ब्लॉगला तूर्तास मरण नाही

ब्लॉगला तूर्तास मरण नाही

वाचण्यापेक्षा बघण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे, असे सर्वसाधारणपणे जाणवू लागले आहे. सोशल मीडियामुळे तर अनेक क्रिएटर्स तयार झालेत. या क्रिएटर्सकडून वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तयार केले जाताहेत. यापैकी काही तुफान हिट होतात, तर काही अजिबात चालत नाहीत. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट व्हायरल होतेच असे नाही. पण एकूणात व्हिडिओ निर्मिती वाढली आहे. भारतातील अनेक माध्यम संस्थांनीही डिजिटल व्हिडिओ निर्मितीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. डिजिटल न्यूजरुममध्ये आता व्हिडिओ टीम स्थिरावली आहे. अवतीभोवती असे सगळे सुरू असताना हळूहळू ऑनलाईन युजर्स वाचन करणं सोडूनच देणार का, इंटरनेटवर जो आशय टेक्स्ट स्वरुपात असेल त्याचे काय होणार असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधणे वाटते तितके सोप्पे नक्कीच नाही. कारण या विषयाला अनेक कंगोरे आहेत. आपण साधारण कोणत्या दिशेने चाललो आहोत, हे समजून घ्यायचे असेल तर काही आकडे बघितलेच पाहिजेत आणि त्यातून या विषयाचे विश्लेषण करायला हवे.

इंटरनेटच्या उगमानंतर पहिला ब्लॉग 1994 मध्ये समोर आला होता. अमेरिकी पत्रकार जस्टिन हॉलच्या वैयक्तिक नोंदी पुढे पहिला ब्लॉग म्हणून ओळखला गेला. त्याला संस्थापक ब्लॉगर म्हणूनही ओळखले जाते. या घटनेला 27 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या कालावधीत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. तंत्रज्ञानाने लक्षणीय प्रगती केली आहे. सगळ्या संकल्पनाच बदलून गेल्यासारखे चित्र निर्माण झाल्याचे दिसते. सध्याच्या जमाना शॉर्ट व्हिडिओंचा, लाँग व्हिडिओंचा, स्टोरीजचा आणि पॉडकास्टिंगचा आहे. अशा वेळी ब्लॉग कोण वाचतो, असा प्रश्न पडू शकतो. पण आजही ब्लॉग वाचणारे आणि ब्लॉग लिहिणारे लोक आहेत. त्यांच्याकडून आपले विचार, मते, निरीक्षणे, विश्लेषण इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी या माध्यमाचा पद्धतशीरपणे वापर केला जातो.

इंटरनेट लाईव्ह स्टॅट्सच्या आकडेवारीनुसार, जगात सध्या 1.9 अब्ज वेबपेजेस आहेत. क्षणाक्षणाला या वेबपेजेसमध्ये वाढही होते आहे. या एकूण वेबपेजेसपैकी 51.6 कोटी ब्लॉग हे ‘टम्बलर’च्या माध्यमातून कार्यरत आहेत. तर 6 कोटी ब्लॉग ‘वर्ड प्रेस’च्या माध्यमातून वाचकांपर्यंत जात आहेत. विशेष म्हणजे हे सर्व ब्लॉग अ‍ॅक्टिव्ह स्वरुपातील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रोजच्या रोज 20 लाख ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केल्या जात आहेत. हे आकडे काही लहान नाहीत. त्यातून एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते की ब्लॉग लिहिणार्‍यांची संख्या आजही लक्षणीय आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याच आकडेवारी सोबत अजून एक माहिती पुढे येते ती अशी की, गुगलवर जाऊन शोध घेणार्‍या युजर्सला जे रिझल्ट्स दाखवले जातात. त्यापैकी 70 टक्के युजर्स रिझल्ट्सच्या पानांमधील ब्लॉग पोस्ट वाचण्याला किंवा सविस्तर माहिती देणारे लेख वाचण्याला प्राधान्य देतात. याचमुळे अनेक वेबसाईट्सनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या साईटवर ब्लॉग लिहिण्याला किंवा त्याची वेगळी कॅटेगरी सुरू करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

साधारणपणे किती शब्दांच्या ब्लॉग पोस्ट लोक वाचतात, याचाही अभ्यास करण्यात आला. त्यातून असे दिसून आले की सात मिनिटांत वाचता येईल, असे 1000 ते 1200 शब्दांतील इंग्रजी भाषेतील लेख वाचक वाचतात. अर्थात ही सरासरी आहे. व्यक्तिपरत्वे आणि विषयानुसार यामध्ये बदल होत जातो. पण 1000-1200 शब्दांपेक्षा मोठे लेख असतील तर लोक वाचण्याचा कंटाळा करतात. यासाठी सात मिनिटांचा कालावधी आदर्श म्हणता येईल. ब्लॉगच्या माध्यमातून वेबसाईटवरील ट्रॅफिकही तब्बल 2000 टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ शकते, असेही दिसून आले आहे.

हे सगळे शक्य आहे. पण त्यासाठी मुळात दर्जेदार आशय निर्मिती ही पूर्वअट आहे. आशयाच्या बाबतीत कसलीही तडजोड करून चालणार नाही. कारण शेवटी वाचक त्यासाठीच ब्लॉगकडे येतात. कोणत्या स्वरुपाचा आशय वाचण्याला वाचक सध्या प्राधान्य देतात, हेसुद्धा बघितले पाहिजे. कारण काळानुरुप त्यामध्येही बदल झाला आहे. हा बदलही समजून घेणे महत्त्वाचे आहे.

ब्लॉगिंगच्या सुरुवातीच्या काळात वाचक सर्व प्रकारच्या ब्लॉग पोस्ट वाचत होते. सुरुवातीला वाचकांच्या फार काही आवडी निवडी नव्हत्या. त्यावेळी प्रामुख्याने वैयक्तिक अनुभव, निरीक्षणे नोंदवणार्‍या ब्लॉग पोस्ट वाचल्या जायच्या. प्रवास वर्णने वाचली जायची. आलेल्या अडचणीवर आपण कसा मार्ग काढला, या स्वरुपाचे लेखही ब्लॉगच्या माध्यमातून वाचले जायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

ऑनलाईन वाचक वाचण्याच्या बाबतीत सजग होत चालल्याचे दिसून आले आहे. काही दिले तर तो वाचत बसत नाही. त्याला ज्या विषयातील ज्ञान प्राप्त करायचे आहे, ज्या विषयातील अभ्यास करायचा आहे, ज्या विषयाची सखोल माहिती हवी आहे, त्या विषयाशी संबंधित ब्लॉग पोस्ट वाचण्यालाच तो पसंती देतो. स्मरणरंजनापेक्षा आकडेवारी देणार्‍या आणि त्या आकड्याचा अर्थ लावणारे, विश्लेषण करणारे ब्लॉग वाचले जातात. सरसकट सगळ्याच विषयातले आपल्याला कळते, असे समजणार्‍यांचे ब्लॉग वाचण्यापेक्षा एखादा विषय निवडून त्याच विषयात व्यक्त होत राहणार्‍या ब्लॉगर्संना वाचक पसंती देतात. तुम्ही एखाद्या विषयापुरतेच मर्यादित लिहीत असाल तर त्याचा अर्थ तुमच्याकडे त्या विषयातील प्राविण्य आहे. ज्याचा उपयोग त्या विषयातील ज्ञान वाढविण्यासाठी होतो. यासाठीच अशा स्वरुपाच्या ब्लॉगना अलीकडच्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.

व्हिडिओ आले, पॉडकास्टिंग आले म्हणून आता ब्लॉग संपणार, ब्लॉग कोण वाचणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्यावर वर दिलेली आकडेवारी, परिस्थिती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे सांगणारी आहे. विशेष म्हणजे मार्केटिंगसाठीही 53 टक्के कंपन्या आजही ब्लॉगवरच विश्वास ठेवतात. वेबसाईटकडे ट्रॅफिक आणणे, वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करणे यासाठी ब्लॉगलाच पसंती देतात, असे अभ्यासात दिसून आले. ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली गेल्यास लोकांमध्ये वस्तू किंवा उत्पादनाबद्दल अधिक विश्वास निर्माण होतो, असेही दिसून आले.

ही सगळी माहिती काहीशी धक्कादायक नक्कीच आहे. पण ती वस्तुस्थितीला धरून आहे. उगाच कोणी वाचत नाही म्हणून लिहिणं थांबवून जसे चालणार नाही तसेच सगळेच वाचक केवळ वाचतात असे समजून व्हिडिओ निर्मिती, पॉडकास्टिंगकडे दुर्लक्षही करता येणार नाही. ज्यांना वाचायचे आहे त्यांच्यासाठी टेक्स्ट आणि ज्यांना बघायचे आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ तयार करत राहिले पाहिजे. तूर्ततरी हे आकडे इतकंच सांगतात.

First Published on: October 24, 2021 5:20 AM
Exit mobile version