शिक्षकाला समजून घ्यायला हवे!

शिक्षकाला समजून घ्यायला हवे!

राज्यात नुकताच राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप झाला. त्या बेमुदत संपात राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाली होते. त्यामुळे त्यात आपोआपच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीदेखील सहभागी झाले. संप एका आठवड्यात तडजोड झाल्याने मागे घेण्यात आला, मात्र संप सुरू असताना शाळा बंद राहिल्याने दोन-तीन दिवसांनंतर काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. गावातील काही लोकांनी स्वतःहून प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्या शाळा सुरू करण्यात काहीच कठीण वाटले नाही. प्राथमिक शाळा सुरू करण्यात जितकी आघाडी होती तितक्या प्रमाणात माध्यमिक शाळा सुरू झाल्या नाहीत. उच्च माध्यमिक विद्यालये चालविण्यासाठी फारसे कुणी पुढे आले नाही. सरकारी शाळा सुरू करण्यासाठी जितके हात पुढे आले होते, त्यापेक्षा नाहीच अशा स्वरूपात खासगी शाळा सुरू करण्यासाठी सरसावले होते. काही ठिकाणी सरकारी शाळा सुरू करा, अन्यथा खासगी शाळेत मुले दाखल करू, असा इशारा देणारी पत्रे देण्यात आली. या घटनांचा नेमका अन्वयार्थ काय? याचा अधिक विचार करण्याची गरज आहे.

सरकारी शाळांमधील शिक्षकांना संपातून बाहेर पडण्यासाठी जितका आग्रह धरला गेला, त्यांना स्थानिक नागरिकांनी पत्रे देण्यात जी तत्परता दाखवली तितकी खासगी शाळांच्या बाबतीत का दाखविली गेली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिक्षकांच्या वेतनासंबंधी जितकी चर्चा माध्यमांवर करण्यात आली तितकी चर्चा इतर क्षेत्राबाबत करण्यात आली नाही. सरकारी शाळा व्यवस्थापनात हस्तक्षेप केला तरी चालतो. खासगी क्षेत्रात हस्तक्षेप सहन केला जात नाही अथवा तेथे करणे अशक्य आहे. खासगी शाळेत फी भरली नाही तर मुले बाहेर काढली गेली तरी तेथे काहीच घडले नाही असे चित्र असते, मात्र याउलट सरकारी शाळेत पालक घडविताना दिसतात.

शाळा बंद होत्या त्याचवेळी ग्रामपंचायत बंद होत्या. तलाठी कार्यालय बंद होती. आरोग्य केंद्रही बंद होती आणि त्यासह इतर शासकीय कार्यालयेदेखील बंद होती. ती कार्यालये सुरू करण्यासाठी कोणतेही हात पुढे आले नाहीत. कदाचित इतर कार्यालये सुरू करणे कठीण असावे किंवा नको त्यांच्याशी वाईट व्हायला अशी धारणा असावी. आपली अनेक कामे त्यांच्याशी निगडित असतात. शाळा सुरू करण्यासाठी फार मोठी क्षमता लागते असे वाटत नसावे. सरकारी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी राज्यात काही लोक सरसावले. अनेक गावांत माध्यमिक विद्यालये आहेत, पण ती खासगी व्यवस्थापनाची आहेत. त्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न अपवादानेदेखील झाला नाही. अनेक ठिकाणी व्यवस्थापनाने सक्रियता दर्शवत पाठिंबा दिला. कनिष्ठ महाविद्यालयांतदेखील कडकडीत संप पाळण्यात आला. तेथे शिकवण्यासाठी कोणी पुढे आले नाही. काही ठिकाणी स्थानिक नवपुढारी आणि शिक्षक यांच्यात संघर्ष झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले.

कोणी आमची मुले खासगी शाळेत घालू, असा इशारा दिला. कोणी त्यांच्या वेतनावर येऊन नालस्ती केली. मुळात सरकारी शाळेत शिकणारी मुले ही गरिबांची आहेत. त्यांच्यासाठी राबणारे शिक्षकही त्याच संवर्गातून आले आहेत. हाती मार्कांचा उंचावलेला आलेख असताना केवळ आर्थिक परिस्थितीचा आलेख खालावलेला होता म्हणून अनेकांनी डीएड् करणे पसंत केले आणि शिक्षक झाले. काही करता येत नाही म्हणून ते शिक्षक झालेले नाहीत. अनेक विद्यार्थी केवळ परिस्थितीने शिक्षक झाले आहेत. प्रचंड क्षमता असूनही ते या पेशात आले आहेत. त्यांच्याबद्दल समाजमाध्यमांतून बदनामी करीत त्यांना नामोहरम कराल, पण त्याचा होणारा परिणाम लक्षात घेतला तर उद्या अवघ्या समाजाला नामोहरम होण्याची वेळ येईल. आज सरकारी शाळा आहेत म्हणून मोफत शिक्षण आहे. उद्या या बंद पडल्या तर खासगी शाळांची फी तरी परवडणार आहे का? आणि उद्या तुम्ही तिथे जाऊन बोलण्याचे धाडस दाखविणार आहात का?

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फार क्षमता लागत नाही असा गैरसमज झाला आहे. प्राथमिक शिक्षण कोणीही देऊ शकते ही आपल्या समाजमनाची धारणा आहे. शिक्षण प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यासाठी फार काही शहाणपण लागत नाही हा खरा गैरसमज. शिक्षक करतो तरी काय? तर केवळ पुस्तक शिकवतो, पाढे, कविता म्हणणे, पुस्तकातील धडे शिकवणे, गणिताच्या क्रिया शिकवणे यात काय विशेष असते? हे तर कोणीही शिकू शकेल ही बहुतेकांची धारणा असावी. शिक्षणाचा विचार इतका मर्यादित अर्थाने केला जाऊ लागला आहे की त्यासाठी बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र जाणणार्‍यांची गरज आहे असे कोणालाही वाटण्याची शक्यता नाही. इतकी लहान मुले शाळेत येतात तेव्हा त्यांना हाताळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. मुलांशी करावा लागणारा संवाद, जाणून घेणे, एखादी संकल्पना उलगडून दाखवणे, त्यासाठीचे अध्ययन अनुभव देणे, त्यांचे मानसशास्त्र जाणून घेणे, विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती जाणून त्यांना पूरक अध्ययन अनुभव द्यायचे असतात.

विद्यार्थ्यांना पुस्तकातील आशय, त्यासाठीच्या केवळ ओळी नाही शिकवल्या जात, तर त्या दोन ओळीत लपलेला अर्थ उलगडून दाखवला जातो. पाठ्यपुस्तक ज्या अभ्यासक्रमावर आधारित आहे त्या अभ्यासक्रमात गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य, २१ व्या शतकासाठीची कौशल्य आशयासोबत रूजवायची असतात. शिक्षणातील गर्भीत अर्थच न उलगडल्याने मुलांना शिकवणे ही अत्यंत सोपी गोष्ट वाटू लागली आहे. त्यातून या घटना समोर आल्या आहेत. लहान मूल रडतं तेव्हा ते शांत करण्यासाठी आईच असावी लागते. ते इतरांचे काम नाही, पण बाहेरून शांत करणे यात काय विशेष असं वाटेलही. दुर्दैवाने प्राथमिक शिक्षण ही जगातील सर्वात सोपी गोष्ट वाटू लागली आहे. जगाच्या पाठीवर प्राथमिक शिक्षणासंदर्भात सूक्ष्म विचार केला जातो.

शिक्षक होणे ही अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते आणि ती असतेही. जगाच्या पाठीवर अनेक देशांत शिक्षक होण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. एकवेळ तुम्हाला अधिकारी होता येईल, पण शिक्षक होणे कठीण मानले जाते. त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आपल्याकडे डीएड्, बीएड्, एमएड् यांसारख्या पदव्या प्राप्त करणे, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता चाचणी यांसारख्या विविध चाळणीतून उत्तीर्ण होऊन गुणवत्तेच्या आधारे शिक्षक होतात. शासकीय सेवेत आलेले शिक्षक हे दहावी, बारावीच्या वर्गात उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक झालेले तरुण आहेत. त्यांनी त्यासाठी आयुष्यात मेहनत घेतली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षणाच्या प्रक्रियेकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे हरवत चालले आहे.

शिक्षकी पेशा म्हणजे नोकरी नाही हे जरी खरे असले तरी अलीकडे पेशाचे सरकारीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्याही काही मागण्या असू शकतात. इतर कर्मचार्‍यांसोबत त्यांचा संप असेल तर त्यांनाही समजून घ्यायला हवे, मात्र समजून न घेता केवळ आणि अधिकार नसताना संघर्षाची भूमिका घेऊन त्यांचा आत्मविश्वास खच्ची करणार असाल तर पुढच्या पिढीला भविष्य असणार नाही. जेथे शिक्षकांचा आत्मविश्वास हरवलेला असेल, हिंमत गमावणे घडले असेल, निर्भीडता गमावणे घडले असेल तर आज त्यांच्या हाताखाली जी पिढी शिकत आहे ती पिढी उद्यासाठी निर्भीड घडण्याची शक्यता नाही. शिक्षकांच्या हाती पुढच्या पिढीचे भविष्य असते. आपण जे काही आपल्या पाल्यासाठी करीत आहोत ती सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ती संपत्ती आपण ज्या शिक्षकांच्या हाती सोपवतो त्यांच्याबद्दल आदराचा भाव नसेल तर आपण आपल्या भविष्यासाठी बरेच काही गमावत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.

वर्तमानातील शिक्षणाचे स्वरूप बदलत चालले आहे. मुळात शिक्षणातील खरा अर्थ हरवत चालल्याने त्यातील अर्थपूर्णतेचा शोध महत्त्वाचा वाटत नाही. पुस्तकाच्या पलीकडे शिक्षण नाही ही धारणा पक्की होत गेल्याने मुलांना शिकवणे सोपे वाटू लागले आहे. सहजतेने मिळालेल्या पदवीने शिक्षणाचा गाभा हरवत चालला आहे. आपल्याकडे ३५ टक्के शिक्षणात पास होण्याची वृत्ती आहे. शिक्षणात नेमलेल्या अभ्यासक्रमातील ६५ टक्के भाग येत नाही तरी पास होणे घडते. त्यामुळे पास होतो आहे ना! मग त्यात काय? खरंतर आपण पास होत असलो तरी त्या वर्गातील अपेक्षित क्षमता न येण्याचे प्रमाणच अधिक आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाचे मोल लक्षात येणे अवघड आहे. सध्याच्या विश्व विद्यापीठीय शिक्षणात ‘विद्या’ नाही अन् त्या शिक्षणात ‘विश्वाचे’ दर्शनही नाही, अशी टीका होते. संपाच्या निमित्ताने समाज व कर्मचारी यांच्यातील एकात्मतेचे दर्शन घडले नाही. आपल्यातील एकात्मता आपण हरवली असल्याचे माध्यमातून समोर आले. शिक्षण माणसामधील एकता आणि विश्वबंधुत्वाची जाणीव करून देण्यासाठी असते. आपल्या समाजात यानिमित्ताने एकमेकांबद्दलच्या द्वेषभावनेचे दर्शन घडले. मोर्चाला प्रतिमोर्चा असे उत्तर मिळाले. मागण्यांच्या मागे समाजाच्या सहानुभूतीचा अभाव दिसून आला. शिक्षणाचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे. संदीप वाकचौरे

First Published on: March 26, 2023 4:00 AM
Exit mobile version