इमोशन्सचा कचरा अन् स्वप्नरूपी निचरा!

इमोशन्सचा कचरा अन् स्वप्नरूपी निचरा!

असं म्हणतात की स्वप्ने फुकटच असतात, स्वप्न पाहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत किंवा ‘बडा ख्वाब देखा!’ यासाठी अजून तरी जगातील १९५ पैकी एकाही देशाने स्वप्नांवर टॅक्स आकारायला सुरुवात केलेली नाही. पण जागेपणी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्वप्नबिजे व रोपट्याला कष्टाने सिंचन करण्यासाठी घाम गाळण्याबरोबर रक्तही आटवत जी किंमत मोजावी लागते व ती अत्यंत मोलाची असते! मेहनतीने दिवसा पाहिलेल्या स्वप्नांची मशागत करताना आतल्या आणि बाहेरच्या वादळांचा सामना करतानाच भावनांचा निचरा होण्यासाठी रात्री स्वप्ननगरीत भूकंप व त्सुनामी न आली तरच नवल वाटले पाहिजे!

आज जगभरातील वैज्ञानिकांमध्ये स्वप्नांच्या संशोधनासाठी चुरस लागली आहे. स्वप्ननगरीत डोकावत सामान्यजन हे लौकिक-अलौकिक-परमार्थ आणि भविष्यात घडणार्‍या घटनांच्या संकेताकडे पाहत असतात, तर शास्त्रज्ञ शास्त्रीय शोध घेण्यात गुंतलेले आहेत. कुणी ‘वंदा किंवा निंदा’ अभ्यासाने सृष्टीचे गूढ उकलत ‘युरेका युरेका’ करणे हाच शास्त्रज्ञांचा कामधंदा तहानभूक विसरत बनला आहे. कुणी टेम्परेचर सेंसर वापरतेय, तर कुणी मेंदूतील अल्फा, बीटा आदी वेव्हचा अभ्यास करतेय. मानवी आभामध्ये (ओरा) होणार्‍या बदलांचा सिग्नल डिटेक्ट करून त्याचे विश्लेषण काही वैज्ञानिक करीत आहेत.

कर्माची फळे व स्वप्नातील मुक्ताफळे!

मृत्यूपूर्वी आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांचा, स्वत: वेदना सहन केलेल्या त्यागाचा व दुसर्‍याला दिलेल्या वेदनेतील तळतळाटाचा व आनंदाचा पाढाच व्यक्ती अंतिम श्वास घेण्याआधी वाचत असते. म्हणजेच मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये साठलेली सर्व महत्त्वाची माहिती गतप्राण होण्याआधी ‘फास्ट फॉरवर्ड’ होतच ‘रिकॉल’ होत असते. या वैज्ञानिक सत्याचा संबंध स्वप्नांतील आभासी दुनियेशी कसा व किती आहे याचा शोध तंत्रज्ञानाचा वापर करीत आज सुरू आहे. कर्माची फळे व स्वप्नातील मुक्ताफळे यांच्या संबंधाचा उलगडा यातून होईल. कारण ‘मौत एक लंबी निंद और निंद यह छोटी मौत’ आहे, असे म्हणतात.

डाऊनलोड यूवर ड्रिम्स!

एलॉन मस्कने मेंदूत बसविता येईल अशी इलेक्ट्रॉनिक्स इंटिग्रेटेड चिप (आयसी) बनविल्यानंतर मेंदूतील सर्व माहितीसाठा हा अनुभवांसह कॉम्प्युटर व रोबोटमध्ये डाऊनलोड करता येत अमरत्व प्राप्तीकडे मानवी सभ्यतेचा प्रवास सुरू झाला आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वप्नांवर नियंत्रण ठेवणेही येत्या काळात शक्य होईल, अशी न्यू सायंटिस्ट या नियतकालिकात बातमी आहे. आपल्याला पडणारी स्वप्ने ही रेकॉर्ड करून ठेवता येतील. यासाठी जर्मनीतील म्युनिच शहरातील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

स्वप्नांच्या डॉक्टरांवर पैशांचा पाऊस!
स्वप्ने डाऊनलोड करीत मानवी शरीरात डोपामाईन लेव्हल बदलत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण करणार्‍या व विविध आजार जेनेटिक मॉडिफिकेशनने बरे करणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स डॉक्टर कम इंजिनियरची फौज विज्ञान शाखा (एज्युकेशन ब्राँच) ही कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या जगातील सर्वात जास्त पगार व पैसा देणार्‍या एक नंबर टेक्नॉलॉजीलादेखील नजीकच्या काही वर्षांत मागे टाकेल. ‘डाऊनलोड यूवर ड्रिम्स’ अशा पाट्या जगभरातील दुकानांवर कदाचित लवकरच दिसू लागतील. स्वप्नांच्या डॉक्टरांवर पैशांचा पाऊस ही ड्रीम नव्हे तर चक्क नजीकची रियालिटी आहे.

नवीन संशोधनाने भूकंप व टीकेच्या लाटा
कुठलेही नवीन संशोधन व सिद्धांत मांडले गेले की जणू भूकंप होतो. नवीन संशोधन हे आधीच्या चौकटीत कोंबण्याच्या प्रयत्नात एखादी ‘चौकडी’ असते, मग शास्त्रज्ञांना नाकारत संशोधनाऐवजी वैयक्तिक चिखलफेक व टीकेच्या लाटा हा हजारो वर्षे जुना इतिहास आहे. संशोधक हा माणूस असतो व त्याच्या चुकांतून विज्ञान पुढे जाते हे लोक विसरतात. राजकीय नेत्याने दाखविलेली स्वप्ने व संशोधकाने मांडलेले नवे सिद्धांत यात फरक असतो. जणू तो संशोधक म्हणजे परग्रहवासी आहे, असे समाजातील काही लोक समजतात. स्वप्नांबरोबर संशोधनाचाही एक विषय कदाचित होऊ शकतो.

१८९९ साली सिगमंट फ्रायड या मानसशास्त्रज्ञाने ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले तेव्हा अशीच खळबळ माजली होती. त्यालाही टीकेला व चिखलफेकीला सामोरे जावे लागले. १९०० साली सिगमंट फ्रायडने सांगितले की, स्वप्नांचा खोलवर अभ्यास मानवजातीला एक नवी दिशा देऊ शकते आणि कसे याचा शास्त्रशुद्ध उलगडा करायला सुरुवात केली तर चक्क त्याला ‘वेडा व व्हिमजिकल’ ठरविले गेले होते ही मोठी गंमत आहे. आज तोच सिगमंट फ्रायड हा संशोधक मानसशास्त्रात जणू देवच मानला जातो ही हकीकत आहे.

ड्रिम्स : द सायन्स
स्वप्न ही झोपेतील अशी अवस्था होय ज्यात मानसशास्त्रीय आणि ‘न्यूरो सायन्स’ म्हणजे चेतापेशींद्वारे मेंदूशी होणार्‍या संदेशवहनाचा संबंध येतो. मेंदूतील तार्किक आणि विश्लेषणात्मक भाग स्वप्नांच्या वेळी शिथिल झालेला असतो. झोपेच्या विशिष्ट टप्प्यात मनामध्ये अनैच्छिकपणे अवतरणार्‍या प्रतिमा, कल्पना, भावना आणि संवेदनांचा वारसा यांचा एकत्रित मिलाप म्हणजेच स्वप्न! स्वप्न हा तत्त्वज्ञानाचा आणि धार्मिक स्वारस्याचा विषय आहे, तसाच तो विज्ञानाचादेखील आहे. ड्रिम्स म्हणजे स्वप्ने समजणे हे एक ‘सायन्स’ आहे, तर स्वप्नांचा अभ्यास कसा करावा ही एक ‘इंटरेस्टिंग आर्ट’ म्हणजे कला आहे.

ड्रीम फेनोलॉजी व स्वप्नांचा प्रवास!
भवतालच्या पर्यावरणापासून अलिप्त होत माणूस जेव्हा झोपेच्या आहारी जातो, स्वप्नांच्या अद्भुत दुनियेतील सफर करून तो जेव्हा वास्तवात परततो तेव्हा जागेपणी तो स्वप्ननगरीतील प्रवास वर्णन जसेच्या तसे मांडू शकत नाही. बर्‍याचदा तर हा संपूर्ण सफरच तो विसरून जातो, पण हे असे का व कसे घडते? याच प्रश्नाचे उत्तर शोधणारी एक विज्ञान शाखादेखील आहे. स्वप्नात व्यक्ती काय अनुभवते याचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा म्हणजे ड्रीम फेनोलॉजी! तर ब्रेन फिजिओलॉजी (मेंदू शरीरशास्त्र) मध्येदेखील स्वप्न पाहणे या रंजक घटनांचा अभ्यास केला जातो.

स्वप्नायन!
खरी स्वप्ने, खोटी स्वप्ने आणि आजारपण किंवा होणार्‍या घटनांची पूर्वसूचना देणारी स्वप्ने असे ढोबळमानाने स्वप्नांचे वर्गीकरण आढळते. रामायण अग्निपुराणात, वेदांत अगदी बायबल आणि कुराण या धर्मग्रंथांतदेखील अर्थ सांगत स्वप्नांचा मागोवा घेण्यात आला आहे. प्राचीन बेबिलोनिया राज्य म्हणजे सध्याचे इराक येथे लिहिल्या गेलेल्या एपिक ऑफ गिल्गमेश या महाकाव्यात स्वप्नांचा उल्लेख आढळतो. ताबीर अल रू आणि मुंतखब अल कलाम फी तबीर अल एहलाम ही स्वप्नांवर आधारित इब्न सीरीं (६५४- ७२८) यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.

स्वप्नांचा पॅटर्न बदलतोय!
मान्सून पॅटर्नसारखाच आता स्वप्नांचा पॅटर्नदेखील बदलत चालला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. भौगोलिक परिस्थिती व व्यक्तीचे बिलिफ, अ‍ॅटीट्यूड व परसेप्शननुसार स्वप्नांच्या छटा दिसतात व भासतात. जशी रंगीबेरंगी स्वप्ने पडतात तशीच काही स्वप्ने ही कृष्णधवलदेखील असतात. स्वप्नांत चव, गंध, ध्वनी आणि वेदनादेखील व्यक्तीला जाणवतात, असा अनेकांचा अनुभव आहे. प्राण्यांना स्वप्ने पडतात आणि अनेकदा ते माणसांप्रमाणे दचकून उठतात. पक्षी, साप व किड्यामुंग्यांनादेखील स्वप्ने पडतात, असे संशोधकांचे मत आहे.

स्वप्नांचे वैज्ञानिक विश्लेषण
एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार किंवा हात धुवून मागे लागणे हे स्वनातही पिच्छा पुरवते. स्वप्नांचा कालावधी ५ मिनिटांपासून २० मिनिटे असू शकतो. व्यक्ती दररोज झोपेत तीन ते सहा स्वप्ने पाहते. यातील ९५ टक्के स्वप्ने जाग येईपर्यंत विस्मृतीत जातात. ३ ते १२ वर्षे वयोगटातील ६ टक्के मुले ही भयाण स्वप्नांनी त्रस्त असतात आणि स्त्री आणि पुरुष यांच्या स्वप्नांचा पॅटर्नदेखील एकमेकांपेक्षा भिन्न असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आपल्या प्रदीर्घ लांबीच्या स्वप्नांत चर्चा करण्यावर भर देतात, तर पुरुष भर्रकन कृती करून मोकळे होताना दिसतात.

स्वप्नांचा मागोवा घेत स्वप्ननगरीत डोकावत गूढ उकलण्याच्या मोहिमेत शास्त्रज्ञांच्या चार गटांनी ३६ लोकांवर प्रयोग केलेत. यासंदर्भात करंट बायलॉजी या जर्नलमध्ये एक रिसर्च पेपरदेखील प्रकाशित झाला आहे. ‘रियलटाईम डायलॉग बिटविन एक्सपरीमेंटर्स अ‍ॅण्ड ड्रिमर्स ड्युरींग आर ई एम स्लिप’ अशा नावाने प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाने जगाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्न सागरातील ज्ञान मोत्यांना गवसणी घालण्याच्या मानवजातीच्या अतृप्त इच्छांना उजाळा मिळाला आहे.

स्वप्न संशोधनाची रियालिटी!
अमेरिकेतील नॉनवेस्टर्न युनिव्हर्सिटी, फ्रान्सची सोर्बोनो युनिव्हर्सिटी, जर्मनीची ओसनाबुर्च युनिव्हर्सिटी आणि नेदरलँडचे रोडबुड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथे वेगवेगळ्या प्रयोगातील निष्कर्ष मात्र सारखे आढळून आले हे विशेष आहे. स्वप्न पाहणार्‍या व्यक्तींशी संवाद साधताना विभिन्न संवेदनातील फरक ओळखा. साधी बेरीज वजाबाकीची गणिते सोडवा. होकारार्थी अथवा नकारार्थी उत्तर द्या, अशा सूचना दिल्या तरीदेखील व्यक्ती आपल्या चेहर्‍यावरील हावभावांवरून प्रतिसाद देत होती आणि स्वप्न पडत असताना आढळणारी डोळ्यातील बुबुळांची हालचाल ज्याला रॅपिड आय मुव्हमेंट (आरआयएम) असे म्हणतात, जे व्यक्ती स्वप्ने पाहत होती, असे संशोधनातून सिद्ध झाले. स्वप्ननगरीतूनदेखील बाहेरच्या दुनियेशी संवाद व्यक्ती साधू शकते, असा नवा शोधच आता लागला आहे.

व्यक्ती कोणत्या प्रकारच्या स्वप्नांचे किती अचुकतेने स्मरण करू शकते? जागरण करणार्‍या व्यक्तीच्या स्वप्नांत कसा फरक पडतो? मानवी स्मरणशक्ती तसेच झोपेचा स्वप्नांशी कसा संबंध आहे? आदी प्रश्नांची उत्तरे शोधणे हा पुढील संशोधन टप्पा असणार आहे. व्यक्तीची झोप व कामांच्या सवयी आदींबाबत डाटादेखील रेकॉर्ड करतच रियल टाईम म्हणजे घटना घडत असताना जास्तीत जास्त व्यक्तींच्या स्वप्ननगरीतील गुपितांचा वेध घेण्यासाठी अनेक संस्थांतील विद्यार्थी एकत्र येऊन एक ‘थिंक टँक’ बनला आहे. तसेच एक ‘मोबाईल अ‍ॅप’देखील या पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.

शेयरिंग इज केयरिंग!
लहानपणी भीतिदायक स्वप्ने पडली की आजी गावातील पिंपळाच्या झाडाला जाऊन ऐकव असे म्हणायची. पिंपळाच्या झाडाशी केलेले शेयरिंग किंवा पिंपळाच्या झाडावर मुंजा राहतो म्हणून अथवा सुट्टीच्या असलेल्या फुरसतीच्या रविवारी आम्ही मुलांनी १०० टक्के ऑक्सिजन देणार्‍या वड-पिंपळ आदी झाडांचा स्पर्श करत पाने तोडू नये याचे ‘लॉजिक आणि फिजिक्स’ लहानपणी कळलेच नव्हते. नंतर तर चार बुकं शिकून तर ती अंधश्रद्धा पण वाटली. मग ‘शेयरिंग इज केयरिंग’ या मानसशास्त्रातील गुरुकिल्लीचे महत्त्व पटले. ‘इमोशन्सचा कचरा हाच स्वप्नरूपी निचरा’ असे कळले व मानसशास्त्रातील अज्ञात-गूढ ‘नॉन लिनियर’ गोष्टींबद्दल ‘ओढी आणि गोडी’ वाटू लागली.

स्वप्न न पडणे हा एक आजार आहे हे अनेकांना कदाचित माहीत नाही. खरंतर ‘सबकॉन्शियस माइंड’ म्हणजे अंतर्मनातील साठलेल्या भावनांचा निचरा करण्याचे काम स्वप्ने करतात हे साधेसोपे विज्ञान आहे. ‘ओ मेरे सपनों के सौदागर’, ‘तेरे हकीकत और ख्वाबों में क्या क्या हैं?’ असे विचारत जागेपणी व झोपेतही आपल्या स्वप्नांच्या प्रेशर कुकरची शिटी वाजत आहे की नाही हे आपणच आपापले तपासायला हवे हे मात्र पक्के.

 

First Published on: November 20, 2022 4:00 AM
Exit mobile version