दिल ढुँढता हैं …

दिल ढुँढता हैं …

निर्माता पी. मल्लिकार्जुन राव आणि दिग्दर्शक गुलजार यांचा ‘मौसम’ हा चित्रपट २९ डिसेंबर १९७५ रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये शर्मिला टागोर, संजीव कुमार, दीना पाठक, ओम शिवपुरी, सत्येन कप्पू या कलावंतांच्या प्रमुख भूमिका होत्या. इंग्रजी लेखक ए. जे. क्रोनीन यांच्या एका कथेवर आधारित या चित्रपटाचे लेखन भूषण वनमाळी, कमलेश्वर आणि गुलजार यांनी केलं होतं. गाणी अर्थातच गुलजार यांची, तर संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच संगीतकार मदन मोहन याचं १४ जुलै १९७५ला निधन झाल्याने चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी सलील चौधरी यांनी सांभाळली होती. गुलजारने हा चित्रपट मदन मोहन यांना समर्पित केलाय.

संजीव कुमार आणि शर्मिला टागोर यांच्या कारकिर्दीतला ‘मौसम’ एक महत्त्वाचा चित्रपट समजला जातो. यात मेरे इश्क में… (आशा भोसले), रुके रुके से कदम… (लता मंगेशकर), दिल ढुँढता है… (लता-भूपेंद्र सिंह) आणि छडी रे छडी कैसे गले में पडी… (मोहम्मद रफी-लता ) ही सुश्राव्य गाणी आहेत. यापैकी ‘दिल ढुँढता है’ हे गाणं भूपेंद्र सिंह यांनी स्वतंत्रपणे (एकल गीत) आणि लतासोबत (युगल गाणे) असं दोनदा गायलं आहे. दोन्ही गाण्यांचे शब्द सारखेच असले तरी चाली मात्र वेगळ्या आहेत. भूपेंद्रचं एकल गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणून वापरण्यात आलं तर युगल गीत संजीव कुमार आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालं आहे. याच गाण्याचा आपण आस्वाद घेऊया.

दिल ढुँढता है फिर वही फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किए हुए
दिल ढुँढता हैं …
जाडो की नर्म धूप और आंगन में लेट कर
आंखो पे खीचकर तेरे आंचल के साए को
औंधे पडे रहे, कभी करवट लिये हुए
दिल ढुँढता हैं…
या गरमियो की रात जो पुरवाईयां चले
ठंडी सफेद चादरों पे जागे देर तक
तारों को देखते रहे, छत पर पडे हुए
दिल ढुँढता हैं…
बर्फीली सर्दीयों में किसी भी पहाड पर
वादी में गुंजती हुई खामोशीयां सुने
आंखो में भीगे-भीगे, लम्हे लिये हुए
दिल ढुँढता है…

मिर्झा गालिब यांची एक अतिशय लोकप्रिय गझल आहे- ‘मुद्दत हुई है यार को मेहमान किए हुए, जोश-ए-कदह से बज्म-ए-चिरागो किए हुए’ यात एकूण १७ शेर आहेत. यातला एक शेर म्हणजे ‘जी ढुँढता है फुरसत के रात दिन …’ गुलजारने ‘जी’ ऐवजी ‘दिल’ या शब्दाचा वापर करून या गाण्याचा मुखडा लिहिला आहे. चित्रपटाच्या या युगल गाण्यात संजीवकुमार स्वत:च्या भूतकाळात डोकावताना दिसतो. तो त्या जागी जातो जिथं त्याने त्याच्या उत्कट प्रेमाचे काही क्षण व्यतीत केलेले असतात. गाण्याच्या शेवटी वृद्ध संजीवकुमार अतिशय शांत स्वरांत गाण्याचा मुखडा आळवताना दिसतो. गुलजारच्या शब्दांची खासियत अशी की त्यांच्या कवितेत निसर्ग वेगवेगळ्या भूमिका वठवताना आढळतो. त्यांच्या काव्यात प्रकृती विलक्षण सुंदरतेने आपलं अस्तित्व दाखवून देते.

माणसांमधले नातेसंबंध निसर्गाशी एकरूप होऊन जात त्यास एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचवतात याचा प्रत्यय गाण्यातून येतो. शब्दांना नैसर्गिक स्वरसाज लाभला तर गाणं कमालीचं परिणामकारक होतं. महान संगीतकार मदन मोहनने हीच करामत इथं केली. गाण्याची श्रवणीय चाल ऐकून आपलं मन अवचितपणे एखाद्या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी जाऊन पोहचतं. हे गाणं एखाद्या मैफिलीत, अनेकांच्या उपस्थितीत ऐकायला फारसं भावणार नाही. कारण यातला आशय एकटेपणाला साथ-संगत करणारा आहे. यातल्या शब्दांमध्ये एक नजाकत आहे, हळुवारपणा आहे, स्वप्न आहे, आशा-आकांक्षा आहेत, भावनेची आर्तता आहे. परिणामी हे गाणं शल्य, वेदना, खंत, दु:ख, रितेपण अनुभवास आणून देतं. विशेषतः आपण एकटे असताना.

गुलजार स्वत:ला गालिबचा शिष्य मानतात. ते असंही म्हणतात की, माझी शायरी गालिबच्या शायरीवर पोसलेली आहे. मी त्यांचा एकप्रकारे सेवकच असून त्यांनी केलेल्या कामाचं ‘पेन्शन’ खातोय. मदन मोहन यांनी या गाण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर अशा पाच-सहा चाली बांधल्या होत्या. त्या ऐकून गुलजारही संभ्रमात पडले. शेवटी ह्या दोन चाली निवडल्या. काळाच्या ओघात हरवलेल्या सुखकारक क्षणांची स्मृती जागवणारं हे भावस्पर्शी गाणं आपल्या मनात आठवणींचे तरंग उठवतं.

या गीताचे गायक भूपेंद्र सिंह यांनी १८ जुलैला अखेरचा श्वास घेतला. ‘दिल ढुँढता हैं’ म्हणजे एक विलक्षण छळणारं प्रकरण. त्या आवाजातून आयुष्याचा केवढा मोठा पल्ला उलगडावा? दोघांनी झेललेला थरार आठवणीत राहिलेला असतो फक्त. मग भूपीजींचा आवाजही थबकत येतो. ‘पहला दिल’चा पंचम अंतराळातून आल्यासारखा! स्वत:शी पुटपुटल्यासारखे, अडखळत येणारे शब्द…आणि ‘दामन के साये’वर आतापर्यंत नसलेला कोमल धैवत चर्रकन कापत जातो. जे गमावलं ते सगळं हा धैवत सांगून जातो. काही स्वर हे अक्षरश: रडवण्यासाठीच येतात, अशा शब्दांत या गाण्याची नि भूपेंद्रची महत्ती गायिका डॉ. मृदुला दाढे जोशींनी सांगितली आहे. भूपीजी उत्कृष्ट गिटारवादक होते. त्यांनी अनेक संगीतकारांची लोकप्रिय गाणी आपल्या अफलातून गिटारवादनाने सजवली आहेत. तसेच पत्नी मितालीसह त्यांचे अनेक आशयपूर्ण गझल अल्बम्स प्रसिद्ध आहेत. गुलजार, संगीतकार राहुलदेव बर्मन यांच्याशी त्यांची सांगीतिक मैत्री होती.

भूपीजींनी ‘सूरमयी रात’ या अल्बममध्ये गुलजारच्या गझल संगीतबद्ध केल्या आहेत. नाम गुम जायेगा…, एक ही ख्वाब देखा है मैने…, कोई नही है कही… (किनारा), हुजूर इस कदर भी ना… (मासूम), बादलोंसे काट-काट के… (सत्या), आज बिछडे है… (थोडी सी बेवफाई), बीती ना बिताई रैना…, मितवा बोले मीठे… (परिचय), एक अकेला इस शहर में…, दो दीवाने शहर में… (घरौंदा), थोडी सी जमीन थोडा आसमान…, सजना का कंगना…, साथ साथ तुम चलो तो… (सितारा), बोलिये सुरिली बोली…, मचल के जब भी आखोंसे…, जिंदगी फूलोंकी नही…, लोगोंके घर में रहता हू… (गृहप्रवेश) यांसारखी गुलजारने लिहिलेली आणि खय्याम, जयदेव, राहुलदेव बर्मन, विशाल भारद्वाज, कनू रॉय यांनी संगीतबद्ध केलेली गाणी भूपेंद्र यांच्या अनवट गायकीतून स्वरांकित झाली आहेत. गायक-वादक-संगीतकार भूपेंद्र सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

–प्रवीण घोडेस्वार

First Published on: July 31, 2022 5:19 AM
Exit mobile version