भारतवासियांसाठी वसियत!

भारतवासियांसाठी वसियत!

कैफी आझमी यांची भारतवासियांसाठी वसियत!
(‘कैफी आझमी – जीवन आणि शायरी’ या चरित्रग्रंथाचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख
यांच्या ग्रंथात लिहिलेला काव्यमय उपसंहार)

कैफीनं त्याचा मुलगा बाबासाठी
एक वसियत (मृत्यूपत्र) मागे ठेवली आहे.
निमित्त मुलाचं
वसियत देशासाठी – इच्छापत्र भारतीयांसाठी!
अशी मोलाची वसियत क्वचितच कुणी दिलीय!
ती ऐका जरा
समजून घ्या जरा
त्याप्रमाणे अंमल करा जरा!

त्यानं आपल्याला त्याचे डोळे, त्याची नजर
वारस म्हणून दिलीय.
त्यांना, जे आपले मस्तक वाळून खुपसून बसले आहेत
जणू त्यांना कोणी पाहू शकणार नाही
पण ही नजर त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेत
त्यांचा विवेक जागृत करू इच्छिते!
त्यांना कैफींना आपले डोळे, आपली नजर द्यायची आहे
जे अंध प्रतिष्ठित अंधारात बाण चालवतात
खुर्चीसाठी जे देश पणाला लावतात.
पैसा मोजून धर्म करतात, पुण्य कमावतात
त्यांच्या त्या खोट्या नजरेत
सत्याचा, खर्‍या धर्माचा आणि विवेकाचा
प्रकाश भरावा आणि
त्यांचं मन उजळून निघावं!
तुम्हांला अशी कैफीची नजर हवी आहे?

कैफीला इच्छापत्राद्वारे त्याचा स्वाभिमान द्यायचा आहे
जे वाकले आहेत,
जे कणाहीन झाले आहेत
जे स्वत:ला पण शासन चरणी गहाण ठेवत आहेत
मानवतेच्या अपराध्याशी ज्यांनी हात मिळवला आहे
आणि तरीही त्यांना जे सहन करत आहेत
त्यांना कैफी स्वाभिमान भेट देऊ इच्छितात!
ही स्वाभिमानाची भेट तुम्हाला हवी आहे?

कैफींना वसियतद्वारे त्यांचं दिलं-हृदय
भेट द्यायचं आहे
ज्यांच्या हृदयात घृणा आहे, द्वेष आहे
करुणा- प्रेम सोडून बाकी सारं आहे
ज्यांना चालणं भाग आहे, पण ध्येय नाही
अभिमान बाळगावा अशी काही पूंजी नाही
समता नाही, ममता नाही, सहवेदना नाही
त्यांना कैफी आपल्या हृदयातील
समता, ममता, सहवेदना देऊ इच्छितात
भेट म्हणून इच्छापत्राद्वारे – वसियतद्वारे
हे हृदय अनमोल आहे
हे हृदयातले विचार आधुनिक – विवेकी आहेत
ते बुद्धाचे विचार आहेत
ते मार्क्सचे आचार आहेत
ते गांधींचे सत्यकथन आहे
या सार्‍यांच्या विचारातून ज्या शायराची
शायरी निर्माण झाली
त्या कैफीचं शायराना दिल
तो तुम्हास नजर करतोय.
तुम्हाला असं बावनकशी दिल हवंय?
असं आत्मप्रकाशी हृदय हवंय?

ही कैफीची वसियत केवळ बाबासाठी नाही
ती तुमच्या आमच्यासाठी आहे
तुमच्या आमच्या सर्वांच्या
विचारासाठी आहे, आचारासाठी आहे.
भारताच्या उज्ज्वल स्वप्नासाठी आहे

ही कैफीची वसियत
माझ्या शब्दातून जमेल तशी
तुम्हास देत आहे
गोड करून घेणार ना?
कैफीचा आवाज ऐकणार ना!

संदेश भंडारे

First Published on: January 12, 2020 2:37 AM
Exit mobile version