अशी घ्या डोळ्यांची काळजी

डोळ्यांची काळजी

पंचेंद्रियांपैकी एक असलेला अवयव म्हणजे डोळे. डोळे हे महत्त्वाचे असून हा एक नाजूक अवयव आहे. म्हणतात ना ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ अगदी तस. या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघू शकतो. त्यामुळे या डोळ्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा हवेचे प्रदूषण, सातत्याने हातात असलेला मोबाईल फोन, संगणक आणि टीव्ही यासारख्या सांधनांचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत. मात्र, या नाजूक डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

नियमित तपासणी

अनेकदा आपले डोके दुखण्यास सुरुवात झाली का मग डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, डोळ्यांची नियमित तपासणी करणे फार गरजेचे आहे. नियमित तपासणीमुळे डोळ्यांचा नंबर वाढला असेल किंवा चष्मा लागला असेल तर कळते. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे देखील त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यांनी डोळ्यांची नियमित तपासणी करुन घ्यावी.

आयड्रॉप्स घालू नका

अनेकांना सवय असते डोळे दुखत असतील किंवा एखाद्या वेळेस डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास मेडिकलमधून आयड्रॉप्स आणून घातला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.

दर्जेदार गॉगल्स घाला

बऱ्याचदा स्वस्तात मस्त असलेले गॉगल्स वापरले जातात. मात्र, यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे गॉगल्स वापरताना ते दर्जेदारच वापरावे.

पालेभाज्यांचे सेवन करा

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. गाजर, बीट, टोमॅटो अशी ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे खावीत.

स्मार्टफोनचा वापर मर्यादित करा

टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा. संगणक आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच ३ फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या. तसेच प्रवास करताना वाचन शक्यतो टाळा.

First Published on: December 8, 2019 6:30 AM
Exit mobile version