या नावाची नोंद केली.

लता मंगेशकरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पटकन आठवणार्‍या गाण्यांच्या यादीत ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ ह्या गाण्याचा खास समावेश केला होता. हे गाणं होतं सलीलदांचं. ‘परख’मधलं. लता मंगेशकरांनी म्हटलं होतं, जेव्हा कधी पाऊस पडून वातावरण कुंद होतं तेव्हा मला घराच्या गच्चीवर जाऊन ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ हे गाणं गावंसं वाटतं. ह्या गाण्यात जयराम आचार्यांनी वाजवलेली मन मोहून टाकणारी सतार, पाऊस असो, नसो, मनाला चिंब करत राहते. आशा भोसले सलीलदांना कायम चमत्कार को नमस्कार म्हणायच्या. ‘ओ सजना, बरखा बहार आयी’सारखं गाणं करणारे सलीलदा हे खरोखरच चमत्कार होते!

 

First Published on: November 15, 2020 5:08 AM
Exit mobile version