दीपोत्सवातील गमतीशीर किश्श्यांची धडाकेबाज आतषबाजी!

दीपोत्सवातील गमतीशीर किश्श्यांची धडाकेबाज आतषबाजी!

दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. चहुदिशांना प्रसन्नतेची लाट घेऊन येणारा आणि सर्वांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटवणारा सण. दिवाळी सण हा विविधरंगी असतो, अभ्यंगस्थानापासून ते फटाके वाजवण्यापर्यंत, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढणे, त्या रंग भरून आकर्षकरित्या सजवणे, दिवाळीनिमित्त कपड्यांची आणि नव्या वस्तूंची खरेदी करणे, कंदील बनवणे, तुलशीचे लग्न लावणे, या सगळ्या उत्सव कालावधीत गमतीशीर किस्से घडत असतात, ते या लेखाद्वारे तुमच्या समोर मांडतेय, जे तुम्हाला आनंद देऊन जातील. चला तर मग भूतकाळातील काही भन्नाट किश्श्यांचा धांडोळा घेऊया..!

किस्सा अभ्यंगस्नानाचा..

अभ्यंगस्नानावरून एक किस्सा आठवला.. तर झालं असं, दिवाळीच्या पहिल्या दिवशी एका नावाजलेल्या कंपनीची सुगंधी उटण्याची पाकिटे माझ्या पतीने कुतुहलाने आणली होती. खूप कौतुक करत होते त्या उटण्याचे कारण तसे त्यांना दुकानदाराने सांगितले होते. पहाटे अभ्यंगस्नानाला ते उटणे आम्ही वापरले पण काही केल्या त्याचा सुगंध येईना. मग घरातील सर्वांनी त्या उटणे बनवणार्‍या कंपनीच्या आणि दुकानदाराच्या नावाने चांगलाच शंख केला. त्यावेळी माझी मुलगी चार महिन्यांची होती. तिला अंघोळ घालायला मालिशचे काम करणार्‍या मावशी यायच्या. नेहमीप्रमाणे मावशी आल्या. तिला मालिश करणार इतक्यात त्यांनी मला गोंधळून प्रश्न केला, ‘अगं, बाळाची मालिशची आयुर्वेदिक पावडर कुठेय? काल तर नवीन पाकिट आणले होतेस.’ तेवढ्यात माझे पती प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहू लागले. एव्हाना घडलेला प्रकार अन् फजिती आमच्या लक्षात आली होती. पतीने वैतागून कपाळाला हात लावला व आम्हाला हसू आवरेना. सर्वांनी उटणे समजून चुकून ती आयुर्वेदिक पावडर लावली होती. ते नावाजलेले कंपनीवाले आणि दुकानदार यांचा मात्र उगाचच उद्धार झाला. तेव्हापासून दर दिवाळीला उटण्याच्या पुड्यावरून पती मिश्कीलपणे चिडवतात.

किस्सा रांगोळीचा..

आमच्या चाळीत संध्याकाळी पाच वाजल्यापासून रांगोळी काढण्यासाठी स्पर्धा सुरू व्हायची. त्याकरता चार वाजता सर्वप्रथम रांगोळीसाठी राखीव असलेल्या जागेत गेरूने छान सारवले जायचे. सारवताना हात मस्त लालम् लाल होऊन जायचे. एकदा माझ्या बहिणीला मोराची रांगोळी हवी होती. म्हणून तिने मनाशी चंग केला की आज मोराचीच रांगोळी काढायची. तसा पुरेपूर प्रयत्न देखील केला व सुरेख रंगसंगती साधत ती रांगोळी पूर्ण केली परंतु काही केल्या तो मोर दिसेना. कुठल्याही बाजूनी तसा साधा भासही होत नव्हता. तिला वाईट वाटू नये म्हणून मी काहीच बोलले नाही. इतक्यात शेजारची हेमांगी येऊन बोलली ‘ताई किती छान बदक काढला आहेस गं’ हे ऐकून मला हसू आवरेना. त्यादिवशी ते बदक बघायला म्हणून चाळीतली सर्व बच्चेकंपनी आमच्या दारात हजर झाली होती. माझ्या बहिणीला शेवटी नाईलाजाने ‘होय ते बदकच आहे’ असे मान्य करावे लागले.

किस्सा कंदिलाचा..

माझ्या शालेय जीवनातला किस्सा आहे. दिवाळीची सुट्टी सुरू व्हायच्या आधी आमच्या शाळेत कंदील बनवण्याचा उपक्रम राबवला जायचा. हा कंदील कार्डपेपर अन् जिलेटीन पेपरच्या सहाय्याने आम्ही बनवायचो. माझी हस्तकला थोडीफार चांगली होती परंतु तो कंदील काही माझ्याकडून नीट बनायचा नाही. कितीही प्रयत्न केले तरी बनवलेली कलाकृती कंदील न दिसता, स्वयंपाक घरातले शिंकाळे दिसायचे. त्यावर्षी मी हट्ट धरला की हाच कंदील घराच्या दरवाजावर लावायचा. प्रत्यक्षात ते शक्य नव्हते कारण रंगीत आकर्षक कंदील बाजारात मिळत असताना दारात हे शिंकाळे कोण लावेल..!
मी खूपच हट्ट केल्याने माझी समजूत काढण्याकरता चाळीतील एका ताईच्या मदतीने नवीन कंदील बनवण्यास वडिलांनी सुचवले. त्यावर्षी मी दिवाळीच्या सुट्टीत पहिला मोठा कंदील बनवला व तो सर्वांना आवडला देखील..

किस्सा आतषबाजीचा..

फटाक्यांच्या बाबतीत माझी मजल ‘फुलबाज्या, जमीनचक्र, पाऊस, सापाच्या गोळ्या, बंदुक-केप-टीकल्या, आपटी बॉम्ब, लवंगी..’ इथपर्यंतच. मोठ्या फटाक्यांच्या नादी मी कधी लागले नाही कारण मला खूप भीती वाटायची. त्यामुळे हा किस्सा माझ्या पतीच्या बालपणीचा आहे, जो त्यांनी मला सांगितला होता. तर झाले होते असे की, फटाक्यांमध्ये रॉकेट नामक गोष्ट मोठी गंमतशीर असते. रॉकेट वार्‍याच्या वेगाने आकाशात जाते ते बघायला फार मजा येते. ज्यांनी ज्यांनी हा प्रयोग केलाय त्यांना माहीत असेल.. हे रॉकेट काचेच्या बाटलीत उभे करून त्याची वात पेटवतात.. ह्या नुसार माझे पती आणि त्यांचे काही मित्र एकत्र मिळून हा प्रयोग करत होते. बाटलीत रॉकेट ठेवले व वात पेटवली.. ती पेटली अन् त्याच क्षणी अनावधानाने माझ्या पतीचा पाय त्या बाटलीला लागल्याने ती जमिनीवर कोसळली व ते रॉकेट उजव्या बाजूने आडवे सुटून तिथे उभ्या असलेल्या एका काकांच्या कपड्यात शिरले. त्यानंतर काय झाले असेल हे मी सांगायला नको. तुम्ही अंदाज बांधू शकता.

किस्सा खरेदीचा..

आता दिवाळीची खरेदी म्हटली की, त्याचे काही प्रकार आलेच. 1.फराळाकरता जिन्नस खरेदी करणे, 2. रांगोळी व तत्सम शोभेच्या वस्तू , 3. कपड्यांची खरेदी, 4. विजेची उपकरणे व तत्सम वस्तूंची खरेदी, 5. फटाके वगैरे..!
ह्यामधील लहान मुलांची सर्वात आवडती खरेदी असते ती फटाक्यांची. लहान मुले एकवेळ नवीन कपडे घेणार नाहीत परंतु फटाक्यांची यादी सर्वात आधी तयार असते. त्याकरता दोन दोन तास रांगेत उभे राहायची त्यांची तयारी असते. असेच एकदा फटाके खरेदी करता आम्ही एका मोठ्या दुकानात गेलो होतो, कारण फटाके कुठल्या दुकानातून, कुठल्या कंपनीचे घेतले ह्यावरून त्याची गुणवत्ता समजायची. तिथे पोहचल्यावर पाहिले तर ही भलीमोठी रांग.. जवळपास दोन ते तीन तास लागणार होते. शहरी भागात मोठ्या दुकानात फटाक्यांचे प्रकार आणि त्यांची किंमत छापलेला कागद गिर्‍हाईकाला हातात दिला जातो. मग त्यानुसार आपण आपल्या आवडीचे प्रकार निवडून व पेनाने खुणा करून ती यादी दुकानदाराला द्यावी लागते. ह्या सर्व गोष्टी खूप वेळखाऊ असतात. आम्ही कंटाळून तिथून निघालो तर रस्त्याच्या कडेला माझ्या मुलीच्या वयाचा एक लहान मुलगा आई बाबा सोबत दिवाळीचे साहित्य विकत होता. ते पाहून माझ्या मुलीने विचारले,’ ह्याला दिवाळीची सुट्टी नाही का?’ मला प्रश्न पडला खरंच की, परिस्थितीमुळे ह्या मुलाला दिवाळीच्या सुट्टीचा आनंद न घेता पालकांसमवेत वस्तू विकाव्या लागत आहेत. मी मुलीला म्हटलं, तुझे बाबा कसे नोकरी करतात..मग पगार येतो, त्यातूनच तुला काय हवे नको ते मिळते. तसेच त्याचे आई-वडील कष्ट करत आहेत व तो मुलगा त्यांना मदत करत आहे. हे ऐकल्यावर माझी अकरा वर्षाची मुलगी म्हणाली, आई आपण ह्यांच्याकडून काही वस्तू खरेदी करूया. हवे तर मला फटाके कमी घे. मला मुलीचे कौतुक वाटले. इतक्या लहान वयात तिने हा विचार केला ही बाब सुखावुन गेली. हीच खरी वैचारिक दीपावली नाही का..!

किस्सा फराळाचा..

दिवाळी आणि फराळ ह्यांचे अतूट नाते आहे. फराळाचे नाव घेताच खुसखुशीत पदार्थांची यादी तयार होते. करंजी, खाज्याचे कानोले, चकली, कडबोळी, शेव, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शंकरपाळी, अनारसे, चिरोटे, चिवडा, नानकटाई व इतर गोडाचे पदार्थ. ही सर्व पक्वान्ने, चमचमीत पदार्थ खायला जेवढे चविष्ट तितकेच बनवाताना कष्टाचे असतात.
त्यामुळेच पूर्वी घराघरात फराळ बनवताना शेजार-पाजारच्या सख्यांना मदतीकरता आमंत्रण दिले जायचे. त्यात आम्हा शालेय मुलींना खास बोलावणे यायचे कारण दिवाळीची सुट्टी पडल्यावर आम्हाला नुसती भटकंती करण्याच्या पलिकडे काही उद्योग नसायचे. तसा दिवाळीचा गृहपाठ असायचा, परंतु तो शाळा सुरू व्हायच्या चार पाच दिवस आधी केला जायचा. मग काय, दुपारचे जेवण झाले की, शेजारच्या काकूंच्या घरी सर्व मैत्रिणी जमायचो अन् काकूंना मदत करायचो. आमच्या घरी माझी आई फराळ बनवताना आम्हाला जवळही फिरकू द्यायची नाही. चुकून जरी तसा प्रयत्न केला आणि तिच्या मनासारखे काही जमले नाही तर ओरडा पडायचा. असंच एक दिवस मी आणि माझ्या मैत्रिणी शेजारच्या घरी करंजी करायच्या निमित्ताने जमलो होतो. त्यादिवशी काकूंना करंज्याचे पीठ भिजवायला थोडा उशीरच झाला होता. करंजी बनवता बनवता संध्याकाळचे पाच वाजले. मला त्यादिवशी शाळेतील एका मैत्रिणीच्या घरी जायचे होते. मी घाईघाईत पिठाच्या लाट्यात करंजीचे सारण भरून काकूंकडे तळायला दिल्या. मी बनवलेला फराळ काकूंनी वेगळ्या भांड्यात ठेवावा असा माझा हट्ट असायचा.. जेणेकरून तो कसा झालाय हे मला समजेल. त्यादिवशी केलेल्या करंज्यांपैकी दोन करंज्या घेऊन मी घरी आले. पुढे चार पाच दिवसांनी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळताना माझ्या हातचा पदार्थ खाऊ घालावा म्हणून त्या करंज्या पुढे केल्या तर गंमत म्हणजे माझा भाऊ ती करंजी खायच्याऐवजी हातात घेऊन खुळखुळ्याप्रमाणे वाजवत खेळ करत बसला होता. थोडक्यात करंजीत सारण कमी भरले गेल्याने ती पोकळ झाली होती. हे पाहून माझी आई मात्र फिदिफिदी हसत होती. मला लाजल्यासारखे झाले. पुढच्या वर्षी मी आईकडून उत्तम करंजी करायला शिकले.

किस्सा लग्नाचा..

तुळशीच्या लग्नाचा दिवस होता. माझ्या मैत्रिणीच्या घरी हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. घरासमोर प्रशस्त मांडव, आजूबाजूला सुमनांच्या माळा, तुळशी वृंदावनासमोर सुरेख रांगोळी, पूजेची मांडणी..वगैरे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत होते. घरात नातेवाईकांची गर्दी होती म्हणून मैत्रिणीचा लहान भाऊ मंदार घराच्या शेजारील मैदानात खेळत होता. तेवढ्यात समोरून एक गृहस्थ पत्ता विचारत त्याच्या जवळ आले. ह्याला चेष्टेची लहर आली. गंमत करायच्या उद्देशाने त्याने त्या गृहस्थांना चुकीचा पत्ता सांगितला व पुन्हा खेळात मग्न झाला. इथे तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. रात्री आठच्या सुमारास मुहूर्तावर हा कार्यक्रम सुरू झाला. लग्न लागल्यावर.. जमलेल्या पाहुण्यांना लाडू वाटण्याचे काम मैत्रिणीच्या भावाला दिले होते. सर्वांना लाडू वाटत असताना शेजारचे काका काकू दिसले, त्यांना लाडू देण्याकरता तो लाडवाचे ताट घेऊन त्यांच्या जवळ गेला अन् समोर ते पत्ता विचारणारे गृहस्थ दिसले. ह्याची भंबेरी उडाली व तो ओशाळून मैत्रिणीकडे आला अन् म्हणाला.. ताई मला आज धपाटे पडणार आईकडून.. हे ऐकून मैत्रिणीने त्याला आश्चर्याने विचारले, का रे, काय झालंय? ताटातले लाडू सांडले का?

अगं नाही गं ताई.. ते शेजारचे काका आहेतना त्यांच्या सोबत कुणीतरी गृहस्थ आलेत आपल्याकडे. त्यांना मी मस्करीत चुकीचा पत्ता सांगितला होता. आता ते माझी तक्रार करतील आई बाबांना.. मी व माझ्या मैत्रिणीने त्याला समजावले व तू समोरून जाऊन त्यांची माफी माग.. असा सल्ला दिला. आम्ही त्याला घेऊन काकांकडे गेलो व झालेल्या प्रकाराची कबुली देऊन दिलगीरी व्यक्त केली. ते ऐकताच काका म्हणाले, अरे हा माझा मित्र आहे बालपणीचा. खूप वर्षांनी आमची भेट होतेय. हा संवाद सुरू असताना ते काकांचे पाहुणे मात्र एकटक मंदारकडे पाहत होते. ह्याची मान शरमेने खाली गेली होती. खूप वेळाने त्यांचे शब्द कानी पडले.. तू मला चुकीचा पत्ता सांगितलास त्यामुळे इथे पुन्हा येईपर्यंत मला मोठी प्रदक्षिणा घालावी लागली. खरे तर मी खूप वैतागलो आहे पण घाबरू नकोस, तुला शिक्षा करत नाहीय कारण आम्ही बालपणी अशीच धमाल करायचो.. नाही का रे सुम्या! असे म्हणत काका मोठ्याने हसले व अचानक वातावरण हलकं फुलकं झालं. आम्ही सर्वजण पुन्हा तुळशीविवाह सोहळ्यात उत्साहाने रममाण झालो. तर असे हे दिवाळीचे किस्से..तुमच्याही आयुष्यात असे असंख्य किस्से, आठवणींच्या करंजीत सारणाच्या रूपात तुमचे जीवन गोड करत असतील. ते कायम स्मरणात ठेवा आणि साजरी करा हसरी दिवाळी.

– कस्तुरी देवरुखकर

First Published on: October 25, 2022 7:28 AM
Exit mobile version