‘ओटीटी’वरच्या बायका!

‘ओटीटी’वरच्या बायका!

नुकताच ‘दिल्ली क्राइम’ या नेटफ्लिक्स ओरीजनल वेबसिरीजला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘एमी’ पुरस्कार मिळाला आणि त्यात दिल्ली क्राइमला ‘बेस्ट ड्रामा’ म्हणून गौरवलं गेलं. दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर अनेक अंगांनी प्रकाश टाकणारी ही वेबसिरीज खरंतर भारतीय मानसिकतेची घाणेरडी आणि विकृत बाजू दाखवणारी होती. वेबसिरीज म्हणून आणि एका कलाकृती म्हणून तिला पुरस्कार मिळणं ही एक कौतुकाची बाजू आहेच, पण त्यात चित्रित केलेल्या विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणं ही भारतीय म्हणून आपल्यासाठी शरमेची बाब असायला हवी. पण या निमित्ताने प्रचंड वेगात प्रसवणार्‍या आणि लोकांपर्यंत जाऊन भिडणार्‍या अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका महत्वाच्या आणि लक्षात घेण्याजोग्या बदलाचं आपण कौतुक करायला हवं तो म्हणजे ऑनलाईन प्रदर्शित होणार्‍या वेबसिरीज आणि चित्रपटांमधून स्त्रियांचे केले जाणारे भक्कम चित्रण!

एरवी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, यशस्वी गायक, उत्तम अभिनेता अशी पुरुष नायकांची आणि सुंदर, कमनीय बांधा असलेली किंवा यशस्वी गायकाची सुंदर पत्नी अशी स्त्री नायिकांची ओळख करून देण्याचा बॉलीवुडी पायंडा मोडत ताकदवान, धीट, सत्याची चाड असलेली आणि ‘कर्तव्यदक्ष’ पोलीस अधिकारी वर्तिका चतुर्वेदी आणि या सगळ्यात स्वतःचा अर्थ शोधणारी, संघर्ष करू पाहणारी ज्युनिअर पोलीस अधिकारी नीती सिंग या दोघींनी फक्त आपले संवादच नाही तर डोळ्यातली आग, देहबोली आणि अभिनय या सगळ्यातून ज्याप्रकारे लोकांना स्क्रीनवरच्या महिला पोलीस अधिकार्‍याला स्वीकारायला भाग पाडलंय ते खूप क्रांतिकारी आहे आणि शेफाली शाह आणि रसिका दुग्गल यांनी यातूनच देशभरातल्या कितीतरी मुली आणि महिलांसाठी आदर्श प्रतिमा उभी केलीय. फक्त दिल्ली क्राइमच नाही तर अशा अनेक स्त्रीकेंद्री कथा-पटकथा, प्रमुख भूमिकांमध्ये असणार्‍या स्त्रिया आणि त्यातून उभ्या केल्या जाणार्‍या स्त्रियांविषयीचे स्टीरीओटाईप तोडणार्‍या प्रतिमा तयार करत गेल्या काही काळात ओटीटी प्लॅटफॉर्म वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या पद्धतीने वेगळा आशय मांडणारे सिनेमे आणि सिरीज घेऊन येतंय आणि ही माध्यमांमध्ये केल्या जाणार्‍या स्त्रियांच्या चित्रणातल्या एका महत्वाच्या बदलाची नांदी असू शकते.

अमॅझॉन प्राईमवरील ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ नावाची वेबसिरीज ज्याप्रकारे चार प्रौढ, स्वतःच्या अटींवर स्वतःचं आयुष्य जगणार्‍या अशा सक्षम मुलींच्या मैत्रीची गोष्ट सांगते ते तरुण आणि अविवाहित मुली म्हणून घट्ट बसलेल्या साच्याला अनेक प्रश्न विचारणारं आहे. स्वतःच्या आयुष्याचे पूर्ण नियंत्रण स्वत:कडे असलेली आणि निर्भीड पत्रकारिता करणारी दामिनी, पेशाने हुशार आणि चाणाक्ष वकील आणि नवर्‍याशी घटस्फोट घेऊन सिंगल मदर म्हणून आयुष्य जगणारी अंजना, एका खूप प्रतिगामी कुटुंबातून येऊन स्वतःच्या लैंगिकतेला स्वीकारून आपल्या पार्टनरसोबत नात्याची जबाबदारी घेणारी उमंग आणि एका गडगंज श्रीमंत कुटुंबात वाढलेली, बॉडी शेमिंगला रोखठोक उत्तर देणारी स्टॅन्डअप कॉमेडीअन सिद्धी या सगळ्या मुली बायकांनी कसं असावं, काय घालावं, कसं दिसावं, काय करावं, काय बोलावं, लग्न करावं?, कधी करावं, कुणाशी करावं या सगळ्या ‘क’ च्या बाराखडीला झणझणीत उत्तर देणारी आहे. हे सगळं श्रीमंत, शहरी आणि त्या अर्थाने प्रीव्हीलेज्ड मुलींचं जगणं आहे, हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही म्हणून ही सिरीज फक्त एका विशिष्ट वर्गाचंच प्रतिनिधित्व करते अशी टीका जरी यावर झाली असली तरी असं आयुष्यसुद्धा बायका जगू शकतात ह्याची शक्यता म्हणून या आशयाकडे आपण का पाहू नये? आणि ही शक्यता आपल्यापुढे ठेवण्यात ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ यशस्वी ठरलीय.

कशा सगळ्या बायका नवर्‍यांना छळण्यात आणि कुटुंब फोडण्यात पुढे असतात हे बिंबवणार्‍या रटाळ सासू-सून डेली सोपच्या जगात स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र भूमिका असलेली ‘मेड इन हेवन’ मधील बोल्ड, स्ट्राँग, ब्युटीफुल वेडिंग प्लॅनर तारा पर्यायी जगाचा आणि पर्यायी भूमिकांचा एक मोठा अवकाशच उभा करते. कनिष्ठ मध्यम वर्गात वाढलेली पण श्रीमंत होण्याचं स्वप्नं असलेली मेहनती, हुशार आणि चाणाक्ष तारा आयुष्यात हव्या असणार्‍या गोष्टी अनेक मार्गांनी मिळवते. तारा जितकी स्मार्ट आणि चतुर आहे तितकीच भावनिक आणि स्वतःच्या आयुष्याविषयी स्पष्टता असणारी आहे. एकतर खूपच संस्कारी आणि सोज्वळ अशा स्त्रियांच्या प्रतिमा किंवा अगदीच खलनायिका म्हणून सतत कुरघोड्या करणार्‍या स्त्री प्रतिमांच्या गोंधळात काळ्या पांढर्‍याच्या साच्यात न बसता तारा पुन्हा पुन्हा ग्रे शेड दाखवत राहते आणि म्हणून ती अपिलिंग आणि वेगळी ठरते.

त्याचसोबत अलीकडेच प्रदर्शित झालेले सिनेमे ‘बुलबुल’ आणि ‘गुंजन सक्सेना’ सुद्धा या यादीत विसरून चालणार नाही. बंगालमध्ये चित्रित झालेला एका बालवधूची गोष्ट सांगणारा बुलबुल! गावातल्या सगळ्या पुरुषांचे गूढरीत्या खून करणारी चेटकीण जरी समर्थनार्थ नसली तरी हा सिनेमा चेटकिणीच्या प्रतिमेचा अर्थ वापरून ज्याप्रकारे बालविवाह आणि पितृसत्तेचे अनेक पदर उलगडून दाखवतो ते वाखाणण्याजोगं आहे. त्याचसोबत 1999 च्या कारगिल युद्धात वैमानिक म्हणून काम करणार्‍या पहिल्या महिला वैमानिकाची म्हणजे गुंजन सक्सेनाची गोष्ट सांगणारा सिनेमा ‘महिला आणि सैन्य’ हा खूप महत्वाचा पण दुर्लक्षित असा विषय मांडतो. या दोन्ही सिनेमांमध्ये टीका करण्याजोगे अनेक मुद्दे असतील, आहेतही पण हे सिनेमे ती गोष्ट सांगतात जी बहुतेकदा सांगितलीच जात नाही. अशा न सांगितलेल्या आणि न ऐकल्या गेलेल्या गोष्टी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समोर येतायत.

ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रेक्षकवर्ग हा खूपच मर्यादित आणि एकाच विशिष्ट ‘वर्गातला’ आहे. त्यामुळे तिथले विषय हे सर्वसामान्यांचे विषय नसतात आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचतसुद्धा नाहीत हा मुद्दा पूर्ण खरा आणि मान्य करण्याजोगा आहेच. पण मुख्य प्रवाहात असे प्रयोग होणं फारसं सोपं नसतं आणि त्यामुळे त्यासाठी फारशी संधीही नसते. पण निदान ओटीटीवर असे प्रयोग होत आहेत हे मान्य करून त्यांचं कौतुक आपण करत गेलो, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत अनेक माध्यमांमधून पोहचवत गेलो तर ते सगळ्यांचे होऊ शकतात किंवा याने मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना आणि कलाकृतींना स्पर्धेत टिकण्यासाठी का होईना नव्या जगाचे, नवे विषयी नव्या दृष्टीकोनातून मांडण्यासाठी भाग पाडता येऊ शकतं. म्हणून ओटीटी सर्वसमावेशक नाही हे मान्य करून त्याला ‘पॉप्युलर’ करण्यासाठी काय करता येऊ शकतं हे आपण पाहायला हवं, नाही का?

First Published on: December 20, 2020 5:07 AM
Exit mobile version