वारी : एक अमृतानुभव !

वारी : एक अमृतानुभव !

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्राची प्रमुख ओळख आहे. वारकरी पंथाच्या पूर्वापार ही प्रथा चालू असल्याचे काही संदर्भ आणि दाखले मिळत असले तरी ही प्रथा निश्चित केव्हांपासून सुरू झाली हे मात्र नेमके सांगता येत नाही, परंतु वारकरी पंथाच्या सुसंघटनानंतर मात्र वारी ही परंपरा महाराष्ट्राच्या मातीतील एक प्रमुख सांस्कृतिक परंपरा बनली आहे. गेली सातशे आठशे वर्षापासून वारीचा हा अमोघ प्रवाह अविरतपणे वाहतो आहे. चैतन्य, ऊर्जा, उत्साह, आनंद आणि भक्ती यांचा महासमन्वय म्हणजे वारी! वारीला कोणी आनंदयात्रा म्हणून संबोधले तर कोणी पारमार्थिक सहप्रवास तर कोणी सामुदायिक तीर्थाटन ! पण खर्‍या अर्थाने वस्तुनिष्ठ विचार केला तर वारी म्हणजे महाराष्ट्रीयांच्या मनाच्या मशागतीसाठी होणारे एक महासंमेलन आहे. आधुनिक परिभाषेत बोलायचे झाले तर ते महाराष्ट्रीय समाजाचे चल स्वरूपातील ‘गेट टुगेदर ‘ आहे. हा एकसंध आणि निरागस, भाबड्या जनमनाचा खळाळता प्रवाह आहे.

भक्ती, शक्ती, युक्ती आणि मुक्ती या चतुरंगी घटकांचा रसरसता अनुभव येतो तो वारीतच. म्हणून महाराष्ट्राच्या समाजजीवनात या अनुभवाला तोड नाही! महाराष्ट्रात जन्मास येऊन वारीचा अनुभव न घेणे म्हणजे करंटेपणाचेच आहे असे अनेकांना वाटते, ते यामुळेच! म्हणूनच या परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. याची देही याची डोळा, आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदची! असा तुकोबांच्या शब्दातील निखळ चैतन्यदायी आनंद लाभतो तो एकमेव वारीतच. वारकरी पंथाने मराठी मुलखास व मराठी माणसास बहाल केलेला हा अनुपम्य व देदीप्यमान वारसा आहे. वारी जशी महाराष्ट्राची शान आहे तशीच ती महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान आहे. म्हणूनच तिच्या गौरवाचे पोवाडे केवळ इथेच नाही तर सात समुद्रापारही घुमत आहेत, गर्जत आहेत. ‘रत्नजडीत अभंग । ओवी अमृताची सखी । चारी वर्णातून फिरे । सरस्वतीची पालखी ।’ अशा महान संतांच्या शब्दांची पालखी खांद्यावर घेत ही वारी प्रवाहित होते आणि माणुसकीची शिकवण देते.. वारीत विविधरंगी अनुभव लाभतो. म्हणूनच वारी म्हणजे बहुआयामी अनुभव! इथे काय नसते? न्यून ते पुरते! अधिक ते सरते असते ती वारी! जगायचे कसे व का? याचे व्यवस्थापन शिकवते ती वारी!

वारकरी पंथात ‘वारी करण्याला खूप महत्व आहे. किंबहुना वारी या शब्दावरूनच वारीकर आणि वारी करणारा तो वारकरी आणि त्यांचा पंथ तो वारकरी पंथ असे या पंथाला नाव पडले संत ज्ञानदेवांनी याबाबत म्हटले आहे. ‘माझे जीवीची आवडी ! पंढरपुरा नेईन गुढी । पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले । काया वाचा मने, जीवे सर्वस्वी उदार । बापरखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर।’ गळ्यात तुळशीमाळ, एकादशी व्रत आणि पंढरीच्या वारीबरोबरच राम कृष्ण हरी या नामजपास या पंथात महत्व आहे. तसेच चार वार्‍यांपैकी आषाढी व कार्तिकी या दोन प्रमुख वार्‍या मानल्या जातात. त्यामुळेच वारीमध्ये चंद्रभागा स्नान, भक्त पुंडलिक व पांडुरंग दर्शन पंढरी क्षेत्र ही त्रिपुटी महत्वाची आहे. अनेक संताच्या घराण्यात पूर्वापार वारीची परंपरा होती. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, तुकोबा, जनाबाई या संतानी त्यांचा उल्लेख केला आहे.

सकळ तीर्थामध्ये पंढरी या क्षेत्रास सर्व संतांनी माहेर म्हणूनच संबोधले आहे. संत एकनाथ म्हणतात ‘माझे माहेर पंढरी । आहे भिवरेच्या तिरी’ एखाद्या सासरवासिनीला जशी आपल्या माहेरची ओढ लागते तशीच वारीमध्ये सर्व विठ्ठलभक्तांना विठू माउलीचे वेध लागतात आणि नकळत पाउले पंढरीची वाट चालू लागतात ‘पाउले चालती पंढरीची वाट। सुखी संसाराची सोडुनिया गाठ । वारीतील सुखापुढे संसारातील सर्व सुखे फिकी आहेत. म्हणूनच ‘या सुखाकारणे देव वेडावला ।’ असे वर्णन संतानी केले आहे. बहुजन समाजाला ईश्वरभक्तीचा निखळ, अनमोल आनंद प्राप्त करून देणारी ही जागतिक पातळीवरील एक अपूर्व आणि ऐतिहासिक घटना आहे. वारीच्या परंपरेला आज जागतिक आयाम लाभला आहे; कारण अशी अभिनव व सामुदायिक पारमार्थिक वाटचालीची घटना जगात कोठेही नाही. म्हणूनच ऐतिहासिक व तात्विक या दोन्ही दृष्टीने ही परंपरा महत्वपूर्ण ठरते.

वारी ही सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी एक महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळेच तिला पारमार्थिकतेबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक परिमाण लाभले. वारीत देह, मन आणि बुद्धीचे विकारदोष दूर होतात. नैसर्गिक पर्यटन घडते, नियोजन, संघटन, दिग्दर्शन समन्वय आणि संचालन इत्यादी व्यवस्थापनातील महत्वाचे घटक इथे कृतीशीलपणे अमलात येतात. इथे अनुशासन असते व त्यांचे स्वयंप्रेरणेने पालन केले जाते. गायन, नर्तन वादन, कीर्तन इत्यादी बरोबरच अनेक लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळाचे दर्शनही येथे घडते! आपल्या अनेक सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन आजपावेतो वारीत होत आले आहे. म्हणूनच वारीने अनेक अभ्यासकांचे, कलावंताचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडच्या काळात वारीत अनेक परदेशीय अभ्यासक आणि तरुण वर्गही सक्रियपणे सामील होऊ लागला आहेत.

आपली पारंपरिक वारी आता ‘डिजिटल’ झाली आहे. त्यामुळेच विविध प्रसार माध्यमातून वारीचे पडघम वाजू लागले आहेत. वारकरी पंथाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी मराठी संतानी वारीच्या रूपाने आपणास दिलेली ही अभिनव देणगी आहे. ही आपली सांस्कृतिक श्रीमंती आहे. महाराष्ट्राच्या देदीप्यमान व तेजस्वी इतिहासातील हे एक सोनेरी पान आहे. ज्ञानदेवांच्या ‘भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे । या मैत्रभावाचा अनुबंध जडतो तो वारीतच । मला वाटते वारी म्हणजे महाराष्ट्रीय माणसांचे सर्वात मोठे महासमेंलन आहे. या काळातील निसर्ग, विलोभनीय असतो. आषाढमास आणि भक्तिमय वातावरण यामुळे वारीचा प्रवास एक मौलिक अनुभव देऊन जातो. या काळात मशागतीचे कामे पूर्ण करून मधला विश्रांतीचा काळ असतो, परंतु अलीकडे पावसाच्या बदलत्या ऋतुचक्राचा परिणाम वारीवर होऊ लागला आहे हे निश्चित!

वारीचे रुपांतर संत तुकोबांच्या नंतर त्यांचे कनिष्ट पुत्र संत नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्यात केले. वारी करताना संत तुकोबा आणि संत ज्ञानदेव आपल्या समवेत आहेत, अशी कल्पना करून त्यांनी त्यांच्या पादुका पालखीत घेऊन वारी करणे सुरू केले. या प्रतीकात्मकतेमुळे ही संत मंडळी आपल्या समवेत आहेत अशी तमाम वारकर्‍यांची धारणा आहे. इ.स.१६८५ पासून ही पद्धत रूढ झाली. या रुढीमुळे वारीला एक नवा आयाम प्राप्त झाला आणि तिचे पर्यवसान आजच्या उत्साही, चैतन्यदायी पालखी सोहळ्यात झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक संताच्या पालख्या पंढरपूर कडे रवाना होऊ लागल्या आणि वाखरी येथे या सर्व संताच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी संत नामदेवांची पालखी त्यांना सामोरी येते हा क्षण सर्व वारकर्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला..वारीमुळे महाराष्ट्राचे महाराष्ट्रपण अबाधित आहे त्यामुळेच आपला सांस्कृतिक वारसा उन्नत करणारी ही घटना म्हणजे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती आहे. वारीत सहभागी होणे हा एक अमृतानुभव आहे तो यामुळेच !

–डॉ.अशोक लिंबेकर 

First Published on: June 26, 2022 4:00 AM
Exit mobile version