आदिमायेच्या नावानं

आदिमायेच्या नावानं

प्रसंग दोन वर्षापूर्वीचा. पावसाळ्याचे दिवस. जागोजागी खड्ड्याचे साम्राज्य. कुठेतरी पालिकेने डांबर टाकून खड्डे बुजवल्याची खूण राहिली होती. पाऊस आला की रस्त्यावर टाकलेलं डांबर पावसाबरोबर कुठल्याकुठे वाहून गेलं असेल. अशातच मुलं सकाळची शाळा वेळेवर गाठण्यासाठी सायकलवरून निघाली आहेत. पावसाचा जोर वाढला आहे. एक मोठा भाऊ आपल्या लहानभावाला सायकलवरून डबलसीट घेऊन निघाला आहे. सकाळच्यावेळी खासगी वहाने नाहीत, पण रस्त्यावर ट्रकचे साम्राज्य आहे. हे ट्रकवाले रस्ता हा जणू त्यांना त्यांच्या लग्नात वधूपित्याने त्यांना आंदण दिल्यासारखा मानून ट्रक चालवत असतात.

सायकल चालवणार्‍या मुलाला पावसाच्या पाण्यामुळे पुढील खड्डा दिसत नाही. सायकल खड्ड्यात अडकते मागून भरघाव वेगाने ट्रक येतो. दोन्ही मुलं ट्रकखाली चिरडली जातात. आजूबाजूला असणारी माणसं धावपळ करतात, पण दोन्ही मुलाचा प्राण गेलेला असतो. वास्तविक एवढ्या पावसात पालकांनी मुलांना सायकलने पाठवलं का? सगळीकडे हा प्रश्न!. खुद्द पालकांना देखील. दोन दिवसांनी अजून एक खबर ह्या धक्क्याने मुलांच्या आईने ह्या प्रसंगाची इतकी हाय खाल्ली की तिने देखील प्राण सोडला. दोन दिवसात ते हसतं खेळत कुटुंब उध्वस्त झालं. आजूबाजूचे लोक म्हणत होतं बाई एवढी खमकी पण मुलांच्या मागे गेली बिचारी.

वरील प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. ह्या प्रसंगावर अनेकांनी अनेकप्रकारे मल्लीनाथी केली. कोण म्हणाले आईला कळत नाही का?. एवढ्याशा पोरांना सायकलने शाळेत पाठवायचे कशाला? कोण म्हणाले सायकलने पाठवायचे तर डबलसीट कशाला, दोन सायकली पोरांना घेऊन द्यायच्या. पुढारी गप्प होते. पाऊस पडला की खड्डे पडणारच! अनेकांनी अनेक प्रश्न उत्पन्न केले पण आमच्या वॉचमनने एक महत्वाचा मुद्दा मांडला तो असा सायेब, ती माय हाय पोरांची. ती पोरांबिगर कशी राहिलं. आमच्या वॉचमनने मांडलेला मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. स्त्रीच्या आंतरिक तळमळतेचा हा भाग आहे. आपण काही गोष्टी अशाच गृहीत धरत असतो. कधी कधी आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घडून जातात. त्यावेळी आपण घेतलेली भूमिका किंवा आपण मांडलेलं मत हे बहुतेकवेळा स्त्रीला गृहीत धरून घेतलेलं असते का? असा काहीसा विचार माझ्या मनात येऊन गेला.

अरुण कोल्हटकर यांच्या ‘वामांगी’ कवितेत रखमाईची मांडलेली भूमिका याबाबतीत किती चपखल बसते ना? रखमाईचे प्रतिक घेऊन स्त्रीचे हे एकटेपण कोल्हटकरांनी एवढ्या समर्थपणे मांडलं आहे की, कोण पुरुष ते सहसा नाकारणार नाही. आजूबाजूला घडणार्‍या अशा गोष्टी जेव्हा पुन्हा पुन्हा आपण बघतो स्त्रीचा मानवतावादातून विचार करणे भाग पडते. एका स्त्रीमध्ये ह्या सर्व गोष्टी किती ठासून भरलेल्या असतात. मातृत्व ही संकल्पना किती व्यापकपणे विस्तारताना दिसते. हीच गोष्ट पुरुषांमध्ये तितक्या ठाशीवपणे येताना का दिसत नाही? स्त्रीच्या आयुष्यात होणारे बदल हे केवळ शारीरिक नसून ते सांस्कृतिक, भावनिकदेखील असतात. प्रत्येक अवस्था ही तितकीच महत्वाची. निसर्गाने स्त्रीला इतके कणखर बनवले की जात्याचाच तिचा तो गुण आहे.

पुरुष हा स्त्रीवर किती अवलंबून असतो! म्हणजे स्त्रीला त्याच्या आयुष्यातून वजा केल्यास काय उरते? माझी आजी तिच्या वयाच्या अवघ्या पन्नाशीत गेली. त्यानंतर अवघी दोन वर्षे होत नाहीत तेवढ्यात आजोबा देखील गेले. ती दोन वर्षे त्यांच्यासाठी किती कष्टप्रद होती. एखाद्या गोष्टीचा विचार करत हे बसून रहात. आजुंबाजुला काय घडतेय यावर त्यांचे लक्ष नसायचे. गावात कधी फेरी मारताना ताई हवालदारीन भेटायची ती म्हणायची अरे आमी म्हणान. ह्यो सवसार फुडे रेटलाव. तुमच्या पुर्षांच्या जीवावर आमचे सवसार झाले हत?. रे तुमी अशे फुडे गेलास की मागे काय रव्हला ता कदी बगलास काय?……सवसार बापयाच्या जीवार नाय होयत, सवसार होता तो बायलेच्या जीवार. ताईला ह्या गोष्टीचा खूप अभिमान होता. का असू नये?.

कधी दुपारच्यावेळी नंदाकाकीच्या पुढे नागेश्वराच्या कोंडीत आंघोळ करायला जायचा विषय काढला तर ती लगेच बाबू, गेलास तर परत खालच्या वाटेन येव नुको. वरच्या वाटेन ये. तिच्या बोलण्यात नेहमी कुठल्यातरी बाईचा उल्लेख असायचा. त्या बाईने म्हणे गरोदर असताना सासरच्या जाचाला कंटाळून कुठल्यातरी गावच्या कोंडीत जीव दिला होता. तिच्या मृत्यूनंतर ती बाई वरचेवर कोणाला ना कोणाला तिथे दिसते. गावोगावी असणार्‍या ह्या कोंडी असल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होत्या. सासरच्या जाचाला किंवा संसाराला कंटाळलेल्या ह्या सगळ्या माय बहिणींनी ह्या कोंडीना जवळ केलं होतं. त्यांच्या आयुष्याची परिणती ही आयुष्य संपवण्यात गेलं. कष्टकरी राबणार्‍या ह्या स्त्रिया कधी भेटल्या तर सांगायच्या अरे पुता, ह्या पोरांका बापसाच्या मागे मी बगलय. कदी चुलत्याच्या तोंडाक लागाक दिलय नाय. चुलतो ह्य्नाची जमीन घेवक बसलो हुतो पण मी कोणाक जमिनीकडे वाकड्या नजरेन बगूक दिलय नाय एवढ्या जिद्दीने ह्या स्त्रिया उभ्या राहिल्या.

ह्यातील बहुतेक स्त्रियांची दुःख ही भौतिक नव्हतीच ती मानसिक होती. त्यातील अनेकजणी खमक्या होत्या. त्यांना बाहेरचा व्यवहार कळत नव्हता, पण माणसातला देव आणि दानव बरोबर कळत होता. मुलांच्या भुकेला आणि जगण्याच्या व्यापातली नेणीव त्यांना आपसूक कळत होती. बालकवींची औदुंबर कविता कितीतरी दिवस मनात होती. बाकी सगळ्या कवितेचा अन्वयार्थ लागत होता पण पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे ह्या ओळीचा अर्थ मात्र लागत नव्हता. गावातली पायवाट पांढरी कशी असेल?. ती लालमातीची असेल किंवा काळ्या मातीची असेल जी काळ्या डोहाकडे जाते, पण ही पांढरी पायवाट कशी असेल? मग हा डोह त्याकडे जाणारी ही पांढरी पायवाट कुठेतरी ह्या संसाराला विटलेल्या आणि डोहाला जवळ करणार्‍या स्त्रियाबद्दल तर सांगत नाही ना? ह्या सगळ्यांचे नाते कुठेतरी आदिमायेशी सांगताना आढळतात. ह्या आदिमायेच्या नावाने चांगभल करताना तिच्यातील जिद्द, आपुलकी ही ह्या स्त्रियांनी घेतली. कुठल्याही आधाराशिवाय कणखरपणे उभे राहण्याची त्यांची ताकद ही इथूनच आली असावी.

मला माझी माली मावशी आठवली. तिच्या तरुणपणी माझे काका म्हणजे तिचे यजमान वारले. तेव्हा मोठा मुलगा फारतर दहा-बारा वर्षाचा असेल. मागच्या दोन्ही मुली लहान होत्या. मावशीचे शिक्षण फारतर जुनी एसएससी. मुंबईसारख्या महानगरीत येऊन दहा-बारा वर्षे झालेली. ह्या तिन्ही मुलांना घेऊन परिस्थितीशी झुंज द्यायची शक्ती तेव्हा तिच्याकडे कशी आली असेल?. मुलांच्या शिक्षणाकडे तिने जातीने लक्ष दिलं. वडिलांच्या मागे तिने त्यांना कशाचीही उणीव भासू दिली नाही. काल कोण म्हणालं एका स्त्रीकडे ही शक्ती मुळातच असते. काहीवेळा ही शक्ती अग्निसारखी निखार्‍याखाली दडलेली असते फक्त त्या निखार्‍यावरची राख बाजूला करायची गरज असते. आपला स्वाभिमान आणि स्वत्व ती जितक्या ताकदीने मांडते तितक्या ताकदीने पुरुष मांडेल असे नाही. खूपशा प्रसंगी वर उल्लेख केलेल्या कोल्हटकरांच्या रखमाईसारखी इथे तिथे नाही बघत ती पण प्रसंग आला की तिच्यातील आदिमाता अशीच जागी होते.

चार-पाच वर्षापूर्वी मी आजारपणातून उठल्यावर काही क्षण विचार करत होतो की, त्या दिवसात किती यातना भोगल्या. माझ्यापेक्षा माझ्या पत्नीने-श्रद्धाने त्या जास्त भोगल्या. त्या चार पाच महिन्यातली धावपळ आठवत राहिलो आणि असंच मस्करीत श्रद्धाला विचारलं, आजारपणात माझं काही बरवाईट झालं असतं तर काय केलं असतंस?, तेव्हा ती म्हणाली काय केलं असत काय?….मला मुलींसाठी, आई- बाबांसाठी तेवढ्या ताकदीने उभं रहावं लागलं असतं. मुलींना आणि आई-बाबांना असं वार्‍यावर सोडता आलं नसतं मला. इतक्या वर्षाच्या सहवासात श्रद्धाचं हे रूप पहिल्यांदा अनुभवायला मिळालं. स्त्रीकडे हा अंगार मूळताच असतो. रास्त परिस्थितीत संयमाने ह्याना कसं वागता येत ह्यामागे कुठली आंतरिक शक्ती कार्यरत असते हे मला कळत नाही. संत महंतांना ही शक्ती मिळवण्यासाठी काय दिव्य करावी लागली हे कधी वाचनात आलं की स्त्रीतल्या आंतरिक शक्तीची जाणीव होते. किती सहज असते हे सगळं त्यांच्यासाठी. आई, काकी, मावशी यांनी सकाळी कामाला लागल्यावर कमरेला खोचलेला पदर रात्रीच काढला असेल तेव्हा त्यांचे कर्तेपण जाणवलं नाही. बाबा घर चालवतात ही एक जाणीव तेव्हा असायची पण त्या मागची ताकद मात्र आईची होती किंवा आहे हे लक्षात यायला एवढा काळ लागला.

First Published on: March 6, 2022 4:50 AM
Exit mobile version