तरुणाईची हाक ‘एकला चलो रे’

तरुणाईची हाक ‘एकला चलो रे’

भारतातील विवाहसंस्था या जगासाठी खरं तर कुतूहलाचा विषय आहे. एकाच व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहण्याच्या भारतीय महिलांच्या सहनशक्तीला अख्खं जगच सलाम करतं. नवरा बरा वाईट जसा असेल तसा त्याला स्वीकारून त्याच्या नावाचं कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून समाजात मानाने मिरवणार्‍या भारतीय महिला याच गुणासाठी जगातील इतर महिलांच्या तुलनेत वेगळ्या ठरतात. पण काळ बदलला, वेळ बदलली आणि भारतीय महिलांचे लग्नाप्रती असलेले विचारही आज बदलत आहेत. जी विवाहसंस्था प्रत्येक भारतीय महिलेला आर्थिक संरक्षण, समाजात मानसन्मान देणारी वाटत होती ती आता नकोशा असलेल्या पाशासारखी वाटू लागली आहे. लग्न, जोडीदार, मुलं, संसार, नातीगोती, रुसवे-फुगवे, हेवदावे, अपेक्षांचे ओझे यात अडकून राहण्यात आजच्या पिढीला रस नाही.

या नात्यातून होणार्‍या घुसमटीखाली जीवन व्यतीत करण्यात काय अर्थ, असा प्रश्न आत्ताच्या तरुणींना पडलाय. यावर सिंगल राहणे हा एकच उत्तम पर्याय त्यांनी निवडला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीत रुजणार्‍या बर्‍याच प्रथा आता आपल्याकडेही रुजू लागल्या आहेत. यामुळे घऱातल्यांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, कोणाला काय वाटेल यात ही पिढी पडत नाही. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीप्रमाणे तरुणाई पंख पसरत आहे. येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे हे वास्तव फक्त तरुण तरुणींमध्येच नाही, तर मध्यवयीन अविवाहितांमध्येही पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे लग्न न करण्यामागे या प्रत्येकाची आपआपली वेगवेगळी कारण जरी असली तरी लग्नच न करण्यामागच्या या निर्णयामागे आजूबाजूची परिस्थितीही तेवढीच कारणीभूत आहे. यामुळे लग्नच नको किंवा नवराच नको असे जर आजची तरुणी ठामपणे सांगत असेल तर त्याला विरोध करण्यापेक्षा त्यामागचे तिचे नेमके कारण पालकांनी समजून घेण्याची आज गरज आहे. कारण आज समाजात अशा अविवाहित तरुणींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. भारतातील महिलांच्या एकूण लोकसंख्येपैकी २१ टक्के महिलांना लग्नच करायचे नसलयचे समोर आले आहे. यात कुमारिका, विधवांबरोबरच घटस्फोटीत महिलांचाही समावेश आहे.

नात्यात आलेले कटु अनुभव, लग्नामुळे येणारी बंधने, मुलांचा सांभाळ, करियर, कौटुंबिक हिंसाचार, पतीच्या अपेक्षा या सगळ्यांमुळे महिलांना आता लग्नबंधनच नकोसे वाटू लागले आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे देशभरातील कौटुंबिक न्यायालयात वाढणारे घटस्फोटाचे अर्ज. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच ही नवपरिणीत जोडपी कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यांपर्यंत पोहचत आहेत. हीच आजची वस्तुस्थिती आहे. यामुळे या केवळ समाज काय म्हणेल यासाठी मुलांवर लग्नाचा दबाव टाकणार्‍या पालकांनी मुलांच्या मतांचाही आदर ठेवत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.

एकीकडे लग्नासाठी घरातल्यांचा दबाव आणि दुसरीकडे समाज या अडकित्त्यात सापडलेल्या या महिलांनी तर आपण विवाहित आहोत हे दाखवण्यासाठी आता सोलोगॅमी नावाचा प्रकार सुरू झाला आहे. यात स्वत:च स्वत:बरोबर लग्न करण्याची पद्धत आहे. जगभऱातील तरुणींमध्ये सोलेगॅमीचा (solo gamy)..हा ट्रेंड वाढत असून भारतातही तो आता फोफावू लागला आहे. स्पेनमध्ये २०११ साली १० मुलींनी सोलोगॅमी विवाह केला होता. स्वत:शीच लग्न करण्याची ही पद्धत, अमेरिका, इटली , जपान, भारतासह ब्रिटनमध्येही रूढ होत आहे. लग्न म्हणजे सर्कस असून मुलींना आता या सर्कसचा भाग व्हायचे नाही, असे मत स्टेटस सिंगल कम्युनिटीच्या संस्थापक आणि लेखिका पियु कुंडू यांनीही म्हटले आहे. पियु कुंडू या विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, अविवाहित असलेल्या शहरातील आणि ग्रामीण महिलांसाठी काम करतात. लग्नानंतर येणारी बंधने, अनावश्यक जबाबदार्‍यांना आताची पिढी कंटाळली आहे.

धूमधडाक्यात लग्नसोहळे झाल्यानंतर हनिमून पिरियड संपल्यानंतर नवदाम्पत्याचे आयुष्य इतरांप्रमाणेच सर्वसामान्य होते. यामुळे त्या रुटीन लाईफला कंटाळून महिलाच नाही तर लग्नबंधनात नव्याने अडकलेले पुरुषही स्वतंत्र होऊ पाहत आहेत. लग्नाआधीचा क्युट, गोड, रोमँटीक, हॉट केयरिंग बॉयफ्रेंड नवरा झाला की त्याचा बदललेला टिपिकल नवरा मुलींना नकोसा होतोय, तर लग्नाआधीची ती क्युट गर्लफ्रेंड लग्नानंतर येणार्‍या जबाबदार्‍यांमुळे बदललेली असल्याने मुलाचा तिच्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होताना दिसत आहे. हे पाहूनदेखील रिलेशिनशिपमध्ये राहणारी जोडपी लग्नापेक्षा लिव्ह इनचा पर्याय निवडत आहेत.

त्यातच आजची पिढीतील तरुणी पूर्वीप्रमाणे सामाजिक, आर्थिक संरक्षणासाठी लग्न करण्यासाठी प्राधान्य देत नाहीये, नाही तर होणार्‍या जोडीदाराचे त्याच्या कुटुंबाचे विचार कसे आहेत याचाही विचार करते. यामुळे हल्लीच्या तरुणींचा कल प्राधान्याने शिक्षण, करियर आणि स्वताच्या मनाप्रमाणे जगता येण्याकडे आहे. बंधनात राहणे त्यांना आवडत नाही. समोरची व्यक्ती नवरा जरी असला तरी त्याला सुखी करण्यासाठी स्वत:चे मन मारून जगणे, तडजोडी त्यांना मान्य नाही. यातूनच आता मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. लग्न चूल मूलापेक्षा शिक्षण आणि करियर याला प्राधान्य देत आहेत. परिणामी मुलांएवढाच त्याही पैसा कमावू लागल्या आहेत यामुळे पूर्वीप्रमाणे आजची महिला ही अर्थाजनासाठी पतीवर अवलंबून नाही. यातून महिलांचा आत्मविश्वासही बळावू लागला आहे. यामुळे तरुणींचा ओढा आता लग्नाप्रती कमी झाला आहे.

अशीच काहीशी परिस्थिती तरुणांची आहे. कोरोना काळानंतर बदललेली आर्थिक स्थिती, कामाचा ताण, नोकरीतील अस्थिरता, त्यातून निर्माण होणारी आर्थिक अस्थिरता, कुटुंबाची जबाबदारी, घरदारासाठी घ्यावे लागणारे लोन, आई-वडिलांची भावंडांची जबाबदारी, तसेच लग्न जमवताना किंवा झाल्यावर वधूच्या असलेल्या अपेक्षा याखाली हल्लीची तरुण मुलं इतकी पिचत चालली आहेत की लग्नास ती मानसिकरित्या तयार नाहीत. यामुळे पालकांनाच आता यावर तोडगा काढावा लागणार आहे. यामुळे पालकांनाही आता काळाबरोबर विचार आणि समज बदलण्याची वेळ आली आहे.

First Published on: February 5, 2023 3:42 AM
Exit mobile version