आरोग्यदायी मोहरी

आरोग्यदायी मोहरी

मोहरी

भारतीय स्वयंपाकातील भाजी, आमटीची सुरुवात होते फोडणीनं आणि तेल तापलं की त्यात प्रथम टाकली जाते ती मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग इतर साहित्य आपण घालतो. मोहरीच्या दाण्यांनी ना पदार्थाला वास येतो, ना चव. पण तरीही फोडणीची सुरुवात होते ती मोहरीच्या चार दाण्यांनीच ती का? हा प्रश्न कोणालाही पडेल. मोहरीच्या चार दाण्यातलं गुपित उलगडून बघितल्यास भाजी, आमटीच्या फोडणीचा श्रीगणेशा मोहरीनं का करतात? हे लक्षात येतं.

कढईमधली तापमापी

मुळात साध्या रोजच्या फोडणीमध्ये आपण मोहरी, हिंग आणि हळद घालतो. हिंग आणि हळद हे दोन्ही पुडीच्या स्वरूपात असतात. तेल व्यवस्थित न तापवता जर त्यात हिंग व हळद घातली तर त्यांचा स्वाद बाहेर येत नाही. कोणत्याही मसाल्याचा स्वाद हा नेहमी उच्च तापमानाला बाहेर येतो. त्यामुळे तेल व्यवस्थित तापलं आहे याची खात्री करण्याकरिता आपण त्यात प्रथम मोहरीचे दाणे टाकतो. म्हणजेच मोहरीचा उपयोग तापमापीसारखा करतो.

मोहरीच्या दाण्यांमध्ये काळी, लाल, पिवळी आणि पांढरी मोहरी असे अनेक प्रकार आहेत. आपल्याकडे फोडणीसाठी काळी मोहरी आणि लोणच्यासाठी लाल मोहरी वापरली जाते.

मध्य पूर्व युरोपमध्ये पिवळी मोठ्या दाण्यांची मोहरी होते. मोहरीच्या सर्व जातींमध्ये ही पिवळी जात चवीला सौम्य असते. अमेरिकन यलोमस्टर्ड बनवण्यासाठी मोहरीची हीच जात वापरली जाते.

आरोग्यदायी लाभ

*मोहरीच्या हिरव्या पानांची भाजी आरोग्याला उत्तम असते. तिच्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम असतं, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहू शकतं आणि रक्तातील साखरेच्या पातळीवरही नियंत्रण राहतं.

*मोहरीच्या हिरव्या पानांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ दोन्ही जीवनसत्त्वं असतात.

*मोहरी उष्ण असल्यानं ही भाजी खास करून हिवाळ्यातच खाल्ली जाते.

*पाय मुरगळला असला तर त्यावर मोहरीचं पोटीस बांधतात; पण मोहरीमुळे त्वचेची आग होते. त्यामुळे अनेकांना ते सोसत नाही.

*मोहरीचं तेल काही ठिकाणी अंगाला मालिश करण्यासाठी वापरतात.

*स्वयंपाकातही ते वापरता आलं तर त्याच्यातील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे ते उत्तम असतं. पण मोहरी अत्यंत उष्ण असते आणि तिची अ‍ॅलर्जी होऊ शकते हे लक्षात ठेवून तेलाचा वापर मर्यादित प्रमाणातच व्हायला हवा.

First Published on: November 15, 2018 5:30 AM
Exit mobile version