जब भी ये दिल उदास होता है…

जब भी ये दिल उदास होता है…

निर्माते सोहनलाल कंवर आणि दिग्दर्शक सुरेंद्र मोहन यांचा ‘सीमा’ हा चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये राकेश रोशन, कबीर बेदी, शीर्षक भूमिकेत सिम्मी ग्रेवाल, पद्मा खन्ना, चांद उस्मानी, सुलोचना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलं होतं. यात एक थी निंदिया दो थे नैना… (सुमन कल्याणपूर/सुषमा श्रेष्ठ ), जब भी ये दिल उदास होता है… (मो. रफी-शारदा), लडकी चले जब सडको पे… (किशोर कुमार), वक्त थोडासा अभी… (आशा भोसले-किशोर कुमार), किस पे है तेरा दिल… (मो. रफी-आशा भोसले), दिल मेरा खो गया … (किशोरदा-आशा भोसले) ही गाणी होती. यातली सुरुवातीला उल्लेख केलेली दोन गाणी गुलजार यांनी लिहिली होती, तर उर्वरित गाणी गीतकार वर्मा मलिक यांच्या तर एक गाणं (वक्त थोडासा…) इंदीवर यांच्या लेखणीतून उतरलं आहे. गुलजारच्या जब भी ये दिल… या गाण्यावर हा दृष्टिक्षेप :

जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आसपास होता है
जब भी ये…

होंठ चुपचाप बोलते हो जब
सांस कुछ तेज तेज चलती हो
आंखे जब दे रही हों आवाजे
ठंडी आहों में सांस जलती हो
जब भी ये…

आंख में तैरती है तस्वीरे
तेरा चेहरा तेरा खयाल लिए
आईना देखता है जब मुझको
एक मासूम सा सवाल लिए
जब भी ये…

कोई वादा नही किया लेकीन
क्यू तेरा इंतजार रहता है
बेवजह जब करार मिल जाए
दिल बडा बेकरार रहता है
जब भी ये…

काही गाण्यांची व्याप्ती चित्रपट गीतापर्यंत मर्यादित न राहता पुढे विस्तारलेली असते. अशी गाणी कुठेही ऐकायला आली, कधीही गुणगुणली ती आपल्या अवतीभवती एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती करत असतात. त्यामुळे अशी गाणी चित्रपटातल्या प्रसंगानुरूप लिहिलेल्या गाण्यांपेक्षा संवेदनशील आणि रसिक श्रोत्यांच्या मनात सदैव रेंगाळत राहत असतात. गुलजार यांचं हे गाणं याच जातकुळीतलं. कोट्यवधी एकाकी हृदयाच्या जीवांना या गाण्यातल्या भावनांनी त्यांच्या हळव्या भावावस्थेत सुखद दिलासा दिला असेल यात शंका नाही. कित्येक रसिकांनी कातर संध्याकाळी या गाण्याचा मुखडा गुणगुणला असेल याची गणतीही करता येणार नाही. असं म्हटलं जातं की प्रेमाचं रसायन संपूर्णपणे शब्दांत उतरवणं अशक्य असतं, मात्र शब्दांचे किमयागार गुलजार पहिल्याच कडव्यात यात यशस्वी झालेले दिसतात. ओठांचं नि:शब्द बोलणं, डोळ्यांनी आवाज देणं, हृदयातून स्पंदनातून निघणार्‍या श्वासांची ऊब अनुभवणं ह्या आपण विचार करू शकणार नाहीत अशा उत्कट आणि विलक्षण प्रतिमा त्यांनी या गाण्यात वापरल्या आहेत. हे असलं केवळ गुलजारच लिहू शकतात.

स्वरसम्राट मोहमद रफींना गुलजार यांनी लिहिलेली फार कमी गाणी गायची संधी मिळाली आहे. छडी रे छडी… (मौसम), मुझे छू रही है…/ एक महल मा… (स्वंयवर ), किसी आसमा पे… (कशिश), जब कझा से गुजरो तो… (देवता), मेरे बाबा रे… (कोशिश), जाने कहां देखा है तुम्हे… (बिवी और मकान) अशी मो. रफी-गुलजारची मोजकीच गाणी श्रोत्यांना ऐकायला मिळाली आहेत. या सर्व गाण्यांपेक्षा ‘सीमा’मधलं हे गाणं सरस म्हणता येईल. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता, मात्र हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. रफींच्या हजारो गाजलेल्या गाण्यांमध्ये याचा समावेश केला जातो.

गुलजारचे शब्द आणि रफींचा आवाज यांच्या तुलनेत शंकर-जयकिशन यांचं संगीत फार प्रभावी वाटत नाही. तेव्हा हे संगीतकार आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात होते. हे गाणं कबीर बेदी आणि सिम्मी ग्रेवाल यांच्यावर चित्रित झालेलं आहे. पडद्यावर कबीर बेदीला हे गाणं गाताना दाखवलेलं नाही. या गाण्याचा मुखडा रसिकांना जितका भावला तितकाच तो दस्तुरखुद्द गुलजार यांनाही आवडलेला दिसतो. म्हणूनच या गाण्याचा मुखडा कायम ठेवून गुलजार यांनी एक गझल लिहिली आहे. त्यांच्या एका काव्यसंग्रहात ही गझल समाविष्ट करण्यात आली आहे. ‘सीमा’ चित्रपटातलं गुलजारचं दुसरं गाणं एक अर्थपूर्ण अंगाई गीत असून ते सुमन कल्याणपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांनी स्वतंत्रपणे गायलं आहे. या गाण्याचे शब्द खालीलप्रमाणे :

एक थी निंदिया दो थे नैना
रात की जायी शाम की बहना

रोज वो परियो जैसी निंदिया आती थी
दोनो जुडवा नैनो को बहलाती थी
आंखो पे रख देती थी मीठे सपने
सपनो वाली निंदिया मां कहलाती थी
एक थी निंदिया…

आओस की बुंदो में जो बरसा करती थी
वो निंदिया अब दो नैनो से रूठ गई
छूट गए वो रेशमी झूले सपनो के
चांद ने कैसी लोरी की धून टूट गई
एक थी निंदिया…

निंदिया की ममता को बांच के दो नैना
आधी आधी सांसे लेकर जीते है
बरी बरी देखते है टूटे सपने
बरी बरी आंख से आंसू पिते है
एक थी निंदिया…

गुलजारसाहेब केवळ प्रेमभावना व्यक्त करणारी, जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी गाणी लिहितात असं नाही, तर चित्रपटातल्या कथानकाची गरज असेल तर नितांत सुंदर असं अंगाई गीतदेखील तितक्याच सहजतेने लिहू शकतात हे या गाण्यातून आणि त्यातल्या आशयगर्भ शब्दांमधून सिद्ध होतं. लतादीदींच्या आवाजाशी कमालीचा साधर्म्य असलेल्या आवाजाच्या प्रतिभावंत पार्श्वगायिका सुमनताई कल्याणपूर यांनी अतिशय तन्मयतेने ही रचना गायली आहे. या गाण्याचा दुसरा भाग दु:खी भाव असलेला असून यास तत्कालीन बालगायिका सुषमा श्रेष्ठने स्वर दिला आहे. १९५० ते १९७० अशी तब्बल तीन दशके गाजवणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या शंकर-जयकिशन या लोकप्रिय संगीतकार जोडीने स्वरबद्ध केलेली ही गुलजारची दोन गाणी वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. विशेषत: जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है… या गाण्याला गुलजार यांच्या चाहत्यांच्या मनात खास जागा आहे.

–प्रवीण घोडेस्वार 

First Published on: November 13, 2022 4:38 AM
Exit mobile version