जोडीदाराशी वागताना नेहमी लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी

जोडीदाराशी वागताना नेहमी लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी

वैवाहिक जीवनात सुरुवातीचे दिवस संपले की दोघांनाही एकमेकांचे दोष दिसू लागतात. शक्य तितके एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न होऊ लागतात. पण हळूहळू यातून परस्परांवर वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न होऊ लागतात. नात्यामध्ये स्वार्थीपणा दिसू लागतो. तुमच्या वागण्यात जर असा स्वार्थीपणा असेल तर वेळीच ओळखा आणि काळजी घ्या. कारण नात्यामध्ये स्वार्थीपणा आणि नि:स्वार्थीपणा यांचा योग्य तो मेळ साधने अत्यंत जरुरीचे असते. जर नात्यात स्वार्थीपणा आला तर ब्रेक-अप, घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते.

जोडीदाराला गृहीत धरणे-
तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या सारख्याच मनस्थितीतून जात असते. तुम्हाला जितका ताण, तणाव, समस्या, कंटाळा असतो तितकाच तिला/त्याला असतो. पण जेव्हा जोडीदाराच्या समस्येपेक्षा तुम्हाला तुमच्या समस्या जास्त मोठ्या आणि महत्त्वाच्या वाटू लागतात. तेव्हा तिथे स्वार्थीपणा सुरु होतो. अनेकदा दुसर्‍याला (जोडीदाराला) काही प्रॉब्लेमच नाहीत किंवा जे आहेत ते अगदी किरकोळ आहेत असे जेव्हा गृहीत धरुन चालणे किंवा दुसर्‍याला गृहित धरणे यातून स्वार्थीपणा प्रगट होतो.

जोडीदाराचे म्हणणे ऐकून न घेणे-
पति-पत्नीच्या नात्यामध्ये संवाद सगळ्यात महत्त्वाचा असतो. दुसर्‍याच्या इच्छा, विचार, मते जाणून घेणे महत्त्वाचे असते. दुसर्‍याच्या इच्छा, मते गृहीत धरणे किंवा अमूक विषयावर पतीला/पत्नीला काहीही मत मांडायचे नसणार हे मानून चालणे म्हणजे वर्चस्व गाजवण्यासारखे असते. त्यातून स्वार्थही दिसून येतो.

कशाचीही जबाबदारी न घेणे –
नात्यातील स्वार्थी व्यक्ती कधीही स्वत:ची चूक मान्य करत नाही. सगळ्या चुकांचे खापर ते जोडीदारावर फोडतात. अशा व्यक्ती त्यांची स्वत:ची चुकी असली तरी, स्वत:च्या चुकीबद्दल कधीही माफी मागत नाहीत वा दिलगीरी व्यक्त करत नाहीत. अगदी त्यांची स्वत:ची चूक स्पष्टपणे दिसत असली तरी.

अशा व्यक्ती निश्चितपणे स्वार्थी असतात.प्रत्येक नात्यात दोन टोके असतात. त्यामध्ये देवाण-घेवाण महत्त्वाची असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून फक्त घेतच असाल आणि देण्याचा विचारही तुमच्या मनात येत नसेल तर ती व्यक्ती अतिशय स्वार्थी आहे असे स्पष्ट होते.अशा नात्यामध्ये ब्रेक-अप किंवा घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे नाते जपताना केव्हाही स्वार्थीपणा दूर ठेवावा अन्यथा जोडीदाराशी असलेले तुमचे नाते फार काळ टिकून राहणे कठीण होऊ शकते.

First Published on: December 5, 2018 5:34 AM
Exit mobile version