स्त्रीवाद – पुरुषांच्या की पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात…

स्त्रीवाद – पुरुषांच्या की पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात…

बसमध्ये प्रवास करताना कानात हॅडफोन्स टाकून बाहेर व बस मध्ये न्याहाळणे हा छंद असल्यामुळे सवयीप्रमाणे एकदा असेच कानात हेडफोन्स टाकून बसमध्ये बसले होते. गाणे वाजायच्या आधी मागच्या सीटवर बसलेल्या दोन तरुण कॉलेजवयीन मुलींचे संभाषण कानावर पडलं. संभाषणाचा विषय जवळचा असल्याने गाणी सोडून तेच ऐकत बसले तर विषय होता फेमिनिझम. त्यांच्या बोलण्यात स्त्रीवादी सेलिब्रेटी बायांबद्दल त्या बोलत होत्या. त्यात काही बॉलीवूड सेलिब्रेटी महिलांची नावे घेतली गेली होती, त्या का आवडतात त्यांचा माईंड सेट कसा आवडतो वगैरे. त्या बोलत होत्या हे ऐकून बरं वाटलं की अरे सामाजिक चळवळ, विषय अभ्यासाच्या पलीकडे सर्वसामान्यपणे स्त्रीवादाची चर्चा होत आहे. पण पुन्हा बॉलीवूड सेलिब्रिटी, फिल्म याच विश्वाचा तरुण पिढीवर कसा परिणाम होत आहे हेही लक्षात आलं. त्या चर्चेतल्या दोन गोष्टी डोक्यात राहिल्या.

त्यावेळी त्या मुलींशी त्या मुद्यांवर चर्चा नाही करता आली, ती इथे या विषयावर उचित होईल, असे वाटते. त्या चर्चेतील मुद्दे होते की या फेमिनिस्ट लै वाढीव असतात, आणि दुसरा मुद्दा म्हणजे बसच्या एका बाजूला तरी पुरुषांना बसू द्यायला पाहिजे ना बायका एका बाजूला आहेत तर दुसर्‍या बाजूला पुरुषांना बसू द्यावे. आपण कशाला बसायला जावं असे ते दोन मुद्दे होते जे डोक्यात राहिले. पहिला मुद्दा हा आहे की वाढीव म्हणजे काय, वाढीव असण्याचे अनेक अर्थ निघू शकतात. स्त्रीवादी बाया वाढीवपणा करतात म्हणजे असं नेमकं काय करतात जे समाजाला रूचणारं, पचणारं नसतं. दुसर्‍या मुद्याबाबत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की खरंतर यांना शहरी बसमधील डाव्या बाजूला महिलांचे आरक्षण असले तरी उजवी बाजू ही पुरुषांसाठी राखीव नाही ती जनरल आहे, तिथे स्त्री- पुरुष कुणी ही बसू शकत हे कळलेले दिसत नाही असे लक्षात आले. जेव्हा स्त्री-पुरुष समतेसाठी पुरुषप्रधान व्यवस्थेत काही गोष्टी करायच्या असतात तेव्हा बसमधील किंवा राजकीय आरक्षण हे पुरुषांवर अन्याय करण्यासाठी नसतं ही समज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेली नसते.

त्यावेळी बसमधील प्रसंगात असे जाणवले व सोशल मीडियावरील सध्याच्या स्त्री-पुरुष समता आणि स्त्रीवादावरील लेखन वाचून असं लक्षात येत आहे की, स्त्रीवाद हा शब्द आता पदव्युत्तर पदवीच्या वर्गात शिकवण्यापुरता किंवा चळवळीपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो सर्वसामान्य मुलींपर्यंत तो पोचत आहे. सध्या तरी शहरी-निमशहरी-ग्रामीण मध्यम वर्गीय तरुण स्त्रिया हाशब्द वापरताना व समजून घेताना दिसत आहेत. हा विषय एकीकडे सिनेमे, चळवळ, संस्था, साहित्य, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असताना यामध्ये स्त्रीवाद म्हणजे काय याबद्दलची नीटशी माहिती नसताना किंवा माहिती असूनदेखील हेतूपूर्वक काही मिथक आणि अनेक गैरसमज पसरवले जातात. हे गैरसमज नेमके कोणते असतात.

स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांसाठी आहे किंवा स्त्रीवादी असणं म्हणजे पुरुषांच्या विरुद्ध असणं किंवा स्त्रियांचं श्रेष्ठत्व निर्माण करणे होय, असे मानले जाते. स्त्रीवादातील मुख्य मिथक जर कोणते असेल तर ते म्हणजे हे आहे की, स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांसाठी आहे किंवा स्त्रीवादी असणं म्हणजे पुरुषांच्या विरोधात असणं होय किंवा पुरुषांवरील अन्याय होय. असे गैरसमज का पसरवले जातात किंवा तयार का होतात, यामागे ही पितृसत्ताक व्यवस्था कशी काम करते हे लक्षात घेतले पाहिजे. स्त्रीवादी विचार व स्त्रीवादी लोकांना जर समाजातून वगळलं किंवा त्यांच्याविषयी गैरसमज पसरवले म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था टिकवणारे गुलामगिरी आणि भेदभावाचे विचार व वागणूक टिकवून ठेवली जाऊ शकते, मग ती धर्मातून येणारी गुलामगिरी असो किंवा कुटुंब व्यवस्थेतून येणारी असो, ती टिकवली म्हणजे स्वतःचे पोलिटिक्स पुढे रेटता येते. भेदभावाची व्यवस्था अबाधित राहते.

पितृसत्ताक समाज व्यवस्था हा फक्त इथल्या स्त्रियांचा प्रश्न नाही. सध्याच्या काळातील जात-भांडवल-पितृसत्तेवर आधारित समाजव्यवस्थेचा विचार केला तर त्याचा पाया हा धर्म , विवाह आणि कुटुंब संस्थेशी जोडलेला आहे हे लक्षात येते. स्त्रियांवरील बंधने ठेवण्यामागचा उद्देश हा असतो की, तिने स्वतःचा जोडीदार स्वतः निवडू नये.

त्या-त्या धर्माची, जातीची संस्कृती टिकवून ठेवावी. स्वत:च्या धर्मातील जातीतील घरच्यांनी निवडून दिलेल्या पुरुषाशी लग्न करून त्याची मुले जन्माला घालावीत हेच तीच कर्तव्य आहे हे लहानपणापासून ठसवलं जातं. लहानपणापासून स्त्रियांनी-पुरुषांनी कसं असावं व वागावं याचे साचेबद्ध नियम समाजातून कुटुंबातून कळत नकळत रुजवले जातात.

स्वतःच्या धर्मातील-जातीतील कुटुंबातील मोठे पुरुष जे ठरवतील सांगतील तसे वागावे हा नियम स्त्रियांसाठी लागू असतो तसा तो कुटुंबातील इतर लहान पुरुषांना व समाजातील इतर कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातीतील पुरुषांनाही लागू असतो. म्हणजे थोडक्यात व मुख्य असे दिसून येते की सवर्ण-उच्च-जात-वर्गीय-विषम लैंगिक पुरुषांची मक्तेदारी असे सध्याच्या समाजाचे स्वरूप आहे. यात कनिष्ठ पुरुष त्यांच्याहून किंवा सोबतच्या स्त्रियांशी समतेने वागतात का? तर नाही. सर्वच स्त्री-पुरुषांमध्ये विविध स्तरावर सत्ता व सत्तेचे डायनॅमिक्स बघायला मिळतात.

स्त्रीवाद हा एकच एक नाही. सध्या विविध प्रकारचे स्त्रीवाद अस्तित्वात आहेत. भारतातील समाज वास्तव हे पितृसत्तेसोबत जाती विषमतेचे ही खोलात रुतलेले वास्तव आहे. त्यामुळे पितृसत्ता व जातीव्यवस्थेचे आंतरसंबंध समजून घेणे तितकेचे महत्वाचे आहे. स्त्रीवादाचा मुख्य गाभा हाच आहे की, भेदभाव व विषमतेवर आधारित समाज रचना बदलून स्त्री-पुरुष समता आणणे. ज्याचा हेतू महिलांना समान राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्क आणि संधी प्राप्त करून देणे व त्यांचे संरक्षण करणे आहे. स्त्रीवाद हा समाजातील सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांसाठी व इतर लिंगाच्या व्यक्तींसाठी आहे. पण त्याचा मर्यादित आणि वरवरचा अर्थ घेतला व बघितला की तो पुरुषांच्या विरोधातील व स्त्रियांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आहे असे दाखवले जाते ज्यांना याबद्दल अर्धवट माहिती आहे किंवा ज्यांना ही व्यवस्था टिकवायची आहे अशा लोकांकडून असे गैरसमज पसरवले जातात.

स्त्रीवाद हा स्त्रियांना विनाकारणच बंडखोर बनवतो उदा. दारू पिणे, शॉर्ट कपडे घालणे, रात्री-बेरात्री एकट्याने फिरणे, लैंगिकतेवर खुलेपणाने मते मांडणे किंवा आचरण करणे इ. महिलांनी दारू पिणे, लहान कपडे घालणे, लैंगिक संबंधाची मोकळीक, चॉइस ठेवणे हे सगळ करणे म्हणजे स्त्रीवादी असणे असा समज पसरवलेला आहे आणि हा समज पुरुषप्रधान संस्कृतीवर पोसलेला आहे. थोडक्यात, पुरुषाला ज्या गोष्टी करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची गरज वाटत नाही त्या गोष्टी स्त्रियांनी विचार करून करायच्या अशी ही संस्कृती आहे. दारू पिणे हे पुरुषांच्या आरोग्यासाठी योग्य नसते, पण तेच स्त्रियांनी केले तर त्यावर तिचे चरित्र वाईट ठरवले जाते.

स्त्रिया ह्या पुरूषाप्रमाणे स्वतंत्र व्यक्ती आहेत जर एखादी मुलगी रात्री, एकटी किंवा इतर कोणाबरोबर बाहेर पडली तर ती तिची निवड आहे. तिला केलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी निवडीसाठी तिच्याविषयी चांगले किंवा वाईट मत ठरवण्याचे कारण नाही. किंवा तिच्यावर बलात्कार झाला तर तिच्याबाजूने उभे राहण्यापेक्षा तिनेच कसे रात्री बाहेर पडणे चुकीचे होते हे सांगणे चुकीचे आहे. स्त्रीवाद हा स्त्री-पुरुष भेदभाव न करता व्यक्तीच्या चॉइस चा स्वीकार व आदर करण्याचा भाग आहे. स्त्रिया जर त्यांच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी बाहेर फिरणे, लैंगिक सबंधाबाबत किंवा इतर कोणतीही चॉइस ठेवत असतील त्यावरून त्यांना हिंसा अत्याचार सहन करण्याच्या विरोधात स्त्रीवाद काम करत असतो.

हे स्त्रीवादाबद्दलच्या गैरसमजाच्या विरोधात स्त्रीवादाचे खरे विचार समाजात रुजण्यसाठी स्त्रीवादी चळवळीने आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांशी संवादी असणे गरजेचे आहे.

— प्रिया रुपाली सुभाष 
-(लेखिका लिंगभाव समता व शाश्वत शहर विकासाच्या चळवळीतील कार्यकर्ता व अभ्यासक आहे)

First Published on: March 7, 2021 4:30 AM
Exit mobile version