सवाल-जबाब

सवाल-जबाब

…तर सवाल-जबाबाचा कार्यक्रम टीव्हीवर सुरू झाला. संध्याकाळी. नेहमीप्रमाणे. …फक्त विचारलेल्या सवालाला जबाब देण्याआधी तेव्हाच्या त्या धडकत्याफडकत्या सवाल-जबाबासारखं ठेका धरून कुणी ‘ऐका’ म्हणत नव्हतं इतकंच. पण नंतर सगळंच बदलत गेलं. सवाल-जबाब अपग्रेड होत गेले. हळुहळू ह्या सवाल-जबाबांनाच लोक टॉक शो म्हणू लागले आणि त्या सवाल-जबाबांची नामोनिशाणी मिटली…मग तर ह्या शोमधले शोमन सुटाबुटात टाय लावून, समोर लॅपटॉप घेऊन बसू लागले. त्यांच्या सवालांना जबाब देणारे लोकसुध्दा सदर्‍यांवर जॅकेट चढवून येऊ लागले. सुळसुळीत-झुळझुळीत अंगरखे घालून खुर्चीवर रेलू लागले. साहजिकच हे टॉक शो पोषाखी होऊ लागले. त्यात नगाला नग भिडवून देण्यात येऊ लागले. त्यासाठी त्याआधी नग शोधण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात येऊ लागले. पुढे तर तेच नग आलटून पालटून दिसू लागले. मग तेच नेहमीचे यशवंत गुणवंत नग आपलं विचारधन चॅनेलचॅनेलातून गुलालबुक्क्यासारखे उधळू लागले. त्यालाच रोखठोक, ठोकठोक, बाचाबाची, बोलाचाली, आमनेसामने, तुमनेहमने अशी नावं देण्यात येऊ लागली. एव्हाना विचारवंत वगैरे म्हटल्या जाणार्‍यांच्या समृध्द विचारांच्या चर्चेचं विश्व वगैरे संकल्पना जुन्या ग्रथांच्या कागदासारख्या पिवळ्या पडू लागल्या. ती कागदी माणसं कपाटबंद होत गेली आणि जाकिटधारी माणसं टीव्हीच्या फडताळातून बाहेर येऊ लागली.

सुटाबुटातल्या शोमनने त्यांना त्यांच्या दुखर्‍या जखमेवर बोट ठेवत प्रश्न विचारायला सुरूवात केली…शोमन म्हणाला, ‘तुमच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमचं निर्णायक मत काय?’ ज्याला प्रश्न विचारण्यात आला त्या फिकट पाणेरी जाकिटधारी माणसाने साडेपाच सेकंद पॉज् घेतला. हाताची घडी सोडली. डाव्या हाताने उजव्या कानाच्या पाळीला हात लावला आणि अतिशय धीरगंभीरपणे पहिलं वाक्य उच्चारलं, ‘मला तुम्ही जरा जास्त वेळ द्या, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो.’

शोमनने टायने आपलाच गळा आवळत म्हटलं, ‘मी तुम्हाला ह्या क्षणी एकच प्रश्न विचारलाय. तुम्ही सुरूवातीलाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं का म्हणून देताय?…आपल्याला अजून चांगले दोन-तीन ब्रेक घेत पाऊण तास टॉक शो करायचा आहे.’ फिकट पाणेरी जाकिटधारी त्याला देण्यात आलेल्या प्रशिक्षणाप्रमाणे म्हणाला, ‘हे पहा, असं आहे…मी असं सांगू इच्छितो, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, म्हणजे मी असं म्हणेन, म्हणजे मी ह्यापूर्वीही म्हणालो आहे की आमच्या पक्षात लोकशाही आहे…आणि प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा गाभा आहे…आणि म्हणून सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच असेल तर एकाच वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझ्या पक्षाच्या विचारसरणीला धरून योग्यच आहे…आणि म्हणून…’

त्यांच्या ह्या उत्तरात दातांतल्या दातांत हसणार्‍या प्रतिस्पर्धी तपकिरी जाकिटधार्‍याने मध्येच तोंड घातलं. हा जाकिटधारी कोणत्याही टॉक शोमध्ये कुणाचीही परवानगी न घेता मध्येच तोंड घालण्याच्या परंपरेचा मोठा पाईक आहे. टॉक शोमध्ये इतर कुणीही बोलताना त्याला हसत राहण्याची सवय आहे. तो हसत हसतच म्हणाला, ‘माझे मित्र पाणेरी हे विद्वान आहेत, त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण ते आता जे काही म्हणाले ते त्यांचं मत झालं. त्यांच्याशी मी संपूर्णपणे असहमत असेनच असं नाही. पण त्यांच्या मताचा जर विचार करायचा झाला तर लोकमत आज त्यांच्या ह्या निर्णयाच्या विरोधात आहे असं माझं स्पष्ट मत आहे.’

तपकिरी जाकिटधारी ज्या कुणाला उत्तर देतात त्याला नेहमी ‘माझे मित्र’ म्हणतात. त्यामुळे टॉक शो बघणार्‍या जनांना तपकिरी जाकिटधारी किती जणांबरोबर संध्याकाळी एका डिशमध्ये पाणीपुरी खात असतील असा भाबडा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे त्यांचे हे सगळे मित्र एकजात विद्वान असतात, त्यामुळे ह्या विद्वज्जनांच्या पुष्पासंगे ह्या तपकिरी मातीलाही विद्वत्तेचा वास लागल्याचाही बहुतेकांना संशय येतो.

पण तपकिरी जाकिटधारी मध्येच कधीतरी इतके सटकतात की फिकट पाणेरींच्या तिन्ही यष्ठ्या उध्वस्त करतात, गरागरा डोळे फिरवत, तर्जनी वर करत, मुठी आवळत म्हणतात, ‘आज आमच्या विद्वान मित्रांनी आजच्या आपल्या विषयावर जरा माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. कोणत्याही विषयाची माहिती न घेता देठोक बोलायची सवयच हल्ली त्यांना लागली आहे. हल्ली त्यांचा संपर्क सामान्य जनतेशी राहिलेला नाही. त्यांच्या घरी ते हल्ली ऑनलाइन पिझ्झा मागवत असल्यामुळे बर्‍याच दिवसांत त्यांनी लोकांमध्ये जाऊन पाणीपुरी खाल्लेली नाही. हल्ली बर्‍याच दिवसांत त्यांनी लोकल गाड्यांचं तोंड पाहिलेलं नाही. आज ह्या चर्चेत सामील होण्यासाठी ते आपल्या चेहर्‍यावर जे फेअरनेस क्रीम लावून आले आहेत त्याचं नाव आता बदललं आहे हेही त्यांच्या गावी नाहीय. अशा माणसाबरोबर आज तुम्ही मला बसवलं आहे ह्याचा मला मनोमन अतिव खेद होतो आहे. मी त्यांचा तीव्र, तीव्र आणि तीव्र निषेध करतो.’

तपकिरी आज पाणेरींवर इतके सटकले की घराघरातले टीव्ही भिंतींना जरा जास्तच चिकटून राहिले.
पण हा सगळा तोंडी तमाशा होत असताना स्वत: पाणेरी काय करत होते?
पाणेरी त्यांच्या मोबाइलमध्ये दंग असल्याचं दिसत होतं. तपकिरी पाणेरींंचा इतका वस्त्रगाळ गौरव गाळत असतानाही पाणेरी व्हॉट्सअ‍ॅप चाळत होते. मोबाइल चोळत होते. पण तरीही तपकिरी त्यांच्याकडे पाहून त्यांचा हार्दिक निषेध करतच होते. शेवटी पाणेरींचा त्रिवार निषेध करून तपकिरी दमले आणि एकदाचे थांबले.
…ते तसे अपरिहार्यपणे थांबल्यावर शोमन पाणेरींकडे वळणं साहजिक होतं.
शोमन म्हणाला, ‘हां…आता बोला पाणेरी…तपकिरींनी तुमच्यावर बेफाम आरोप केलेत…उत्तर द्या.’
…पण तरीही पाणेरी आपल्या मोबाइलमध्येच तोंड खुपसून बसले.
शोमन टाय आवळत म्हणाला, ‘पाणेरी, माझा प्रश्न तुम्हाला ऐकू येतोय? माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय?’
ह्या प्रश्नावर मोबाइलमध्ये गढलेल्या पाणेरींनी अकस्मात डोकं वर केलं…आणि हाताचा अंगठा वर करत आणि ओठ मुडपत आपल्याला ऐ येत नसल्याची खुण केली.
टायवाल्या शोमननेही पाणेरींचा चॅनेलशी संपर्क तुटल्याचा जाहीर केलं. तपकिरींनाही आपल्या तीव्र निषधाचे बाण चिखलात रूतल्यासारखं वाटलं.
वास्तव हे होतं की परिस्थिती विरूध्द जात असली आणि आपल्यावर निरूत्तर व्हायची पाळी आली की मोबाइलमध्ये तोंड खुपसायच्या आणि आपल्याला ऐकू येत नसल्याच्या अभिनयाचं प्रशिक्षण पाणेरींना पक्षाच्या अभिनय कार्यशाळेत मिळालं होतं.

First Published on: January 24, 2021 2:08 AM
Exit mobile version