फैजभाई, जय श्रीराम !

फैजभाई, जय श्रीराम !

प्रिय फैजभाई,
दचकलात? हल्ली हाक मारली तरी दचकल्यासारखं होतं, हे खरंय. त्यात मी तर अनोळखी माणूस. तुम्हाला ठाऊक असण्याचं काही कारण नाही. तुम्ही गेल्यानंतर माझा जन्म झालाय. त्यामुळे आपला जीवनकाळही कुठे क्रॉस होत नाही तिथं अशी आज अचानक भर रस्त्यात आपली भेट होणं अनपेक्षित आहे. तेही अशा गर्दीत. गर्दी कसली झुंडच आहे ही. अशा झुंडी अवतीभवती असताना दोन माणसांना कुठं भेटता येतं !

तुम्हाला माहीत नसेल कदाचित; पण तुमची माझी भेट झाली नारायण सुर्वेंच्या विद्यापीठात. सुर्वेंचा जाहीरनामा आकाराला आला तुमच्यामुळे. त्यामुळेच तर तुमच्याविषयी मला समजलं. मेघना पेठेंची ‘आए कुछ अब्र’ कथा वाचताना विचार करू लागलो की बाईंना हे शीर्षक कुठं सापडलं असावं. आमच्या गुगलगुरुने तुमच्या ‘आए कुछ अब्र शराब आए, इसके बाद आए जो अजाब आए’ इथवर पोहोचवलं. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशीच अवस्था होते पुन्हा पुन्हा नि कातरवेळ अंगावर धावून येते आणि मग एका निराश संध्याकाळी मी एकटाच टेकडीवर फिरत असताना तुमच्या ओळी भेटीला आल्या-

दिल नाउमीद तो नही, नाकाम ही तो है
लंबी है गम की शाम, मगर शाम ही तो है

असा आशेचा कवडसा असला की धावायला मैदानही अपुरं पडतं. पण तो कवडसा उसना आणता येत नाही. तो यावा लागतो. आत खोलवर पोचावा लागतो.
मग तुम्ही भेटत राहिलात पुस्तकांच्या पानांआडून. इथे तिथे. आंदोलनात तुमची कविता वाचणार्‍या कार्यकर्तीसोबत तुम्ही भेटलात तर कधी हिंदी साहित्याचं भांडार खुलं करणार्‍या प्रा. शशिकला राय यांच्या हसतमुख चेहर्‍यावर तुम्ही दिसलात. रेख्तावर वेळी-अवेळी तुमच्यासोबत तुमच्या परस्पर आमचं गुफ्तगू सुरू असतं. तुम्हाला माहिती असावं म्हणून हा पत्रप्रपंच.
परवा अगदीच गम्मत झाली. ती गम्मतही तुमच्या कानी घालावी, म्हणून लिहितोय.

तुमची ‘हम देखेंगे’ ही आमची सर्वांची आवडती कविता. अगदी सहज तिचा संदर्भ येतोच. आयआयटी कानपूरमधल्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदवही या विरोधातील आंदोलनात ही कविता म्हटली. आपलं म्हणणं अगदी नेमकं मांडणारी ही तुमची अगदीच क्रांतिकारी कविता. ‘लाजिम है की हम भी देखेंगे’ हे अगदी निर्भीडपणे आव्हान देत उस दिन के वादे की याद दिलाने वाली कविता. तोच दिवस ज्या दिवशी सत्तेचे सारे तख्त कोसळतील आणि तुझं, माझं प्रत्येकाचं राज्य येईल. जिथे तो खुदा नसेल, तू आणि मी खुदा असू. सगुण-निर्गुण ओलांडून तुझं माझं असणं सांगणारे तुमचे शब्द. तुम्ही म्हणाल, माझीच कविता मला काय समजावून सांगतोस? पण ऐका तर. गंमत पुढे आहे. तुमची ही कविता हिंदू-विरोधी आहे, असा आंदोलकांवर आरोप करण्यात आला. एवढंच नाही, ही कविता खरोखरच हिंदूविरोधी आहे की नाही, यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. आता बोला.

हो, मला माहितीय की ही कविता तुम्ही पाकिस्तानचा हुकूमशहा जनरल जिया उल हकच्या विरोधात विद्रोह केला तेव्हा लिहिली आहे. अहो, मला हेपण माहिती आहे की तुम्ही नास्तिक होता आणि तिकडे तुम्हाला लोक मुस्लीम विरोधी समजत होते ! पाकिस्तानातल्या तुरुंगातच तर तुम्ही ‘जिंदान नामा’ आणि ‘दस्त-ए-सबा’ लिहिलं पर इनको ये सब कौन बताए फैजभाई ? पण तुमचं अभिनंदनही करायचं आहे मला. जिवंतपणी मुस्लीमविरोधी म्हणून आरोप केले गेले तुमच्यावर आणि आता मरणोत्तर हिंदूविरोधी. त्यामुळे एकूणात तुम्ही सर्वधर्म विरोधी आहात, हे सिद्ध होत आहे. माणूस असण्याचा अजून कोणता पुरावा तुम्हाला हवा !

तुम्हाला खरं सांगू का, हा काळच मुळी कविता हरवत चालल्याचा आहे. कविता न समजणारे सत्ताधीश आहेत इथे-तिथे. समजणं सोडून द्या; त्यांना कवितेची भीती वाटते. आपलं सिंहासनच डळमळीत होणार नाही ना, या शंकेने जीव कुरतडत राहतो बापड्यांचा. म्हणून तर इस्मत चुगताई आणि सफदार हाश्मी यांना अभ्यासक्रमातूनच काढून टाकतात हे महाभाग; पण मला सांगा फैजभाई, मनातून त्यांना कोण हद्दपार करु शकेल !

परवाच तुमच्याविषयी चर्चा सुरु होती- तुम्ही अल्लाऐवजी इन्सान म्हणाला असतात तर किती बरं झालं असतं, वगैरे. गंमतय किनै, कवीने कसं लिहावं हे पण आता सांगितलं जाऊ लागलं आहे. काही दिवसांनी राज्यकर्ते आपल्याला कविताच लिहून देतील रेडीमेड. तुमच्या या कवितेतील ‘अन-अल-हक’ अर्थात ‘मै ही खुदा हूँ’ या शब्दासाठी मरण पत्करणार्‍या सुफी मन्सूर हाजीबाला या लोकांनी काय सल्ला दिला असता ?

फैजभाई, तुमचं नामांकन नोबेल वगैरेसाठी झालं होतं, असं नुकतंच वाचनात आलं. नोबेल मिळो न मिळो, पण तुमच्या कवितेला मरणोत्तर संदर्भमूल्य प्राप्त होणं आणि लाखो तरुण तरुणींनी रस्त्यावरती येऊन ‘हम देखेंगे’ म्हणत आपला आवाज बुलंद करणं, याहून मौल्यवान काय असू शकतं !

येशू म्हणाला होता, ईश्वरा, यांना माफ कर, आपण काय करतोय, हे त्यांना कळत नाही. कबीराला धर्माच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा भर बाजारात उभं राहून आपल्या दोह्यांमधून समाजाची वीण घट्ट बांधण्याचा त्याने प्रयत्न केला. फैजभाई, आम्हीही वेड्यासारखं तुम्हाला ‘जय श्रीराम’ म्हणतो आहोत. आम्हाला माफ करा आणि हसण्यावारी घ्या. फैज अहमद फैज कोण आहेत, हे ठाऊक नाही बिचार्‍यांना. कविता विसरून गद्यप्राय झालेल्या रक्तरंजित द्वेषपूर्ण भवतालात पुन्हा तुमच्याच ओळी मागे येऊन बिलगतात ः

ये दाग़ दाग़-उजाला, ये शब-गज़ीदा सहर
वो इंतज़ार था जिसका, ये वो सहर तो नहीं…

सच है फैजभाई, ये वो सुबह भी नहीं. ये वो देश भी नहीं. ज्या सुंदर उज्ज्वल देशाची कल्पना केली होती, हा तो देश नाही, हे खरंच; पण ये दिल नाकाम है लेकिन नाउमीद नहीं.

शुक्रिया फैजभाई.
अपना खयाल रखना और हमे माफ करना.

आपका
‘नए भारत’ में पुराने भारत की तस्वीर ढूंढता हुआ
आप का छोटा दोस्त
श्रीरंजन

-श्रीरंजन आवटे

First Published on: January 12, 2020 2:41 AM
Exit mobile version