इवल्याशा जीवांची किमया मोठी

इवल्याशा जीवांची किमया मोठी

एखादं रोपटं लावलं किंवा बी रुजतं आणि त्याला खत-पाणी दिलं की उत्पन्न मिळतं…वरवर आपल्याला असंच चित्र दिसतं आणि तसं वाटतंही. मात्र, यात परागीभवनाची मुख्य अवस्थाच आपण विसरतो, ज्यावर उत्पादन अवलंबून असतं. यात सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या मधमाशांच्या रुपाने निसर्गाने चमत्कारिक योजना केलीय. या मधमाशाच राहिल्या नाहीत तर अनेक झाडांना फळं येणार नाहीत आणि त्याचा विपरीत परिणाम हंगामी पिकांवरही होईल. किडनियंत्रणासाठी जी विषारी फवारणी केली जातेय, त्यात या मधमाशांचाही बळी जातोय. मानवाचे हे उद्योग वेळीच थांबले नाहीत तर, मधमाशांचं अस्तित्व नष्ट होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

पृथ्वीवरुन मधमाशा नष्ट झाल्यानंतर मानवाच्या हातात स्वतःसाठी केवळ चार वर्षं उरतील, त्यानंतर माणसाचं अस्तित्व राहणार नाही, हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं. यावरुन सृष्टीचक्रात मधमाशा किती महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात येतं. शेती करताना किटक, गांडुळ, साप, पक्षी, मुंग्या असे सर्वच जीव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्याला मदतच करत असतात. यात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका मधमाशा बजावत असतात. कारण, मध संकलनात परागीकरणाचे अर्थात स्वार्थासोबत परमार्थाचं काम त्या करतात. यातूनच फुलांचं फळात रुपांतर होतं. मधमाशांशिवाय अन्य कोणताही किटक एवढ्या प्रभावीपणे आणि व्यापक प्रमाणावर हे काम करू शकत नाही. विशेष म्हणजे अशी अनेक फळझाडं, फुलझाडं, भाजीपाला आणि धान्य पिकं आहेत, ज्यांचं परागीभवन मधमाशांमुळेच शक्य होऊ शकतं. या मधमाशाच नष्ट झाल्या तर आपल्या आहारातील कितीतरी घटक कायमस्वरुपी बंद होतील.

रसायनांचा भरमसाठ वापर, हायब्रीड अन्नधान्याचे उत्पादन यातून मानवी गुणसूत्रांवर आणि पर्यायाने त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांवरही दूरगामी परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. बदललेल्या आहारपद्धतीमुळेच कॅन्सरसारख्या व्याधी आणि वंध्यत्वाचं प्रमाण प्रचंड वाढलं असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. मात्र, जगण्याच्या आणि गरजा भागवण्यासाठीच्या स्पर्धेत याचा विचारही करायला कुणाला वेळ नाही. दुर्दैवाने करिअर आधारित आपल्या शिक्षणप्रणालीतही या गोष्टी प्रभावीपणे शिकवल्या जात नाहीत.

जैवविविधता आणि निसर्गाचं चक्र टिकवायचं असेल तर प्रत्येक जीवाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. केवळ बुद्धिमत्ता आणि शक्ती आहे म्हणून मानवाने एकाधिकारशाही गाजवायला नको. कारण, तो स्वतःदेखील निसर्गाच्या दृष्टीने फक्त एक लहान घटक आहे. त्यामुळे त्याला टिकायचं असेल तर इतरांचं अस्तित्त्वही त्याला सांभाळावं लागेल. किटकांसाठी बांधावर कडुनिंब, बोरी, करंज, बाभळी, उंबर, भोकर, पिंपळ, जांभूळ अशी जैवविविधतेसाठी पूरक झाडे लावावी लागतील. निलगिरी, गुलमोहर आणि नारळासारखी झाडं शेतीसाठीही निरुपयोगी ठरतात आणि किटकांसाठीही. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीला अनुकूल झाडं लावणं गरजेचं आहे.

मधमाशांचं विश्व आणि पर्यायाने स्वतःला वाचवायचं असेल तर आपण फळधारणेचं जसं नियोजन करतो, तसंच किटकनाशकांचंही करावं लागेल. काही शेतकरी दिवसा कीटकनाशक फवारतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर मधमाशा मरतात. त्याऐवजी शेतकर्‍यांनी रात्री फवारणीचं काम केलं पाहिजे. म्हणजे, यावेळी परागीभवनाचं काम थांबलेलं असतं. अर्थात, शेतकर्‍यांनाही आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल अन्यथा मधमाशांपाठोपाठ मानवाचं अस्तित्त्वही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही!

मधमाशांच्या अधिवासात बदल
गेल्या शतकात मधमाशांचं पोळं हे शक्यतो बाभूळ, बोर अशा काटेरी झाडांवरच अधिक दिसायचं. मात्र, ही झाडं निरुपयोगी असल्याचं समजून त्याची सर्रास कत्तल सुरू आहे. त्यामुळेच आता मधमाशांचं पोळं जांभूळ, आंबाच नव्हे तर इमारतींवरही दिसू लागली आहेत. माणसाच्या चुकांमुळे त्यांनी आपल्या अधिवासात बदल केला आहे. आगी मधमाशा तर अलिकडे उंच इमारतींवरच अधिक दिसतात. त्याचं दुसरंही कारण आहे, ते म्हणजे कमी होत चाललेले नैसर्गिक पाणवठे. हातपंप, विहिरी, शेती, ओहोळ, बंधारे या ना त्या माध्यमातून मधमाशांना पाणी सहज उपलब्ध व्हायचं. मधमाशा मातीत उतरुन गाळातलं पाणी सहज पितात. मात्र, पाईपबंद पाणी योजनांमुळे उघड्यावर सांडणारं पाणी आणि चिखलाचं प्रमाणही खूप कमी झालंय. गावागावांत डांबर आणि सिमेंटचे रस्ते झालेत. गटारी बांधल्या गेल्या, त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न मिटला आणि पर्यायाने मधमाशांना त्यांच्या अधिवासात बदल करावा लागला. पाणवठे म्हणून सिमेंटच्या टाक्या बांधल्या असल्या तरीही, पाणी पिण्यासाठी उतरलेल्या मधमाशा त्यात बुडून मरत असल्याचं दिसतं. याच कारणामुळे मधमाशांनी आपला अधिवास बदलून इमारती, मंदिरांची निवड केलीय.

मधमाशांशिवाय पर्याय नाही
डाळिंब, काकडी, सफरचंद ही अशी फळझाडं आहेत ज्यांची फळधारणा केवळ मधमाशाच करू शकतात. मधमाशा नसतील तर डाळिंबाच्या फुलांचं फळात रुपांतर होणार नाही. कारण याची नर आणि मादी अशी वेगवेगळी फुलं असतात. मधमाशा एका फुलातला नर उचलून मादी फुलावर सोडते. हे काम दुसरा किटक करत नाही. म्हणूनच डाळिंबाच्या चांगल्या उत्पादनासाठी अनेक शेतकरी शेतातच मधमाशांच्या पेट्या ठेवतात. काकडीच्या बाबतीतही असंच आहे. काकडीचं परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करते.

First Published on: July 4, 2021 4:15 AM
Exit mobile version