खारेपाटण किल्ल्याची अनपेक्षित भेट

खारेपाटण किल्ल्याची अनपेक्षित भेट

खारेपाटण किल्ला

साधारण चार वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टीचा कालावधी साधून आम्ही गुंडये कुटुंबियांनी कोकणातील आमचं नडगिवे गाव गाठलं. मे महिन्यातील या कोकण मुक्कामात मुलांनी सुट्टीचा पुरेपूर आणि मनमुराद आनंद घेतला. त्यांचं मनसोक्त बागडणं आम्हाला आमच्या बालपणातील गावच्या भेटीची आठवण करून देणारं ठरलं. त्या काळात प्रत्येक, उन्हाळी सुट्टीत पालक आम्हाला गावी घेऊन जात असत त्याची आठवण झाली.

आमचा कोकणातील मुक्काम संपत आला असताना मुंबईला परतण्याचे वेध लागले. शिरस्त्याप्रमाणे मुंबईला परत येताना गावची भेट म्हणून कोकणातील प्रसिद्ध शेंगदाण्याचे लाडू, काजूगर आणि मालवणी खाज्याची खरेदी करण्याकरता गावापासून पाच किमी अंतरावर असणारी खारेपाटण ही बाजारपेठ गाठली. खरेदी करण्याअगोदर सहजच बाजारपेठेत फेरी मारत असताना आम्ही चौघे भाऊ बाजारपेठेच्या शेवटच्या टोकाला असणार्‍या शासकीय विश्रामगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांपर्यंत आलो. त्याचवेळी आम्हा चौघांच्याही बोलण्यात खारेपाटण किल्ल्याचा विषय निघाला. आतापर्यंत इतके वेळा गावी आलो, पण इथे खारेपाटण किल्ला आहे एवढंच ऐकून होतो, पण नक्की कुठे आहे ते पाहिले नव्हते किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला नव्हता. पण यावेळी मात्र येथपर्यंत आलोच आहोत, तर त्या किल्ल्याला भेट द्यायला हवी असे चौघांच्या मते ठरलं. लगेचच मोबाईलमधील इंटरनेटवर खारेपाटण किल्ल्याविषयी माहिती शोधली. ती शोधताना लक्षात आलं की आपण त्या किल्ल्याच्या आसपासच आहोत. मग तर किल्ल्याला भेट द्यायचीच यावर शिक्कामोर्तब झाले.

शासकीय विश्रामगृहाकडे जाणार्‍या पायर्‍या चढून गेल्यानंतर तेथे असलेल्या स्थानिक गृहस्थाकडे चौकशी केली असता त्यांनी विश्रामगृहाच्याच वरच्या बाजूने असलेला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला. तो मार्ग आम्ही पकडला आणि सुरुवातीलाच दुर्गादेवी मंदिराच्या खालच्या अंगाने असणार्‍या भुयाराचे दर्शन झाले. मंदिरापासून नदीजवळच्या घोडेपथारीपर्यंत जाणारा हा भुयारी मार्ग होता. शिवाजी महाराजांच्या काळात वाघोटण नदीच्या तीरावर असलेल्या मोठ्या कातळावर घोडे बांधले जात असत. तेव्हापासून त्या जागेला घोडेपथार असे नाव मिळाले असावे असं स्थानिकांकडून सांगितलं जातं. आम्ही त्या भुयाराच्या मुखाजवळ गेलो. ते आता वापरात नसल्यामुळे तिथं झाडेझुडुपं व वेलींचा विळखा पडलेला दिसला.

तिथं सावधपणे उतरावं लागलं कारण तीव्र उतार आहे. त्या वाटेवर जर घसरलो असतो तर सरळ खाली गेलो असतो. भुयाराची लांबीरुंदी मोजण्याकरता तिथून पुढे दुर्गादेवी मंदिरात जाऊन दुर्गादेवीचे दर्शन घेतले. बालेकिल्ल्यातच शिवाजी महाराजांनी हे मंदिर उभारले आहे. त्यानंतर जवळच असलेली पण सध्या जीर्ण अवस्थेत असलेली तटबंदी पाहिली. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर किल्ल्यावर असलेला ‘सुळाचा दगड’ पाहिला, या सर्व ठिकाणी भेट दिल्याचं स्मरणात रहावं म्हणून साहजिकच फोटोसेशन झालं. (तेवढंच आम्ही करू शकतो.)

अनपेक्षितपणे दिली गेलेली ही किल्ला भेट मनाला उभारी देणारी ठरली आणि त्या वर्षीची गावभेट सार्थकी लागली, पण या वेळी आम्ही चौघे भाऊच होतो, पण पुढच्या सुट्टीत मात्र सहकुटुंब खारेपाटण किल्ल्याला भेट देण्याचे ठरवून तृप्त मनाने निघालो. तिथून निघावंसं वाटत नव्हतं तरीही!

– दीपक गुंडये

First Published on: December 4, 2018 5:28 AM
Exit mobile version