खेळूया सुकी होळी

खेळूया सुकी होळी

Eco friendly Holi

रंगपंचमी म्हटली की रंगांची उधळण ठरलेलीच. मात्र याच होळीला मागील काही वर्षांपासून ग्लॅमरस लूक आल्याचे आपण पाहतो. दिवसभर रासायनिक रंगांची उधळण करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय या दिवशी गल्लोगल्ली पाहायला मिळतो. एरव्ही पाणीच आले नाही म्हणून बोंब ठोकणारे या दिवशी मात्र टँकर्सच्या टँकर्स पाण्याची होळी करताना दिसतात. शहरांच्या ठिकाणी तर रस्त्यावरून येणा-जाणार्‍यांवर त्यांच्या नकळत रंगांचे फुगे मारण्याचे प्रकार सर्रास दिसतात.

खरंच आपण आपले रक्षणकर्ते आहोत की भक्षणकर्ते असा प्रश्न का न पडो?मालिका, चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने होळीचा इव्हेंट साजरा केला जातो. अगदी तसाच इव्हेंट आयोजित करून धांगडधिंगा करण्याचे फॅडच मागील काही वर्षांपासून फोफावले आहे. फिल्म स्टार्स करतात म्हणून त्यांच्यासारखीच ‘होळी’ खेळून हजारो लिटर पाणी वाया घालवू लागले. होळीच्या निमित्ताने कित्येक ठिकाणी ‘रेन डान्स’सारखे चैनीचे प्रकार सुरू असतात. दुष्काळाने राज्य, देश होरपळत असताना आपण मात्र आपलेच रंग उधळत असतो. हेच का आपले संस्कृती प्रेम, संस्कृती जतन? जलव्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली असताना आपण पाण्याचा अपव्यय करणे कितपत योग्य ठरेल? याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे.

रंगपंचमी खेळायची म्हणजे पाण्यात रंग मिसळून दुसर्‍याच्या अंगावर फेकले पाहिजेच असं नाही, तर दुसर्‍यांवर कोरडे रंग टाकून, होळीच्या शुभेच्छा देऊन सुद्धा रंगपंचमी साजरी करता येऊ शकते. पर्यावरणपूरक होळी साजरी झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल. रंगपंचमी साजरी करत असताना आपल्या अतिउत्साहामुळे रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दुसर्‍याला रंग लावत असताना त्याच्या आवडी निवडीचाही विचार करायला हवा..होळीच्या नावाखाली एकमेकांना शिवीगाळ करणे, बोंब मारणे हे प्रकार थांबविले गेले तर फारच उत्तम.

First Published on: March 20, 2019 5:04 AM
Exit mobile version