तो आज असा…..

तो आज असा…..

पंधरा दिवसापूर्वी एका मोबाईल नंबरवरून मला सकाळीच फोन आला. पलीकडून वैभव सर का?. सकाळीच कोणाला वैभव सर आठवले याचा विचार करत मी उत्तर दिलं, त्यावर पलीकडून मग काय सर आता मोठी माणसं झालात तुम्ही. आम्हाला ओळखले का?. सकाळी सकाळी अशी कोडी कोणी घातली की डोक्यात तिडीक जाते. एकतर सुट्टीच्या दिवसात सकाळी कोणी फोन केला की आपली झोप मोडली याचा प्रचंड राग आलेला असतो, पण ह्या माणसाने इतक्या जवळीकतेने माझी झोप उडवली की मला पुढे राग येण्याची शक्यता नव्हती. मी त्याला ओळखले नाही म्हणून मग त्याने मला एक एक हिंट द्यायला सुरुवात केली. आपण एकत्र कॉलेजला होतो. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला आपण एकत्र प्रोजेक्ट केला होता. त्याने टाय डेला टाय लावून आल्याची आठवण करून दिली, पण हा नक्की कोण हे माझ्या लक्षात येत नव्हते. शेवटी त्याने कॉलेजमधले दोन तीन किस्से सांगितले आणि मी वीस वर्षांपूर्वीच्या सगळ्या घटना आठवू लागलो.

त्याचे नाव जालिंदर. मुलं त्याला काही म्हणायची. जाल्या, जाळी के अंदर, कोण आगाऊ त्याला जॉली म्हणून उगाच चण्याच्या झाडावर चढवायचा. कॉलेजमधल्या प्रत्येक ग्रुपमध्ये खेचायला कोणतरी गिर्‍हाईक लागतं. जालिंदर तसा होता. तो कॉलेजमध्ये आला की आज त्याला कसा गिर्‍हाईक बनवायचे याचा सगळे विचार करायचे. आमच्या कॉलेजच्या बाहेर एक गणपतीचे मंदिर होते. त्याच्या बाजूला दोन तीन बाकडी ठेवली होती. तिथे बसून जालिंदरला कोण कोण काय काय बोलायचे याची इथे सांगता सोय नाही, पण आम्ही त्याला इतका त्रास द्यायचो पण हा माणूस कधी एका शब्दाने आमच्यावर रागावला नाही. जालिंदर आमच्या ग्रुपमध्ये आला नाही तर तो ओढला गेला, त्याच झालं असं जालिंदर गावाहून आला होता. त्याचं गाव तालुक्यापासून तीस पस्तीस किलोमीटर्स आतमध्ये. त्यामुळे शहरी सांस्कृतिक जीवनाशी तो अनभिज्ञ होता. आमच्या ग्रुपमध्ये त्याला हवं तसं वातावरण होतं. आम्ही सगळे उपनगरातल्या कामगार वस्तीतून आलेलो. जालिंदरला हवं तसं वातावरण आमच्या ग्रुपमध्ये होतं. जालिंदर तसा मोठ्या शेतकर्‍याचा मुलगा. महिन्याच्या महिन्याला गावाहून त्याला पैसे भरपूर येत. त्याकाळात ही त्याची जमेची बाजू.

शहरी खानपान आणि इतर शहरी शिष्टाचार त्याला माहीत नव्हते, त्यामुळे बराच गोंधळ व्हायचा. एकदा कॉलेजची लेक्चर्स संपल्यावर आम्ही ठाण्याच्या तलावपाळी जवळ फिरायला गेलो. तलावाच्या बाजूने भरपूर फिरलो. त्यानंतर तलावात बोटिंग केली आणि काहीतरी चटपटीत खावं म्हणून त्या तलावाच्या आसपास असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्याच्या जवळ गेलो. सगळ्यांनी पाणीपुरीची ऑर्डर दिली. पाणीपुरी देणार्‍या इसमाने आमच्या हातात डिश दिल्या. त्याने पहिली पाणीपुरी दिली ती नेमकी जालिंदरच्या डिशमध्ये. जालिंदरने पाणीपुरी प्रकार याआधी कधी चाखला नव्हता. पाणीपुरीवाल्याने जशी प्लेटमध्ये पाणीपुरी ठेवली तशी जालिंदरने पुरीच्या आत असलेला रगडा पुरीतून ओतून तोंडात घातला आणि पुरी मागे फेकून दिली. दुसर्‍या राउंडमध्ये देखील जालिंदरने तेच केले. जालिंदर नक्की काय करतो याकडे बाकीच्या सगळ्यांचे लक्ष गेले तेव्हा जालिंदर नेमके काय करतो हे त्यांना कळेना. त्यानंतर सगळ्यांनी पाणीपुरी नक्की कशी खावी हे त्याला सांगितले. त्यानंतर मात्र जालिंदर आणि पाणीपुरी हा आमच्या हसण्याचा विषय झाला होता. आताही कधी पाणीपुरी खायला गेलो की जालिंदरची ती आठवण येतेच.

जालिंदर भोळा होता. इथून बी.एस्सी करून गावी जाऊन आधुनिक शेती करण्याचा त्याचा मानस होता. पण त्याचं आणि इंग्लिशचं जमत नव्हतं. प्राध्यापक मंडळी त्याला इंग्लिशमध्ये काही प्रश्न विचारायचे आणि तो त्याची उतरे मराठीत द्यायचा. वर्गात त्यामुळे वातावरण नेहमीच उत्साही असायचे. सकाळी सातच्या लेक्चर्सला आम्ही पावणे सातपर्यंत गणपतीच्या देवळात जमायचो. जालिंदर आमच्या आधीच तिकडे आलेला असायचा. सगळे जमलो की समोरचा अण्णा चहाचे कप घेऊन यायचा, मग कुठल्या लेक्चर्सना बसायचे, कुठली लेक्चर्स बंक करायची हे सर्वानुमते ठरवले जायचे. एकदा दिवसभराचा कार्यक्रम ठरला की मग क्रिकेट खेळण्याची वेळ ठरवली जायची. त्यावेळी जालिंदर खुलायचा. तो उत्तम क्रिकेट खेळायचा. एकतर त्याच्याकडे मूलभूत अंगयष्टी होती त्या जोरावर तो जीव तोडून बॉलिंग करायचा. आमच्या सगळ्यांच्या आधी जालिंदर मैदानावर पोचायचा आणि मैदानावर पाणी मारायचा, दोन्ही बाजूना स्टम्प लावायचा. खेळपट्टीवर ताणून मॅट घालायचा. त्याच्यात इंग्लिश न बोलता येणं एवढाच काय तो न्यूनगंड होता, पण काही बाबतीत तो कमालीचा भोळा होता.

एकदा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता. जालिंदरचा आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा काही संबंध नव्हता, पण जिकडे आम्ही तिकडे जालिंदर असायचाच. आमचा निलेश प्रभू नावाचा एक मित्र उत्कृष्ट हार्मोनियम वाजवायचा. तो आणि आम्ही गाण्यांचा सराव करत बसलो होतो. जालिंदर आमच्या मागे बसला होता. निलेश त्याला म्हणाला जाल्या, खाली जाऊन चहाची ऑर्डर देऊन ये ना. पडत्या फळाची आज्ञा मानून जालिंदर कॅन्टीनमध्ये गेला. आम्ही रुमच्या बाहेर येऊन कार्यक्रमाचे नियोजन ठरवत होतो. वास्तविक निलेशने जालिंदरला केवळ चहाची ऑर्डर द्यायला सांगितले होते, पण जालिंदर ऑडीटोरिममध्ये चहाची किटली आणि कप घेऊनच वार आला आणि आता हा चहा घशाखाली घाला आणि प्रक्टिस करा, उगाच माझं नाव घालवू नका. तो काय बोलतो याकडे आम्ही बघतच बसलो. आम्ही बाहेर उभे राहून चहा घेत असताना जालिंदर आत गेला आणि हार्मोनियमचा भाता न उघडताच वाजवायचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात चहाचा ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा आत आलो. बघतो तर जालिंदर साहेब हार्मोनियम समोर घेऊन सूर लावायचा प्रयत्न करत होते. आम्ही सगळे ते बघून हसायला लागलो. जालिंदर मात्र निर्विकारपणे निलेशला म्हणाला, अरे, ह्या पेटीतून आवाज का नाही येत रे?

निलेशने त्याची फिरकी घ्यायचे ठरवले. निलेश त्याला म्हणाला काय केलस हे जाल्या, अरे पेटी वाजवून वाजवून तिचे सेल संपवून टाकलेस. आता सरांना सांगून नवे सेल टाकावे लागणार. तुला माहीत आहे का, मला सर विचारणार इतक्या लवकर सेल कसे संपले?

त्यावर जालिंदर म्हणाला, अरे पण मी फक्त दोन मिनिटं पेटी वाजवली, आणि सेल कसे संपले?

ते काय नाय जाल्या, आता नवीन सेल आणून दे. हे बघ निलेश, उगाच सरांना माझं नाव सांगू नकोस. मी तुला दुकानातून आताच्या आता नवीन सेल आणून देतो. आम्ही सगळे हसून हसून बेजार झालो. जालिंदर मात्र मनातल्या मनात खूप घास्तावला होता. निलेशने त्याला सेल कुठे मिळतात ते सांगितलं आणि त्याला सेल आणायला पाठवलं. सेलचा आणि पेटीचा काही संबंध नाही हे जाल्याला कळलेच नाही. जाल्याने भाबडेपणाने सेल आणून निलेशच्या हातात दिले. त्यावर आम्ही सगळे साताच्या वर हसायला लागलो आणि अख्ख ऑडिटोरिअम डोक्यावर घेतलं, आम्ही कशासाठी हसतो आहोत हे जालिंदरला कळलेच नाही. वर्ष संपत आलं. पहिल्या वर्षाच्या परीक्षा झाल्या. यथावकाश परीक्षेचे निकाल जाहीर झाले.

सगळे मित्र भेटले पण जालिंदर भेटला नाही. ह्यावर्षी आपण नापास होणार हे जालिंदरला बहुतेक आधीच कळले होते. त्यानंतर जालिंदर पुन्हा भेटला नाही. त्यादिवशी त्याने मला फोन केला, त्यानंतर त्याचे मेसेज येत राहिले. आता कुठल्यातरी पक्षाचे काम करतो. कॉलेजमध्ये असताना त्याच्यात रगेलपणा, रांगडेपणा बिलकुल नव्हता. आता जालिंदर पूर्णपणे बदलला आहे. मी त्याला कॉलेजच्या दिवसाची आठवण करून दिली. तुझ्यात हा बदल कसा झाला हे विचारले तेव्हा त्याने उडत उडत काही उत्तरे दिली पण….Time has change, now its my time, काय फर्डे इंग्लिश बोलला म्हणून सांगू!. जालिंदर आता पूर्ण बदलला आहे. त्याच्यातला तो निरागसपणा निघून गेला आहे. पक्का बिजनेसवाला झालाय. राजकारणातदेखील सक्रीय आहे. आवाज, बोलण्याची ढब, कपड्यांची निवड असा सगळा बदल झाला आहे त्याच्यात. नक्की काय कारण घडले असेल हे त्याला भेटल्याशिवाय नाही कळणार. बघू त्याला भेटायची कधी संधी मिळते?, तोपर्यंत मी सगळे तर्कवितर्क लावत बसेन.

First Published on: May 29, 2022 5:40 AM
Exit mobile version