वय आणि आडे

वय आणि आडे

रोजच्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही मुलं आजीच्या भोवती गराडा घालून गोष्टी ऐकत होते. बहुतेक सोमवारचा दिवस होता, कारण सोमवार असला की, घरातले दिवे गेलेले असायचे. मग तात्या म्हणजे माझे चुलते कंदील पेटवून वळईत ठेवून द्यायचे. अगदीच नाही तर घरात असणार्‍या दुपायलीवर मोठी चिमणी ठेऊन त्याच्या त्या प्रकाशात आमच्या आजीशी गप्पा चालत. अशा तिन्हीसांजेच्या वेळी समोरच्या पाणंदीतून वसंत नाना आला आणि विजय तात्यांना उद्देशून इज्या, तुझ्या भाटयेतल्या बागेत ढोरा गेली हत…किती पावटी सांगलय खालची वय करून घेवया….

वसंत नाना असाच यायचा आणि तात्याला आठवण करून द्यायचा. नानाने असं फर्मान सोडलं की, तात्या सकाळी लवकर उठून बागेच्या बाजूने वई करायला निघायचे. वय हा जरी प्रचलित शब्द असला तरी जनमानसात वई असं बोलायची पद्धत नव्हतीच. कोणीही सहज बोलताना वय असचं बोलायचे. वय तयार करायचे म्हणजे लाकडाचे छोटे ठोंबे लागणार, त्याला आडवी ठेवायला चिव्याची भेत लागणार आणि हे सर्व एकत्र बांधायला चिव्याचे बन हवेच…

शेतातल्या पिकाचे गुराढोरापासून रक्षण व्हावे म्हणून आजूबाजूने जे कुंपण घालतात ते म्हणजे वई किंवा वय. एकदा वय घातली की आपल्याला शेतातल्या पिकाच्या बाबतीत निर्धास्त रहाता येईल ही शक्यता अगदी शंभर टक्के कधीच नसते. वय कोणी कितीही मजबूत बांधो ती पेचून आत शिरकाव करणारी ढोरं कमी नाहीत. मी पेचून शब्द मुद्दाम वापरला. कारण केलेली वय ही सहसा मोडता येत नाही, ती जाणीवपूर्वक पेचावी लागते.

पहिले नेमा( लहान खड्डे ) काढून त्यात ठोंबे पुरून बाजूने आडवी काठी लावून ते ठोंबे आणि काठी ताणून बांधतांना एक खरोखर कसब पणाला लागते. वईच्या एकंदर ठेवणीवरून ती कोणी बांधली हे लक्षात यायचे. एकंदर त्या वईच्या बांधण्याच्या कसबीवरून तिचा निर्माता ठरवला जाई. भाटयेच्या बाजूने मेरेवरून जाताना ठोंबे लावून नजाकतीने बांधलेली वय म्हणजे ही वय सदाकाकाने बांधलेली, त्या वयीच्या सौंदर्यात अक्षराशः भर पाडलेली असायची. सदाकाका वय करायचा तेव्हा ती वय बघून कुठल्या गुरालादेखील ही वय आपण पेचू नये असं वाटत असेल. सर्व ठोंबे एका समान अंतरावर ठोकलेले, त्याच्या बंदाची टोके कधी बाहेर आलेली नसायची, हा कारभार सगळा व्यवस्थित.

खाली तशी वय भाऊकाका तयार करायचा, बांधाचा एखादा दोर किंवा शिग्रा बाहेर आली की, ती कोयत्याने आडवी मारून काढून टाकलीच समजा. वय बनवणे हा वरवर रांगडेपणा दिसला तरी त्यात कलाकुसर भरलेली असायची. ती कलाकुसूर नसली की, वईचे बारा वाजले म्हणून समजा. बैल आपल्या शिंगाने असली वय उभ्या उभ्या आडवी करून टाकायचे. वयीवरून जाता येता यावे म्हणून आखाडा करावा लागे.

या आखाड्याची मोठी गंमत असायची. आखाडा म्हणजे जाण्यासाठी-येण्यासाठी केलेले दार. म्हणजे कुठल्यातरी एकाठिकाणी वयीची उंची कमी करून खाली उंचवटा करून त्या सकल केलेल्या भागातून पाय उचलून ओलांडता येते. या आखाड्यावरून येता जाता कधीतरी शर्टाचा फडशा पडायचा किंवा शरीराच्या एखाद्या भागाला ओरखडा पडायचा. पण हे गावकरी वर्षानुवर्ष या आखाड्यावरून डोक्यावर ओझं घेऊन येजा करतात त्यांचे कौतुकच करावे लागेल.

हल्ली आखाड्यावरून येणे जाणे कमी झाले तरी घराला किंवा शेताला वय केली की, त्याला आखाडा नाही केला तर कसं चालेल. शेताला केलेला आखाडा आणि घराला केलेला आखाडा हा सर्वस्वी वेगळा. घराच्या आखाड्याला लाकडी खांबांना भोके पाडून त्यात बांबूंची काठी घालायची सोय केलेली असते. ती काठी बाजूला करून सहज ये जा करता येते.

या वय -आखाड्याशी किती आठवणी लपलेल्या असतात. नदीकडे जाताना वयीच्या आखाड्यावरून ओलांडून जाताना किती विजारी फाटल्या असतील किंवा कितीतरी वेळा मांडीवर किंवा मांडीच्या मागे ओरखडे पडले असतील, पण नदीकडे जायचा उत्साह कधी कमी व्हायचा नाही. गावात कितीजणांनी वयीच्या कथा रंगवून सांगितलेल्या असतात. उन्हाळ्याच्या दिवसात काजूंच्या बागेभोवती केलेल्या वई कशा पेचल्या जातील याचा नेम नाही. या बागांच्या भोवती भक्कम वयीचे तट उभारले जात. पण वयीच्या भोवतीने गुरांनी नाही तर माणसांनीदेखील शिरकाव करणे कठीणच.

आमच्या गावात हरीदादा होते, त्यांच्या वय या गावात मान्य. म्हणजे त्यांनी केलेली वय गुरांना नाही तर माणसाला तोडणेदेखील कठीण! त्यांच्या वईतून आत शिरणे म्हणजे दिव्यच ! एखादा माणूस काजू चोरण्याच्या निमित्ताने गेला की, तो अडकला म्हणून समजा. ती वई नसून एक प्रकारचा चक्रव्यूह होता, ज्यात शिरणे अवघड पण त्यातून बाहेर येणे म्हणजे महाभयंकर. आमच्याकडे हरण्या बैल होता, त्याची शिंगे अशी उभी असल्याने, त्या शिंगांना वईच्या बाहेरून ठोब्यांना मोडून तो कुडणात शिरत असे. तो कोणाच्या वई कशा पेचेल हे सांगता येत नसे.

एकदिवस हरण्याने हरीदादाने केलेला तो चक्रव्यूह भेदला. आमच्याकडे गुरांसाठी गडी होता, त्याला जाग लागली. हरण्या बैल हरीतात्यांच्या कुडणात गेला. त्याने हरण्या बैलाने जिथून वई पेचली तिथून कसाबसा आत शिरकाव करून घेतला, बैल पुन्हा शिंगांनी वईला वर करून बाहेर आला, पण गडी अडकला, तिथून बाहेर कसं पडायचं हे त्याला कळल नव्हत. वय पेचण्यासाठी हातात कोयता नाही. त्याने बैलाने जिथे वई मोडली होती तिथून जायचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात पायात चार आणि अंगात चार मोठे करवंदीचे काटे गेले. लंगडत लंगडत तो घरी आला. घरी येऊन पायातले काटे काढण्यासाठी कोणाकडे बिब्ये मिळतात का बघा म्हणून आम्ही पोरं कोणाच्या घरी गेलो ….कुणी विचारले बिब्ये कशाला ? ….त्यावर ऐकलेली खरी गोष्ट वाडीभर झाली .

गड्याच्या पायातले काटे काढले, तेवढ्यात हरीदादा तिथे आले. आता हरीदादा ओरडणार हे नक्की ….हरीदादा शांतपणे ….. माका तू आत कशाक गेलस या मुळीच सांगा नुको….पण एवडा सांग तू त्या वईच्या आत गेलं कसो… माझी वय म्हणजे सापळो ….ती मोडल्यान कोणी …. वई बांधण्याच्या बाबतीत हरीदादा प्रसिद्ध पण त्यांनी केलेली वई कशी मोडली..? या वईच्या बांधणीत केवढी कल्पकता आणि विश्वास !

घराभोवती आता वई दिसत नाहीत. जांभ्या दगडाने घडवलेला गडगा असतो. त्या गडग्याला शोभेल असं फाटक असतं. एक गोष्ट किती चांगली होती या वईने आपल्याला आपली मर्यादा ओळखायला शिकवली होती. या वईने घरादाराचे. शेताभाताचे रक्षण केलेच. पण माणसाला आपली चतु:र्सीमा बघून हातपाय पसरायला शिकवले. वई म्हटलं की, नदीच्या वरच्या बाजूला तोंडात चिव्याच्या बंधाना घेवून वयीच्या ठोंब्याना आवळून बांधत एखादी गजाल सांगणारा भाऊकाका आठवतो किंवा वई बांधून झाल्यावर वैभव बघ रे जमली काय वय ..! असं म्हणत गालात हसणारा सदाकाका दिसतो…ही सगळी वई करण्यात वाकबगार माणसं.

वई हा विषय जमिनीइतकाच जिव्हाळ्याचा आणि जमिनीच्या संलग्न जाणारा…तेवढाच अविभाज्य. कधीतरी माणसाला आपल्या मर्यादा लक्षात घ्यायला लावणारा.

First Published on: October 4, 2020 5:19 AM
Exit mobile version