बालभारतीचा सृजनशील प्रयोग !

बालभारतीचा सृजनशील प्रयोग !

1993 साली प्रो. यशपाल यांनी ‘ओझ्याविना अध्ययन’ या नावाने भारत सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या संदर्भाने राष्ट्रीय स्तरावरती कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र देशातील अनेक राज्यांनी पुस्तकांचे ओझे कमी करण्याची भूमिका घेतली. पाठीवरचे ओझे कमी करताना डोक्यावरच्या माहितीच्या ओझ्याचे काय झाले ? हा खरा प्रश्न होता. देशातील शिक्षणाच्या प्रक्रियेत असलेले अनेक विद्यार्थी तणावात आहेत. त्यामागे बालकांच्या मस्तकावरती असलेल्या माहितीच्या ओझ्याचा ताण अधिक आहे. त्यामुळे ते माहितीचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती. मात्र तसे फारसे प्रयत्न देशभर झाले नाहीत. मात्र यावर्षी मुलांच्या डोक्यावरचे माहितीचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्रात बालभारतीच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने राज्यात सुमारे पाचशे शाळा आदर्श शाळा करण्यासाठी पावले उचचली. त्यांच्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक निर्मितीचा विचार करण्यात आला. त्या वर्गासाठी तयार केलेली पुस्तके ही पथदर्शक स्वरूपात विकसित करण्यात आली आहेत. एकाच पाठ्यपुस्तकात एका इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी शासनाच्या विषयसूचीप्रमाणे सर्व विषय शिकता येणार आहेत. ती पुस्तके विकसित करताना एकात्मिक स्वरूपाची मांडणी ही त्यांची वैशिष्ठ्ये आहेत. या प्रयोगाची दखल भारतीय संसदेच्या शिक्षण विषयक समितीने घेतली आहे. देशभरात या स्वरूपाची पुस्तके निर्माण करण्यासाठी शिफारस करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राने यापूर्वी देखील अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा मानली जाते.

कोठारी आयोगाच्या शिफारशींनंतर महाराष्ट्रात बालभारतीची स्थापना झाली. संस्था आता पन्नास वर्षांची होते आहे. बालभारतीने तेव्हापासून महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार पुस्तके विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. राज्यातील पुस्तके नेहमी अधिकाधिक निर्दोष करण्याकडे कल राहिला आहे. त्या पुस्तकांची रचना, आशय, स्वाध्याय आणि तत्सम सर्व प्रकारच्या प्रयोगांची राष्ट्रीय स्तरावरती सातत्याने दखल घेतली गेली आहे. एखादी संस्था आपल्या कामाच्या दर्जावरती उंची प्राप्त करते आणि सातत्याने कामात दर्जा राखला जात आहे. स्वतःच्या उंचीचे साजेसे काम बालभारती सातत्याने करते आहे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

राज्य सरकारने राज्यात सुमारे 500 शाळांची आदर्श शाळा निर्मितीसाठी घोषणा केली. त्या शाळांमध्ये राज्य सरकारने पथदर्शक स्वरूपात एकात्मिक स्वरूपाचे पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्याचे धोरण घेतले आहे. त्या शाळांसाठी सृजन बालभारती नावाने हे पुस्तक प्रकाशित झाले केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीनंतर राज्याच्या दौर्‍यावरती आलेल्या संसदीय समितीने बालभारतीला भेट दिली होती. त्यावेळी या प्रयोगाविषयी सादरीकरण करण्यात आले होते. या प्रयोगाची दखल घेण्यात आली असून संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले आहे, की या प्रयोगाची संपूर्ण देशभर अंमलबजावणी केली जावी अशी शिफारस करणार आहोत. महाराष्ट्र राज्यात हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. तोही पथदर्शक स्वरूपातील असल्याने त्याचे झालेले हे कौतुक राज्यासाठी निश्चित अभिमानास्पद आहे.

त्याचबरोबर गेली काही वर्षे बालभारतीने पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकातील घटक विभाजित करून तीन भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक सत्रासाठीचा विचार करण्यात आला आहे. वर्गात येताना विद्यार्थी एकावेळी सर्व पुस्तके न आणता आणलेल्या एकाच पुस्तकात सर्व विषयाचे पाठ, प्रकरणाचा समावेश असल्याने विद्यार्थ्याचे पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. वजनाचे झालेले विभाजन लक्षात घेतले तर विद्यार्थ्यांसाठी सहज सुलभता आली आहे. राज्य व केंद्र स्तरीय समितीने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या शिफारशीनुसार असे पुस्तकांचे विभाजन अपेक्षित आहे. या स्वरूपातील एकात्मिक पुस्तकेदेखील गेली काही वर्ष राज्यातील निवडक शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सृजन बालभारती हे पुस्तक मात्र एकात्मिक दृष्टिकोनातून विकसित करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या पुस्तकांनी विषयाच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या समग्र शिकण्यापेक्षा विषयांच्या भिंती अधिक दृढ झालेल्या आहेत. एखादा घटक शिकविताना तो कोणत्या विषयांचा आहे याचा विचार केला जातो. या भिंतीमुळे एखादा घटक, कृती, उपक्रम केला गेला, किंवा एखाद्या घटकासाठी अध्ययन अऩुभव दिला गेला तर तो ज्या शिक्षकाने दिला आहे, तो शिक्षक जो विषय शिकवितो त्याच अनुषंगाने विचार करीत असतो. त्याच स्वरूपाचे विवेचन आणि स्वाध्याय दिले जात असतात. त्या अध्ययन अनुभवात इतर विषयांसंबंधी त्याला जोडून अध्ययन अनुभव दिले गेले तर त्यात विद्यार्थ्यांचे शिकणे सुलभ होत असते. त्यादृष्टीने या पाठ्यपुस्तकात मराठी, गणित, इंग्रजी या मुख्य विषयांसोबत कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमावरती हे एकात्मिक पुस्तक विकसित करण्यात आले आहे. पारंपरिक पध्दतीच्या विषयांच्या भिंतीची चौकट मोडताना त्यात बदल घडवून आणण्यासाठी घेतलेली भूमिका महत्वाची आहे.

पहिलीचे पाठ्यपुस्तक एकात्मिक दृष्टिकोनातून निर्माण करताना एकूण पाच संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, पक्षी, वाहतूक आणि मदतनीस या सर्व संकल्पना विद्यार्थी सर्व विषयांच्या आशयांच्या संदर्भाने एकत्रित शिकणार आहेत. त्यामुळे शाळेत असणार्‍या प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ही संकल्पना या निमित्ताने संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी संकल्पना निहाय एकात्मिक पुस्तक मुलांच्या हाती शिकायला मिळणार आहे. त्यामुळे एकच संकल्पना अधिक व्यापकतेने शिकण्यास मदत होणार आहे. पाठ्यपुस्तकात सर्वाधिक भर नवनवीन कृती, विचार करण्यासाठी सूचक क्रिया, तसेच विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडणारा आणि विचाराला प्रेरणा देणार्‍या कृतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य यांचा विचार आहेच, त्याप्रमाणे 21 व्या शतकातील जीवन कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे शिकणे व्यापक होण्यास मदत होते.

अनेकदा भाषेचा घटक शिकत असताना त्यात विद्यार्थी गणित, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव विषयाचे अनुभव एकत्रित शिकता येणार आहेत. जसे भाषा विषयासाठी देण्यात आलेले चित्र आहे. ते चित्र क्रमाने जोडताना त्यासाठी संख्याज्ञानाचा विचार करण्यात आला आहे. त्यात रंग भरणे, रेषा जोडणे यात कलेचा विचार आहे. त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची साधने हे चित्र देण्यात आले आहे. तेथे चित्र जोडण्याची संधी आहे. त्यात रंग भरणे अपेक्षित आहे म्हणजे कलेचा विचार करण्यात आला आहे. त्याचवेळी कोणत्या भांड्यात पाणी जास्त, कमी साठविले जाईल. त्याचा आकार, त्या वस्तू बनविण्यासाठी काय काय उपयोग आणले आहे? कोणत्या धातूपासून त्या वस्तू बनविले? त्या वस्तू बनविणार्‍याला काय म्हणतात? वस्तूंचे वर्णन करणे यासारखे विविध विषय एकाच घटकात शिकणे होणार आहे. त्यामुळे माहितीचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पुस्तकात शिकताना प्रश्नाचे ओझे अधिक असते तेही नाही. येथे शिकणे महत्वाचे आहे, त्याचबरोबर काय शिकणे अपेक्षित आहे, ते कितपत साध्य झाले आहे ते जाणून घेण्यासाठी व विचार करण्याच्यादृष्टीने सूचक चाव्या देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी काय विचार करावा? कसा विचार करावा? या दृष्टीने शिकण्याची दिशा अधोरेखित होण्यास मदत होणार आहे. पुस्तकात मुलांसाठी कृती देण्यात आल्या आहेत, त्या कृती सूचित करण्यासाठी प्रतीकांचा उपयोग करण्यात आला आहे. सुमारे 19 प्रतीकांचा विचार केलेला आहे, त्या लिहिणे, वाचने, रंगविणे, कृती कर, बैठे खेळ, वर्गीकरण, कोडी सोडव, चिकित्सक विचार, निरीक्षण, गाणे गा, मैदानी खेळ आदी प्रतीकांसाठी वापरलेले संबोध ही कल्पना मुलांना मदत करणारी आहे. त्याचबरोबर 21 व्या शतकातील कौशल्यांचा विचार करताना अध्ययन कौशल्य, साक्षरता कौशल्ये व जीवन कौशल्ये यांचा विचार करण्यात आला असून त्यासाठी 12 कौशल्यांच्या प्रतीकांचा उपयोग केला आहे

. त्याचबरोबर थिंकिंग हॅट्स दर्शित करण्यात आल्या आहेत. त्याकरीता सहा हॅट आणि त्यांचे विविध रंग विविध विचार सुचित करतात. तसेच थिंकर की दोन प्रकारे सुचित केल्या आहेत. त्यातून मुलांच्या भावभावना, सर्जनशीलता, तथ्ये, प्रक्रिया याचा विचार करण्यात आला आहे. एकूण पाठ्यपुस्तक हे विद्यार्थ्यांच्या कल्पनेला भरारी देणारे असले तरी सुलभन करण्यासाठी मात्र शिक्षक जितक्या विविध प्रकारे कल्पकता उपयोगात आणून अध्ययन अनुभव देतील तितके मुलांच्या विकासाच्या वाटा समृध्द होण्यास मदत होणार आहे. बालभारतीची ही वाट देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षण समितीने शिफारस करून देशभर अंमलबजावणी झाली तर देशातील मुलांच्या मस्तकी असलेले माहितीचे ओझे किमान संपुष्टात येईल.

 

First Published on: November 14, 2021 6:30 AM
Exit mobile version